आत्याचा आवाज ऐकून नंदिनी बाहेर आली. आत्या तिला म्हणाली.
” नंदिनी… मी आज खूप खुश आहे…तू आमची मान उंचावलीस बघ…”
काहीही न कळल्यामुळे नंदिनी तिथेच उभी होती. मग आत्या पुढे म्हणाली.
” अगं कॉलेजातून पहिली आलीस तू…”
” खरंच…” नंदिनी आश्चर्याने म्हणाली.
” हो तर.. हा नितीन आताच सांगत आलाय मला…” आत्या म्हणाली.
” हो वहिनी…तुम्ही शिकत असलेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला गेलो होतो मी…तेव्हा तिथे नोटीस बोर्डवर तुमचा फोटो लावलेला होता…मी तिथला मजकूर वाचला तेव्हा मला कळलं…” नितीनने स्पष्टीकरण दिले.
आता मात्र नंदिनी खूप आनंदी झाली. सरलाताईंनी सुद्धा देवासमोर साखर ठेवली आणि नंदिनी सून म्हणून मिळाली ह्याबद्दल देवाचे आभार सुद्धा मानले. नकुल तिथेच उभा राहून सगळं ऐकत होता. त्याला नंदिनीचे खूप कौतुक वाटत होते. कारण लग्नाच्या पंधरा दिवसांआधीच तिची परीक्षा झाली होती.
इतक्या सगळ्या तणावपूर्ण वातावरणात तिने कसा अभ्यास केला असेल ह्याचे त्याला खूप नवल वाटत होते. शेवटी त्याने कितीही नाकारले तरी इतक्या दिवसात सहवासाने त्याला तिची सवय झाली होती. तिच्याबद्दल एक एक गोष्ट नव्याने माहिती पडत होती. तो तिच्याकडे बघतच होता. इतक्यात त्याच्या आईने त्याला आवाज दिला. आई म्हणाली.
” ऐकलंस ना नकुल…नंदिनी पहिली आलीय तिच्या कॉलेजातून…जा पेढे घेऊन ये तालुक्याहून…”
” हो आई…” नकुल म्हणाला. पण त्याचे सगळे लक्ष फक्त नंदिनी कडे होते. मग काहीतरी सुचल्यासारखे त्याची आई त्याला म्हणाली.
” नाहीतर एक काम कर…आज तिलाच घेऊन जा सोबत…खूप दिवस झालेत ती घरातून बाहेर गेलीच नाही…तसाही आज रविवार आहे…तुलाही काही काम नसेल…”
नकुल हो म्हणायला एका पायावर तयार होता. पण नंदिनी मध्येच म्हणाली.
” कशाला आत्या…त्यांना काहीतरी काम असेल…मला सुद्धा घरी काम करायचे आहेत…नंतर कधीतरी जाईल…”
” कामाचं काय आहे ग.. ते तर आयुष्यभर पुरतात…पण आजचा दिवस विशेष आहे…जाऊन ये बाहेर…येताना पेढे पण घेऊन या…” आत्या म्हणाली.
मग नंदिनी काहीच बोलू शकली नाही. ती जाऊन तयार झाली आणि आत्याला सांगून घराबाहेर पडली. बाहेर नकुल गाडी काढून तयार होता. ती जाऊन गाडीवर बसली आणि गाडी गावाच्या बाहेरच्या दिशेने चालू लागली. तेवढ्यात नंदिनी नकुलला म्हणाली.
” सॉरी…माझ्यामुळे आज तुमचा रविवार वाया गेला…तेवढाच तुमचा आराम झाला असता…पण मी आत्याला नाही म्हणून शकले नाही…”
” ठीक आहे…नो प्रोब्लेम…मी सुद्धा खूप दिवसांपासून कुठे बाहेर फिरायला गेली नव्हतो…अन् बायकोसाठी एवढं तर करूच शकतो ना मी…” नकुल म्हणाला.
त्याला इतकं गोड बोलताना तिने पहिल्यांदा पाहिले होते. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. मग तो पुढे तिला म्हणाला.
” तू एवढी हुशार आहेस हे मला माहीतच नव्हतं…कधी सांगितले नाहीस…”
” असं कुणी स्वतःहून सांगतं का मी हुशार आहे म्हणून…” नंदिनी नाक मुरडत म्हणाली.
” नाही…पण बोलण्यातून सुद्धा कळतंच ना…पण तू तर साधं बोलत सुद्धा नाहीस माझ्याशी…” नकुल म्हणाला.
” तुम्हीच मनाई केली होती ना मला बोलायला…” नंदिनी ने त्याला आठवण करून दिली.
मग नकुलला त्याचे बोलणे आठवले. आपण हिला इतकं वाईट कसे काय बोललो हे त्याचे त्यालाही कळत नव्हते. आधीच ती बिचारी एवढ्या काळजीत होती आणि आपण सुद्धा तिला साथ दिली नाही. साथ देणे तर दूर पण तिच्याशी नीट बोललो सुद्धा नाही. आता आठवून त्याला खूप वाईट वाटत होते. त्याला त्याच्या वागणुकीबद्दल तिची माफी मागायची होती. त्याने रस्त्याने एका मंदिरा च्या बाजूला आपली गाडी उभी केली. नंदिनी ने गाडीवरून उतरून देवाचे दर्शन घेतले. परत जाताना नकुल तिला म्हणाला.
” नंदिनी…मला माहिती आहे मी तुला खूप नको ते बोललो लग्नानंतर… खरं तर त्यामध्ये तुझी काही चूक नाही ह्याची कल्पना मला तेव्हाही होतीच…पण जे काय झालं त्याचा राग मला कुणावर तरी काढायचा होता आणि मी तो तुझ्यावर काढला…मला अजूनही कळत नाही की इतका असंवेदनशील मी कसा काय वागलो…”
नकुल अशी अचानक आपली माफी मागेल ह्याची सुतराम कल्पना नसलेल्या नंदिनीला आता काय बोलावे हे काही सुचत नव्हते. ती खाली मान घालून उभी राहिली. नकुल पुढे तिला म्हणाला.
” तू घेतलेल्या निर्णयाबद्दल तुझे कौतुक करायचे सोडून मी तुलाच दोषी ठरवले…पण तू खरंच खूप धाडसी आहेस…तू माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगला नवरा डीजर्व करतेस…पण नशिबाने हे सुखाचे दान माझ्या पदरात टाकले तरी मला त्याची किंमत नव्हती आतापर्यंत…मला खरंच माफ कर…”
आता मात्र नंदिनी त्याला म्हणाली.
” प्लिज हे एवढं काही बोलू नका…ह्यातलं अर्ध तर काय डोक्यावरून सुद्धा गेलं…माझ्या मनात तुमच्याबद्दल राग नाही…”
काहीही न सूचल्याने नंदिनीने हे एका दमात बोलली. मग नकुल पुन्हा गाडीजवळ आला आणि त्याने गाडी सुरू केली. नंदिनी मागून जाऊन गाडीवर बसली. मग काहीतरी आठवून त्याने पुन्हा तिला विचारले.
” एक विचारू का…?”
” वि..चा..रा ना…” नंदिनी अडखळत म्हणाली.
” हे तू मला आहो जाहो का म्हणायला लागली आहेस अचानक…?मला फार विचित्र वाटतं…” नकुलने विचारले.
” ते आता तुम्ही माझे…म्हणजे आपलं लग्न झालंय ना म्हणून…” नंदिनी म्हणाली.
” वेडाबाई कुठली…” नंदिनीचे उत्तर ऐकून नकुल गालातल्या गालात हसत म्हणाला.
त्याच्या इतक्या चांगल्या वागण्याने नंदिनी गोंधळून गेली होती. ह्याला अचानक झालंय तरी काय ह्याचा विचार तिच्या मनात आला. पण त्याच्या मनात तिच्याबद्दल उमलत असलेल्या भावनांची तिला जाणीवही नव्हती.
त्याला तिचा स्वभाव उमगत होता. तो नकळतपणे तिच्या प्रेमात पडत होता. त्याला खूप वाटायचे की नंदिनीने स्वतःहून त्याच्याशी बोलावे. पण नंदिनी मात्र फक्त कामापुरते त्याच्याशी बोलायची. आताशा त्याला ह्या गोष्टीची चीड यायला लागली होती. इतरांच्या बायका कशा ते कामावरून आले की छान तयार होऊन समोर येतात. चहा देतात. काय हवं नको ते विचारतात.
सतत आजूबाजूला घुटमळत असतात. पण ह्या नंदिनीला तर ह्यातले काहीच सुचत नाही. पण मग त्याला आठवले की आपणच तिला तसे करायला भाग पाडले होते. पण आता आपल्याला ते नकोय. नंदिनी आपल्याशी बोलली तर चालेल आपल्याला. चालेल कशाला आवडेल. तो मनाशीच म्हणायचा.
पण या वेडाबाईला ह्यातलं काहीच सुचत नाही. सतत आईच्या आजूबाजूला असते. जसं माझ्याशी नाही आईशी लग्न झालंय हिचं. नकुल स्वतःशीच म्हणाला आणि मग स्वतःच गालातल्या गालात हसला. लग्न झाल्यावर आज इतक्या दिवसांनी त्याने तिला नीट न्याहाळले होते.
उंचपुरी, गोऱ्या रंगाची, काळ्याशार डोळ्यांची आणि किंचित कुरळ्या केसांची नंदिनी किती सुंदर दिसते ना. हल्ली साड्या नेसायला लागलीय तेव्हापासून तर एकदमच खुलून दिसते. डोळेसुद्धा किती बोलके आहेत. ऐनवेळी लग्न करावं लागल्याने आपण तिच्यावर चिडून तिला नको ते बोललो.
तेव्हा घाबरलेल्या हरिणीसारखे तिचे डोळे का वाचता नाही आले आपल्याला ह्याचे त्याला विलक्षण नवल वाटत होते. तिच्या रूपाने त्याच्या आयुष्यात भरभरून प्रेमाचं चांदणं बरसलं होतं. फक्त त्याला ते आता कळत होतं. पण त्याला त्याच्या आई बाबांचे मात्र फार कौतुक वाटले.
त्यांनी आजवर आपल्यासाठी कधीच चुकीचा निर्णय घेतला नाही ह्याची जाणीव आज पुन्हा एकदा झाली त्याला. नकुल नंदिनीच्या प्रेमात पडला होता आणि नंदिनीला अजूनही ह्याची जाणीव झाली नव्हती. एक नवं प्रेम खुलत होतं, आकार घ्यायला लागलं होतं.
अन् एक जुनं नातं आलेल्या अडचणींचा सामना करून पुन्हा एकत्र यायला सज्ज झालं होतं. ते होतं नंदिनीच्या आई बाबांचं. नंदिनी चे बाबा परतल्यावर सगळ्यात आधी स्वतःच्या घरी न जाता त्यांच्या सासुरवाडीला आले होते. तिथे गेल्यावर त्यांना कोणी एका चकार शब्दानेही दुखावलं नाही.
उलट नेहमी जसा मानपान व्हायचा तसाच मानपान यावेळीही झाला. त्यांचा मेव्हणा सुधीर तो सुद्धा खूप जिव्हाळ्याने त्यांची विचारपूस करत होता. त्यांना हवं नको ते विचारत होता. सासरच्या ह्या मान त्यांना मेल्याहून मेल्यासारखे झाले होते.
त्यांच्या मनात विचार तरळून गेला की कधीकधी रक्ताच्या नात्यापुढे इतर नात्यांना कमी लेखतो. पण आयुष्याच्या वळणावर आणि अनेक नाती आपल्यासोबत जुळतात जी आपल्या चांगल्या वाईट परिस्थितीत सुद्धा बदलत नाहीत. सतत आपल्यासोबत खंबीर पणे उभी राहतात. प्रसंगी मान अपमान गिळून सुद्धा.
जर आपल्या बहिणीचा कुणी इतका अपमान केला असता तर कदाचित आपण सुद्धा त्यांच्याशी इतकं चांगलं वागू शकलो नसतो. पण उषा च्या माहेरची तऱ्हा वेगळीच होती. कोणत्याही परिस्थितीला शांततेने तोंड देणे ही कला तर त्या भावंडांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाली होती.
म्हणूनच तर उषा इतकी समंजसपणे वागायची. आपण मात्र आलेल्या परिस्थितीशी सामना न करता त्याला शरण जातो. चिडतो, ओरडतो, दुसऱ्यांवर दोषारोप करतो पण उषा या सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आहे. त्यांना उषाताईंच्या घरच्यांची माफी मागायची होती पण त्यांना सगळ्यात आधी त्यांच्या उषाला पाहायचे होते.
किती त्रास दिला तिला. लग्नाला इतकी वर्षे झाल्यानंतर कुणी आपल्या बायकोला माहेरी पाठवतं का हा विचार त्यांच्यासमोर तरळून गेला. दोन महिन्यात उषा मनातून किती खचली असेल ह्याची त्यांना कल्पना आली होती. त्यांच्या सासूबाईंनी त्यांच्या येण्याची कल्पना उषाताईंना दिली आणि उषाताई घाईघाईने त्यांच्या जवळ आल्या. उषाताईंना पाहताच प्रकाशरावांना आपल्या सगळ्या चुका पुन्हा जशाच्या तशा आठवल्या.
त्यांची मान आपसूक खाली गेली. त्यांची मनस्थिती लक्षात यायला उषाताईंना फार वेळ लागला नाही. त्या स्वतःहून त्यांना म्हणाल्या.
” तुम्ही कधी आलात…? मी तुमच्यासाठी चहा आणते…” एवढं बोलून त्या स्वयंपाकघराकडे जाणार इतक्यात सुधीरची बायको संध्या स्वतःच चहाचा ट्रे घेऊन आली आणि म्हणाली.
” मी आणलाय ताई चहा…”
मग प्रकाशरावांच्या समोर टेबलवर चहा आणून ठेवला. प्रकाशरावांना आता काहीच खायची प्यायची इच्छा होत नव्हती. ते उषाताईंना आर्जवाने म्हणाले.
” उषा…मी तुला घ्यायला आलोय…चल आपण घरी जाऊया…”
हे ऐकून उषाताई आणि त्यांच्या माहेरचे सगळे जण त्यांच्याकडे पाहतच राहिले.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.
प्रकाशराव आपल्या चुका कशा सुधारतील…? नंदिनी आणि नकुलच्या आयुष्यात ही सुखाची नांदी असेल का…? उषाताईंना जेव्हा शालू ताईंचे सत्य कळेल तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया असेल…? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.