” कधी सांगणार आहेस… तुझं लग्न झाल्यावर…अरे तुझ्यावर विश्वास ठेवून मी माझ्या घरच्यांना आपल्याबद्दल सगळं सांगितलं होतं…आता कोणत्या तोंडाने मी त्यांना सांगू की आदित्यच्या लग्नासाठी मुली पाहणं सुरू झाल्या आहेत म्हणून…कसं सांगू की आदित्य ने त्यांच्या बोलण्याला अजिबात सीरिअसली घेतलेलं नाही म्हणून…?” रेवती म्हणाली.
” अगं इतकी मोठी गोष्ट सुद्धा नाही बघ ही…आता फक्त सुरूच झाल्यात मुली पाहणं…अजुन खुप वेळ लागेल ह्या सर्वांना….आणि मी लवकरच सांगणार आहे घरी…” आदित्य म्हणाला.
” तू इतक्या मोठ्या गोष्टीला इतक्या सहजपणे कसा काय घेऊ शकतोस रे…तू हे असे वागून आपल्या नात्याचा अपमान करतो आहेस असे नाही का वाटत तुला…मी तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणून तू मला सतत गृहीत धरणार आहेस का…तुझ्यासाठी मुली बघणे सुरू झाले आहे आणि तू मलासुद्धा ह्याची काहीच कल्पना दिली नाही…आणि आता नाही सांगणार तर कधी सांगणार… तुझं लग्न ठरल्यावर…मला तुझा शेवटचा निर्णय सांग…एकतर तू तुझ्या घरी आज सांगायचं नाहीतर मला कायमचं विसरून जायचं…कारण मी त्यांचा नकार सहन करू शकते पण तुझ्याकडून हा जो माझ्या प्रेमाचा अपमान होतोय ना तो सहन नाही करू शकत…” रेवती म्हणाली.
” हे बघ रेवती…तू जरा जास्तच रिॲक्ट होत आहेस…” आदित्य म्हणाला.
” आज सांगणार की नाही ते सांग आधी…?” रेवती ने विचारले.
” इतक्यात नाही सांगू शकणार मी त्यांना…तू समजुन घे ना…” आदित्य म्हणाला.
” ठरलं तर मग…ही आपली शेवटची भेट…यानंतर आपले रस्ते वेगवेगळे…” रेवती म्हणाली आणि तिथून उठून निघून गेली.
आदित्यने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती नाही थांबली. आदित्यला वाटले की आजवर जसे लहान सहान भांडण व्हायची आणि त्यानंतर रेवती लगेच त्याच्याशी बोलायला यायची त्याप्रमाणे आजही ती स्वतःहून त्याच्याशी बोलायला येईल. रेवती मात्र फक्त रागातच नव्हती तर तिला आदित्यचे वागणे अजिबात आवडले नव्हते. आदित्य तिला आणि तिच्या प्रेमाला गृहीत धरत होता हे तिला आज कळून चुकले होते.
आदित्य रोज रेवतीला एखादा कॉल करायचा पण रेवती ने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. पण आदित्यने ह्यापेक्षा जास्त काहीच प्रयत्न देखील केले नाहीत तिला समजवायला. त्याला माहितीच होते की दरवेळी प्रमाणे रेवती यावेळेला ही स्वतःच बोलायला येईल. त्याने नेहमीप्रमाणे तिला गृहितच धरले होते.
त्यानंतर एके दिवशी अचानकच त्याला कळले की तिचं लग्न झालंय. तो एकदमच बिथरला. रेवती असे काही करू शकते ह्याचा त्याने कधीच विचार नव्हता केला. त्याने तिला भेटण्याचा प्रयत्न केला पण सगळंच व्यर्थ ठरलं. तिची आणि त्याची भेट होऊ शकली नाही.
तेव्हापासून मात्र आदित्यचा पार देवदास झाला. आदित्य रोज मनातून रेवतीला दूषणं द्यायचा. सतत तिला आठवून भावूक व्हायचा. तिची जास्त आठवण आली की दारू सुद्धा प्यायचा. ह्या सर्वांमुळे त्याच्या कामावर सुद्धा परिणाम होत होता. सतत चिडचिड करायचा. त्याच्यात झालेला बदल त्याच्या घरच्यांच्या लक्षात आला होता. त्याला घरच्यांनी विचारले देखील पण त्याने अजूनही त्यांना काहीच सांगितले नाही.
तो अजूनही विचारातच होता इतक्यात त्याच्या मोठ्या भावाने त्याला आवाज दिला आणि तो त्याच्या विचारातून बाहेर आला. त्याचा भाऊ त्याला म्हणाला…
” आदित्य… औषधं आणलीत का..?”
” नाही दादा…बस आणतोच आहे…”
एवढे बोलून आदित्य पुन्हा औषध आणायचे म्हणून तिथून बाहेर निघून गेला. तो औषधं घेऊन परत आला. आणि त्याला ती पुन्हा दिसली. बहुतेक कुणाचीतरी वाट पाहत असावी. तो तिच्याजवळ गेला आणि तिला म्हणाला.
” रेवती…”
रेवतीने चमकून वर पाहिले. आदित्य ला पाहून तिला फारसा आनंद झालेला दिसला नाही. तरीपण ती त्याला म्हणाली.
” बोल…इथे कसा…?” काहीतरी बोलावे म्हणून तिनेच विषय सुरू केला.
” ते जाऊदे…पण तू इथे कशी…आणि ती ही एकटीच…बरी आहेस ना…” तो काहीसा उपहासाने म्हणाला.
” तू माझी काळजी करू नकोस…मी ठीक आहे…तू तुझी काळजी कर…” त्याच्या निस्तेज चेहऱ्याकडे पाहून ती म्हणाली.
” माझी ही हालत तुझ्यामुळेच झालीय…का सोडून गेलीस तू मला अशी अचानक…ते ही न सांगता…”
” अचानक कुठे गेले…चांगले चार वर्ष सोबत होतो आपण…मी तर तुझ्याबद्दल माझ्या घरीसुद्धा सांगून ठेवलं होतं…माझ्या बाजूने मी खूप प्रयत्न केले होते…पण तूच कुठेतरी कमी पडला स…”
” मी फक्त घरी सांगितलं नव्हतं…ही काय खूप मोठी गोष्ट होती…कधीतरी सांगितलच असतं ना…”
” तुझ्यासाठी नसेल पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती…कारण मी आधीच माझ्या घरी सांगून ठेवले होते…माझ्यावर माझ्या घरच्यांचा दबाव होता…आणि तू काहीच प्रयत्न करत नव्हतास…तू तुझ्या कंफर्ट झोन मधून बाहेर येतच नव्हतास…तुझ्या घरच्यांनी नकार दिला असता तर मी एकदाच समजून घेतलं ही असतं…पण प्रेमासाठी थोडाही संघर्ष करण्याची तयारी नव्हती तुझी..
तू कमालीचा निर्धास्त होतास…तू आपल्या नात्यासाठी काहीच पाऊल उचलले नाहीस…मी तुझ्या प्रेमात वेडी होते आणि तू मात्र मला सतत गृहितच धरायचास…आणि एकदा का मी माझा स्वाभिमान गुंडाळून तुझ्या पायाशी वाहिला असता तर संपूर्ण आयुष्यभर मला तू गृहितच धरले असते…तुझा हा एकंदर दृष्टिकोनच माझ्यासाठी खूप निराशाजनक होता…
तेवढ्यातच पुन्हा माझ्यासाठी कुणीतरी स्थळ सुचवले…बाबा म्हणाले की आता तुला निर्णय घ्यावाच लागेल…बाबांचं म्हणणं सुद्धा बरोबरच होतं…त्यांची काळजी त्यांच्या जागी योग्यच होती…तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम तर होतं पण त्या प्रेमासाठी सन्मान नव्हता…एखाद्या नात्यात प्रेम कमी असलं तरी चालेल पण सन्मान हा असायलाच हवा…त्यामुळे मी वारंवार तुला समजावत राहिले आणि तू मात्र सतत दुर्लक्ष करून एकप्रकारे माझ्या प्रेमाचा अपमानच केलास…
तरीही मला वाटले की एकदा तुझ्याशी बोलावे पण तेव्हाच मी तुझे तुझ्या मित्रांसोबतचे केरळच्या सहलीचे फोटो बघितले सोशल मीडिया वर…मी इकडे प्रचंड दबावाखाली होते आणि तू मात्र एन्जॉय करत होतास…तेव्हाच माझा निर्णय झाला होता…माझ्या आयुष्याबद्दल मी जो निर्णय घेतला होता तो काहीसा चुकतोय हे जेव्हा मला जाणवलं तेव्हा मी स्वतःच्या आयुष्याचा निर्णय बाबांवर सोपवला…आणि आज मला या गोष्टीचे समाधानच आहे…” रेवती म्हणाली.
” पण तू माझा विचार सुद्धा केला नाहीस…” आदित्य म्हणाला.
” आज जर तू दुःखी असशील तर फक्त तुझ्यामुळेच आहेस…तू वेळेवर काहीच प्रयत्न केले नाहीस म्हणून…आणि वेळ कधीही कोणासाठीही थांबत नाही…त्यामुळे मला दोष देणे बंद कर आणि स्वतः एका नव्या आयुष्याची सुरुवात कर…” रेवती म्हणाली.
आदित्य काही बोलणार इतक्यात त्याचा मोठा भाऊ आणि त्याचे वडील तिथे आले…रेवतीला पाहून आदित्यचे वडील म्हणाले…
” थँक यू बाळा…मी पडल्यावर तू लगेच माझ्या मदतीला धावून आलीस…आणि माझ्यासोबत दवाखान्यात सुद्धा आलीस…आजकाल कोण कोणासाठी एवढं करतं…?”
” थँक यू नका म्हणून काका…मोठ्यांनी फक्त आशीर्वाद द्यावेत… आता लवकर बरे व्हा आणि स्वतःची काळजी घ्या…” रेवती म्हणाली.
इतक्यात रेवतीचा नवरा सुद्धा तिला घ्यायला तिथे आला. ठाणे सुद्धा आदित्य च्या वडिलांची विचारपूस केली. आणि दोघेही तेथून निघाले. त्या दोघांना जाताना पाहून आदित्यचे बाबा म्हणाले.
” खूप चांगली मुलगी आहे बघ…मला लागलेलं पाहून तिची गाडी तिथे रस्त्यातच उभी करून माझ्यासाठी टॅक्सी शोधली आणि मला इथे घेऊन आली…आदित्य साठी सुद्धा आपल्याला अशीच एखादी मुलगी मिळायला हवी बघ…”
बाबांचे बोलणे ऐकून आपण एकदाही रेवती बद्दल घरी न सांगितल्याचे आदित्य ला आता खूप वाईट वाटत होते.त्यांना दोघांना सोबत पाहून आदित्य मनातल्या मनात आपण आयुष्यात काय गमावलंय ह्याचा हिशोब करत होता. त्याच्या पाणावलेल्या डोळ्यात त्याने त्याच्या प्रेमासाठी काहीही न केल्याचा पश्चात्ताप दिसत होता.
कधीकधी नुसते प्रेम करून भागत नाही तर प्रेमाच्या वाटेत येणाऱ्या अनेक कसोट्या देखील पार कराव्या लागतात. आणि ज्या प्रेमात आपल्याला सन्मान मिळत नसेल तिथे वेळीच थांबणे ही गरजेचे असते.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करा.
अप्रतिम कथा अश्या शब्दात , मांडणी केली आहे की वाचतांना अस वाटतं आपण तो क्षण जगत आहे,story संपली की कळत की ही तर story होती😄😊
Kharach sundar story.