रश्मी आज बऱ्याच दिवसानंतर माहेरी आली होती. तसे पाहिल्यास तिच्या सासर आणि माहेरामध्ये फारसं अंतर नाही पण जबाबदाऱ्या वाढल्यामुळे आता वर्षातून फक्त दोनदा माहेरी यायला मिळायच. ते ही फक्त एक ते दोन दिवसांसाठी.
पण यावेळी मात्र रश्मी चांगली पंधरा दिवसांसाठी आली होती. त्याला कारणही तसेच होते. रश्मीच्या भावाचे रोहनचे लग्न होते. त्यामुळे रश्मी तिच्या चार वर्षांच्या माहेरी आली होती. तिचा नवरा राजेश लग्नाच्या दोन दिवस आधी येणार होता.
लग्नाच्या तयारीत दिवस कसे निघून गेले तिला कळलच नाही. पाहता पाहता लग्नाचा दिवस उजाडला. सगळेजण खूप उत्साहात होते. पण रश्मीचा नवरा मात्र पूर्ण लग्नमंडपात नाराज दिसत होता. त्याचे कारण म्हणजे रश्मीच्या वडिलांनी इतर पाहुणे मंडळी समोर त्यांच्या दुसऱ्या जावयाची खूप स्तुती केली पण ते राजेशबद्दल फारसं काही बोलले नाहीत. ह्याचा राजेशला राग आला होता.
तसंही राजेशला नेहमीच वाटायचं की त्यांना त्यांच्या दुसऱ्या जावयाचं जरा जास्तच कौतुक आहे. कारण त्यांचा लहान जावई विनय एका मोठ्या हुद्द्यावर नोकरीला होता आणि राजेश मात्र एक कारकून. त्यामुळे जेव्हा विनय बद्दल त्याचे सासरे कौतुकाने बोलायचे तेव्हा राजेशला तो स्वतःचा अपमान वाटायचा. त्यामुळे जेव्हा त्याच्या सासारेबुवांनी पाहुण्यांसमोर विनयची स्तुती केली तेव्हा मात्र त्याला खूप राग आला.
राजेशला राग आलाय हे उत्साहाच्या भरात रश्मीच्या लक्षात आले नाही. रश्मी तिच्या लहान मुलीला सांभाळत भावाच्या लग्नाच्या प्रत्येक विधीत बारीक लक्ष ठेवून होती. कुणाला काय हवं नको ते विचारत होती. लग्न पार पडलं आणि सर्व वऱ्हाड नवरीला घेऊन घरी आलं. घरी पोहचताच रश्मीच्या नवऱ्याने तिला बाजूला येण्याची खूण केली. रश्मी त्याच्याशी बोलायला गेली तेव्हा तो म्हणाला…
” तुझ्या घरच्यांना माझा अपमानच करायचा होता तर मला लग्नात बोलावले तरी कशासाठी..?”
” म्हणजे…तुम्ही काय बोलतात मला कळलं नाही…काही झालंय का..?” रश्मीने काळजीच्या सुरात विचारले.
” होय…तुझे वडील जाणूनबुजून माझ्यासमोर विनय रावांना मोठेपणा देतात…आणि आज त्यांनी मुद्दामहून विनय रावांना नवरदेवाच्या गाडीतून घेऊन गेले आणि मी लग्नाला कोणत्या वाहनाने येणार आहे ह्याची साधी चौकशी देखील केली नाही…म्हणजे मला काही मान आहे की नाही…आता जोपर्यंत त्यांना त्यांची चूक कळत नाही तोपर्यंत तू इथे तुझ्या घरीच राहा…माझ्यासोबत माझ्या घरी यायची काही गरज नाही…” राजेश असे म्हणून रागाने पाय आपटत तिथून निघून गेला.
राजेशचे शब्द ऐकून रश्मी मटकन खाली बसली. आता नेमकं काय करावं हे तिला सुचत नव्हतं. राजेश असे काही बोलेल यावर तिचा विश्वास बसत नव्हता. आजपर्यंत राजेशच्या घराला स्वतःचे घर आणि त्याच्या सुखात आपले सुख पाहणाऱ्या रश्मीला राजेशला क्षणार्धात परके करून टाकले होते.
सहा वर्षांपूर्वी रश्मीचे लग्न राजेशसोबत झाले होते. रश्मीच्या वडिलांनी राजेशला तिच्यासाठी पसंत केले होते आणि वडिलांची पसंती रश्मीने आनंदाने स्वीकारली होती. राजेश सोबत लग्न झाल्यावर तिने त्याच्या घरालाच आपलं घर आणि त्याच्या माणसांना आपली माणसे मानली.
राजेशच्या मोठा परिवार होता. राजेश, त्याचे आईवडील, लहान बहीण आणि भाऊ, आणि आता रश्मी सुद्धा त्याच्या कुटुंबाचा एक भाग बनली होती. घरात फक्त राजेशच कमावणारा होता. त्याचा पगार तसा चांगला होता पण बहीण भावांच्या शिक्षणामुळे हातात शिल्लक राहत नव्हता. शिवाय त्यांचे घर देखील भाड्याचे होते.
रश्मी आधीपासूनच खूप समंजस होती. घरची आर्थिक परिस्थिती पाहता तिने राजेशकडे कधीही कुठल्या गोष्टीसाठी हट्ट केला नाही. उलट त्याला मदत म्हणून घरीच शिलाईचे काम सुरू केले. घरी आर्थिक मदत व्हायला लागली आणि हाती पैसा शिल्लक राहू लागला. रश्मीच्या शिलाईच्या कामात जम बसला आणि रश्मी बऱ्यापैकी कमवायला लागली. राजेश आणि रश्मीने मिळून बऱ्यापैकी पैसे साठवले होते.
इतक्यात रश्मी आणि राजेशच्या संसाराला बाळाची चाहूल लागली. राधिकाचा जन्म झाला आणि रश्मीने काही काळापुरता कामांपासून ब्रेक घेतला. राधिका दोन वर्षांची झाल्यावर रश्मीने पुन्हा शिलाई च्या कामाला सुरुवात केली. रश्मी आणि राजेशने मिळून तिच्या नणंदेचे थाटामाटात लग्न लावून दिले.
आता रश्मीच्या दिराला सुद्धा चांगली नोकरी लागली होती आणि तो सुद्धा लग्न करून स्थायिक झाला होता. दोघांनीही आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली होती. आता त्यांना नवीन घर घेण्याचे वेध लागले होते. दोघांनीही थोडेफार पैसे जमा करून एक छोटेसे घर विकत घेतले.
आणि आज त्याच घरात येण्यापासून राजेश रश्मीला मनाई करत होता. रश्मीने तर त्या घराला दोघांचे घर मानले होते. पण तिला आज कळून चुकले होते की मुली ह्या सर्वांना नेहमीच परक्या असतात. माहेरी लहानपणापासूनच त्यांना परक्यांचे धन म्हणून सांभाळले जाते तर सासरी सुद्धा ती नेहमीच परकी मानली जाते. तिचे स्वतःचे असे घर नसतेच.
रश्मीला खूप वाईट वाटले होते. तिच्या भावाचे लग्न होऊन आता आठ दिवस झाले होते. घरातील सर्व पाहुणे एव्हाना निघून गेले होते. रश्मी अजूनही माहेरीच असल्याने शेजारी पाजारी कुजबुज करू लागले होते. शेवटी तिच्या आईनेच तिला ती कधी जाणार असल्याचे विचारले तेव्हा झाला प्रकार तिने तिच्या आईला सांगितला. आणि आईने ही गोष्ट तिच्या वडिलांच्या कानावर घातली.
रश्मीचे वडील तडक राजेशच्या घरी आले आणि त्यांची समजूत काढली. झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. आणि पुन्हा असे काही होणार नाही असेदेखील म्हणाले. आणि रश्मीला तिच्या सासरी सोडून आले.
रश्मी पुन्हा तिच्या…म्हणजेच तिच्या नवऱ्याच्या घरी परतली होती. राजेश रश्मीसोबत अगदी काही झालेच नाही असा वागत होता. पण रश्मी मात्र त्याच्या वागण्याने दुखावून गेली होती. तिच्या आजूबाजूला सर्वकाही पूर्वीप्रमाणेच होते पण तिच्या मनातून मात्र काहीतरी तुटले होते. अशा परिस्थितीत ती खरंच पूर्वीप्रमाणे संसार करू शकेल का ?
आपल्या आजूबाजूला देखील असे बरेचदा घडते. जिथे एक स्त्री आपल्या कुटुंबासाठी आपले अस्तित्व देखील विसरून जाते तिथे तिला केवळ गृहीत धरले जाते. घराला घरपण देणारी गृहलक्ष्मी खरंच परकी असते का हो..?
समाप्त.
Photo credit- pixel
©®आरती लोडम खरबडकर.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या ‘मितवा’ या फेसबुक पेज ला लाईक करा.