” हे काय वृषाली…नाही नाही म्हणत आठ महिने झाले आहेत आपल्या लग्नाला…पण अजूनही तू माझ्यासोबत माझ्या नोकरीच्या ठिकाणी राहायला आलेली नाहीस…मी कंटाळलो आहे आता बाहेरचं जेवून…” अजित काहीशा रागानेच म्हणाला.
” मला कळतंय रे…तुलाही वाटतच असेल ना मी तुझ्यासोबत असावं म्हणून…पण तू समजुन घे ना…आईंची तब्येत अशी असताना मी तुझ्यासोबत येणं बरोबर आहे का…?” वृषाली म्हणाली.
” अगं पण आता बरी आहे ना आईची तब्येत…चांगली चालते, फिरते…तू म्हणत असशील तर मी बोलून घेतो ना आईशी…” अजित म्हणाला.
” पण आईंना आजकाल कामांची फारशी सवय नाही राहिली रे…आणि बाबांचं पण पथ्य पाणी बघावं लागतं…” वृषाली म्हणाली.
” अगं पण निशा वहिनी पण राहतातच की याच शहरात…काही दिवस आई बाबा तिकडे राहू शकतात किंवा दादा वहिनी पण इथे येऊन राहू शकतात…” अजित म्हणाला.
” पण आईंना त्यांच्याकडे करमत नाही आणि त्यांना इथे करमत नाही…दोघींचं फारसं पटत सुद्धा नाही…” वृषाली म्हणाली.
” जा मग…तुला वाटेल तसं कर…” अजित पुन्हा रागात म्हणाला.
अजित बाजूच्याच शहरात नोकरी करायचा. रोजचे येणे जाणे झेपत नसल्याने त्याने तिथेच सरकारी क्वार्टर मध्ये राहणे पसंत केले होते. दोन तीन दिवसाआड तो घरी यायचा. त्याचं आणि वृषालीच लग्न आठ महिन्यांपूर्वी झालं होतं. त्याचा मोठा भाऊ सुजित आणि त्याची वहिनी त्याच शहरात पण वेगळे राहायचे.
सासूबाईंचे आणि निशा वहिनीचे काही फार पटले नाही म्हणून लवकरच दोघेही वेगळे झाले. तशा वृषालीच्या सासुबाई चांगल्या धडधाकट होत्या. पण वृषाली आणि अजितचे लग्न झाले आणि त्यानंतर आठच दिवसात सासुबाई पायऱ्यांवरून घसरूनपडल्या.
तेवढंच निमित्त झालं आणि सासूबाईंच्या पायाला चांगलाच मार बसला होता. आणि मग काही दिवस पायाला प्लास्टर लावावं लागलं होतं. मग वृषाली ने काही दिवस आईंकडेच राहायचे ठरवले आणि अजित ने सुद्धा त्याला होकार दिला.
आईंची सेवा करावी हा उद्देश तर होताच पण जेव्हा सासुबाई पाय घसरून पडल्या तेव्हा घरी त्यांना भेटायला आलेल्या पाहुण्यांकडून हे सगळं वृषालीच्या पायगुणामुळे झालंय असं दबक्या आवाजातून बोलल्या जात होतं. म्हणून कुठेतरी वृषालीच्या मनात त्याबद्दलच गिल्ट होतं. आणि म्हणूनच मग सासूबाईंच्या प्लास्टर निघालं तरी आणखी काही दिवस त्यांना आराम म्हणून वृषाली तिथेच राहिली होती.
अजित सुद्धा शनिवार रविवार घरी यायचा. मग वृषाली सुद्धा घरीच राहायची. आता तर सासुबाई पूर्णपणे चांगल्या झाल्या होत्या. अगदी चालत फिरत होत्या. पण आता त्यांना घरातल्या कामांची फारशी सवय नसल्याने मग आताही वृषाली घरीच राहायची. पण अजितला मात्र आता असं वाटू लागलं होतं की वृषालीने त्याच्या सोबत राहायला हवं.
वृषालीची सुद्धा इच्छा होतीच अजित सोबत राहायला जायची पण आधीच मनात गील्ट असल्याने सासूबाईंना सध्या सोडून जने तिला योग्य वाटत नव्हते. आणि म्हणूनच अजित तिच्यावर रागावला होता. आणि त्याचा रुसवा घालवावा म्हणून अजित आज त्याच्यासाठी खास त्याच्या आवडीचे पदार्थ करणार होती.
त्यासाठी काही सामान आणायचे म्हणून ती जवळच असलेल्या मार्केट मध्ये जायला निघाली. ती निघणार इतक्यातच आईंची एक मैत्रीण त्यांच्या घरी आली. त्या दोघींना चहा देऊन मग वृषाली बाहेर निघाली. अर्ध्या रस्त्यात आल्यावर तिला आठवले की ती पर्स घरीच विसरली आहे ते.
मग ती पुन्हा घराच्या दिशेने निघाली. बाहेरचं गेट उघडुन ती आत आली. घराचा दरवाजा उघडाच होता. आणि आत मधून आईंचा आणि तिच्या मैत्रिणीचा आवाज तिच्या कानावर पडला. त्यांच्याजवळ जाऊन ती त्यांच्याशी बोलणार इतक्यात आईंच्या मैत्रिणीचे बोलणे वृषाली च्या कानावर पडले. मैत्रीण सासूबाईंना म्हणत होती.
” तुझं बरं आहे प्रभा…चांगली सून भेटली आहे तुला…फक्त तुझी सेवा करायची म्हणून लग्न झालं तेव्हापासून इथेच आहे…”
” कसली माझी सेवा ग…मी चांगली ठणठणीत आहे आता…हे इतकं मोठं, सुखसोयींनी युक्त घर सोडून लहानशा सरकारी क्वार्टर मध्ये जायची इच्छा नसेल तिला…आणि इथे सगळंच तर आहे की…म्हणून नसेल जात…नाहीतर मला काय गरज आहे…आयुष्यभर केलीच की मी घरातील कामे…अगदी ती लग्न करून घरी येईपर्यंत मीच सांभाळलं माझं घर…” सासुबाई नाक मुरडत म्हणाल्या.
” अगं पण तुझा पाय फ्रॅक्चर झाला होता तेव्हा तिच होती ना तुझ्याजवळ… तुझं सगळंच केलं तिने…” मैत्रीण म्हणाली.
” कसलं काय ग…ती नसती तर काय माझं भागलं नसतं का…आजकाल पैशांनी सगळंच मिळतं…कामाला एखादी बाई ठेवलीच असती…आणि हिच्या कामाला काही चव नाही…पोळ्या जाडच काय करेन, भातात मिठच नाही टाकणार, भाजीत मसाला जास्त टाकेन…त्यापेक्षा मी माझं माझं चांगल करू शकते…पण आता ती करते म्हटल्यावर काही बोलता येत नाही…” सासुबाई म्हणाली.
आणि त्या सरशी सासुबाई आणि तिची मैत्रीण दोघीही हसल्या. आणि त्यांचे बोलणे ऐकून वृषालीचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता . सासुबाई आपल्याबद्दल असा विचार करते हे ऐकून वृषालीचा चांगुलपणा वरचा विश्र्वासच डळमळीत झाला होता. आपण नवीन लग्न होऊन सुद्धा सासूबाईंच्या सेवेसाठी इथेच राहिलो. त्यांचं प्लास्टर निघेस्तोवर घराच्या बाहेर पाय देखील ठेवला नाही.
त्यांना काय हवं काय नको ते सतत पाहिलं. प्रसंगी मध्यरात्री सुद्धा त्यांच्या हाकेला धावून गेली. आणि सासूबाईंनी आपल्या सेवेचं हे मोल दिलं. वृषालीने स्वतःशीच कसलातरी विचार केला आणि रूममधून तिची पर्स घेऊन मार्केट मध्ये निघून गेली. तिथून सगळं सामान आणलं आणि रात्री जेवणात अजितच्या आवडीचे पदार्थ केले.
संध्याकाळी जेवणाच्या टेबलवर अजितने जेव्हा त्याच्या आवडीचा स्वयंपाक बघितला तेव्हा तो खुश झाला. तेव्हा सासूबाईंनी विचारले.
” अरे वा वृषाली…नेहमीप्रमाणेच खूपच छान बेत केला आहेस जेवणाचा…जेवण सुद्धा चविष्ट झालंय…आज काय विशेष…?”
” तसे विशेष असे काही नाही…फक्त आज सगळं ह्यांच्या आवडीचे केले आहे…आणि एरव्ही मला स्वयंपाक जमतोच कुठे…काढू पोळ्या जाड होतात तर कधी भाजीत मसाला जास्त…” वृषाली म्हणाली.
वृषाली चे बोलणे ऐकुन सासुबाई विचारात पडला पण अजित म्हणाला.
” थँक्यू वृषाली…”
” मला तुम्हाला आणखी काही सांगायचं आहे…” वृषाली म्हणाली.
” काय…?” अजितने विचारले.
” मी तुमच्यासोबत राहायला येण्याचा निर्णय घेतला आहे…” वृषाली म्हणाली.
” खूपच छान…”
अजित खुशीतच म्हणाला. पण सासूबाईंनी मात्र तिचे बोलणे ऐकून तिला विचारले.
” अगं पण असे अचानक का…? आणि इथे कसे मॅनेज होईल…?”
” सगळं होईल आई…आता तशीही तुमची तब्येत ठणठणीत आहे…आणि मी घरात यायच्या आधीसुद्धा तुम्ही छान घर सांभाळत होतातच की…आणि आजकाल पैसे दिले की सगळंच मिळतं…एखादी कामवाली पण ठेवता येतेच…” वृषाली म्हणाली.
” अगं पण…” सासुबाई पुढे बोलूच शकल्या नाहीत. त्यांना कळले की वृषालीने मघाशी त्यांचे बोलणे ऐकले म्हणून. आपण वृषालीबद्दल असे बोललो ह्याचे त्यांना सुद्धा वाईट वाटले. खरं तर बोलण्याच्या ओघात त्या बोलून बसल्या होत्या. आणि इतके दिवस वृषालीने निस्वार्थीपणे त्यांची जी सेवा केली होती त्याचे मोल त्यांना तेव्हा कळले नव्हते.
पण जेव्हा त्यांना त्यांची चुकी कळली तेव्हा त्यांना वाटले की वृषालीची माफी मागून तिला थांबायला सांगावे म्हणून. पण त्या ते करू शकल्या नाहीत आणि लवकरच वृषाली अजित सोबत राहायला निघून गेली. सासूबाईंना मात्र आपल्या वागण्याचा पश्चात्ताप झाला. ती निघून गेल्यावर तिचे महत्त्व जरा जास्तच कळले.
कधीकधी आपल्यासाठी जेव्हा कुणी काहीतरी करतं. तेव्हा त्याची जाणीव ठेवणे महत्त्वाचे असते. नाहीतर नकळतपणे आपण त्या चांगल्या व्यक्तीला गमावून बसतो.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.