बापमाणूस

 

पारूला डिलिव्हरी साठी सरकारी दवाखान्यात दाखल केले होते. पारूची अवस्था बघून हरी सुद्धा घाबरला होता. काहीही न सुचल्याने दवाखान्यातच तो इकडून तिकडे चकरा मारत होता. इतक्यात नर्स बाहेर आली आणि त्याला आनंदाची बातमी देत म्हणाली.

 

” अभिनंदन…तुम्हाला मुलगी झाली आहे…”

 

हे ऐकून हरी आनंदाने वेडा झाला होता.

“पारू, बघ ना…आपल्या घरी लक्ष्मी आली आहे!” तो नवजात बाळाला हातात घेऊन म्हणाला.

 

पण पारू आणि धूरपताबाईंचा चेहरा उतरलेला होता. धूरपताबाई हरीला म्हणाल्या.

” पहिला तर मुलगाच व्हायला हवा होता. मुली तर परक्याच धन असतात. शेवटी मुलाचाच आधार असतो.”

 

आईचे बोलणे ऐकून पारू आणखीनच चेहरा पाडून बसली आणि म्हणाली.

 

“देवाने पहिला मुलगा द्यायचा असता. म्हणजे म्हातारपणाची काळजी राहिली नसती..”

 

हरी शांतपणे म्हणाला,

“अगं, काय बोलतेस तू पारू. असं बोलू नये. देवाने आपल्या घरात लक्ष्मी पाठवली आहे. मुलगा-मुलगी असा भेद आपण कशाला करायचा?”

 

तेव्हा त्या दोघी गप्प बसल्या पण दोघी मायलेकींच्या मनात मुलगा नसल्याची खंत घर करून बसली होती.

 

गावाच्या टोकाला असलेल्या छोट्याशा घरात हरी आणि पारूचा संसार सुरू होता. दोघेही कष्टकरी होते. हरी दिवसभर मजुरी करायचा तर पारू शेतात जाऊन काम करायची. पैसा फार नव्हता, पण दोन वेळच्या भाकरीची चिंता नव्हती.

 

पारूची आई धूरपताबाई त्यांच्यासोबतच राहत होती. तिचा मुलगा तिला नीट सांभाळत नव्हता, म्हणून पारूने तिला आपल्याजवळच ठेवून घेतले होते.

 

बाराव्या दिवशी मुलीला पाळण्यात घातले तेव्हा मोठ्या हौशीने हरी ने मुलीचे नाव आनंदी ठेवले होते. पारू मात्र अजूनही तिच्या नशिबाला नावं ठेवत होती. आनंदी मात्र तिच्या बाबांच्या कुशीत वाढत होती.

 

कामावरून थकून आल्यावर हरी सर्वात आधी मुलीला उचलून घ्यायचा.

बाबांना पाहून आनंदी खुदकन हसायची. हरीचा सगळाच थकवा दूर पळून जायचा.

 

काही वर्षांनी पारूला पुन्हा दिवस गेले. यावेळी धूरपताबाई आणि पारूने नवस, उपवास, देवदेव सगळं सुरू केलं. “यावेळी मुलगाच झाला पाहिजे.” असे जवळपास रोजच देवाला सांगायच्या. हरी त्या दोघींनाही समजावायचा. की जे होईल ते देवाच्या इच्छेने होईल.

 

पण दोघींचे एकच स्वप्न होते—मुलगा. नऊ महिने पूर्ण झाले. सगळे दवाखान्यात होते. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले.

 

“अभिनंदन, मुलगी झाली आहे.”

 

हे ऐकताच हरीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

 

पण पारू आणि धूरपताबाईंचे चेहरे पडले. अगदी सुतक असल्यासारखं वावरत होत्या दोघीही. पारू तर मुलीला फारशी जवळ सुद्धा घेत नव्हती. घरी आल्यावर सुद्धा त्या बाळाकडे फारसं कोणी लक्षच देत नव्हतं. हरीनेच तिचं नाव ठेवलं— भाग्यश्री.

 

तो दोन्ही मुलींना सारखंच प्रेम द्यायचा. रात्री दोघी त्याच्याकडून गोष्ट ऐकल्यावरच झोपायच्या. तो त्यांच्या केसांवरून हात फिरवत राहायचा.

म्हणायचा की देवाने माझ्या पदरात दोन राजकन्या टाकल्या आहेत. दोघींना बघून त्याच्या डोळ्यांत माया आणि वात्सल्य दाटून यायचं. पण पारू मात्र सतत नशिबाला दोष देत होती. आल्या गेल्याजवळ दोघीही मुलगा न झाल्याचं रडगाणं गायच्या.

 

एक दिवस पारूची मावसबहिण घरात आली. तिला एक मुलगा होता पण दुसऱ्यांदा बाळ होत नव्हतं. तिने पारू आणि धुरपता बाईंचे रडगाणे ऐकले होते. तिने भाग्यश्रीला पाहिलं तेव्हा तिला ती भलतीच गोड वाटली. मग ती हळूच पारू आणि धुरपताबाईला म्हणाली,

 

“जर तुम्हाला मुलगी नको असेल तर मी तिला दत्तक घ्यायला तयार आहे.”

हे ऐकून पारू ला काय बोलाव ते सुचत नव्हतं, पण धूरपताबाईंच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक आली होती.

 

“हो ना, तुझ्याकडे सुखात राहील बघ ती.”

 

धुरपताबाईंनी समजावल्यावर पारूही लगेच भाग्यश्रीला दत्तक द्यायला तयार झाली.

 

“हो, तुला पाहिजे असेल तर घेऊन जा तू. तुझ्या जवळ राहील तर चांगलंच आहे की.” ती बहिणीला म्हणाली.

 

हे बोलणं बाहेरून येणाऱ्या हरीने ऐकलं. तो संतापाने घरात आला. एरव्ही कमी आणि ते ही शांतपणे बोलणारा हरी जोरात कडाडला.

 

“कोणाला घेऊन जायचं आहे माझ्या मुलीला?”

 

त्याचा आवाज पहिल्यांदाच इतका मोठा झाला होता.

आज पहिल्यांदा पारू त्याच्या आवाजाला घाबरली होती. धुरपताबाई सुद्धा जावयाचे हे रूप पाहून गप्प झाल्या होत्या.

 

“अहो, आम्ही हे सगळं तिच्या भल्यासाठीच…” पारू म्हणाली.

 

हरीचे डोळे लाल झाले.

 

“भलं? आई जिवंत असताना मुलीला परकी करण्यात मुलीचं काय भलं आहे ते सांग जरा…”

 

तो भाग्यश्रीला उचलून छातीशी कवटाळत म्हणाला,

 

“ही माझी मुलगी आहे. माझा जीव आहे.”

 

” माझी पण मुलगी आहे. माझी बहीण तिचा चांगला सांभाळ करेन. सुखात राहीन पोरगी.”

 

त्याच्या डोळ्यांत पाणी आलं.

” अस्स आहे तर. मग हिच्या जागी मुलगा झाला असता तर दिला असता का दत्तक?”

 

हे ऐकून पारू जोरात म्हणाली.

 

“मुलगा झाला असता तर कशाला दिला असता मी दत्तक. मला काय वेड लागलंय का..?”

 

” आत्ता आलं ना खरं काय ते बाहेर. मुलगी आहे म्हणून स्वतःपासून दूर करणार आहेस मुलीला. मुलगा काय अन् मुलगी काय. जे आहे ते तुझ्याच पोटातून जन्माला आलंय ना. मग स्वतःच्या मुलाला असं दुसऱ्याला द्यायचा विचार आलाच कुठून तुझ्या मनात. आणि तिचा बाप जिवंत असताना तिला असं दुसऱ्याच्या घरात पाठवायचा अधिकारी कोणी दिला तुम्हा दोघींना…” हरी नुसता मोठ्याने बोलत होता आणि पारू आणि धुरपता बाई गप्प बसल्या होत्या. मग मोठी हिंमत करून पारूची आई म्हणाली.

 

” अहो जावईबापू, मुलगा म्हातारपणात आधार देतो. मुली दुसऱ्याच्या घरात जातात शेवटी.”

 

” हे तुम्ही बोलताय सासूबाई. तुम्हाला पण मुलगा आहे ना. तो बनला का तुमच्या म्हातारपणाची काठी. शेवटी तुमचा सांभाळ तुमची मुलगी करत आहे ना. तुम्ही तरी पारू ला समजावून सांगायचं ना. पण तुम्ही तर तिच्या मनात आणखीनच भरून देताय. मुलगा म्हणे म्हातारपणाची काठी बनतो.”

 

आता मात्र पारू आणि तिच्या आईला जाणीव झाली की हरी काही चुकीचं बोलत नाही म्हणून. ह्यांचे बोलणे सुरूच होते. पारूची मावसबहिण मात्र हरीचा हा अवतार पाहून लगेच निरोप घेऊन निघून गेली. मग हरी पुन्हा म्हणाला.

 

“तुम्हा दोघींना माझ्या मुलींच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. तुम्हाला माझ्या मुली नकोशा झाल्या असतील तर मी सांभाळेल दोघींना सुद्धा. तुम्ही माझ्या मुलींच्या एकाही कामाला हात सुद्धा नका लावू.”

 

हे ऐकून लक्ष्मीचा जीव कळवळला. कधी नव्हे ते आज मुलीपासून दूर जाण्याची भीती वाटली तिला. आज इतक्या दिवसानंतर तिने मुलगा, मुलगी असा विचार न करता एका आईच्या दृष्टिकोनातून विचार केला होता. ती हरीला म्हणाली.

 

” अहो असं करू नका. माझी खरंच खूप मोठी चूक झाली. मुलगा हवा म्हणून मुलींकडे दुर्लक्ष केलं मी. मुलींना परक्याच धन म्हणूनच पाहिलं आतापर्यंत. पण माझी चूक माझ्या लक्षात आली आहे. मला माफ करा. मला माझ्या मुलींपासून दूर नका करू..”

 

” हो जावईबापू. मी पण तुमची गुन्हेगार आहे. मीच पारूच्या मनात मुलगा हवा असं भरवल. मी स्वतः सुद्धा आयुष्यभर मुलींपेक्षा मुलाला जीव लावला. पण आयुष्याच्या शेवटी मला मुलीनेच आधार दिला हे विसरले मी. खरंच मुली परक्याच धन नसतात. परक्या घरात राहूनसुद्धा त्यांचं काळीज आईबापासाठी तिळ तिळ तुटत राहतं. माझी मती गुंग झाली होती. मला सुद्धा माफ करा.” धुरपताबाई डोक्याला पदर लावत म्हणाल्या.

 

” तुम्हाला जर खरंच तुमच्या चुकीची जाणीव झाली असेल आणि यानंतर तुम्ही माझ्या मुलींना परक्यांच धन न समजता घरच्या लक्ष्मी समजणार असणार, त्यांना जपणार असाल तर मी तुमची ही चूक माफ करायला तयार आहे. पण यापुढे माझ्या मुलींच्या बाबतीत चुकीचं वागलेलं किंवा बोललेलं मी सहन करणार नाही.” हरी ने निक्षून सांगितले.

 

इतक्यात बाहेरून खेळून आलेली आनंदी घरात आली. आईच्या डोळ्यांत अश्रू पाहून तिला म्हणाली.

 

” काय झालं आई…तुला कुठे दुखतंय का…मी तुला मलम लावून देऊ का…”

 

तिचे बोबडे बोलणे ऐकून पारू ला एकदमच भरून आले. तिने पटकन आनंदीला जवळ घेऊन पोटाशी धरले. आज खऱ्या अर्थाने पारूला मातृत्वाचा अर्थ कळला होता. पारू ची आई सुद्धा आपल्या वागण्यावर आणि विचारांवर खजील झाली होती. हरीच्या डोळ्यात मात्र निर्धार होता की काहीही झाले तरी तो आपल्या मुलीच्या वाट्याला कधीच दुःख येऊ देणार नव्हता.

 

नेहमी आई ही प्रेमळ आणि वडील म्हणजे भावना नसलेले, कठोर असेच चित्र पहायला मिळते. अनेक कथा आणि चित्रपट यामध्ये आईची थोरवी गायलेली आपण नेहमीच पाहतो. पण वडिलांना सुद्धा भावना असतात. कधी कधी आईपेक्षा जास्त प्रेम वडील करतात. फक्त अनेकांना ते व्यक्त करता येत नाही. पण त्यामुळे वडिलांचं प्रेम कमी आहे आहे गृहीत धर्म जाते.

 

मुलगा आणि मुलगी यात फरक करणं ही सर्वात मोठी चूक आहे. प्रत्येक मूल हे आई-वडिलांसाठी सारखंच अनमोल असतं. विशेषतः वडिलांचं प्रेम अनेकदा शब्दांत व्यक्त होत नाही, पण त्यांच्या प्रत्येक त्यागात, कष्टात आणि काळजीत ते दिसत असतं. मुली या परक्याचं धन नसून वडिलांच्या हृदयाचा सर्वात जिव्हाळ्याचा तुकडा असतात. ❤️

मुलगा की मुलगी ह्यावर वारसा ठरवल्यापेक्षा

प्रेम, संस्कार आणि माणुसकी हाच खरा वारसा असायला हवा.

समाप्त.

ही कथा कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. 😊 आणि अशाच हृदयस्पर्शी कथा इथे वाचा.

आनंदी आनंद गडे – भाग १

तूच हृदयात अन् तूच श्वासात या – भाग १

समाधानातील सुख

 

मर्यादा : फक्त तिच्यासाठीच का ?

 

©® आरती निलेश खरबडकर.

 

तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्कीच कळवा.

Leave a Comment