आज ऑफिसमधून लवकर घरी आलो होतो. आज मूड खूप चांगला होता. येताना बायकोसाठी गजरा सुद्धा घेऊन आलो होतो. आल्यावर दारावरची बेल वाजवली. बायको जरा तणतणत आली आणि दार उघडून पाय आपटत किचन मध्ये निघून गेली. मला भारी नवल वाटलं. एरव्ही दार उघडल्यावर हसून स्वागत करणारी बायको आज काही कारण नसताना अशी का बरं वागत असावी.
मी आपला अंदाज बांधत होतो. सकाळी तर बरी होती. जाताना छान हसून बाय केला होता. अचानक काय झालं हिला. स्वयंपाक घरातून जोरजोरात भांडी वाजण्याचा आवाज येत होता. मी मात्र परिस्थितीचा अंदाज लावत गप्प बसलो होतो.
शेवटी बायको पाण्याचा ग्लास घेऊन आली. माझ्याकडे अगदी जळजळीत कटाक्ष टाकला. मी मात्र तिच्याकडे पाहून घाबरलो. पण मी घाबरलोय हे मी तिला दाखवले नाही. आणि मी तिला विचारले.
” आज काय विशेष…अशी रागात का दिसत आहेस…”
” रागात नाही असणार तर काय…इतके दिवस झालेत आपल्या लग्नाला…आजवर मला कधी एखादे गिफ्ट तरी दिले का तुम्ही..?” बायको जरा तणतणत म्हणाली.
” पण तू आजवर जे मागितले ते दिलेच ना मी तुला…कधी कधी थोडा वेळ लागतो पण हवं ते देतोच की…” मी आपला बचाव करत म्हणालो.
” पण मी मागितल्यावर च देता ना…कधी काही स्वतःच्या मनाने आणलं का माझ्यासाठी..”
” अग…आपलं नवीन लग्न झालं होतं तेव्हा मी तुझ्यासाठी छान माझ्या आवडीच्या पोपटी रंगाची साडी आणली होती…तुला अजिबात आवडली नव्हती…दुसऱ्या दिवशी सकाळीच मला साडी बदलून द्यायला पाठवलं होतं तू… मी अर्धा तास दुकानाच्या बाहेर उभा राहून दुकान उघडायची वाट बघितली होती साडी बदलून घेण्यासाठी…”
” तुमची चॉईस सुद्धा तशीच आहे ना ( बायकोसुद्धा माझीच चॉइस आहे हे ती विसरली बहुतेक)…तुमचा आवडता रंग कोणता तर पोपटी…निदान तो आपल्या बायकोला शोभतो का ह्याचा विचार तरी करायचा असता…मुळात पोपटी रंग तुमचा सर्वात आवडता रंग आहे याचं मला नवल वाटतं…” बायको म्हणाली.
” म्हणूनच तेव्हापासून मी स्वतः तुझ्यासाठी काहीच घेत नाही…नेहमी तुला सोबत घेऊन जातो…”
” पण मलाही वाटतं ना की तुम्ही माझ्यासाठी कधीतरी सरप्राइज म्हणून काहीतरी आणावं…”
” अग पण तुलाच माझी चॉइस आवडत नाही तर मी काय करू…?”
” मग माझी आवड निवड जाणून घ्यायला हवी ना तुम्ही”
” हे काय सुचलं तुला अचानक…आजवर तुला काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि नेमकं आजच का सुचतंय हे सर्व…”
” हो…बरोबर आहे तुमचं…आजवर तुम्ही माझा विचारच केला नाही…आणि मी मात्र दिवसरात्र फक्त तुमच्याच आवडीनिवडी चा विचार करते…”
” काही झालंय का आज…तुझा मूड का इतका खराब आहे..” मी विचारले.
पण बायको आज जरा वेगळ्याच मूड मध्ये होती. आजवर मी ज्या नोटीस सुद्धा केल्या नसतील त्या गोष्टी उकरून काढल्या तिने.. काय तर म्हणे मी रोमँटिक नाही… मैत्रिणीचा नवरा तिला नेहमी सरप्राइज देत असतो…पुढचा अर्धा तास नुसती माझ्याशी भांडत होती…शेवटी ती थकून बोलायची बंद झाली…मी मात्र सर्वकाही निमूटपणे ऐकत होतो…
त्यानंतर घरात बराच वेळ शांतता होती. आम्ही दोघेही एकमेकांशी काहीच बोलत नव्हती. आम्ही दोघेही जेवायला सोबतच बसलो पण एकमेकांशी न बोलता कसेतरी दोन घास गिळले आणि उठलो. मी आज लवकर झोपायला आलो होतो. मला बराच वेळ झोप लागली नाही.
मी सारखा विचार करत होतो की आज हिला झाले तरी काय ? कारण तशी ती खूप समजदार आहे. कधी भांडत नाही. एखादी गोष्ट आवडली नसल्यास ती समजावून सांगते. कधीकधी रागावते सुद्धा. पण आज चक्क भांडली ती. मी तिच्या वागण्याचा अर्थ लावत बसलो होतो.
इतक्यात बायको तिची कामे आटोपून झोपायला आली माझ्याकडे पाठ करून झोपून गेली. मला मात्र नंतर बराच वेळ झोप लागली नाही. पहाटे कधीतरी माझा डोळा लागला. सकाळी जाग आली ती बायकोच्या आवाजाने.
“अहो… उठताय ना…तुमच्यासाठी गरमागरम चहा करतेय…तुम्ही फ्रेश व्हा…आपण सोबतच चहा घेऊ..”
मी एकदम दचकून उठलो. काल तर माझ्याशी खूप भांडली आणि आज सकाळी एकदम लाडात येऊन गोड बोलतेय, सोबत चहा पिऊ म्हणून. मला तिच्या वागण्याचा काही अर्थ लागत नव्हता. म्हणून मी गुपचूप उठलो. फ्रेश झालो आणि चहा घेतला.
इतक्यात बायको म्हणाली,
” आज तुमच्या आवडीचा नाश्ता करणार आहे. सोबत आणखी हवं असल्यास मला सांगा..”
” नाही…तुला जे करायचे ते कर…आणखी काही नको…”
” ठीक आहे”
एवढे बोलून बायको स्वयंपाकघरात निघून गेली. मी मात्र विचारात पडलो. हिला काय झालं असेल. एकतर काल स्वतःहून माझ्याशी भांडली आणि आज स्वतःहून नॉर्मल वागतेय. हिला विचारू का काय झालं ते.
पण हीचा मूड चांगला आहे. उगाच मी कालच्या भांडणाची आठवण करून दिली तर पुन्हा भांडायला सुरुवात करेल. काय करू…? विचारू की नको…? पण विचारायला तर पाहिजेच. नाहीतर उगाच डोक्यात तेच विचार येत राहतील. आता मनाला प्रश्न पडला तर त्याचं उत्तर तर मिळायला हवं. मी मोठी हिम्मत करून बायकोजवळ गेलो. आणि तिला विचारलं.
” एक विचारू का..?”
” विचारा की “
” काल तू माझ्याशी का भांडलीस..?”
” अहो ते काल ना मी एक कथा लिहीत होते…ज्यामध्ये नवरा बायकोच भांडण होतं…पण काही केल्या ती कथा जमतच नव्हती…त्यामध्ये खरेपणा येत नव्हता…म्हणून मग मी तुमच्याशी थोडी भांडले…त्यानंतर ती कथा पूर्ण केली…आणि आश्चर्य म्हणजे ती कथा एकदम छान जमली मग…” बायको सहजपणे म्हणाली.
” अरे देवा…म्हणजे हे सर्व फक्त कथेसाठी…मी रात्रभर झोपलो नाही विचाराने… मला किती टेन्शन आले होते…”
” तुम्ही पण ना खूप भोळे आहात हो…अगदी कोणत्याही गोष्टीचं पटकन टेन्शन येते तुम्हाला…”
बायकोच्या उत्तराने मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. पण या उत्तराने आणखी नवे प्रश्न माझ्यापुढे उभे ठाकले. ते म्हणजे हीच्या लेखन प्रवासात माझा नेमका कसा प्रयोग होईल ह्याची काही शाश्वती नाही.
खरं आहे लेखिका होणे सोपे नाही…पण एका लेखिकेचा नवरा होणे देखील इतके सोपे नाही बरं का ?
समाप्त.
©आरती खरबडकर.
फोटो – साभार pixel
,😂🤣🤣🤣
गोड लव्ह स्टोरी आहे. जाम आवडली…❤️