गौरी एका लहान शहरात वाढलेली मुलगी. पाच महिन्यांपूर्वी साधना ताईंची सून बनून मुंबईला आली. मुंबईसारख्या शहरात राहून इथल्या चालीरीती शिकत होती. सर्वांशी जुळवून घेत होती. तिचा नवरा सर्वेश नोकरीनिमित्ताने सकाळीच घराबाहेर पडायचं आणि रात्री उशिरा घरी यायचा. त्यामुळे त्यांना एकमेकांसाठी पुरेसा वेळ मिळत नसे. म्हणून साधनाताई स्वतः आवर्जून दोघांनाही रविवारी कुठेतरी बाहेर फिरायला पाठवत असे.
साधनाताई तशा मनाने प्रेमळ होत्या. गौरी सुद्धा समजूतदार होती. पण दोघीही एकमेकींशी नेहमीच ठराविक अंतर ठेवून वागत होत्या. गौरीच्या मनात सासू या व्यक्तिरेखे बद्दल भीती होती. तिने आजवर तिच्या विवाहित मैत्रिणीकडून त्यांच्या सासवांबद्दल जे काही ऐकले होते त्यामुळे तिच्या मनात पूर्वग्रह होता.
दिवाळी जवळ आली होती. दोघीही सासू सूना मोठ्या उत्साहाने तयारीला लागल्या होत्या. हळूहळू दोघींमधील अंतर कमी होत होते. सासू आणि सूनेतील संवाद वाढत होता. दोघींनी मिळून दिवाळीची सर्व खरेदी केली.
घराची साफसफाई केली. सर्व फराळ तयार केला. दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली होती. रात्रीचं जेवण होऊन साधनाताई स्वयंपाकघरात आवराआवर करत होत्या. तोच गौरी स्वयंपाकघरात बाहेर येऊन उभी राहिली.
साधनाताईचे तिच्याकडे लक्ष गेले. ती अवघडून बाहेर उभी असलेली पाहून साधनाताई तिच्याकडे गेल्या आणि तिला त्याचे कारण विचारले. तिला सुरुवातीला खूप अवघडल्यासारखे झाले पण मग तिने साधनाताईना सांगितले की तिला पाळी आली आहे.
साधनाताईनी गौरीला तिच्या रूम मध्ये जाऊन आराम करायला सांगितले. गौरी मात्र मनातून घाबरली होती. कामाच्या व्यापात तिला तिच्या पाळीची तारीख लक्षात राहिली नाही याचे तिला वाईट वाटत होते. सासरी पहिलीच दिवाळी असल्याने काहीतरी उपाय करून पाळी लांबवायला पाहिजे होती असे तिला सारखं वाटत होते.
इकडे साधनाताई विचारात पडल्या. साधनाताईंचे जेव्हा लग्न झाले तेव्हा त्या त्यांच्या पतीसोबत मुंबईला राहायला आल्या होत्या. त्यांचे सासू सासरे मात्र गावी राहायचे. तिथे त्यांचा खूप मोठा गोतावळा होता. साधनाताई प्रत्येक सणावाराला गावी जात असतं. दिवाळी मध्ये सर्वजण गावी जात आणि एकत्रितपणे साजरी करत असत.
साधनाताईंच्या लग्नाला दोन वर्षे झाली असतील तेव्हाची घटना त्यांना आठवली. त्या दिवाळी निमित्ताने त्यांच्या पतीसोबत गावी आल्या होत्या. दिवाळीच्या तयाऱ्या ऐन रंगात असताना साधनाताईंना पाळी आली आणि ती दिवाळी त्यांच्या आयुष्यातील एक न विसरता येणारी दिवाळी ठरली.
त्यांना घराला लागूनच असलेल्या पण येण्याजाण्यासाठी वेगळे दार असणाऱ्या खोलीत राहायला पाठवले. घरात सर्वजण गोडधोड जेवायचे पण साधनाताईंना मात्र सकाळचे जेवण दुपारी मिळायचे तेही कुणीतरी दारातूनच ताट सरकवून जायचे.
बाहेर दिव्यांचा अगदी लखलखाट होता पण साधना ताईंची दिवाळी मात्र त्या अंधाऱ्या खोलीतच गेली. त्या दिवसात त्यांची कुणी साधी विचारपूस देखील केली नाही. पुरुष मंडळींना त्यांचे दुःख कळणार नाही हे त्या समजू शकत होत्या पण घरातल्या महिलांनी सुद्धा त्यांना समजून घेतले नाही याचे त्यांना वाईट वाटले. आज त्यांच्या जागी गौरी होती.
इकडे गौरीला सुद्धा रात्री उशिरा पर्यंत झोप आली नाही. पहाटे सुद्धा उशिरा जाग आली. सकाळी ती उठली तेव्हा घरी सर्वांच्या अंघोळी उरकल्या होत्या. ती सुद्धा आवरून अंघोळीला जाणार इतक्यात तिला तिच्या सासूबाईंनी पाठीमागून आवाज दिला.
गौरीने मागे वळून पाहिले तर सासुबाई हातात उटणे घेऊन उभ्या होत्या. सासूबाईंनी गौरीला पाटावर बसायला सांगितले आणि तिला उटणे लावले. गौरी सासूबाईंच्या अशा वागण्याने पार भांबावून गेली होती. अशा वेळी जेव्हा बाईला कुणी घरात साधी लुडबुड सुद्धा करू देत नाही अशा वेळी सासूबाईंनी तिला उटणे लावावे म्हणजे काय ?
सासूबाईंनी गौरीला उटणे लावल्यावर ती अंघोळीला गेली. अंघोळ करून आल्यावर समोर पाहते सासुबाई आरतीचे ताट घेऊन तयारच होत्या. सासूबाईंनी गौरीचे औक्षण केले आणि गौरीला अश्रू अनावर झाले. तिने सासूबाईंना मिठी मारली आणि रडायला लागली.
” अग बाळा, रडायला काय झालं तुला..” साधनाताई नी काळजीच्या सुरात विचारले.
” आई…तुम्ही मला ओवळताय..?”
” अग आपल्या घरी हीच पद्धत आहे…धनत्रयोदशी पासून भाऊबीज पर्यंत आपण उटणे लावून स्नान करतो आणि स्नान झाल्यावर औक्षण करतो…” साधनाताई म्हणाल्या.
” पण आई…माझ्या माहेरी फक्त मुलांचं औक्षण करतात…आणि तुम्ही सुनेला ओवाळत आहात आणि ते सुद्धा मी अशी विटाळशी असल्यावर…
आई, अशा दिवसात घरी एका कोपऱ्यात बसवून ठेवतात मुलींना…अगदी स्वतःच्या रूम मधून बाहेर यायची सुद्धा मुभा नसते…मला वाटले की पुढील तीन – चार दिवस तुम्ही माझी सावलीसुद्धा पडू देणार नाही कशावर…पण तुम्ही तर माझे औक्षण केले आज…” बोलताना गौरीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.
” माझ्यासाठी जसा सर्वेश माझा मुलगा तशीच तू सुद्धा मला मुलीसारखी च आहेस…देवाला मी नेहमी एक मुलगी मागायचे…पण देवाने माझ्या पदरात दोन्ही मुलेच टाकली…पण तुझ्या रूपाने मला मुलगी मिळाली आहे…म्हणून मी तुझे सगळे लाड पुरवणार आहे…
मासिक पाळी च्या दिवसात अगदी वाळीत टाकल्या सारखी वागणूक मी सहन केली आहे पण हे सर्व कुठेतरी थांबायला हवं…हे सर्व मी तुझ्या बाबतीत घडू देणार नाही… तुला जर काम करावसं वाटत असेल तर तू करू शकतेस…नाहीतर जाऊन आराम कर…हे तुझच घर आहे…तुला हवं तिथे आणि हवं तेव्हा तू कधीही जाऊ शकते स…” साधनाताई म्हणाल्या.
गौरीला हे सर्व ऐकुन अगदी भरून आले. ती पुढे काही बोलूच शकली नाही. तिने फक्त डोळ्यांनीच सासूबाईंना होकार दिला. या दिवाळीत गौरीला एक आई आणि साधनाताईंना मुलगी मिळाली होती.
समाप्त.
फोटो – साभार गूगल
लेखिका – आरती निलेश खरबडकर.