अमृताच्या वडिलांनी लवकरच अमृतासाठी एक त्यांच्या तोलामोलाचा मुलगा पसंत केला. मुलगा घरी चांगलाच श्रीमंत होता. नोकरी सुद्धा चांगली होती. मुलाने पहिल्या भेटीतच अमृताला पसंत केले. आणि लग्नाचा मुहूर्त सुद्धा लवकरच काढला होता. अमृताच्या होकाराचा तर प्रश्नच येत नव्हता.
घरच्यांनी अमृताचे लग्न ठरवले आणि लग्नाच्या तयारीला लागले. लग्न अगदीच थाटामाटात करायचे ठरवले होते. अमृता उदास मनाने चेहऱ्यावर उसने अवसान आणून कशीतरी लग्नाच्या तयारीमध्ये सहभागी होत होती. एक एक दिवस जात होता. लग्न जवळ आलेलं होतं आणि आठवणी सरता सरत नव्हत्या.
शेवटी लग्न दोन दिवसांवर राहिलं आणि लग्नाच्या तयारी करताना आनंदात असणाऱ्या अमृताच्या वडिलांच्या चेहऱ्यावर जरा काळजी मिश्रित भाव दिसायला लागले. . वरपक्षाकडील काही लोक इथे आले आणि त्यांनी अमृताच्या वडिलांशी काहीतरी चर्चा केली होती. आणि तेव्हापासून घरातील वातावरण जरा गंभीर झाले होते. तेव्हा अमृताच्या आईने तिच्या बाबांना ह्याचे कारण विचारलेच.
” काय झालंय अमृताचे बाबा…तुम्ही सकाळपासून खूप काळजीत दिसत आहात…काही झालंय का…आणि सकाळी ते लोक काय म्हणाले तुम्हाला…?”
” अगं त्यांना एक खात्री हवीय आपल्याकडून…” अमृताचे वडील म्हणाले.
” कसली खात्री…?” अमृताच्या आईने प्रश्न केला.
” उद्या आपण खरोखर सगळी संपत्ती आपल्या दोन्ही मुलींमध्ये बरोबर वाटणार की नाही ह्याची त्यांना खात्री नाही…” वडील म्हणाले.
” हे काय नवीनच…?” आई.
” त्यांना हे सगळं कागदोपत्री लिहून हवंय की आपली अर्धी संपत्ती आपण अमृताच्या नावावर करणार आहोत…” वडील जरा नैराश्याने म्हणाले.
” असे कसे बोलू शकतात ते…ते ही लग्न दोन दिवसांवर आलेलं असताना…आणि तुम्ही काय म्हणालात त्यांना…?” आईने विचारले.
” मी म्हणालो की सध्या खूप घाई आहे लग्नाची…लग्न झाल्यावर करूयात…” वडील म्हणाले.
” अहो पण तुम्ही असे का म्हणालात…त्यांनी आपली संपत्ती पाहून सोयरिक केली का आपल्याशी…आपण आपल्या काळजाचा तुकडा त्यांच्या घरी पाठवणार आहोत आणि त्यांना आपल्याकडून संपत्ती बद्दल खात्री पाहिजे…हे मला काही योग्य वाटत नाही…” आई म्हणाली.
” योग्य जरी वाटत नसलं तरी हेच सत्य आहे…हे सगळं आपल्यामागे आपल्या मुलींचच आहे…आणि आज नाहीतर उद्या त्यांना द्यावेच लागेल…मग लवकर द्यायला काय हरकत आहे…” वडील म्हणाले.
” पण लग्न दोन दिवसांवर राहिलेले असताना…?” आईने विचारले.
” थांबतील ते अजुन काही दिवस…मी बोलतो त्यांच्याशी…तू काळजी नको करुस…तू फक्त लग्नाची तयारी बघ…” अमृताचे वडील म्हणाले.
लग्नाच्या एक दिवस आधी मुलाकडच्यांनी अमृताच्या वडिलांना निक्षून सांगितले की तुम्ही कागदोपत्री अर्धी संपत्ती मुलीच्या नावे करून देणार नसाल तर आम्ही उद्या नवरदेव घेऊन तुमच्या घरी येणारच नाही. आता मात्र अमृताचे वडील काळजीत पडले.
आपण आपल्यापेक्षाही श्रीमंत घरात मुलीची सोयरिक केली पण इतके श्रीमंत असूनही त्यांना आपल्या अर्ध्या संपत्तीची इतकी लालसा आहे की त्यासाठी लग्नाच्या एक दिवस आधी ते लग्न मोडू शकतात ह्यावर अमृताच्या वडिलांचा विश्र्वासच बसत नव्हता.
मात्र आता काही दुसरा उपाय सुद्धा त्यांना दिसून येत नव्हता. लग्नाची पुरेपूर तयारी झालेली होती. सगळ्या नातेवाईकांना पत्रिका सुद्धा पोहचल्या होत्या. अर्धे अधिक नातेवाईक आज लग्नासाठी घरात दाखल सुद्धा झाले होते. अमृताच्या वडिलांनी मुलाकडच्या लोकांना विनंती केली की इतक्या गडबडीत हे होणे शक्य नाही. मी लग्नाच्या दोन दिवसात सगळे व्यवहार पूर्ण करेन.
ह्या सगळ्यात घरातल्या लोकांनी रात्र जागून काढली होती
दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली तरी मुलाकडचे काहीच समजून घ्यायला तयार नव्हते. शेवटी अमृता चे बाबा हतबल होऊन बसले. अमृताला समोर पाहून तिचे बाबा म्हणाले.
” मला माफ कर पोरी…असे ऐन लग्नाच्या दिवशी अशी अडचण येईल असे कधीच वाटले नव्हते मला…पण तू काही करू नकोस…अजूनही वेळ आहे आणि की समजावतो त्यांना…येतील ते वेळेवर…”
अमृता काहीच बोलत नव्हती. पण अमृताची आई आली आणि म्हणाली.
” तुम्ही त्यांना आपला नकार कळवा…अशा लालची लोकांच्या घरी मला माझी लेक द्यायची नाही आहे…”
” अगं हे काय बोलत आहेस तू…आज लग्न आहे पोरीचं…मंडप सजलाय…पाहुणे आलेले आहेत…आणि अशात मी त्यांना नकार कळवू…आपल्या अमृताच्या लग्नाचं कसं होईल मग…” वडील म्हणाले.
” अमृताचं लग्न होईल…अगदी याच मांडवात होईल…पण त्या मुलासोबत नाही ज्याला फक्त पैशांमध्ये रस आहे…अमृताचे लग्न अशा मुलासोबत होईल ज्याला खरोखरच आपल्या संपत्ती पेक्षा आपल्या अमृता महत्त्वाची असेल…” आई म्हणाली.
” तू काय बोलते आहेस मला कळले नाही…” वडील म्हणाले.
” सांगत्ये…” असे म्हणून अमृताची आई बाहेर पाहायला गेली. तोवर एक गाडी त्यांच्या घराबाहेर पोहचली सुद्धा होती. त्या गाडीतून एक मुलगा उतरला. त्याला पाहताच अमृता आणि तिचे वडील पाहतच राहिले. तो अनिकेत होता. त्याला पाहताच अमृताचे बाबा काहीच बोलू शकले नाहीत. अमृताची आई पुढे म्हणाली.
” अमृताच लग्न अनिकेतशी होईल…”
” अगं पण…” अमृता चे बाबा काही म्हणतील इतक्यात आई पुढे म्हणाली.
” आजवर तुम्ही आपल्या मुलींसाठी हे काही निर्णय घेतले त्यामध्ये मी काहीही बोलले नाही…कारण मला माहिती होते की तुम्ही जे काही कराल ते आपल्या मुलींच्या हिताचेच असेल…पण आज मला हा तुमचा निर्णय मान्य नाही…मला सगळं काही दिसत असताना कळत असताना सुद्धा मी तुम्हाला साथ दिली तर माझ्या मुलीवर अन्याय होईल…
तुम्हाला माहिती नसेल तर की सांगते की अमृताने अनिकेतला पळून जाऊन लग्न करण्याबद्दल विचारले होते. पण ह्याने फक्त तुम्हाला काय वाटेल ह्याचा विचार करून आपल्या अमृताला समजावून सांगितले की तुम्हाला दुखावून ती आयुष्यावर आनंदी राहू शकणार नाही. ह्याला जर तुमच्या संपत्तीत रस असता तर ह्याने तिला पळवून नेले असते. आपण आज नाहीतर उद्या स्वीकार केलाच असता की ह्यांचा…”
अमृता आईकडे आश्चर्याने पाहत होती. त्या दिवशी आपण अनिकेतशी जे काही बोललो ते आईने ऐकले होते हे तिला आता कळून चुकले होते.
आई पुढे म्हणाली.
” पण दोघांनीही असे न करता फक्त तुमचा विचार करून दूर झाले. आणि त्यानंतर तुम्ही अमृतासाठी जो मुलगा पसंत केला त्याने तुमच्या मुलीचा चांगुलपणा न पाहता फक्त तुमची संपत्ती पाहीली. यावरून हेच सिद्ध होते की श्रीमंत लोक मनाने चांगले असतीलच असे काही नाही.
आणि अशा लोकांच्या घरी जाऊन आपली अमृता खरंच खुश राहू शकली असती का. आणि अनिकेत होतकरू मुलगा आहे. तो शून्यातून त्याचं जग निर्माण करतोय. अगदी तसच जसं तुम्ही आपल्यासाठी हे सगळं शून्यातून उभे केले. जेव्हा आपलं लग्न झालेलं तेव्हा आपली परिस्थिती सुद्धा अशीच साधारण होती.
पण नंतर दिवस पालटले ना. तशीच ह्या दोघांना सुद्धा एक संधी द्या. निदान मनाला हे समाधान तरी राहील की अमृता सुखात आहे…” आई म्हणाली.
आता सगळ्यांचं लक्ष अमृताच्या वडिलांकडे होतं. ते काय निर्णय घेतील याकडेच सर्वांचं लक्ष लागले होते. तिथे उपस्थित असलेला जवळपास प्रत्येक जण अनिकेत आणि अमृताच्या लग्नाच्या बाजूने होता. पण शेवटचा आणि महत्त्वाचा निर्णय तर अमृताच्या बाबांना घ्यायचा होता. इतक्यात ते म्हणाले.
” लग्नाचा मुहूर्त टळायला नको…सर्वांनी तयारीला लागा…”
त्यांनी असे म्हणताच सगळे काळजीत पडले. अमृताचे वडील आता मुलाकडच्यांना समजवायला जाणार की काय असा प्रत्येक जण विचार करत असताना अमृताचे वडील अनिकेतला पाहून म्हणाले.
” काय जावईबापू…लवकर तयार व्हा…आणि घरच्यांना पण बोलवून घ्या…”
” म्हणजे तुम्ही या लग्नाला तयार आहात…” अमृताच्या आईने आश्चर्याने विचारले.
” हो…मी तयार आहे ह्या दोघांच्या लग्नाला…मला माझी चूक कळून चुकली आहे…आणि तुझं म्हणणं सुद्धा पटलंय…आज जर मुलाकडच्यांनी लग्नात अडथळा आणला नसता तर कदाचित अमृता आयुष्यभर दुखी राहिली असती…अनिकेत च तिच्यासाठी योग्य मुलगा आहे…”
आणि त्यांनी असे म्हणताच अनिकेत आणि अमृता दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलले. अमृता ने पटकन येऊन बाबांना मिठी मारली. त्यावर बाबा गमतीने तिला म्हणाले.
” चला आता माझा निर्णय बदलायच्या आत लवकर लग्नाच्या विधींना सुरुवात करा…”
त्यावर अमृता गोंधळून अनिकेत जवळ गेली आणि त्याला म्हणाली.
” चल चल… लवकर तयार हो…”
आणि तिच्या या गोंधळाला पाहून घरातील सगळीच मंडळी मनसोक्त हसली.
अमृताची आई आणि वडील मात्र मुलीचा आनंद पाहून आपल्या निर्णयावर खुश झाले.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.