थोड्या वेळाने ती तिच्या रूम मध्ये गेली तेव्हा वृषभ आणि विवान दोघेही झोपी गेले होते. तिने ताप आणि अंगदुखीची गोळी घेतली आणि ती सुद्धा झोपी गेली. सकाळी ती लवकर उठली नाही तेव्हा वृषभ स्वतःहून तिला उठवायला गेला. तिला हात लावल्यावर त्याच्या लक्षात आले की तिला खूप ताप आला होता.
त्याने लगेच डॉक्टरांना फोन केला आणि डॉक्टरांनी त्याला काही औषधे आणायला सांगितली. वृषभ ने औषधे आणली. विशाखा कशीबशी बीड वर उठून बसली होती. आज रविवारचा दिवस असल्याने वृषभला ऑफिसला जायची घाई नव्हती. त्याला आता भूक लागत होती. विशाखाला सुद्धा गोळी घ्यायच्या आधी नाश्ता करणे गरजेचे होते.
तोपर्यंत तिच्या सासुलाही तिला ताप असल्याबद्दल कळले होते म्हणून त्यांनी आज स्वतःच चहा नाश्ता बनवायला सुरुवात केली. पण बरेच दिवसांपासून त्यांनी किचन मध्ये स्वयंपाकासाठी पाय ठेवला नसल्याने त्यांना लवकर काही सुचत नव्हते. शेवटी त्यांनी नाश्ता केला आणि विशाखा ला तिच्या रूम मध्ये आणून दिला. विशाखाने नाश्ता केला आणि गोळ्या घेऊन ती पुन्हा झोपली. सासूबाईंनी कसातरी त्या दिवशीचा स्वयंपाक केला.
संध्याकाळपर्यंत विशाखाचा ताप थोडा उतरला होता. पण अंगदुखी आणि अशक्तपणा अजूनही होता. ती किचन मध्ये गेली आणि तिने स्वतःसाठी चहा ठेवला. वृषभ बाहेर गेलेला होता. तो परतला तेव्हा त्याने पाहिले की विशाखा ने स्वतः चहा बनवला आणि ती हॉल मध्ये बसून चहा पीत होती.
तिने विचार केला की आता थोडे बरे वाटते आहे तर घरच्यांसाठी रात्रीच्या जेवणाला खिचडी करावी. तिने तयारीला सुरुवात केली इतक्यातच दारावरची बेल वाजली.तिने दरवाजा उघडल्यावर समोर पाहते तर वृषभ ची मावसबहिण जया आणि आणि तिचे मिस्टर दारात उभे होते. तिने हसून त्यांचे स्वागत केले. इतक्यात वृषभ सुद्धा रूम मधून बाहेर आला.
” ताई…भाऊजी… या ना…मला वाटलं आज तुम्हाला वेळ मिळणार की नाही…बऱ्याच दिवसांपासून मनात होतं एकदा जेवायला तुम्हाला घरी बोलवावे…म्हटलं आज रविवारच आहे…भेटणं ही होईल आणि सोबत जेवण सुद्धा… ” वृषभ म्हणाला.
” तू इतक्या आग्रहाने बोलावलं म्हणून म्हटलं आज जावच…” त्याचे भाऊजी म्हणाले.
” चल वृषभ…आम्ही जरा आधी आत जाऊन मावशीची भेट घेतो…मग आपण बोलूच…” त्याची ताई म्हणाली.
आणि ते वृषभ च्या आईला भेटायला त्यांच्या रूम मध्ये निघून गेले. ते गेल्यानंतर विशाखा वृषभ ला म्हणाली.
” वृषभ…जरा रूम मध्ये चलतोस का…मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे…”
” घरात पाहुणे आहेत… किचन मध्ये जायचं सोडून रूम मध्ये का जायचं तुला…” वृषभ ने बेफिकिरी ने विचारले.
विशाखा त्याला काहीच उत्तर न देता सरळ रूम मध्ये जाऊ लागली. तिला जाताना पाहून वृषभ सुद्धा तिच्या मागोमाग चालायला लागला. दोघेही रूम मध्ये आल्यावर तिने रूम चा दरवाजा आतून लावला आणि त्याला विचारले.
” तुला माहिती आहे ना माझी तब्येत बरी नाही…तरी तू आज घरी पाहुण्यांना जेवायला का बोलावले स…?”
” अग सकाळी तुला बरं नव्हतं…पण मघाशी तर तू किचन मध्ये जाऊन काम करत होतीस ना…मला वाटलं बरं वाटतं असेल तुला…” वृषभ म्हणाला.
” पाहुणे स्वतःहून आले असते तर एखादे वेळी मी समजून घेईल…पण मला बरं नसताना सुद्धा तू आग्रह करून त्यांना घरी बोलावून घेतलेस…मग मला एकदा विचारून बघायचं असतं मला खरंच बरं वाटतंय की नाही…” विशाखा म्हणाली.
” विचारायचं काय आहे त्यात…तू स्वतः चालत गेलीस ना किचनमध्ये…मघाशी तर आरामात चहा घेत होतीस…” वृषभ म्हणाला.
” आईंना काम करायला लागू नये म्हणून मी मला बरं नसतानाही किचन मध्ये जाऊन चहा घेतला तर तुला वाटलं मी ठणठणीत बरी झाले…आणि बरी झाले असले तरी एक दोन दिवस आराम करायचा अधिकार नाही का मला…” विशाखाने रागाने विचारले.
” बायकांना एवढ्या दुखण्याच काही वाटत नाही…त्यांच्यात खूप सहनशक्ती असते…आणि या आधी तर तू कधी कोणत्या कामाला नाही म्हटले नाहीस…”
” मग मी नाही म्हणत नाही म्हणून तू सतत मला गृहीत धरणार आहेस का…आणि बायकांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त सहनशक्ती असते याचा अर्थ बायकांचं काही दुखत नाही किंवा त्या थकत नाही असा होत नाही…सहनशक्ती असते म्हणून तिचा अंत पाहणे गरजेचे आहे का…
मी कधी नाही म्हटले नाही म्हणून तुलाही कधी ह्या गोष्टीची जाणीव होत नाही का…तू लस घेऊन आल्यावर तुला पण त्रास झालाच होता ना…दोन दिवस फक्त आराम करत होतास तू…आणि मी लस घेऊन आलेली आहे हे माहिती असतानाही तू काल पण पाहुण्यांना जेवायला बोलावले स आणि आज पण…
अरे निदान माझा नवरा म्हणून नाही पण माणुसकीच्या नात्याने तरी हा विचार कर की मी पण एक माणूसच आहे…एखादी सुपरहिरो किंवा रोबोट नाही…तुला स्वतःहून कधी कळत कसं नाही की मी सुद्धा थकते…
अरे आजारी बायकोची सेवा करणे तर दूर पण मी आजारी असताना तू दोन प्रेमाचे, काळजीचे शब्द सुद्धा बोलत नाहीस माझ्याशी…आणि माझ्याकडून तुझ्या किती अपेक्षा असतात…तुझ्या अशा वागण्याने शरीराने कमी पण मनाने खूप थकल्यासारखे होते मला…तू कधीच बदलणार नाहीस का…तू कधीच मला समजून घेणार नाहीस का…?” विशाखा म्हणाली.
” तू फक्त आजच्या दिवस स्वयंपाक कर…मी पुन्हा तुला सांगुनच पाहुणे बोलावेन…” वृषभ थोड्या नरमाईने म्हणाला.
” नाही…मला बरं नाही आहे आणि मी स्वयंपाक करणार नाही….आणि जेव्हा जेव्हा मी आजारी असेल तेव्हा तेव्हा माझ्याकडून असल्या अपेक्षा करायच्या नाहीत…तुला पटत नसेल तर सांग…मी जाते माझ्या माहेरी निघून…” विशाखा म्हणाली.
” अग ए…सॉरी ना…तुला इतकं वाईट वाटत असेल ह्याची मला कल्पनाच नव्हती…मी पुन्हा तुझ्याशी असे वागणार नाही…तू आता फक्त आराम कर…मी बाहेरून जेवण मागवतो…” वृषभ म्हणाला.
विशाखा मात्र त्याच्याकडे न पाहता बेडवर आराम करायला गेली. वृषभ रूम मधून बाहेर निघून गेला. विशाखा चा राग आता हळूहळू कमी होत होता. रागाच्या भरात आपण वृषभ ला खूप काही बोलून गेलो ह्याची जाणीव आता विशाखा ला होत होती. आजवर एक वाईट शब्द ही न बोललेल्या विशाखाने आज त्याला खूप काही सुनावले होते. तिला वाटले आता वृषभ आपल्यावर रागावला असेल.
थोड्या वेळाने ती जरा घाबरतच बाहेर आली. बघते तर सगळेजण वृषभ ने आज खरोखरच बाहेरून जेवण मागवले होते. थोड्या वेळातच सर्व जण जेवायला बसले तेव्हा विशाखा सर्वांना जेवण वाढायचे म्हणून जेवायला बसली नाही. पण वृषभ ने आग्रहाने तिला सर्वांसोबत जेवायला बसवले. आणि कुणाला काही लागले तर स्वतः वाढत होता.
विशाखा ने दिलेली कानउघाडणी ची मात्रा वृषभ वर चांगलीच लागू पडली होती.
त्यानंतर पुन्हा कधी वृषभ ने विशाखा ला गृहीत धरले नाही. जर कुणाला घरी जेवायला बोलवायचं असेल तर आधी तिची परवानगी घेऊ लागला. आजारी झाल्यावर तिची काळजी घेऊ लागला. आपल्याप्रमाणे तीलासुद्धा आरामाची गरज आहे हे त्याला कळून चुकले होते. आणि वृषभ मध्ये झालेला बदल पाहून तिला खूप आनंद झाला होता.
कधीकधी आपण न बोलता समोरच्याला आपल्या भावना कळत नसतील तर त्या बोलून दाखवलेल्या बऱ्या असतात…कदाचित ज्या न बोलता कळल्या नाहीत त्या बोलल्यावर कळू शकतील….नाही का…
समाप्त.
©®आरती लोडम खरबडकर.
फोटो – साभार गूगल
खुपच छान आणि एकदम खरे आहे.