सहा महिन्यांपूर्वीच नोकरीवर लागलेल्या प्रियासाठी आता स्थळं पाहायला सुरुवात झाली होती. प्रियाला मात्र इतक्यात लग्न करण्याची इच्छा नव्हती. पण तिच्या आई बाबांना मात्र तिच्या लग्नाची काळजी लागून राहिली होती. म्हणून त्यांनी तिला कसेबसे तयार केले. प्रियाला सुद्धा आईवडिलांची काळजी कळत होती. आणि आई बाबा जे काही करत आहेत ते तिच्या भल्यासाठीच हे सुद्धा ती जाणून होती.
एक दोन स्थळे पाहून झाल्यानंतर प्रियासाठी मोहितचे स्थळ आले. दिसायला देखणा आणि चांगल्या नोकरीवर असणारा मोहित कुणालाही पहिल्या नजरेत आवडेल असच होता. प्रिया सुद्धा दिसायला अत्यंत देखणी असल्याने मोहितला प्रिया आवडली होती. मोहीतच्या आई वडिलांना सुद्धा प्रिया पसंत पडली.
दोही घरच्यांची पसंती झाली आणि लवकरच एक चांगला मुहूर्त बघून प्रिया आणि मोहितचा साखरपुडा पार पडला. तीन महिन्यानंतर लग्नाचा मुहूर्त निघाला होता. दोघांनी ही एकमेकांशी फोन वर बोलायला सुरुवात केली होती.
हल्ली मोहितशी फोन वर बोलताना लाजनारी प्रिया आता तासनतास त्याच्याशी गप्पा मारायची. मोहितने प्रियाला त्यांच्या सुखी संसाराची अनेक स्वप्ने दाखवली. प्रिया सुद्धा हळूहळू मोहितच्या प्रेमात पडली होती.
बघता बघता दिवस सरले आणि दोघांच्या लग्नाचा दिवस उजाडला. दोघांचेही थाटामाटात लग्न लावून देण्यात आले. प्रिया मोहितची बायको म्हणून त्याच्या घरात आली. नव्या नवरीचे सासरी कोडकौतुक झाले. सत्यनारायणाची पूजा पार पडली. मांडव परतणी सुद्धा झाली.
दोघे नवरा बायको चार दिवस बाहेर फिरून सुद्धा आले. आणि तिथून प्रियाच्या खऱ्या संसाराला सुरुवात झाली.
प्रिया आणि मोहित काल रात्री उशिरा महाबळेश्वर वरून परतली होती. रात्री आवरून झोपताना खूप उशीर झाला होता. प्रिया गाढ झोपेत होती. पहाटेचे पाच वाजले असतील. इतक्यात कुणीतरी त्यांच्या बेडरूम चे दार ठोठावले. प्रिया दचकून जागी झाली. तिने लगेच जाऊन दरवाजा उघडला तर समोर तिच्या सासुबाई उभ्या होत्या. त्यांना पाहून प्रिया जरा अवघडलीच.
” आई…तुम्ही इतक्या सकाळी इथे..?” प्रियाने विचारले.
” हो…अग पाच वाजलेत…म्हटलं तू उठली नसशील तर आपणच उठवावे..मी आणि तुझे सासरेबुवा रोज सकाळी साडेपाचला उठतो…तू रोज सकाळी पाचला उठत जा आणि तुझं आवरून सहा वाजेपर्यंत नाश्ता तयार करत जा…” सासुबाई म्हणाल्या.
,
आधीच अर्धवट झोपेत असलेल्या प्रियाला सासूबाईंनी बोललेले नीट कळले नव्हते पण तिने मानेनेच हो म्हटले. सासुबाई निघून गेल्या आणि प्रिया स्वतःच आवरायला लागली.
अर्ध्या तासात स्वतःच आवरून प्रिया स्वयंपाक घरात गेली. सासरी आल्यानंतर आज पहिल्यांदाच स्वयंपाक घरात आलेल्या प्रियाला गोंधळल्यासारख झालं होतं.
इतक्यात तिच्या सासुबाई आल्या आणि त्यांनी काय कुठे ठेवलं आहे हे तिला सांगितलं आणि त्या निघून गेल्या. प्रियाने सर्वांसाठी पोहे बनवले. भरभर घरातील कामे आटोपली आणि स्वयंपाक केला. मोहीतचा आणि तिचा टिफीन भरला. आणि साडेआठला ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघालो.
तिला ऑफिसला जाईपर्यंत दोन ट्रेन बदलाव्या लागणार होत्या. आज झोप व्यवस्थित न झाल्याने तिला थकवा जाणवत होता. पण तरीही लग्नाच्या सुट्ट्यानंतर आज पहिल्यांदा ऑफिसला जायचं म्हणून तिने आपली मरगळ झटकली.
आज ऑफिस मध्ये तिला भरपूर काम होते. ऑफिसमधून निघायला सुद्धा उशीर झाला. घरी पोहचेपर्यंत आठ वाजले होते. ती घरी येताच तिच्या सासूबाईंच्या चेहऱ्यावरून तिला कळून चुकले होते की आपल्याला उशीर झाल्याने त्या थोड्या नाराज आहेत.
” सॉरी आई…आज जरा उशीर झाला…ऑफिस मध्ये काम थोडं जास्त होतं म्हणून…” प्रिया म्हणाली.
” ते ठीक आहे…आता जाऊन हात पाय धुवून घे आणि स्वयंपाकाला सुरुवात कर…तसाही उशीर झालाय…मोहित घरी येण्याची वेळ झालीय…” सासुबाई म्हणाल्या.
” हो आई…” एवढे बोलून प्रिया आत गेली पण तिच्या मनात अजूनही विचार सुरूच होते. मला उशीर झालाय तरीपण सासूबाईंनी स्वयंपाकाला सुरुवात सुद्धा नाही केली. मला जितकं शक्य असेल तितकं मी करेनच. पण कालच मी प्रवासाहून आले. सकाळी पाच वाजता पासून जागी आहे. सकाळी सुद्धा घरातील सगळीच कामे उरकून गेले होते.
प्रियाने विचार करतच हात पाय धुतले आणि सरळ स्वयंपाक घरात गेली. बघते तर दिवसभरातील भांडी सुद्धा घासायची होती. आधी प्रियाच्या सासरी भांडी घासायला एक मावशी यायच्या पण प्रिया ह्या घरात सून बनून आल्यावर दोनच दिवसात सासूबाईंनी त्यांना कामावर येऊ नका असे सांगितले होते.
प्रियाने भांडी घासायला घेतली. आज सकाळपासून प्रिया खूप थकलेली होती. पण आता लग्न झालं म्हटल्यावर घरातील कामे तर करावीच लागणार असा विचार करून प्रिया काम करत होती.
स्वयंपाक करून जेवण व्हायला रात्रीचे अकरा वाजले होते. सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला निघून गेले. मोहित सुद्धा झोपायला खोलीत निघून गेला. प्रियाने पूर्ण स्वयंपाक खोली आवरली आणि ती सुद्धा झोपायला निघून गेली. प्रिया इतकी थकली होती की बेडवर पडताच तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी पाच वाजता उठून कामांना सुरुवात केली. सर्वांसाठी चहा, नाश्ता केला. ती रूम मध्ये मोहीतला नाश्ता आणि चहा द्यायला गेली. पण मोहित मात्र आज तिच्याशी बोलत नव्हता.
” काय झालं मोहित…तुम्हाला कशाचा राग आला का..?” तिने विचारले.
” मला राग आलाही असेल तरी तुला थोडी माझी काळजी आहे..?” मोहित म्हणाला.
” काय झालं…माझं काही चुकलं का..?” प्रियाने विचारले.
” मी रात्री तुझी वाट पाहत जागा होतो आणि तू आल्यावर लगेच झोपली…माझ्याशी बोलणं नाही ना काहीच नाही…” मोहित म्हणाला.
” अच्छा…ह्याचा राग आलाय तुम्हाला… सॉरी… काल काम जरा जास्तच झालं होतं ना म्हणून खूप थकले होते…” प्रिया हसून म्हणाली.
” एवढ्याने च थकलीस…माझी आई तर आयुष्यभर ही कामे करत आलीय…ती नाही थकली कधी…तू बरी एकाच दिवसात थकली…” मोहित म्हणाला.
मोहित चे बोलणे ऐकुन प्रिया विचारातच पडली. ती काहीही न बोलता चहा नाश्ता टेबल वर ठेवून रूम च्या बाहेर आली. मनात मात्र विचार सुरूच होते. तिने घाईघाईने घरातील काम आटोपले आणि ऑफिसची तयारी करून ती ऑफिसला निघून गेली.
क्रमशः
सांग कधी कळणार तुला भाग ३
सांग कधी कळणार तुला भाग ३
लेखिका – आरती खरबडकर.
(सर्व हक्क लेखिकेचे अधीन)
फोटो – साभार गूगल
कथा आवडल्यास माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.