सर्वांची जेवणं आटोपल्यानंतर प्रिया स्वयंपाक खोली आवरून बेडरूम मध्ये गेली तेव्हा मोहित जागाच होता. प्रिया ला बघून तो म्हणाला.
” आज तुझा पगार झाला असेल ना…?”
” हो.”
” पैशाचं काय केलंस…?”
” माझ्या बँकेच्या अकाउंट मध्ये आहेत…”
” मग ते माझ्या अकाउंट वर ट्रान्स्फर कर.. मला आपल्यासाठी नवीन कार घ्यायची आहे…काही माझ्याकडे आहेत…आणखी काही महिने बचत केली तर आपल्याला नवीन कार सहज घेता येईल…तुझ्या हातून उगाच खर्च होईल…माझ्याकडे सुरक्षित जमा राहतील…” मोहित म्हणाला.
” पण आजपर्यंत माझ्या जवळ सुरक्षितच होते पैसे…आता असं काय होणार आहे…तुम्हाला जेव्हा घ्यायची असेल तेव्हा मी देईल की काढून…” प्रिया म्हणाली.
” काही नाही…पण माझ्याजवळ दिलेस तरी काही फरक पडणार नाही…मी जमाच ठेवेल पैसे…तुला माझ्यावर विश्वास नाही का..?” मोहित म्हणाला.
” असं काहीच नाही…मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे…तुम्ही जे काही करताय ते आपल्यासाठीच करताय…आणि तसंही जे तुमचं आहे ते माझं आहे आणि जे माझं आहे ते तुमचंच तर आहे…मी करते पैसे ट्रान्सफर…” प्रिया म्हणाली.
” माझी समजुतदार बायको…” मोहित प्रियाला जवळ घेत म्हणाला.
दुसऱ्याच दिवशी प्रियाने आपला पगार मोहितच्या अकाउंट वर ट्रान्स्फर केला. तिला मोहित चे खूप कौतुक वाटत होते. मोहित आपल्या भविष्याचा इतका विचार करतोय म्हणून ती खुश होती.
त्यानंतर बरेचदा ऑफिस मधून घरी येताना प्रियाला उशीर व्हायचा. आधीच दोन ट्रेन बदलून तिला घरी यावं लागायचं आणि ऑफिसमधून थकून आल्यावर तिच्या सासूचे तिला टोमणे मारणे सुरूच असायचे. मोहित पण एखादे वेळी लवकर घरी आला की तिच्या उशिरा येण्यावरून तिला रागवाय चा. तेव्हा ती त्याची समजूत काढायची. पण संसार म्हटलं की हे सर्व चालायचंच म्हणून ती दुर्लक्ष करायची.
असेच सहा महिने निघून गेले. दिवाळी जवळ आली होती. घराची साफसफाई आणि फराळाचं बनवायचं होतं. प्रिया रात्री जागून कामे करायची. सासरी तिची पहिलीच दिवाळी होती. त्यामुळे तिला कोणत्याच गोष्टीत कमतरता ठेवायची नव्हती.
असेच एकदा प्रिया संध्याकाळी घरी लवकर आली. मोहित सुद्धा लवकरच घरी आला होता. मोहित ने तिला विचारले.
” काय प्रिया…आज लवकर आलीस…”
” हो…जवळच एक मीटिंग होती. मीटिंग लवकर संपल्याने टॅक्सी ने घरी आले…”
” टॅक्सी ने कशाला आलीस…टॅक्सी ला जास्त पैसे लागतात…थोडा उशीर झाला असता पण पैसे वाचले असते ना…” मोहित म्हणाला.
” पण एक दिवस टॅक्सी ने घरी आले तर काय बिघडलं…आपण एवढा खर्च आरामात करू शकतो…आणि दिवाळीची कामे सुद्धा करायची आहेत ना…” प्रिया थोडीशी रागातच म्हणाली.
प्रियाला राग आलाय हे पाहून मोहित पुढे काहीच बोलला नाही. प्रियासुद्धा रूममध्ये निघून गेली. पटापट स्वयंपाक आवरला आणि सगळ्यांची जेवणं झाल्यावर किचन आवरून रूममध्ये गेली. मोहितकडे पाहून म्हणाली.
” मी काय म्हणते मोहित…दिवाळी जवळ येत आहे…धनत्रयोदशीला काहीतरी नवीन घ्यायचं असतं तर आपण कार घ्यायची का…म्हणजे चांगल्या मुहूर्तावर कार घेता येईल आपल्याला…” प्रिया म्हणाली.
” सध्या नको…सध्या पैसे नाही आहेत…नंतर कधीतरी पाहू…” मोहित म्हणाला.
” पण आपण तर खूप दिवसांपासून कार घ्यायला पैसे जमा करत होतो ना…” प्रिया ने विचारले.
” हो…पण ते पैसे मी एका स्कीम मध्ये गुंतवले होते आणि त्यामध्ये मला थोडं नुकसान झालंय…आपण आणखी काही दिवस पैसे जमा करू आणि पुढे बघू…” मोहित म्हणाला.
” पण तुम्ही ते पैसे कार घेण्यासाठी म्हणून मला मागितले होते ना…मग तुम्ही मला न सांगता ते इतर गोष्टींसाठी का वापरले…?” प्रिया ने विचारले.
” हे बघ…तू माझी बायको आहेस…आणि तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझा अधिकार आहे…तुझ्यावर सुद्धा आणि तुझ्या पैशांवर सुद्धा…आणि तू मला असा जाब विचारू शकत नाहीस…मी नवरा आहे तुझा…” मोहित म्हणाला.
” मी दिवसभर नोकरी करते, संध्याकाळी घरातील कामे करते, पुरेशी झोप घेता येत नाही, सतत पैशांची काटकसर करते. इतकं सगळं केल्यानंतर महिना अखेरीस जो पगार मिळतो तो काहीतरी चांगल्या कामी आला पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे जमा करते. आणि तो पैसा कुठे खर्च करावा आणि कुठे नाही याबाबतीत माझं मत देखील विचारात घेतलं जाऊ नये का..?” प्रीती म्हणाली.
” तू काही नवीन करत नाही आहेस…सगळ्या बायका नवऱ्यासाठी हे सर्व करतातच… तुझं कर्तव्य आहे ते…आणि मला सकाळी लवकर उठायचं आहे…म्हणून तू झोप आणि मलापण झोपू दे…”
एवढं बोलून मोहित कूस बदलून झोपी गेला. पण प्रियाला मात्र हळूहळू सगळच लक्षात येत होतं. मोहित तिला फक्त गृहीत धरत होता. ती आजच्या काळातील मुलगी असूनसुद्धा तिला नवऱ्याची अपेक्षा सहन करावी लागत होती. मोहित नेहमीच तिला पैशांच्या बाबतीत काटकसर करायला सांगायचा. पण स्वतः मात्र सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत पार्टी करायचा. सासूबाईंनी तर तिला कधीच समजून घेतले नव्हते. घरची कामे, त्यानंतर ऑफिस, सतत सासूबाईंना खुश करण्यासाठी चाललेले तिचे प्रयत्न इतकं करूनही तिच्या मेहनतीचं साधं कौतुक सुद्धा नव्हतं मोहित ला. तिने ठरवले की ही परिस्थिती बदलायची असेल तर तिलाच काहीतरी करावे लागेल.
त्यानंतर काही दिवस ती कोणाशी जास्त काही बोलत नव्हती. उलटून उत्तर सुद्धा देत नव्हती.
दिवाळीचा दिवस आला. सर्वांनी अगदी जल्लोषात दिवाळी साजरी केली. प्रिया ने सगळा फराळ स्वतः बनवला होता. दारावर सुंदर रांगोळी. त्यावर दिव्यांची सजावट. सर्वजण प्रियाचे कौतुक करत होते.
दिवाळी झाल्यानंतर एकदा शेजारच्या काकू फराळाला प्रियाच्या घरी आल्या होत्या. फराळ खाताना त्या प्रियाच्या सासूबाईंना म्हणाल्या…
” तुमच्या सूनबाई च्या हाताला छान चव आहे बरं…खूप छान फराळ बनवलाय तिने…सुनेच्या बाबतीत नशीब काढलं बघा तुम्ही…घरकामात पण हुशार आहे आणि नोकरी सुद्धा करते…”
” फक्त कामात हुशार असून काय उपयोग…नोकरीवर जाते तेव्हा सगळी कामे मलाच करावी लागतात घरातली…मलापण वाटते की सूनबाई ने गरम गरम जेवण करून वाढावं…दिवसातून तीनदा गरम चहा मिळावा…माझी सेवा करावी…पण ही तर सकाळीच स्वयंपाक करून ठेवते आणि ऑफिस ला निघून जाते…वरची सगळी कामे, आल्या गेल्याचं मलाच करावं लागतं…” प्रियाची सासू म्हणाली.
” पण तीचीसुद्धा धावपळ होत असेल ना घर आणि नोकरी सांभाळून…” काकू म्हणाल्या.
” कशाची धावपळ…तिला तर बरच वाटत असेल बाहेर निघायला भेटते म्हणून…आम्ही नाही निघालो कधी कामासाठी बाहेर…आम्ही तर पूर्ण आयुष्य सासूची आणि घरच्यांची सेवा केली…” प्रिया ची सासू म्हणाली.
किचन मध्ये असलेल्या प्रियाला सासुबाईचे बोलणे स्पष्ट ऐकायला येत होते. किंबहुना तिला ऐकायला जावं म्हणून सासुबाई मोठ्याने बोलत होत्या. प्रियाला मनोमन वाईट वाटले. तिने याबाबतीत सासुबाई शी बोलायचे ठरवले.
क्रमशः
सांग कधी कळणार तुला भाग -४ (अंतिम भाग)
लेखिका – आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.