अविनाश एका साधारण घरातील मुलगा होता. लहानपणी त्यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती पण आई वडिलांनी त्यांच्या दोन्ही मुलांना प्रेम मात्र खूप दिले होते. अविनाशला त्यांनी लाडाकोडात वाढवले होते.
अविनाशचे वडील एका कंपनीत कामाला जायचे आणि आई घरीच शिवणकाम करायची. जे मिळायचे त्यात सगळेच समाधानी होते. अविनाश अभ्यासू मुलगा होता. शाळेत नेहमी पहिल्या तीन नंबर मध्ये असायचा.
त्याला नोकरी लागेपर्यंत सर्वकाही ठीक होते. पण त्याला चांगली सरकारी नोकरी लागली आणि त्याच्या लग्नासाठी स्थळे पाहायला सुरुवात झाली. आईने सांगितले होते एखादी गरीब घरची मुलगी सून म्हणून आणायला. पण तेव्हा नवीन नोकरी लागल्यावर थोडं स्टेटस मेन्टेन व्हायला पाहिजे म्हणून अगदीच गरीब घरची मुलगी न बघता थोडी मध्यमवर्गीय घरातील मुली बघितल्या.
आणि शालिनीची भेट झाली. शालिनी पहिल्याच नजरेत आवडली होती. तिचे ते चाफेकळी नाक, मोठे डोळे आणि गव्हाळ रंग. पाहताक्षणीच नजरेत भरली होती. घरच्यांना सांगितलं की ही मुलगी पसंत आहे आणि घरच्यांनी लग्नाचा बार उडवून दिला. शालिनी सून बनून घरात आली आणि सगळ्या घरादाराची जबाबदारी तिने स्वतःवर घेतली.
नुसती जबाबदारी नव्हे तर सगळे हक्क सुद्धा घेतले. आईला व्यवस्थितपणे घरातील निर्णया पासून हळूहळू दूर करू लागली. अविनाशची आई काहीही करायला गेली की म्हणायची तुम्ही काम करू नका. तुम्ही फक्त आराम करा. पण ह्यात काळजी नसून शालिनीला कामात तिची चुळबुळ नको होती हे अविनाशला तेव्हा कळलंच नाही.
आई मनातून अस्वस्थ व्हायची पण कधी तिने असे बोलून दाखवले नाही. मग एके दिवशी अचानकच अविनाशचे बाबा हे जग सोडून निघून गेले. अविनाशचे बाबा गेल्याचे सर्वांना खूप दुःख झाले होते. पण आई मात्र बाबांच्या जाण्याने पुरती ढासळली होती. त्या वेळी अविनाशला आईचा आधार बनायला हवं होतं. पण तो मात्र त्याच्या नवीन संसारात इतका गुरफटून गेला होतं की आईला सुद्धा कशाच तरी दुःख होऊ शकतं हे त्याला कळलंच नाही.
शालिनी सुद्धा सुरुवातीला त्याला हेच दाखवत राहिली की तिला आईची खूप काळजी आहे. पण एक मुल झाल्यावर मात्र तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. आईला आता ती उघडपणे बोलू लागली होती. कधी पाहुण्यांसमोर तर कधी अविनाशसमोर. अविनाशने आधी काहीच सिरीयसली घेतलं नाही.
पण जेव्हा त्याला कळलं की शालिनी जाणूनबुजून आईला बोलतेय, तिला स्वतःच्याच घरात परकेपणाची वागणूक दिली जातेय तेव्हा मात्र तो गप्प बसलो नाही. शालिनी मात्र तेवढ्यापुरती गप्प बसायची आणि नंतर पुन्हा जैसे थे. आई स्वभावाने मुळातच गरीब होती. आधी बाबांसमोर आणि आता सूनेसमोर तिने लगेच शरणागती पत्करली होती. मोठ्याने ओरडून बोलणारी आई तर अविनाश ने कधी पाहिलीच नव्हती.
शालिनी मात्र या आईच्या गरीब स्वभावाच्या आईचा पुरेपूर फायदा घ्यायची. एरव्ही आईला किचनमध्ये लुडबुड न करण्याचा सल्ला देणारी शालिनी मोलकरीण सुट्टीवर असली की आईला किचन मध्ये बोलावून घ्यायची. आईला तर आधीपासूनच कामांची सवय. सगळं काही जोमाने करायची. पण मोलकरीण कामावर परतली की शालिनी एकदम कठोर शब्दात आईला किचन मध्ये येऊ नका असे सांगायची.
आईने एखादे काम केले तर त्यात मुद्दामहून खोट काढायची. आईच्या हातचा स्वयंपाक खायची पण वरून आईलाच म्हणायची की तुम्हाला स्वयंपाक नीट जमत नाही. आईचे कुणी नातेवाईक आले तर त्यांना चांगली वागणूक द्यायची नाही.
आईने अविनाशला ह्याबद्दल कधीच काही सांगितले नव्हते. पण दिवसेंदिवस अबोल होणारी आई बघून त्याला जाणीव होत होती. एकदा अविनाश घरी ऑफिसमधून लवकर आलो होतो. तेव्हा बाहेरूनच शालिनी आणि त्याच्या आईचा संवाद कानावर आला. आईने छोट्या अर्जुनसाठी स्वतःच्या हाताने स्वेटर विणले होते. आणि मोठ्या आवडीने ते स्वेटर घेऊन शालिनीकडे आली होती.
” शालिनी…हे स्वेटर मी अर्जुन साठी विणले आहे…त्याला घालून बघ ना कसं दिसतंय ते…” आई म्हणाली.
” तुमचं ते भिकार स्वेटर ठेवा तुमच्याकडेच…नवरा चांगलं कमवतो माझा…आम्हाला कशाची कमी नाही…आणि या वयात हे नसते उद्योग करायला सांगितलं कोणी तुम्हाला…गप्प खायचं आणि स्वतःच्या खोलीत पडून राहायचं…पण नाही…तुम्हाला तर नुसतं घरभर फिरायला आवडतं…त्या दिवशी माझ्या घरचे पाहुणे आले होते तेव्हा तुम्हाला दोनदा बजावून सांगितले होते की खोलीच्या बाहेर येऊ नका म्हणून…पण तुम्हाला कुठं एका जागी राहवल्या जातंय…आल्या बाहेर…” शालिनी नुसती फणकार्यने बोलतच होती.
अविनाशला राहवलं नाही आणि तो लगेच आत येऊन तिला ओरडला…
” शालिनी…तू कोणाला बोलतेस ह्याचं काही भान आहे का तुला…ती आई आहे माझी…आणि तुझी सासू…या घराची मालकीण आहे ती…ती का म्हणून एका खोलीत बसून राहील…आणि फक्त तुझा नवराच चांगलं कमवत नाही तर तिचा मुलगा सुद्धा चांगलं कमव तो आणि त्याच्या आईसाठी सुद्धा कमवतो…” अविनाश म्हणाला.
” म्हणजे…माझा या घरावर अधिकार नाही का…मी तुमची बायको आहे…तुमच्या मुलांची आई आहे…त्या नात्याने मीच या घराची मालकीण आहे…” शालिनी म्हणाली.
” तुझा या घरावरचा हक्क मी नाकारत नाही आहे…पण याचा अर्थ असा नाही की माझ्या आईचा या घरावर हक्क नाही…तुझा आणि आईचा दोघींचा सुद्धा हक्क आहे या घरावर…पण आईचा हक्क तुझ्या आधी आहे हे लक्षात ठेव…” अविनाश म्हणाला.
” ठीक आहे मग…या घरात एक तर की राहीन किंवा तुमची आई…” शालिनी म्हणाली.
” ठीक आहे…जागी तुझी इच्छा…तुला या घरात राहायचं असेल तर माझ्या आईशी व्यवस्थित च वागावे लागेल…
माझ्या आईचा अपमान मी यापुढे सहन करणार नाही…आजवर अनेकदा मी दुर्लक्ष केलंय…पण आता नाही…” अविनाश म्हणाला.
अविनाश च्या बोलण्याने शालिनीला आणखीनच राग आला. आणि ती रागातच बॅग भरून तिच्या माहेरी निघून गेली. ती जाताना अविनाशच्या आईने तिला नको जाऊ म्हणून खूप विनवले. अविनाश ने मात्र तिला अजिबात थांबवले नाही. आणि आईची विनंती तिने ऐकली नाही. मग ती गेली रागात घर सोडून.
अविनाश तरी काय करणार होता. त्याचा सुद्धा नाईलाज होता. स्वतःच्या समोर तो आईचा अपमान कसा सहन करणार होता. ती अर्जुनला घेऊन निघून गेली. अविनाशला वाटलं तिला तिची चूक कळल्यावर आपोआप येईल परत. पण तिला तिची चूक कळण्या ऐवजी तिचा रागच वाढत गेला. आणि सगळ्यात जास्त तिला अविनाशच्या आईचा राग आला होता.
इकडे अविनाशची आईसुद्धा खूप दुःखी होती. तिला वाटत होतं की फक्त तिच्यामुळे त्यांचा संसार विस्कळीत होतोय. आई खूप साधी होती. तिला शालिनीचे डावपेच कळत नव्हते. आईने तिला एक दोनदा फोन करून बघितला पण तिने आईचा फोन उचलला देखील नाही. आई मात्र अविनाशला रोज सांगायची की शालिनी आणि अर्जुनला घेऊन परत ये. शालिनी स्वतःहून आली नाही किंवा तिने आपल्याला साधा फोन ही केला नाही ह्याचे अविनाश ला नवल वाटत होते. अविनाशच्या मते शालिनीला तिची चूक अजूनही कळली नव्हती.
तिकडे शालीनीची अवस्था फार काही चांगली नव्हती. शालिनी नवऱ्याशी भांडून घरी आली आहे हे शालिनीच्या माहेर च्या सुद्धा रूचलेल नव्हतं. म्हणून दरवेळी माहेरी आल्यावर तिचा जो सत्कार व्हायचा तो अजिबात होत नव्हता. तिच्या वडिलांना सुद्धा वाटत होते की शालिनी चुकीची आहे. तिची वहिनी सुद्धा आडून आडून विचारायची की शालिनी नवऱ्याच्या घरी कधी जाणार.
माहेरच्या लोकांची बदललेली वागणूक शालीनीला कळायची. पण स्वतःहून घरी परत जाण्यात तिला कमीपणा वाटत होता म्हणून सगळं काही सहन करून ती माहेरीच राहत होती. अविनाश काही स्वतःहून तिला फोन करत नव्हता आणि हिला आधी फोन करायचा नव्हता. पण तिला परत घरी यायची संधी मात्र हवी होती.
क्रमशः
सासुलाच सासुरवास – भाग २ (अंतिम भाग)