अमित कालपासून खूप आनंदात होता. त्याची लाडकी बहीण अवनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने काल घरी आली होती. अवनी अमितपेक्षा लहान पण दोघा बहीण भावांचे खूप पटायचे. दोन वर्षांपूर्वी अवनीचे लग्न राहुल सोबत झाले होते. राहुलचे शहर त्यांच्या शहरापासून चार तासांच्या अंतरावर होते. पण मुलगा चांगला आहे हे पाहून अवनीच्या आईवडिलांनी तिचं सासर दूर होईल ह्याचा जास्त विचारच केला नाही.
अवनी च्या लग्नानंतर ती फक्त एकदा माहेरी आठ दिवस राहिली असेल. त्यानंतर कधीच दोन दिवसांच्या वर राहिलेली नव्हती. ती यायची आठ दिवस राहण्याच्या बेताने पण आल्यावर दुसऱ्याच दिवशी राहुलचा फोन यायचा. कधी म्हणायचा की घरी पाहुणे आले आहेत तर कधी म्हणायचा की आईची तब्येत बरी नाही. आणि तिला लगेचच निघावे लागत असे.
अवनी अशी घाईत निघून गेली की अमितला वाईट वाटायचे. राहुलचा राग पण यायचा. पण अवनी अमितची समजूत काढायची आणि म्हणायची की पुढच्या वेळी जास्त दिवस राहील. अमित सुद्धा तेवढ्यापुरता गप्प बसायचा मग.
पण यावेळेला त्याने तिला हट्टच केला होता. यावेळेला तरी चांगली आठवडा भर राहा म्हणून. अवनी ने सुद्धा होकार दिला होता. अमित ने आधीच ठरवून टाकले होते की आठ दिवसात कुठे कुठे फिरायचे आणि काय काय करायचे. आज संध्याकाळी त्याने सर्व फॅमिली सोबत बाहेर जेवायचे ठरवले होते.
ठरल्याप्रमाणे सर्वजण संध्याकाळी बाहेर जेवायला गेले. सगळ्यांना एकत्र बाहेर आल्याने खूप आनंद झाला होता. सगळ्यांनीच खूप धमाल केली. आई, बाबा, त्याची बायको अमृता सगळेच खुश होते. अवनीच्या चेहऱ्यावरून तर आनंद अगदी ओसंडून वाहत होता. आणि सगळ्यांना खुश पाहून अमित ही खूप खुश झाला होता. दुसऱ्या दिवशी सगळे जन पुन्हा बाहेर फिरायला जाणार होते.
तो संध्याकाळी घरी आला आणि पाहतो तर घरी राहुल आलेला होता. परवाच अवनी घरी आली आणि राहुल आज इथे आला होता. त्याला पाहून अमित म्हणाला.
” तुम्ही आज अचानक…म्हणजे अवनी ने आधी काही सांगितले नाही…”
” अवनीला सुद्धा काहीच माहीत नव्हते…मला इथे एक काम होते म्हणून आलो होतो…काम झाल्यावर म्हटलं चला आलोच आहोत तर अवनीला सुद्धा सोबत घेऊन जाऊया…तेवढाच तुमचा एक चक्कर वाचेल…” राहुल म्हणाला.
” राहुद्या की अवनीला काही दिवस…खूप दिवसांनी आलीय ती माहेरी…त्या निमित्ताने आम्हालाही बरं वाटेल…मी सोडेल ना तिला घरी…तुम्ही काळजी करू नका…” अमित म्हणाला.
” माझी बहिण पण येणार आहे या आठवड्यात…त्यामुळे घरी अवनीची गरज पडणारच…आई काय आता या वयात कामे करणार आहे का…मी घेऊन जातो तिला…” राहुल म्हणाला.
अमित ने राहुल ला अवनी ला काही दिवस राहू द्या म्हणून बराच आग्रह केला पण राहुल मात्र त्याच्या निर्णयावर ठाम होता. शेवटी अमितच्या वडिलांनी त्याला निदान आजच्या दिवस तरी तुम्ही इथे राहा म्हटले आणि अमित त्या दिवशी जायचा थांबला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच अवनी ला घेऊन घरी निघून गेला.
अमितला राहुलचे वागणे अजिबात आवडले नव्हते. राहुल गेल्यावर तो म्हणाला.
” हे राहुल राव कधीच अवनी ला माहेरी राहू देत नाहीत…लग्न करून दिलंय म्हणजे तिच्यावरचा आमचा अधिकार संपला असे नाही…प्रत्येकवेळी ह्यांची हीच तऱ्हा…काय तर म्हणे माझी बहीण येत आहे…अवनी दोन दिवसांपूर्वीच माहेरी गेलीय एवढे पण कळत नसेल का तिच्या घरच्यांना…”
अमित ची बायको अमृता त्याचे बोलणे ऐकून गप्पच होती. अमितची आई त्याला म्हणाली.
” राहू दे…खरंच त्यांना काम असेल…आणि तिच्या सासूबाईंच्या ने आता काम होत नसतील म्हणून घेऊन गेले असतील…आता ती त्यांची बायको आहे…त्यामुळे आपण फार काही बोलू शकत नाही…”
आईचे बोलणे ऐकून अमित गप्प बसला पण त्याला वाईट तर वाटलेच होते.
रात्री झोपताना तो पुन्हा राहुलच्या नावाने त्रागा करत म्हणाला.
” राहुल रावांनी हे चांगलं नाही केलं…लग्न झालं तेव्हापासून त्यांचं हे असंच सुरू आहे…तिला जास्त माहेरी राहूच देत…आपली अवनी किती खुश होती माहेरी येऊन…पण ते तिला घेऊन गेले…मला नाही वाटत त्यांना इथे काही काम असेल…फक्त अवनीला घ्यायलाच आले असतील…”
सकाळपासून अमित चे बोलणे ऐकुन अमृता त्याला म्हणाली.
” तुमची बहीण खूप दिवसांपासून माहेरी राहू शकली नाही ते बरोबर कळतं तुम्हाला…सकाळपासून राहुल रावांच्या नावाने त्रागा करताय…पण तुम्हीसुद्धा अगदी त्यांच्यासारखाच वागता हे कधी कळले नाही तुम्हाला…”
” म्हणजे…तुला काय म्हणायचंय…?” अमित ने आश्चर्याने विचारले.
” हेच की तुम्ही सुद्धा आजवर मला एका दिवसापेक्षा जास्त माहेरी राहू दिलं नाही कधी…नेहमी सोबतच येता आणि मलाही सोबतच घेऊन येता…माझे बाबा सुद्धा तुम्हाला कितीदा आग्रह करतात की अमृताला राहू द्या काही दिवस म्हणून…पण तुम्ही त्यांचं कधीच ऐकत नाही…माझ्या बहिणी येतात तेव्हा मलापण वाटते की मी सुद्धा त्यांच्यासोबत काही काळ घालवावा…काही दिवस माहेरी राहून आराम करावा…पण तुम्ही मला राहूच देत नाही कधी…” अमृता म्हणाली.
अमृताच्या मनात हे असे काही असेल ह्याची अमितने कधीच कल्पना सुद्धा केली नव्हती. अमृताला सुद्धा माहेरी जाऊन राहावे वाटत असेल हा त्याने विचारच केला नव्हता. तो अमृताला म्हणाला.
” अगं पण तुझं माहेर काय दूर आहे का…अगदी तासाभराच्या अंतरावर तर आहे तुझं माहेर…तिथे जाऊन राहायची काय गरज आहे…?” अमित म्हणाला.
” जवळच असलो तरीही वर्षातून मुश्किलीने पाच ते सहा वेळा भेट होते आमची…आणि ते सुद्धा त्याच दिवशी जाऊन यावं लागतं…अर्धा दिवस तर जाण्या येण्यातच जातो…माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळी सुद्धा फक्त दोनच दिवस राहू दिलं होतं तुम्ही…का तर घरची कामे तुमच्या आईला करावी लागतात म्हणून…तुमच्या बहिणीसाठी तुम्हाला वाटतं पण माझ्यासोबत सुद्धा तुम्ही असेच वागत ह्याची साधी जाणीव पण नाही तुम्हाला…” अमृता म्हणाली.
आता मात्र अमितला आपली चूक कळून आली. अमृता ने बरेचदा माहेरी राहायचा हट्ट केला पण त्याने कधीच तिला राहू दिले नव्हते. आपण आपल्या बायकोला सतत गृहीत धरत आलोय ह्याचे सुद्धा त्याला वाईट वाटले. मुळात बायकोला तिच्या माहेरी राहण्यासाठी नवऱ्याकडून परवानगी घ्यावी लागते आणि आपण सुद्धा तिच्यावर मालकी हक्क असल्या प्रमाणे तिने सरळ सरळ तिला नकार देत असतो ही आपली चूक आहे हे सुद्धा अमितला कळून चुकले होते.
त्यानंतर तो काहीही न झोपता विचार करत झोपी गेला. दुसऱ्या दिवशी तो सकाळीच उठला. अमृता किचन मध्ये चहा बनवत होती. तो तिच्याजवळ जाऊन म्हणाला.
” अमृता…लवकर तयारी कर…आज मी तुला तुझ्या माहेरी घेऊन जाणार आहे…आणि यावेळी तुला हवे तेवढे दिवस तू तुझ्या माहेरी राहू शकते…” अमित म्हणाला.
” आज अचानक कसे काय सुचले तुम्हाला…?” अमृता ने आश्चर्याने विचारले.
” तुझ्या कालच्या कानउघडणी ने डोळे उघडले माझे…माझी चूक लक्षात आलीय माझ्या…यापुढे मी तुला माहेरी राहण्यापासून थांबवणार नाही…” अमित म्हणाला.
” अरे वा…हे आधी कळले असते तर आधीच कानउघडणी केली असती की चांगली…” अमृता म्हणाली.
” तू कर तुला हवी तेवढी चेष्टा पण मला खरंच माझी चूक कळून चुकली आहे…आणि मी तुला कधीच माहेरी जाण्यावरून बोलणार नाही… पण याचा अर्थ तू माहेरी जाऊन मला विसरून जायचं असे नाही… बरं का…?” अमित हसत म्हणाला.
आणि दोघेही नवरा बायको मनमुराद हसले.
समाप्त.
©® आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल