आज रविवार असल्याने जान्हवी जरा आरामात झोपेतून उठली. तिचा चार वर्षांचा मुलगा अजूनही झोपेतच होता. ती फ्रेश झाली आणि तिने स्वतःसाठी चहा केला. चहाचा कप घेऊन ती तिच्या बेडरूम मधल्या बाल्कनीत आली आणि आरामात बसून चहा प्यायला लागली.
रविवारी निवांत बाल्कनी मध्ये बसून चहा पिणे आणि आदेशच्या आठवणींमध्ये हरवून जाणे हा तिचा आवडता छंद. आदेश तिला आणि आयुषला या जगात एकटं सोडून एकटाच अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता. त्याला देवाघरी जाऊन चार वर्षे झाली होती.
एका छोट्याश्या अपघाताचे निमित्त झाले आणि एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा आधार हरपला. जान्हवी तशी चांगली शिकलेली होती. पण तिला नोकरी करण्याची फारशी आवड नव्हती. तिला तर आदेशचे घर सांभाळायचे होते. ती एक आनंदी गृहिणी होती. आणि लग्नाच्या तीन वर्षानंतर जेव्हा त्यांच्याकडे गोड बातमी आली तेव्हा तर ती आणि आदेश दोघेही आनंदाने हुरळून गेले होते.
दोघांनी होणाऱ्या बाळासाठी खूप स्वप्ने बघितली होती. पण दैवाने घाला घातला आणि जान्हवी आठ महिन्याची गरोदर असतानाच एके दिवशी ऑफिसमधून घरी येताना आदेश च्या बाईक ला एका भरधाव कार ने उडवले. दोन दिवस आय सी यू मध्ये आयुष्याची लढाई लढल्यावर तिसऱ्या दिवशी आदेश ने हार मानली.
आदेश गेल्यानंतर जान्हवीला सुद्धा तीव्र इच्छा झाली होती मरण्याची. पण लगेच तिला तिच्या पोटातील बाळाचा विचार आला आणि मरण्याचा विचार सोडून दिला. कारण तिला माहिती होतं. आपलं असं भ्याडपणे मरणे आदेश ला आवडणार नाही हे तिच्या मनाला सुद्धा ठावूक होतं.
मग तिने जगायचं ठरवलं. आदेश आणि तिच्या बाळासाठी. आणि ज्या दिवशी आयुष या जगात आला त्या दिवशी तर जणू तिच्या साऱ्या दुखांवर फुंकर घातली गेली. अगदी आदेशचेच रूप घेऊन आयुष तिच्या आयुष्यात आला होता. तेव्हापासून दोघेही मायलेक एकमेकांच्या साथीने जगत होते.
आदेशच्या इन्शुरन्सचे जे पैसे मिळाले होते त्यावर मिळणाऱ्या व्याजावर जान्हवी आणि आयुषचा उदरनिर्वाह आरामात चालत होता. तरीपण आयुष दोन वर्षांचा झाल्यावर जान्हव ने ऑनलाईन गाण्याचे क्लास घ्यायला सुरुवात केली. जान्हवीचे माहेर सुद्धा अगदी जवळच होते. तिची आई आणि वहिनी नेहमीच जाऊन येऊन असायची. ही देखील अधून मधून घरी जायची.
” मम्मा…मम्मा…” आयुषने झोपेतून उठून तिला हाक मारली तशी ती विचाराच्या तंद्रीतून बाहेर आली आणि आयुष जवळ गेली. त्यानंतर तिने घरातील कामे आटोपली. तिच्यासाठी आणि आयुष्यासाठी नाश्ता बनवला. दोघांनी सुद्धा आरामात टीव्ही वरील कार्टून बघत नाश्ता केला.
जान्हवी रिकाम्या प्लेट्स किचन मध्ये नेऊन ठेवणार इतक्यात त्यांच्या दारावरची बेल वाजली. इतक्या सकाळी कोण असेल असा विचार करून तिने मेन डोर ला असलेल्या होल मधून बाहेर कोण आहे ते पाहिले. आणि समोरची व्यक्ती बघून तिच्या काळजात धस्स झालं. बाहेर तिच्या सासुबाई उभ्या होत्या.
इतक्या दिवसानंतर ह्या इकडे कशा ह्याचे तिला नवल वाटले. तिने जरा घाबरतच दरवाजा उघडला. बाहेर तिच्या सासू सोबत तिचे सासरे, दिर आणि जाऊ सुद्धा आली होती. जान्हवीला वाटले की ह्यांना दारातच विचारावे की आता कशाला आलेत हे तिच्याकडे. पण तसे न करता तिने आधी त्यांना बसायला सांगितले. ते चौघेही हॉल मध्ये सोफ्यावर बसले. त्यांना कधीही न पाहिल्याने आयुष त्यांना कुतूहलाने पाहत होता. तोच तिच्या सासुबाई त्याच्याकडे पाहून म्हणाल्या.
” ये बाळ…आमच्या जवळ ये…मी तुझी आजी आहे…”
पण आयुष मात्र त्यांच्याकडे गेला नाही. त्याने प्रश्नार्थक नजरेने जान्हवीकडे पाहिले. जान्हवीने मानेनेच त्याला होकार दिला तसा तो तिच्या सासुबाई जवळ जाऊन उभा राहिला. सासूबाईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला सोबत आणलेले चॉकलेट दिले.
ते चौघे ही आयुषला खूपच जास्त एकटक पाहत होते हे जान्हवीच्या नजरेतून सुटले नाही. पण त्यांच्याशी नेमकं काय बोलावं हे जान्हवीला कळत नव्हते. म्हणून ती तशीच त्यांच्यासाठी पाणी आणायला किचन मध्ये गेली. पण नजर मात्र आयुष वरच होती. तिला मागे घडून गेलेल्या सगळ्या घटना आजही अगदी जशाच्या तशा आठवत होत्या.
जान्हवी आणि आदेश न त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे हे जेव्हा आपापल्या घरी सांगितले होते तेव्हा दोघांच्या ही घरातून त्यांच्या प्रेमाला आणि लग्नाला विरोध झाला. कारण जान्हवीच्या हातावर आणि पायावर कोड ( पांढरे डाग) होते म्हणून आदेश च्या घरचे तिला सून म्हणून स्वीकारायला तयार नव्हते. आणि जान्हवीच्या घरच्यांना आदेशच्या घरच्यांची मानसिकता आधीच माहिती होती. पण या दोघांचा निश्चय झालेला होता. लग्न करतील तर फक्त एकमेकांशीच. त्यांनी घरच्यांना वर्षभर समजावून सांगितले पण काहीच फायदा झाला नाही.
त्यातच एके दिवशी आदेशची आई त्याला काहीही कल्पना न देता नात्यातील एका मुलीसोबत त्याचे लग्न ठरवून मोकळी झाली होती. आदेशला जेव्हा हे कळले तेव्हा त्याला कळून चुकले की घरचे आपल्या प्रेमाला मान्यता देणार नाहीत. म्हणून मग दोघांनी घरच्यांना न सांगता लग्न केले आणि अचानक गळ्यात हार वगैरे घालून घरी गेले.
तेव्हा आदेश च्या घरच्यांनी त्यांना घरात घेतलेच नाही. जान्हवी वर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावून त्यांनी दोघांनाही घराच्या बाहेर काढून दिले. जान्हवीच्या घरचे मात्र आधी रागावले पण नंतर त्यांनी हे लग्न मान्य केले. घरचे आपल्याला स्वीकारणार नाही ह्याची कल्पना असलेल्या आदेश ने त्याच्या अन् जान्हवीच्या साठी एक फ्लॅट आधीच भाड्याने घेतला होता.
तिथे दोघांचा संसार सुरू झाला. सुरुवातीला बऱ्याच गोष्टी adjust कराव्या लागल्या पण हळूहळू त्यांच्या संसाराची गाडी पूर्वपदावर येत होती. आदेश ने त्याच्या घरच्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच फायदा झाला नाही. उलट त्याच्या घरचे म्हणायचे की तू तिला सोडून दे. तुझ्यासाठी तिच्यापेक्षा चांगली मुलगी शोधू आपण. आदेशला मात्र या गोष्टी आवडायच्या नाहीत.
आदेश आणि जान्हवी दोघेही एकमेकांच्या सहवासात खूप आनंदात होते. आदेशच्या आईने मग आदेशच्या लहान भावाचे लग्न लावून दिले. आणि त्यांच्या मनासारखी सून घरात आणली. आणि आदेश ला त्यांच्या संपत्ती तून बेदखल केले. पण संपत्ती गेल्याचे दुःख आदेशला झाले नाही पण घरच्यांनी अजूनही त्याला स्वीकारले नाही ह्याचे मात्र त्याला खूप दुःख झाले होते.
आदेश नोकरीत खूप चांगली प्रगती करत होता. त्याने त्याच्या कमाईतून त्याच्या आणि जान्हवी साठी एक छोटेसे घर विकत घेतले. त्यानंतर काहीच दिवसात त्यांना येणाऱ्या बाळाची चाहूल लागली आणि दोघेही आनंदून गेले. निदान नातवंडांच्या येण्याने घरचे माफ करतील ही आशा सुद्धा त्याला होतीच.
पण त्या एका अपघाताने होत्याचे नव्हते झाले आणि आदेश कायमचा निघून गेला. तेव्हा पण त्याच्या घरच्यांनी जान्हवीला दोषी ठरवले होती. आमच्या मुलाला गिळले. पांढऱ्या पायांची, अपशकुनी आणि काय काय आरोप केले होते.
आठ महिन्यांच्या गरोदर असलेल्या जान्हवीने जेव्हा निदान माझ्या पोटातल्या बाळासाठी तरी माझा स्वीकार करा अशी विनंती केली तेव्हा तिच्या पोटातले बाळ नेमके आदेशचे आहे की नाही ह्यावर देखील त्यांनी संशय घेतला होता.
आधीच नवऱ्याचा मृत्यू आणि त्यानंतर लगेच तिच्या चारित्र्यावर आणि तिच्या बाळाच्या अस्तित्वावर उठलेले प्रश्न ह्यामुळे ती पुरती कोलमडून गेली होती. पण त्यावेळी तिच्या माहेरचे तिच्या मदतीला आले. तिच्या आईवडिलांनी तिला त्यांच्या घरी येण्यासाठी विनवले पण ह्या घरात आदेश च्या आठवणी आहेत म्हणून तिने इथेच राहणे पसंत केले होते. मग तिच्या आईवडिलांनीच तिच्या घराजवळच एक घर घेतले आणि तिला त्यांचा आधार मिळाला. आईवडिलांच्या आधाराने स्वतःच्या बाळासाठी तिने स्वतःला सावरले.
त्यानंतर आयुष जन्मल्यावर आजपर्यंत ते एकदाही तिची खाली खुशाली विचारायला किंवा बाळाला बघायला आले नव्हते. पण आज इतक्या वर्षांनी कसे बरे त्यांनी येणे केले असावे ह्या विचाराने जान्हवीच्या डोक्यात थैमान घातले होते.
क्रमशः
स्वीकार – भाग २ (अंतिम भाग)