विनायकरावांच्या लहान मुलाचे आदित्यचे लग्न होऊन पंधरा दिवस झाले होते. लग्न मोठ्या थाटात पार पडलं होतं. लग्न झाल्यावर गोंधळ, सत्यनारायण सुद्धा थाटात पार पडला.
सगळे पाहुणे सुद्धा आपापल्या घरी निघून गेले. लहान मुलगा, सून बाहेरून फिरून सुद्धा आले. सगळं काही सुरळीत सुरू होतं. लहान सूनबाईचा स्वभाव सुद्धा चांगला वाटत होता. घरच्यांशी मिळून मिसळून वागायचा प्रयत्न करत होती.
अशातच एके दिवशी त्यांचा मोठा मुलगा अजित त्यांच्या जवळ आला. आणि म्हणाला…
” बाबा…एक बोलायचं होतं…”
” बोल ना…” विनायकराव म्हणाले.
” बाबा…मला आणि अदितीला (अजितची बायको) रोज ऑफिसला जाण्यासाठी ये जा करावी लागते…” अजित म्हणाला.
” मग .” विनायकरावांनी विचारले.
” म्हणून आमचा असा विचार होता की आम्ही शहरातच एखादं घर घ्यावं आणि तिथेच राहायला जावं…” अजित म्हणाला.
आणि विनायकरावांना धक्का बसला. अजित…घरचा मोठा मुलगा…ज्याने कुटुंबाला एकत्रित ठेवायला हवं…सांभाळून घ्यायला हवं…त्यालाच वेगळी चूल मांडायची आहे म्हणजे काय… ज्या एकत्र कुटुंबाचा विनायकरावांना गर्व होता तेच विस्कटित होऊ पाहत होते..
” अरे पण असे अचानक काय सुचले तुला…तुम्ही दोघेही एकाच ठिकाणी नोकरी करता…आपल्या घरापासून पंचवीस किलोमीटर प्रवास करावा लागतो तुम्हाला फक्त…” विनायकराव समजावणीच्या सुरात म्हणाले.
” पण त्या प्रवासाने खूप दगदग होते बाबा…आमचा आधीपासूनच शहरात राहायला जायचा विचार होता…पण आम्ही आदित्यचे लग्न व्हायची वाट पाहत होतो…म्हटलं त्याचं लग्न झालं की तो तुमच्याजवळ राहील आणि आम्हाला तुमची जास्त काळजी वाटणार नाही…” अजित म्हणाला.
” अरे पण आपला इतका मोठा वाडा आहे…हे सगळं तुम्हा दोघा भावांच च आहे ना…आमच्या मागे हे वैभव तुम्ही दोघांनीच जपायला पाहिजे ना…मग आपलं स्वतःचं घर सोडून कशाला शहरात वेगळं घर घ्यायचं…” विनायक राव म्हणाले.
” माफ करा बाबा…पण आपला हा वाडा आता जुना झालाय…आणि आता आपण वतनदार वगैरे नाही आहोत…तो काळ गेलाय आणि हा वाडा सुद्धा जुना झाला आहे…ह्या वाड्याला आता काहीच किंमत नाहीय…ह्याच्या डागडुजी वर खर्च करायला सुद्धा परवडणार नाही…आणि आम्ही ठरवलंय शहरात राहायला जायचं म्हणून…” अजित म्हणाला.
अजित आपल्याला सोडून दुसरीकडे राहायला जाणार यापेक्षा जास्त दुःख त्यांना आपल्या समृद्ध इतिहासाचा वारसा असलेला हा वाडा म्हणजे अजितच्या लेखी फक्त एक जुनी इमारत आहे हे कळल्याने झाले.
अजित मोठा होता. आपले निर्णय घ्यायला सक्षम होता. विनायकराव त्याला समजावण्याच्या जास्त भानगडीत पडलेच नाहीत. कारण तो ऐकणार नाही हे त्यांना माहिती होते. पण त्याच्या जाण्याचे दुःख मात्र त्यांना खूप झाले होते. त्यांच्या पत्नीने जानकीबाईनी मात्र अजितला समजवायचा पुरेपूर प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही.
सुट्टीच्या दिवशी घरी येत जाईल हे सांगून अजित आणि अदिती घर सोडून निघून गेले. त्यांना घर घेण्यासाठी मदत म्हणून विनायकरावांनी त्यांच्याकडे जमा असलेली काही रक्कम सुद्धा त्यांना दिली. पाखरे मोठी झाली की ती आपल्याजवळ राहत नाही ह्याची कल्पना विनायकरावांना होती. पण आपली मुलं तशी नाहीत हा त्यांना विश्वास होता. मात्र आता त्यांचा विश्वास डळमळीत होऊ पाहत होता.
दर सुट्टीला घरी यायचं सांगून गेलेला अजित तब्बल एका महिन्याने घरी चक्कर मारायला आला होता. तो सुद्धा आला त्या दिवशीच निघून गेला. आता वाड्यात फक्त विनायकराव, त्यांची म्हातारी आई, त्यांच्या पत्नी जानकीबाई, लहान मुलगा आदित्य आणि त्याची पत्नी अनघा एवढे पाच जण राहायचे.
अनघा आणि आदित्य सुद्धा नोकरी करायचे. ते नोकरीसाठी घराबाहेर पडले की घर खायला उठायचं. पण तर दोघेही घरी परत आले की घराचं गोकुळ झाल्यासारखं वाटत असे. अनघा खूप समजुतदार होती. आणि तितकीच गोड सुद्धा. आणि बोलायला खूप मोकळी. ती लग्न करून आली तेव्हा तिला हा वाडा मनापासून आवडला होता. वाडा जुना झाला असला तरीही त्यातील कलाकुसर अजूनही लक्षात यायची. एका एका खोलीचे बांधकाम खूप काळजीपूर्वक केले होते.
विनायकरावांचा खूप मोठा दुमजली वाडा होता. गढीवर बांधलेल्या ह्या वाड्यात एकूण बारा खोल्या होत्या. बाहेर मोठी दगडाची भिंत मागच्या दोनशे वर्षांपासून वाड्याचे संरक्षण करत होती. वाड्याचे प्रवेशद्वार लाकडी होते. आणि ये जा करायला एक लहान दिंडी दरवाजा सुद्धा होता.
लाकूड, चुना, दगड आणि मातीपासून बनलेला हा वाडा दोनशे वर्ष जुना होता. वाड्याच्या प्रवेशद्वारावर सुंदर कलाकुसर केलेले होती. वाड्याच्या मोठ्या भिंतींमधून उन्हाळ्यात गारवा आणि हिवाळ्यात ऊब जाणवायची. पूर्वी असलेलं वैभव आता नव्हतं मात्र विनायकरावांना आपल्या ह्या वाड्याचे विशेष कौतुक होते. आणि त्यामुळे त्यांना गावात खूप मान होता.
विनायक रावांकडे तीस एकर जमीन होती. जमीन चांगली पिकायची. चांगलच उत्पन्न होतं. विनायकरावांनी अजित आणि आदित्यला शिक्षणात काहीच कमी पडू दिले नाही. दोन्ही मुलं शिक्षणात हुशार होती ह्याचं त्यांना कायम कौतुक असायचं.
त्यानंतर दोन्ही मुलांना नोकऱ्या लागल्या. विनायकरावांनी थाटामाटात दोन्ही मुलांची लग्ने लावून दिली. दोन्ही सूना सुद्धा नोकरी करायच्या. विनायकरावांनी आता मोठ्या मुलाला घर घेण्यासाठी सुद्धा काही पैसे दिले होते. आता त्यांच्याजवळ जो काही थोडाफार पैसा उरला होता तो त्यांनी आदित्यला द्यायचे ठरवले.
एके दिवशी त्यांनी आदित्य ला बोलावले आणि म्हणाले…
” आदित्य…मी माझ्याकडे जमा असलेल्या पैशांमधून काही पैसे अजीतला घर घेण्यासाठी दिले आहेत…आणि उरलेले पैसे तुझ्याकडे द्यावेत असा माझा विचार आहे…तुला जेव्हा गरज पडेल तेव्हा तू ते पैसे माझ्याकडून मागून घे…”
” नाही बाबा…मला सद्ध्या पैशांची काहीच गरज नाही…आणि मला लागले तरी मागेन ना तुम्हाला…” आदित्य म्हणाला.
बाजूलाच स्वयंपाकघर असल्याने अनघाने आदित्य आणि त्याच्या वडिलांचे बोलणे ऐकले होते. ती बाहेर आली आणि म्हणाली…
” बाबा…बरेच दिवस झाले एक गोष्ट माझ्या मनात आहे…तुम्हाला काही हरकत नसेल तर बोलू का…?”
तिच्या बोलण्याने विनायक रावांच्या काळजात पुन्हा एकदा धस्स झालं. त्यांना वाटलं की आता ह्या दोघांना पण बहुतेक वेगळं राहायचं आहे. तशी जेव्हा अजित घर सोडून वेगळा राहायला निघून गेला तेव्हाच त्यांनी ह्या गोष्टीचा सुद्धा विचार केला होता की कधीतरी आदित्य सुद्धा आपल्याला सोडून जाईल. पण तो दिवस इतक्या लवकर येईल असे त्यांना अजिबात वाटले नव्हते. ते जरा अनिच्छेने अनघा ला म्हणाले.
” हा…बोल ना सूनबाई…”
क्रमशः
अधिकार भाग २ (अंतिम भाग)