प्रीती फक्त बारावी पर्यंत शिकलेली होती आणि तिला घरकामा व्यतिरिक्त काही विशेष काम येत नव्हते. पण तिने आधी घरच्या शेतीत काम केले असल्याने तिला शेतीतील कामांची सवय होती. तिने शेतात मजुरीला जायचे ठरवले. लाडाकोडात वाढवलेली मुलगी तिच्या दोन वर्षाच्या बाळाला घरी ठेवून मजुरीला जाईल हे ऐकुन तिच्या आईचे काळीज तीळ तीळ तुटत होते. तिच्या आईने तिला साफ मना केले तरीही ती काही मागे हटली नाही.
प्रीती आणि तिची आई घरातच एका खोलीत राहायची. वहिनी काही तिच्याशी कामाव्यतिरिक्त बोलायची नाही. प्रितीची आई घरी पार्थला सांभाळायची. आणि प्रीती गावातील बायकांसोबत रानात कामाला जायची. दोन वर्षांच्या पार्थ ला घरी सोडून जाताना प्रितीचे मन धाजावत नव्हते. पण तिचा नाईलाज होता. कामात असताना देखील तिचे लक्ष फक्त पार्थ कडेच असायचे. संध्याकाळी प्रीती शेतावरून घरी आली की पार्थ तिला सोडायचाच नाही.
मजुरी करून का होईना पण प्रीती आता स्वतःचा, पार्थ चा आणि तिच्या आईचा खर्च स्वतः करू लागली होती. साधी भाजी भाकरी खायची पण कुणासमोर ही हात पसरायचे नाहीत हे प्रीतीने ठरवले होते. अवघ्या एकविसाव्या वर्षी प्रीतीवर इतकी मोठी जबाबदारी येऊन पडली होती. जबाबदारीच्या ओझ्याने प्रीती लहान वयातच प्रौढ वाटत होती. चेहरा थकलेला वाटत होता. ती फक्त मुलाच्या आशेवर जगत होती.
प्रीती ला आता कोर्टात एकटीनेच जावे लागणार होते. अशातच पंकज कधी यायचा तर कधी नाही. बऱ्याच दिवसांपासून पंकज सुनावणीसाठी हजर राहिला नव्हता. पण आता मात्र त्याला हजर राहावे लागणार होते.
प्रितीच्या आईची तब्येत बरी नसल्याने ह्यावेळी प्रीती पार्थला सोबत घेऊन जाणार होती. कारण त्याला एकट्याला सोडून गेली तर ते लहान पोर चुकून वहिनीच्या मुलासोबत खेळायला जाईल आणि वहिनी त्याला कसं वागवेल ह्याचा काही अंदाज नव्हता. उगाच जीवाला घोर नको म्हणून प्रीतीने पार्थला सोबत घेतले.
प्रीती पार्थसोबत कोर्टात पोहचली. पंकज अजुन आलेला नव्हता. प्रीती तिथेच एका व्हरांड्यात पार्थला घेऊन बसलेली होती. इतक्यात तिथे पंकज सुद्धा पोहचला. ह्या सुनावणी साठी पंकज सुद्धा आज एकटाच आला होता.
प्रीती तिच्याच विचारात मग्न असल्याने तिचे पंकज वर लक्ष गेले नाही. पण पंकजने प्रीतीला पाहिले. आणि तिच्या मांडीवर बसलेल्या निरागस पार्थ ला सुद्धा. पंकजने पार्थ ला आज पहिल्यांदा पाहिले होते. त्याच्या आईने त्याला शपथा दिल्याने त्याने आजपर्यंत एकदा सुद्धा पार्थला पाहिले नव्हते. पार्थ अगदी त्याच्यासारखाच दिसत होता. तसेच मोठे डोळे, भारदस्त कपाळ, तसेच नाकडोळे.
पण खूपच बारीक दिसत होता. हातावर, पायावर, कपाळावर जखमांचे व्रण दिसत होते. अंगावर जुनाट कपडे, साधी चप्पल होती. व्हरांड्यात आईच्या मांडीवर एखाद्या शहाण्या मुलासारखा बसून होता. त्याला पाहून पंकजला भरून आले.
मोठ्या माणसांच्या भांडणात ह्या निरागस जीवाने किती सोसले ह्याची त्याला जाणीव झाली. आपण स्वतः मात्र इतक्या जास्त सुखसोयीत राहतो आजी आपला मुलगा मात्र हलाखीचे जीवन जगतोय ह्याच्या जाणिवेने त्याला मेल्याहून मेल्यासारखे झाले.
आपण इतके निष्ठुर वागू शकतो ह्याची त्यालाच लाज वाटली. जवळ जावून पार्थला मिठीत घ्यावे अशी त्याला तीव्र इच्छा झाली. पण लगेच त्याची नजर आपल्याच विचारत गुंग असणाऱ्या प्रीतीवर गेली.
तिची सुध्दा पार काया बदलली होती. अंगावर साधीशी साडी, विस्कटलेले केस, निस्तेज डोळे. आज तिला या अवस्थेत बघून पंकजचे मन हेलावले होते. त्याला वाटले होते की प्रीती तिच्या माहेरी मजेत असेल. तिचे दोन्ही भाऊ तिला चांगल्या पद्धतीने सांभाळत असतील. तशी प्रितीची माहेरची परिस्थिती सुद्धा चांगली होती.
पण प्रीतीला पाहून ती कोणत्या परिस्थितीत जगतेय हे पंकजला कळून चुकले. पंकज आतून आणि बाहेरून पुरता हादरला होता. खोट्या अहंकारा पायी त्याने स्वतःच्या बायको अन् मुलाला वाऱ्यावर सोडले होते. अन् इतके दिवस त्याला त्याचे काही वाटले नव्हते.
अन् आता जेव्हा त्याला त्याची चूक कळून आली होती तेव्हा त्याला एक क्षण देखील घालवायचा नव्हता. तो लगेच पुढे आला आणि त्याने प्रितीच्या मांडीवर बसलेल्या पार्थ ला उचलून मिठीत घेतले. पंकजच्या अशा अनपेक्षित वागण्याने प्रीती सुद्धा गोंधळली होती.
पण पुढच्याच क्षणी तिला वाटले की पंकज आपल्यापासून पार्थला हिरावून घेईल. पार्थ प्रितीच्या जगण्याचा एकमेव आधार होता. तिने पार्थला पंकजच्या मिठीतून सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. पण पंकजने मात्र पार्थला खूप घट्ट पकडले होते. पंकज पार्थला मिठीत घेऊन रडत होता.
पार्थला काहीच कळत नव्हते. तो नुसता आईकडे पाहून रडत होता. शेवटी प्रीतीने खेचतच पार्थला पंकजच्या मिठीतून सोडवले अन् पंकज भानावर आला. प्रितीच्या नजरेला नजर द्यायची त्याची हिम्मत होत नव्हती. तो तिथेच मटकन खाली बसला. पंकज असं का वागतोय हे प्रीतीला कळत नव्हते. इतक्यात पंकजने तिच्या समोर हात जोडले आणि म्हणाला.
” प्रीती…मला माफ कर…माझ्यामुळे तुझ्यावर इतके वाईट दिवस आले…तू किती स्वप्ने घेऊन माझ्या आयुष्यात आली होतीस…आणि मी मात्र नालायक ठरलो… मी तुला कोणतेच सुख देऊ शकलो नाही…आईचा चांगला मुलगा बनण्याच्या नादात मी तुम्हा दोघांची आयुष्य बरबाद केली…माझ्या नाकर्तेपणामुळे तुला किती सहन करावं लागलं असेल ह्याची तर माझ्याच्याने कल्पनाच होत नाही…
खरं सांगायचं तर मी गरोदरपणात तुझे लाड करायला हवे होते…तुला हवं नको ते विचारायला पाहिजे होतं…तुझ्या पोटातल्या बाळाशी बोलायला पाहिजे होतं…तुला खूप सुखी ठेवायला पाहिजे होतं…आपलं बाळ जन्माला आल्यावर त्याचा खूप लाड करायला पाहिजे होता…पण मी काय केलं…तुला साधा चिवडा खावासा वाटला पण मी तो सुद्धा देऊ शकलो नाही…उलट एवढ्याशा कारणावरून तुला माहेरी पाठवलं…आणि इतके वर्ष तुझी साधी चौकशी सुद्धा केली नाही…ना मी एक चांगला नवरा बनू शकलो…ना बाप…ना चांगला माणूस…
आज मी माझ्याच नजरेत पडलो आहे प्रीती… खरं सांगायचं तर मला जगण्याचा काही एक अधिकार नाही…पण तू एक संधी दिली तर मला माझ्या चुकांच प्रायश्चित्त करेन मी…”
पंकजचे बोलणे ऐकुन प्रीती हादरलीच. आपण इतक्या वर्षात जे सोसलय ते फक्त ह्याच्या एका दिवसाच्या माफी मागण्याने भरून तर निघणार नाही…मग ह्याला नेमकी कुठली संधी हवी आहे हे तिला कळत नव्हतं. प्रीतीने मागच्या काही दिवसात इतके अश्रू गाळले होते की पंकजचे अश्रू बघून तिला फारसे वाईट वाटले नाही.
” कुठली संधी हवी आहे तुम्हाला…मला काही कळलं नाही…” प्रीती थंडपणे म्हणाली.
” तू जर मला एक संधी दिलीस तर की एक चांगला नवरा आणि बाप होऊन दाखवेन…पार्थला जे सुख मी देऊ शकलो नाही ते द्यायचं आहे मला…तू घरी परत चल…यानंतर तुला काहीही त्रास होणार नाही हे वचन देता मी तुला…” पंकज हात जोडून म्हणाला.
” नाही…मला आता तुमच्यावर विश्वास राहिला नाही…जो व्यक्ती एकदा वाईट वागू शकतो तो पुन्हा का नाही वाईट वागणार…आणि माझ्या पार्थला सांभाळायला मी समर्थ आहे…आजवर तुम्ही नव्हते तेव्हा मी एकटीनेच सांभाळले त्याला…या पुढे देखील मीच सांभाळेल…तुम्हाला आमची काळजी करायची काही गरज नाही…” प्रीती निर्विकारपणे म्हणाली.
” प्लीज एकदा विश्वास ठेवून बघ ना माझ्यावर…मला माझ्या चुका सुधारायच्या आहेत…तुला नाही पण मला तुम्हा दोघांचीही खूप गरज आहे…हवं तर मी पाया पडतो तुझ्या…” पंकज प्रीती समोर हात जोडून गयावया करत होता.
” नाही…मी नाही ठेऊ शकत पुन्हा तुमच्यावर विश्वास…तुम्ही जा इथून…जे काही बोलायचय ते आपण कोर्टात बोलू…” एवढे बोलून प्रीती पार्थला घेऊन तिकडून जाऊ लागली.
ती थोडी अंतर चालत गेली असेल तेवढ्यातच मागून लोकांच्या गलक्याचा आवाज आला. तिने मागे वळून पाहिले तर पंकज खाली कोसळला होता. ती लगेच धावत त्याच्याजवळ गेली. लोकांच्या मदतीने त्याला जवळच्याच एका हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली. पार्थ सोबत होताच.
आजूबाजूला काय घडतंय हे त्याला कळत नव्हते पण आपली आई काहीतरी टेन्शन मध्ये आहे ह्याची जाणीव त्या लहानग्या जीवाला झाली होती. म्हणून तो सुद्धा आज आईच्या कडेवर अगदी शांत बसलेला होता.
दवाखान्यात पंकजवर तातडीने इलाज सुरू झाले. डॉक्टरांकडून प्रीतीला कळले की पंकजला सौम्य हार्ट अटॅक आला होता. हे ऐकुन प्रीती मनातून घाबरली. पंकज कसाही असला तरी त्याचे काही वाईट व्हावे असे तिला कधीच वाटले नव्हते.
तिने नकळतच देवाला हात जोडले आणि पंकजला काही होऊ देऊ नको अशी प्रार्थना केली. त्यानंतर तिने पंकजच्या लहान भावाला फोन केला. आणि पंकज हॉस्पिटल मध्ये असल्याचे सांगितले. पंकजचा भाऊ काही वेळातच हॉस्पिटल मध्ये पोहचला. तो हॉस्पिटल मध्ये पोहचल्यावर लगेच प्रीती हॉस्पिटल मधून बाहेर पडली आणि पार्थला घेऊन तिच्या घरी आली.
क्रमशः
एकाच ह्या जन्मी जणू – भाग ४
©®आरती लोडम खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेजला लाईक करा.
Comments 1