” हो…कारण मी तुझ्यापेक्षा चार उन्हाळे पावसाळे जास्त पाहिले आहेत…तुला मागच्या काही दिवसात खूप दुःखांचा सामना करावा लागला हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असणार…पण आयुष्यात आपल्याला जराही सुख मिळत असेल तर ते ओंजळीत भरून घ्यावं…भूतकाळ कुरवाळत बसल्यापेक्षा तुझा भविष्यकाळ कसा सुखी होईल याकडे लक्ष द्यायला हवं…” आई म्हणाली.
” जे काही मी भोगलय त्यासाठी मी त्यांना कशी माफ करू..?” प्रीती म्हणाली.
” आता जसं तू तुझ्या भावाला माफ केलं आहेस तसचं पंकाजरावांना पण कर… तसं पाहिलं तर तुझ्याबाबतीत आमची सुद्धा चूकच झाली ना…एकतर इतक्या लहान वयात तुझं लग्न लावून दिलं आणि त्यानंतर तुझ्यासोबत तुझी सासू कशी वागते हे माहिती असल्यावरही तुला सहन करायला सांगितले..
आणि त्यानंतर तुझ्या भावांनी तुला त्यांच्या जबाबदारीवर माहेरी आणले पण तुझी जबाबदारी घेतली नाही…आणि तू दुःखात असताना तुझे अश्रू पुसायचे सोडून लोक काय म्हणतील ह्याचा विचार करत राहिलो…पण तू आम्हा सर्वांना माफ केलंच ना…एकाच चुकीसाठी एकाला वेगळा न्याय आणि दुसऱ्याला वेगळा हे तर बरोबर नाही ना…
आणि त्यांच्या जागी दुसरा कोणी मुलगा असता आणि त्याच्या आईला तुझे भाऊ बोलत असताना शांत राहिला असता का…त्यांनी त्यांच्या आईच्या प्रभावाखाली येऊन चूक केली आहे…पण त्यांनी त्यांची चूक मानली आहे आणि ती चूक सुधारायचा पुरेपूर प्रयत्न सुद्धा करत आहेत…” आई म्हणाली.
” पण आई…इतक्या सहजासहजी मी कसं विसरू सगळं…” प्रीती म्हणाली.
” लवकर विसरू शकणार नाहीस…पण एकदा प्रयत्न तरी कर…पंकज रावांना आणि स्वतःला देखील एक संधी तर देऊन बघ…आयुष्यात प्रत्येकाला दुसरी संधी नाही मिळत बाळा… पंकज रावांच्या डोळ्यात मला पश्चात्ताप दिसून येत आहे…शिवाय तू एकटी नाहीस…तुझ्यासोबत पार्थच्या आयुष्याचा देखील प्रश्न आहे…” आई म्हणाली.
प्रीती आईच्या बोलण्याचा विचार करू लागली. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. आईने तिच्या मनातील द्वंद ओळखले आणि म्हणाली…
” प्रीती…जुन्या गोष्टींना मनात ठेवून आयुष्यभर कुढत बसल्या पेक्षा त्या व्यक्तीला माफ करून सर्वकाही विसरून नव्याने सुरुवात करणे केव्हाही चांगले…तू अजूनही विचार करत आहेस…पण पार्थ ने मात्र पंकज ला स्वीकारले आहे…ते बाहेर बघ…”
असे म्हणून आईने प्रीतीला घराच्या खिडकीतून बाहेर अंगणात खेळत असलेल्या पार्थ आणि पंकजकडे बोट दाखवले. पार्थ पंकज सोबत खूप चांगला खेळत होता. तसा पार्थ अनोळखी लोकांसोबत लवकर मिसळत नसे. पण पंकज शी मात्र त्याने थोड्याच वेळात मैत्री केली होती. पार्थ ला त्याच्या वडिलांचे प्रेम मिळावे ह्यासाठी प्रीतीने अनेकदा देवाजवळ हात जोडले होते. आणि त्यांना सोबत बघून प्रीतीला मनातून खूप आनंद होत होता. तिच्या चेहऱ्यावर इतक्या दिवसांनंतर हसू पाहून आईला सुद्धा आनंद झाला.
आई पुढे म्हणाली…
” हे बघ प्रीती…तू एकदा पंकज रावांना संधी देऊन बघ…आणि आता ते तुझ्याशी नीट वागले नाही तर तू एक क्षण देखील तिथे राहायचे नाही…मी तुला वचन देते की मी स्वतः तुला घरी सोबत घेऊन येईल…आणि ह्यावेळेला मी लोक काय म्हणतील ह्याचा अजिबात विचार करणार नाही…”
प्रीतीने आईच्या बोलण्याचा विचार केला आणि तिला आईचे म्हणणे पटले. स्वतःसाठी नाही पण निदान पार्थ साठी तिने पंकज सोबत पुण्याला जायचे ठरवले.
तिने पंकजला तिचा निर्णय सांगितला. पंकजला खूप आनंद झाला. प्रितीच्या आईला देखील खूप आनंद झाला. पंकज दोन दिवस गावातच राहिला. ह्या दोन दिवसात घरात बरंच काही बदललं होतं.
प्रितीच्या दादाने पंकजची माफी मागितली होती. प्रितीच्या आईच्या हातात पुन्हा घरचा व्यवहार आला होता. नाईलाजाने का होईना तिच्या वहिनीने तिच्या आईची माफी मागितली होती. थोड्याफार प्रमाणात घर पुन्हा पूर्वी प्रमाणे झाले होते.
दोन दिवसांनी पंकज प्रीती आणि पार्थला घेऊन पुण्याला जायला निघाला. प्रितीच्या आईने प्रीतीला आनंदाने निरोप दिला. प्रितीच्या काळजीने डोळ्यात आलेले अश्रू तीच्याबाईने आपल्या साडीच्या पदराने अलगद टिपून घेतले.
पंकज सोबत प्रीती आणि पार्थ दोघेही पुण्यात आले. इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा पुण्यात आल्यावर प्रीतीला भरून आले. पंकज सुद्धा तिच्या भावना समजत होता. पण त्याने मनोमन ठरवले होते की यापुढे तो प्रीतीला अश्रू नाही गाळू देणार.
पंकज ने घरी जाण्यासाठी टॅक्सी बोलावली होती. टॅक्सी त सामान ठेवून तिघेही टॅक्सीने घराच्या दिशेने जाऊ लागले. थोडे अंतर चालल्यावर प्रीतीला लक्षात आले की टॅक्सी थोडी समोर निघून आली आहे आणि घर थोडं मागे निघून गेलंय. ती पंकज ला म्हणाली.
” आपलं घर तर मागे राहिलं…आपण थोडं पुढे निघून आलोय…”
” आपण त्या घरी जाणार नाही आहोत…आपण आपल्या घराच्या मागच्याच गल्लीत एका नव्या घरी भाड्याने राहणार आहोत…” पंकज म्हणाला.
तोवर घर आलं सुद्धा…पंकज ने सामान टॅक्सीतून बाहेर काढले…पंकज चा एक मित्र तिथे आधीच हजर होता…त्याने पंकज कडे घराची चावी दिली आणि तो निघून गेला. पंकज सामान घेऊन आत गेला. आणि त्याच्या पाठोपाठ प्रीती आणि पार्थ सुद्धा आत गेले.
नवीन घर लहान होते पण खूप छान होते. हवेशीर किचन, छोटा पण सुंदर हॉल, आणि एक छोटीशी बेडरूम. गरजेचे सामान पंकजने गावी येण्या पूर्वीच भरून ठेवले होते. आणि काही सामान त्याच्या मित्राने आणून दिले होते.
घरात आल्यावर प्रीतीने हात पाय धुवून आधी चहा ठेवला आणि पार्थला खावू घातले. नंतर चहा पिताना तिने पंकज ला विचारलेच,
” आपण आपलं घर असताना सुद्धा इथे भाड्याच्या घरात का राहायला आलोय…”
” कारण तिथे आईने तुला मनापासून स्वीकारलं नाहीय अजुन…मग तिथे गेलो असतो तर पुन्हा सर्वकाही आधीसारखच झालं असतं…आईने तुला पूर्वीप्रमाणेच वागवलं असतं…आणि पार्थ च्या बद्दल सुद्धा आईच्या मनात काही विशेष माया नाही आहे…मी ऑफिसला गेल्यावर आई तुझ्याशी आणि पार्थशी कशी वागेल ह्याचा अंदाज नाही…म्हणून मी इथे भाड्याने घर घेतलं…” पंकज म्हणाला.
” पण मी सहन करून घेतलं असतं…आता तुम्ही माझ्याबरोबर आहात तर मला कशाचीच भीती नाही…” प्रीती म्हणाली.
” पण मला तेच नकोय… मी आता तुला जास्त दुःखात नाही पाहू शकत…आणि शिवाय पार्थ चा विचार सुद्धा करावा लागेल…त्याच्यासमोर आई अशी वागली तर मोठा झाल्यावर त्याच्यावर काय परिणाम होईल याचाही विचार आपण करायला हवा…” पंकज म्हणाला.
” मग आता तुमची आई घरी एकटीच राहणार का…” प्रीतीने विचारले.
” नाही…प्रणव असणार ना तिच्यासोबत…आणि आईवर लक्ष असावं म्हणूनच घर अगदी मागच्याच गल्लीत घेतलंय…” पंकज म्हणाला.
” आणि आपल्याला कायमचं इथेच राहावं लागणार का..?” प्रीतीने प्रश्न विचारला.
” आपण आईच्या जवळ राहिलो तर तिची खूप चिडचिड होईल…आणि आपण दूर राहिल्याशिवाय आईला तिची चूक कळणार नाही…मला विश्वास आहे की कधी ना कधी तरी आई तुला मनापासून स्वीकारेल…आणि त्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहील…” पंकज म्हणाला.
प्रीतीला देखील त्याचे म्हणणे थोडीफार पटले होते.
प्रीतीने घराची थोडी साफसफाई केली आणि सोबत आणलेले समान व्यवस्थित लावले. पंकज बाजारातून काही भाज्या घेऊन आला होता. प्रीतीने संध्याकाळी छान स्वयंपाक बनवला. पार्थ ला नवीन घर खूप आवडले होते. तो दिवसभर घरात नुसतं खेळतच होता. त्यामुळे संध्याकाळी लवकर झोपी गेला.
त्यानंतर प्रीतीने घर आवरले आणि ती झोपायला आली. पंकज ने त्याची झोपायची व्यवस्था जमिनीवर केली होती. त्याला पाहून प्रीती ने विचारले…
” तुम्ही तुमची गादी खाली का टाकलीय…तुम्ही वर झोपणार नाही का…?”
” नाही…मला माहिती आहे की तू आपल्या मुलासाठी मला स्वीकारले आहेस…तुझ्या मनात माझ्यासाठी आता ते पूर्वीसारखं प्रेम राहिलेलं नाही…आणि जोपर्यंत मी तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम आणि विश्वास निर्माण करत नाही तोवर मी नवऱ्याचा हक्क गाजवणार नाही…” पंकज म्हणाला.
पंकज चे बोलणे ऐकुन प्रीती गप्प बसली. तिला पंकजचे बोलणे आवडले होते. ती स्वतःशीच हसली आणि पार्थच्या बाजूला येऊन झोपून गेली. आधीच्या दिवशीचा प्रवासाचा थकवा असल्याने प्रीतीला सकाळी उठायला थोडा उशीर झाला होता. प्रीती झोपेतून उठून बघते तर पंकज रूम मध्ये कुठेच दिसत नव्हता. त्याची गादी सुद्धा त्याने उचलून ठेवली होती.
क्रमशः
: https://mitawaa.com/एकाच-ह्या-जन्मी-जणू-भाग-८/
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल & इंस्टाग्राम
कथा आवडल्यास माझ्या मितवा या फेसबुक पेजला लाईक करायला विसरु नका.