” माझ्यासमोर तोंड वर करून बोलण्याआधी तू हे लक्षात ठेव की कायद्याने तू अजूनही माझी बायको आहेस…त्यामुळे मी जे म्हणेल तुला तसेच करावे लागेल…” सागर म्हणाला.
” आज मी तुमचा माझा नवरा असण्याचा हक्क नाकारत आहे…शिवाय कायदेशीर रित्या सुद्धा लवकरच तो हक्क संपेल…पण माझ्या मनातून तुम्ही केव्हाच उतरले आहात…या आधी तुमचं सगळं काही निमूटपणे ऐकुन, सहन करून मी चूक केली…पण एकच चूक पुन्हा करणार नाही मी…आणि तुमच्या काहीही बोलण्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही…” सावी म्हणाली.
” या चार महिन्यात असा काय बदल झाला जो मागच्या चार वर्षात झाला नव्हता…आठवतंय ना कशी माझ्या मागे मागे रडायची की श्वेताला सोडून द्या…आपण पुन्हा आपला संसार सुरू करू म्हणून…आणि आता कुठे गेली तुझ्यातला पतिव्रता बायको…?” सागर चिडत म्हणाला.
” जर नवरा त्या लायकीचा असता तर जीव सुद्धा ओवाळून टाकला असता…स्वतःच्या मर्जीने लग्न केलं तुम्ही…तरीसुद्धा लग्न झाल्यावर दोघांच्या मध्ये तिसरीला आणले…इतकंच नाही तर एखाद्या निर्लज्ज माणसाप्रमाणे मलाच येऊन सांगितलं की माझं दुसरीवर प्रेम आहे तू माझ्या आयुष्यातून निघून जा…
निघून जात नसशिल तर मरून जा म्हणून…त्यानंतर कितीतरी दिवस तुम्हाला आपल्या लग्नाची शपथ दिली…तुमच्या हातपाय पडले…पण तुम्हाला काहीच फरक पडला नाही…मागच्या महिन्यापर्यंत तर मोठ्या आवेशात येऊन म्हणत होते की मला डिव्होर्स हवाय म्हणून…
आणि आता एकाच महिन्यात अचानकपणे मला सांगायला येत आहेत की पुन्हा संसार करू म्हणून…नक्कीच श्वेताने तुम्हाला नाकारले असणार…त्याशिवाय तुम्ही असे परत येणे शक्यच नाही…आजवर माझ्यावर साधी दया ही न आलेल्या माणसाला माझ्यावर इतक्या लवकर प्रेम कसं होईल…” श्वेताने सुद्धा आज सागरला जशास तसे उत्तर दिले.
त्यावर सागर पुन्हा तावातावाने म्हणाला.
” होय…सोडलं तिने मला…म्हणून आलोय तुझ्याकडे परत… अन् तुझ्याकडे दुसरा कोणता पर्याय सुद्धा नसणार आहे आता… बाईची जात आहेस…नवऱ्याने टाकलेली बायको म्हणून जग तुला नेहमी हिणावतच राहील…त्यापेक्षा गपगुमान माझ्यासोबत पुन्हा संसाराला सुरुवात कर…मी तुला माफ करून पुन्हा स्वीकारायला तयार आहे…” सागर म्हणाला.
यावर सावीला मोठ्याने हसू आले. तिला हसताना पाहून सागर आणखीनच चिडला. आणि तिला म्हणाला.
” अशी हसतेस काय…मी काय जोक करत आहे का इथं…?”
” आता जोक नाही म्हणणार तर आणखी काय म्हणणार…चूक तुमची, बाहेर तोंड काळे तुम्ही केले, मला डिव्होर्स द्यायचा निर्णय सुद्धा तुमचा आणि तुम्हीच मला वर म्हणतात की मी तुला माफ करून स्वीकारायला तयार आहे म्हणून…पायासोबत डोक्याला सुद्धा मार लागलाय की काय…” सावी म्हणाली.
आणि सावीचे असे बोलणे ऐकून सागरच्या डोक्यात तिडीक गेली. त्याने सावीवर हात उगारला. पण सावी सुद्धा सावध होती. तिने वरच्यावर त्याचा हात पकडला. मात्र यामुळे आणखीनच चिडलेल्या सागरने तिचा हात मुरगळन्याचा प्रयत्न केला. पण साकेत सरांचे ह्या दोघांकडेही लक्ष असल्याने सागर जसा तावातावात आला तसेच ते सुद्धा या दोघांकडे निघाले. साकेत सरांनी सागरच्या हातातून सावीचा हात सोडवला…आणि सागरला म्हणाला.
” सोडा त्यांना…काय करताय हे…आणि एका स्त्रीवर हात उचलताना काही वाटत कसे नाही तुम्हाला…”
” ए…तू मध्ये पडू नकोस…तुझा इथे काहीही संबंध नाही…ही बायको आहे माझी…आणि हिला कसे सरळ करायचे ते माझे मी बघून घेईल…” सागर गुर्मीत म्हणाला.
” तुम्ही एका स्त्रीवर हात उचलण्यात पुरुषार्थ मानणारे असले तरीही मी मात्र माझ्यासमोर कुण्या स्त्रीचा अपमान होताना हातावर हात धरून पाहू शकत नाही…मग ती स्त्री खुद्द मारणाऱ्याची बायको का असेना…” साकेत सर म्हणाले.
” मग आधी तुझा माज उतरवतो…थांब…” असे म्हणत सागर त्याच्या अंगावर धावून गेला. मात्र आता खुद्द सावी त्याला आडवी आली. आणि सागरला थांबवत म्हणाली.
” खबरदार त्यांना हात जरी लावला तर…प्रत्येक ठिकाणी तुमची मनमानी चालणार नाही…”
सावी या माणसाच्या बचावासाठी आपल्या समोर येऊन आपल्याला उलट बोलतेय हे सागरला सहन झाले नाही. तो तिला म्हणाला.
” असा कोण लागून गेलाय हा तुझा…ज्याच्यासाठी तू माझ्याशी वाद घालत आहेस…माझ्यापेक्षा आता हा महत्त्वाचा आहे का तुला…”
” हे माझे खूप चांगले मित्र आहेत…आणि एक व्यक्ती म्हणून तुमच्यापेक्षा कैक पटीने चांगले आहेत…आणि एवढंच कारण पुरेसं आहे मला…” सावी म्हणाली.
आता मात्र सागर खूप जास्त चिडला होता. तो घरून ठरवून आला होता की आज फक्त प्रेमानेच बोलायचं सावी सोबत. पण इथे आल्यावर तो स्वतःचा राग रोखू शकला नाही. म्हणूनच सावी वर हात उचलण्याची हिम्मत झाली त्याची. पण सावी सुद्धा आज त्याच काहीच ऐकणार नव्हती. सावी त्याला म्हणाली.
” कुठवर हे सगळं करणार आहात तुम्ही…आणखी किती खालच्या पातळीवर उतरणार आहात…आयुष्यात खूप चुका केल्यात तुम्ही…त्या मान्य करण्याऐवजी आपल्या प्रत्येक चुकीसाठी इतरांना कारणीभूत ठरवणे बंद करा…आणि जर दुसरं कुणी तुम्हाला चांगलं सांगत आहे तर निदान त्यांचं ऐकावं तरी माणसाने…
आपलं नातं आता कधीच पूर्वीसारखं होऊ शकत नाही…आणि जे आधीच तुटलेलं आहे त्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका…मी आधी खूप समजावले तुम्हाला…अगदी माझा स्वाभिमान गुंडाळून ठेवत पाय पकडले तुमचे…पण तुम्ही माझे काहीच ऐकले नाही…तेव्हा जर कदाचित तुम्ही आपल्या लग्नाला एक संधी दिली असती तर सगळं काही ठीक सुद्धा झालं असतं…
पण आता खूप उशीर झालाय…आता माझ्या मनात तुमच्याबद्दल एकही भावना शिल्लक नाही…आधी निदान राग तरी यायचा…पण आता तो ही येत नाही आहे…कारण की कधीच तुम्हाला माझ्या मनातून आणि आयुष्यातून काढून टाकलं आहे…आता पुन्हा सगळं पहिल्या सारखं नाही होऊ शकत…
तुम्ही माझ्यासोबत जे काही केलंत…जसे वागलात ते विसरणे माझ्यासाठी उल्या जनमत तरी शक्य नाही…तुम्हाला श्वेता सोडून गेली तेव्हा तुम्ही पुन्हा माझ्याजवळ यायचा प्रयत्न करताय…पण मला असे कुणाच्या आयुष्यात सेकंड ऑप्शन बनून राहायचे नाही…ती नाही तर मग मी…
मी आयुष्यात पुढे निघून आली आहे…आणि तुम्ही सुद्धा पुढे निघून जा…कारण तुमचं माझ्यावर प्रेम नाहीय…कधीच नव्हतं…आणि माझ्या मनात जे काही तुमच्याबद्दल प्रेम होतं ते कधीच संपलय…मग असा ओढून ताणून संसार केल्यापेक्षा दूर झालेलं कधीही बरं…” सावी म्हणाली.
पण सागर मात्र तिचं म्हणणं समजूच शकला नाही. त्याच्या मनात फक्त एकच होते. सावी त्याच्या आयुष्यात राहिली असती तर त्याच्यासाठी आयुष्य खूप सोपे झाले असते. सावी सारखी गरीब स्वभावाची बायको असल्यास त्याचे सगळे नखरे सहन करेल असे त्याला वाटत होते. तो भांडणाच्या तयारीत होताच.
क्रमशः
गोष्ट एका लग्नाची – भाग ७ (अंतिम भाग)