आपल्या मुलाला ट्युशनला सोडायला गेलेली वसुधा घरी परतत होती. कॉलनीमधील पार्कमध्ये बसून बायका गोष्टी करत होत्या. वसुधाला सुद्धा त्यांनी हाक मारली. तशी वसुधा त्यांच्याजवळ गेली. तिला पाहून वंदना काकू म्हणाल्या.
” अग वसुधा.. आम्ही सगळ्या जणी विचार करतोय की एकदा रोहिणीला भेटून येऊ म्हणून…”
” बिचारी कशी जगत असेल काय माहिती…अजुन दुःखातून सावरली सुद्धा नसेल…” सुधा काकू म्हणाल्या.
” हो ना ग…खूपच वाईट वाटतं बघ…हे काय वय आहे का तिचं…विधवा होण्याचं…” रमा काकू म्हणाल्या.
” हो ना…शिवाय पदरात दोन लहान मुलं सुद्धा आहेत हो…” शारदा काकूंनी दुजोरा दिला.
त्यावर वसुधा म्हणाली.
” बरोबर बोलताय तुम्ही…आपण एकदा जायला पाहिजे तिला भेटायला…तिला आधार द्यायला…शेवटी आपणच तिला समजून घेतले पाहिजे…”
” हो ना…” रमा काकू म्हणाल्या.
” मी तर सांगणार आहे तिला…बाई ग जे झालं ते विसरून जा…शेवटी गेलेला माणूस काही परत येत नाही…पण मुलांचा विचार करून तरी तिने जगायला हवं ना…” सुधा काकू म्हणाल्या.
” आपण तिला समजावून सांगू की दुःख झटक आणि कामाला लाग…शेवटी घरच्या जबाबदाऱ्या उद्या चालून तिलाच पार पाडाव्या लागणार आहेत…येणारी परिस्थिती कशी असेल हे सांगता येत नाही…म्हणून तिला खंबीर व्हायला हवं…” वंदना काकू म्हणाल्या.
” आणि शिवाय तिची यात काय चूक…जे व्हायचं ते झालं म्हणावं… तसं वय सुद्धा खूप लहान आहे तिचं…तिने लग्नाचा विचार केला तरी काही गैर नाही त्यात…” शारदा काकू म्हणाल्या.
या सगळ्याजणी वरच्या मजल्यावर राहणाऱ्या रोहिणी बद्दल बोलत होत्या. अवघ्या बत्तीस वर्षांची असेल रोहिणी. तीन महिन्यांपूर्वी तिचा नवरा सुमित एका अपघातात वारला होता. पदरात दोन जुळी मुले होती.आरव आणि अद्विक. अवघ्या सहा वर्षांची. सुखी कुटुंबावर घराच्या मुख्य व्यक्तीच्या जाण्याने दुःखाचे सावट पसरले होते.
रोहिणी या धक्क्याने पार कोलमडून गेली होती. पण नियतीपुढे कोणाचे काहीच चालत नाही हेच खरे. तिची लहान मुले सुद्धा बाबांसाठी खूपच रडली होती. आणि हे पाहून सगळेच शेजारी त्यांच्यासाठी हळहळले होते.
म्हणून सगळ्यांनी पुन्हा एकदा तिची जाऊन भेट घ्यावी आणि तिला दिलासा द्यावा हे ठरवले होते. हल्ली ती बाहेर जास्त दिसायचीच नाही. म्हणून सगळ्यांना तिची काळजी वाटत होती.
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी वसुधा, रमा काकू, सुधा काकू, शारदा काकू आणि वंदना काकू रोहिणीच्या घरी गेल्या. रोहिणी ने त्यांचे हसून स्वागत केले. आणि त्यांना बसायला सांगितले. तिने अगदी प्रसन्न चेहऱ्याने सगळ्यांची विचारपूस केली. तेव्हा वंदना काकू तिला म्हणाल्या.
” आमचं जाऊ दे ग.. तू कशी आहेस ते सांग आधी…?”
” मी बरी आहे काकू…” रोहिणी म्हणाली.
” सुमित गेल्यावर खूपच वाईट हाल झाले असतील ना तुमचे…मला तर बाई विचारच नाही करवत…” शारदा काकू म्हणाल्या.
” जे झालं ते खूप वाईट झालं…पण जगावं तर लागणारच आहे ना…स्वतःसाठी…मुलांसाठी…माझ्या लहान मुलांना सुद्धा कळतं की आई दुःखात आहे म्हणून ती दोघे इतक्या कमी वयात खूप समजुतदार असल्या सारखी वागतात…मग म्हटलं आपण सुद्धा समजुतदार पणाने वागायला हवं…मुलांसाठी नव्याने उभारी घ्यायला हवी…” रोहिणी म्हणाली.
” पण घर चालवायचं कसं हा प्रश्न सुद्धा पडला असेल ना तुला…?” सुधा काकूंनी विचारले.
” पडला तर होताच…पण सुमितने आधीच त्याचा जीवन विमा उतरवला होता…त्याची मिळालेली रक्कम बँकेत टाकली आहे…मुलांना भविष्यात ती कमी येईलच…शिवाय मी पण नोकरी शोधत आहे…शिक्षण घेतलय पण अनुभव कमी पडतोय…पण लवकरच एखादी चांगली नोकरी मिळेलच अशी आशा आहे…” रोहिणी म्हणाली.
एवढे बोलून त्यांच्यासाठी चहा करायला म्हणून आत किचनमध्ये निघून गेली.
तिला तसं प्रसन्न पाहून वसुधाला खूप चांगले वाटले पण बाकीच्या बायकांना मात्र नवल वाटले. शारदा काकू हळूच वंदना काकूंच्या कानात म्हणाल्या.
” आपल्याला तर वाटलं होतं ही खूपच दुःखी असेल…रडवेला चेहरा घेऊन आपले स्वागत करेल…पण ही तर चांगली दात काढून हसत होती…”
” हो ना…आणि आपण तिची विचारपूस करायला आलोय इतक्या काळजीने…पण ती तर उलट आपलीच विचारपूस करत होती…” वंदना काकू म्हणाल्या.
त्या दोघी हे जरी आरामात बोलत असल्या तरी बाजूला बसलेल्या बायकांना ते ऐकू आलेच. म्हणून मग रमा काकूंनी सुद्धा मध्येच आपले मत मांडले.
” आणि तिचे कपडे बघितले का तुम्ही…एकदम रंगबिरंगी…आमच्यात तर बाई नवरा मेल्यावर हिरवा रंग नाहीत घालत…पण हिने घातलाय…आणि डोक्यावर टिकली सुद्धा आधी लावायची तशीच लावली आहे…”
” आणि केसांची वेणीसुद्धा एकदम टापटीप…आम्हाला तर अजूनही एवढं नटायला वेळ मिळत नाही…आणि हिने डोळ्यात काजळ सुद्धा लावलय…” सगळ्या बोलल्यावर आपण कशाला मागे राहायचं म्हणून मग सुधा काकू सुद्धा मध्येच बोलल्या.
” हो ना…आपला नवरा आता नाही आहे एवढं सुद्धा कळत नसेल का बायकांना…आता कुणासाठी आहे हा साजशृंगार…?” शारदा काकू नाक मुरडत बोलल्या.
त्यांचं बोलणं रोहिणीला आत किचन मध्ये सुद्धा ऐकू गेलं होतं. त्यांचं बोलणं संपताच ती चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली आणि म्हणाली.
” काकू…तुम्हा सगळ्यांच बोलणं मी ऐकलं आहे…आणि खरं सांगायचं म्हणजे आता या बोलण्याच वाईट सुद्धा वाटत नाही…कारण हे नेहमी पासूनच चालत आलंय..विधवा बाई म्हटली की त्यांच्यासाठी समाजाने काही रीतिरिवाज आखून ठेवले आहेत…त्यांनी असच वागावं…असच राहावं…पण हळूहळू लोक बदलत आहेत…त्यांचे विचार बदलत आहेत…अर्थातच पूर्णपणे बदलायला अजुन बराच काळ लागेल…
पण वाईट ह्याचं वाटतंय की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही आल्या होत्या तेव्हा तुम्हीच म्हणाला होतात की झालं गेलं विसरून नव्या आयुष्याची सुरुवात कर…नवरा मेला म्हणून बाईच आयुष्य संपत नसतं…तेव्हा खूप कौतुक वाटलं होतं तुमचं…पण आज तुमच्याच तोंडून असे ऐकले तेव्हा नवल वाटले…पण खरंच जुने नियम तुम्हाला योग्य वाटतात का…?” रोहिणी ने विचारले.
” अगं…आपण जर जगरिती प्रमाणे वागलो नाही तर लोकांना कळणार कसं की आपला नवरा गेल्याचं आपल्याला दुःख आहे म्हणून…?” वंदना काकू म्हणाल्या.
” खरंच…” रोहिणी विस्मयाने म्हणाली…” म्हणजे मी जर रंगीत कपडे घातले, डोक्यावर टिकली लावली किंवा नीटनेटकी राहिली तर याचा अर्थ असा होईल का की मला माझा नवरा गेल्याचं दुःख नाही म्हणून…काहीही हा काकू…
माझं दुःख किती मोठं आहे हे माझ्याव्यातिरिक्त आणखी कोणाला कळणार नाही…पण माझ्या मुलांच्या समोर मला असं दुःखी होऊन चालत नाही…कारण त्यांना त्यांची आई पूर्वी प्रमाणेच हवी आहे…प्रसन्न…हसतमुख…आणि मी नुसता रडवेला चेहरा करून त्यांच्यासमोर वावरू शकत नाही ना…आणि मला दुःखी, असहाय्य समजून सहानुभूती दाखवून माझा फायदा घेऊ बघणारे सुद्धा बाहेरच्या जगात मला भेटतील हे मला माहिती आहे…म्हणूनच मनात कितीही दुःख असलं तरी ते मी कुणाला सांगत नाही…
आणि तुम्हाला असं का वाटतं की नवरा नसताना बायकांच्या आयुष्यात रंग असू नयेत…जेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं तेव्हा सुद्धा मी रंगीत कपडे घालायचेच ना…आणि मला वाटतं की कोणत्याच विधवा बाईने रंगाशी नातं तोडू नये…आणि मी खरंच असे वागले तर माझ्या सुमितला हे अजिबात आवडणार नाही हे मला माहीत आहे…
आणि हे सगळं फक्त बायकांच्या बाबतीत असतं…एखाद्या पुरुषाची बायको वारली असती तर त्याला तुम्ही म्हटले असते का की भडक रंगांचे कपडे घालू नको किंवा नीटनेटका राहू नकोस…हे नियम फक्त बायकांसाठी का…आणि अशा वेळी बायकांच्या पाठीशी उभं राहण्या ऐवजी तिच्यावर बोट उचलायला पुरुषांच्या आधी बायकाच समोर येतात…फक्त याच एका गोष्टीचं वाईट वाटतं…” रोहिणी म्हणाली.
रोहिणी चे बोलणे ऐकुन बायका अगदी चहा न पिताच तिच्या घरून निघाल्या. बाहेर आल्यावर रमा काकू म्हणाल्या.
” बघा…आताच हिचे असे रंग आहेत तर उद्या दुसरं लग्न करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही ही…”
त्यांचे बोलणे ऐकून वसुधा म्हणाली.
” अहो पण काकू…आपण तर तिला हेच समजावून सांगण्यासाठी आलो होतो ना की नवरा गेला म्हणून खचून जाऊ नकोस…पुन्हा एकदा आयुष्याची नवीन सुरुवात कर…आणि दुसऱ्या लग्नाचा विचार कर म्हणून…पण मग तिला प्रसन्न पाहून तुम्हा सगळ्यांना तर आनंदच व्हायला हवा होता…पण तुम्ही तर उलट तिच्यावरच रागावलात…”
वसुधाचे बोलणे ऐकून बायका स्वतःशीच खजील झाल्या. तिला उत्तर द्यायला त्यांच्याकडे काहीच नव्हते. म्हणून मग सगळ्या गपचुप आपापल्या घराकडे निघाल्या.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.