धीरजच्या घरची मंडळी पोहचायची वेळ झाली होती. राधाच्या घरी सगळ्यांना वाटत होते की आपण आग्रहाने बोलावलंय म्हटल्यावर सुलूताई पाहुण्यांबरोबर नक्कीच येतील.
इकडे सूलू ताईंच्या मिस्टरांनी म्हणजेच केशवरावांनी घरामध्ये येत सुलू ताईंना आवाज दिला. त्या समोर येताच ते म्हणाले.
” काय हे माधवच्या आई…तुम्ही अजूनही तयार झालेल्या नाही…अहो पाहुणे निघायची वेळ झालीय आता…”
” तुम्हीच जा सोबत…मला यायची इच्छा नाहीये…” सुलोचना ताई म्हणाल्या.
” अगं काय हे…पुरे झाला की आता राग…आणि तुझ्या माहेरचे आहेत ते सगळे…तू नाही आलीस तर कसे वाटेल त्यांना…
” काही नाही वाटणार…आणि तुम्ही जाणार आहातच ना तिथे…” सुलोचना ताई म्हणाल्या.
“मी सुद्धा जास्त वेळ थांबू शकणार नाही ग तिथे…आज एका जमिनीच्या व्यवहारासाठी तालुक्याच्या गावी जायचं आहे…तिथे थोडा वेळ थांबून लवकरच निघून जाईल मी…निदान तू तिथे असशील तर त्यांना बरे वाटेल…नाहीतर त्यांना वाटेल की आपण जाणूनबुजून त्यांना टाळतोय…” केशवराव म्हणाले.
” त्यांना जे समजायचं ते समजू द्या…पण मी नाही येणार…लग्नात जायचं आहेच ना…आता काही फार महत्त्वाचं काम नाही तिथे…” सुलोचना ताई निर्धाराने म्हणाल्या.
त्यांचा आवाज ऐकून राघव डोळे चोळत खोलीच्या बाहेर आला. राघव हा सुलोचना ताई आणि केशवराव ह्यांचा लहान मुलगा. राघव इंजिनिअर असून आजवर बेंगलोरला एका चांगल्या मल्टी नॅशनल कंपनीत चांगल्या पॅकेज वर काम करत होता. पण गावात राहून स्वतःचा काहीतरी उद्योग चालू करण्याच्या विचाराने त्याला स्वस्थ बसू दिले नाही.
भरपूर विचार करून मागच्याच महिन्यात त्याने त्याचा जॉब सोडला होता. गावी भरपूर शेती होती. विविध पिके आणि फळांचे उत्पादन त्यांच्या स्वतःच्या शेतात व्हायचे. शिवाय केशवराव स्वतः हाडाचे शेतकरी होते. त्यांच्या मेहनतीने त्यांनी शेती फुलवली होती. माधव सुद्धा पूर्णवेळ शेती पाहायचा त्यामुळे केशवराव ह्यांना थोडा आराम होता आता.
त्यामुळे ते मग बाहेरची कामे पाहायचे. त्यामुळे राघव जॉब सोडून गावी आल्याचा केशवराव आणि सुलोचनाताईंना आनंदच झाला होता. माधव सुद्धा त्याच्या येण्याने खुश झाला होता. जॉब सोडल्यावर त्याचे तेथील सामान काही काम बाकी असल्याने व काही सामान सुद्धा करत घेऊन यायचे असल्याने तो पुन्हा बंगलोर ला गेला होता आणि परवाच परतला होता. त्यामुळे त्याच्या मागे घरी नेमकं काय सुरू होतं ह्याची त्याला कल्पनाच नव्हती. तो त्याच्या आईला म्हणाला.
” काय झालं आई…? कुठे जाणार नाहीस तू…?” राघव डोळे चोळत घरातून बाहेर निघत म्हणाला.
” अरे आज धीरज राधाला पाहायला जाणार आहे…मी म्हटलं की तिथे माझं काय काम…तसेही सगळेच ओळखीचे आहेत…” सुलोचना ताई जरा नरमाईने म्हणाल्या.
” म्हणजे खरंच धीरज राधाला पाहायला आय मीन दोघांचं खरंच लग्न होणार आहे का…?” राघव ने विचारले.
” हो…म्हणजे सगळ्या गोष्टी जुळून आल्यात तर नक्कीच होईल…” केशवराव म्हणाले.
” अगं पण इतक्या लवकर लग्न करायची काय गरज आहे…मामांनी आधी तिच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवं होतं…” राघव म्हणाला.
” अरे तिला शिकायची आवड असेल तर आपला धीरज पुढे शिकवणार की तिला…” केशवराव म्हणाले.
” ते ही खरेच आहे म्हणा…” राघव म्हणाला.
” मी काय म्हणतोय राघव…तुला जर आज शक्य असेल तर तू चलतोस काय आमच्या सोबत…म्हणजे मी थोड्या वेळात जर तिथून निघालो तरीही काही वाईट वाटणार नाही…म्हणजे तू असशील तिथे…” केशवराव म्हणाले.
” ठीक आहे बाबा…येतो मी…लगेच तयार होऊन येतोच आहे तुमच्या मागे…तसेही गाडीला जायला अजुन जरा वेळ आहे…” राघव म्हणाला.
केशवरावांनी होकारात मान हलवली आणि बाहेर निघून गेले. राघव सुद्धा तयारी करण्यासाठी आत निघून गेला. त्यानंतर सगळे जन तयार होऊन गाडीतून राधाच्या गावाच्या दिशेने निघाले. गाव जास्त दूर नव्हते. अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावरच होते. गाडीत राघव आणि धीरज जवळच बसले होते. राघवला पाहून धीरज तिरकसपणाने म्हणाला.
” काय मग राघव…गाशा गुंडाळला का बेंगलोर मधून…म्हणजे सगळं काही सामान आणून झालंय का…?”
त्याच्या बोलण्याचा रोख राघवच्या लक्षात आला होता. तरीपण तो शांतपणे म्हणाला.
” हो…झालंय तिथलं सगळं काम…”
” मला तर वाटतं तू ह्या निर्णयाबद्दल चुकलास भावा…चांगली नोकरी, शहरातील लाईफस्टाईल सोडून तू गावी आलास…काय तर गावातच राहून काहीतरी उद्योग सुरू करशील म्हणून…उद्योग सुरू करणं सोपी गोष्ट नसते…आणि उद्योगात अपयश आले तर सगळं भांडवल वाया जाईल…” धीरज म्हणाला.
यावर राघव काहीच बोलला नाही. त्याने हसुन विषय टाळला. त्याच्या या निर्णयाचे सगळेच स्वागत करतील ह्याची त्याला कल्पना होती. अनेकांना त्याचा निर्णय मूर्खपणाचा वाटत होता. शिवाय धीरज आणि तो जवळपास सारख्याच वयाचे होते. राघव अभ्यासात आणि इतर बाबतीत धीरज पेक्षा सरस होता.
त्यामुळे साहजिकच त्याच्या आणि धीरज मध्ये तुलना ही व्हायचीच. नोकरीत सुद्धा राघवचा हुद्दा मोठा होता. त्यामुळे कुठेतरी धीरजच्या मनात राघवबद्दल आकस होता. आणि म्हणूनच ह्यावेळी त्याला सूनवायची संधी तो सोडणार नव्हता. पण राघव ने सुद्धा ठरवले होते की सगळे काही ती शांतपणे करेल म्हणून. सगळ्यांकडून ऐकून घ्यायची मानसिक तयारी सुद्धा होती त्याची. म्हणून तो फार काही बोलला नाही.
सगळे जण राधाच्या घरी पोहचले. इतर ज्येष्ठ मंडळी हॉल मध्ये जाऊन बसले. राघव ला मात्र हॉल मध्ये बसणे जरा कंटाळवाणे वाटत होते. शिवाय हे घर त्याच्या मामाचेच होते. म्हणून तो पाहुण्या मंडळीतून उठून आत घरात गेला. राधा तयार झालेली होतीच. त्याने तिला पाहिले. अल्लड पणे घरात वावरणारी राधा आज साडीत खूपच सुंदर दिसत होती.
दोन क्षण तर त्याची तिच्यावरून नजरच हटली नाही. हा असा का पाहतोय ते राधाच्या लक्षातच आले नव्हते. राधा त्याला म्हणाली.
” तू कधी आलास…?”
” हे काय आत्ताच आलोय बघ पाहुण्यांसोबत…” तो हसून म्हणाला.
त्यावर ती काहीच बोलली नाही. ती यावेळेला खूपच नर्व्हस होती. एकतर तिच्या लग्नासाठी पाहुणे पाहायला आलेले. आणि त्यात मुलगा तिच्या आधीच ओळखीचा होता. शिवाय हे लग्न होणे जवळपास नक्कीच होते. इतक्या लवकर हे सगळे घडत असल्यामुळे की काय राधा जरा गोंधळून गेली होती. तिला पाहून राघव गमतीने म्हणाला.
” काय झालंय…जरा टेंशन मध्ये दिसत आहेस…तुला आमचा धीरज आवडला नाही का…?”
” काय ना तू पण…आधीच मी नर्व्हस आहे आणि तू इथे माझी गंमत करत आहेस…” राधा गाल फुगवून म्हणाली.
” अगं वेडाबाई…तुझं टेंशन कमी करण्यासाठीच गंमत करत होतो…” राघव म्हणाला.
इतक्यात तिथे राधाची आई म्हणजेच राघवची लाडकी शालिनी मामी सुद्धा आली. मामी त्याला म्हणाली.
” काय राघव…कसा आहेस…? बरं वाटलं तू सुद्धा आलास…तू आलास की जरा आधार वाटतो बघ…पण सुलू ताई नाहीत आल्या…?”
” ते आईला आज जरा घरी काम होतं…म्हणून मला म्हणाली की तू जा…मी एक दोन दिवसात पुन्हा जाऊन येईल…” राघवने कशीतरी वेळ मारून नेली. पण शालिनी मामीला तर खरं काय झालं असेल त्याची कल्पना होतीच. मग त्या काही जास्त बोलला नाही. मग राघवच त्यांना म्हणाला.
” मामी…किती काम करताय तुम्ही मघापासून…मला सांगा मी काय मदत करू तुमची…?”
” नको…राहू देत…तू आज मुलाकडून आला आहेस…” शालिनी मामी म्हणाल्या.
” अरे असे कसे…तुम्ही तर मला एकदमच परकं करून टाकत आहात मामी…” राघव लटकेच रागावून म्हणाला.
आणि स्वतःहून मामीची मदत करायला म्हणून किचन मध्ये निघून गेला. किचन मधल्या सगळ्याच बायकांना राघव आपल्या गोष्टींनी हसवून देत होता. राधा सुद्धा त्याचे बोलणे ऐकून गालातल्या गालात हसत होतीच. लहानपणी सुद्धा राघव अगदी असाच होता. तो घरी आला की घरात चैतन्य असल्यासारखं वाटायचं.
लहानपणी आजी नेहमीच राधाला म्हणायची की हाच तुझा होणारा नवरा आहे. राघवची आई म्हणजेच सुलू आत्या सुद्धा तिला राघवची बायको म्हणायची आणि राधासुद्धा मग खरेच त्याला नवरा मानायची. तिला बालमनाने आजीच्या बोलण्याला खरे मानले होते. पण जसजशी ती मोठी झाली तसतसं तिला कळायला लागलं की ते फक्त तिला चिडवण्यासाठी म्हणायची म्हणून. मग ती सुद्धा ते सगळंच विसरुन गेली. आता तर ते आठवून तिला आपल्या बालिशपणावर हसू येत होतं. थोडावेळ का होईना ती तिचं सगळं टेंशन विसरली होती.
आधी पाहुण्यांना चहा पोहे झाले आणि मग मुलीला बघण्याची औपचारिकता पार पडली. मुलगी तर सगळ्यांना पसंत होतीच. धीरजला तर माधवच्या लग्नात पाहिल्या पासूनच राधा आवडली होती. धीरजच्या सोबत असणाऱ्या एका पाहुण्यांनी पाहुण्यांनी जेव्हा विचारले की त्याला मुलीशी बोलायचं आहे का तेव्हा तो लगेच तयार झाला.
थोड्या जुन्या विचारांच्या असलेल्या राधाच्या बाबांना आणि काकांना हे जरा जास्तच वाटले. कारण मुलामुलीची तोंड ओळख तर आधीपासून होतीच. पण मुलाकडच्यांनी म्हटलंय म्हटल्यावर नाही सुद्धा म्हणू शकत नव्हते. मग दोघांना बोलण्यासाठी म्हणून घराच्या मागच्या बाजूला असलेल्या परसबागेत पाठवले. राधा जरा घाबरलेलीच होती. काय बोलावं आणि काय नको हे तिला कळत नव्हते. तेव्हा धीरज स्वतःच तिला म्हणाला.
” हाय…कशी आहेस…?”
” मी….बरी….आहे…” राधा ने अडखळत उत्तर दिले.
” तुला माहिती आहे…मी आज पहिल्यांदा कुण्या मुलीशी असा बोलतोय…पण मला तू खरंच खूप आवडली आहेस…म्हणून मी तुझा विषय निघताच लगेच होकार दिला…”
त्यावर राधा काहीच न बोलता नुसती खाली बघत राहिली. मग तो पुढे म्हणाला.
” मी होकार दिलाय…पण तुझ्या मनात काय आहे ते सुद्धा मला कळायला हवं…तू नाही का पडलीस माझ्या प्रेमात…?”
राधा नुसती बघतच होती. त्याच्या ह्या प्रश्नावर काय बोलावे हे तिला कळतच नव्हते. तुला मी आवडलो की नाही हा प्रश्न विचारला असता तर तिने काहीतरी उत्तर दिले ही असते. पण हा डायरेक्ट विचारतोय की तू माझ्या प्रेमात पडलीस का म्हणून. इतक्या सहजासहजी आणि कमी वेळात प्रेमात कशी पडणार बिचारी. आणि प्रेमात पडली तरी ते असे बोलून थोडेच दाखवले असते. ती काहीच बोलत नाहीये हे पाहून तो म्हणाला.
” तू काहीच का बोलत नाही आहेस… अच्छा…आत्ता मला कळतंय…तू लाजतेयस बहुतेक…अशी कशी सांगणार ना…पण तू सांगितलं नाहीस तरी मला कळलंय तुझ्या मनातलं… माझ्यासारख्या हँडसम आणि वेल सेटल्ड मुलाच्या प्रेमात कुणी मुलगी कशी नाही पडणार…पण तुझं लाजणं खूप आवडलं मला…मुळात गावातल्या मुलींची हीच अदा तर आवडते मला…” धीरज नुसता बोलत होता. आणि राधा ऐकत होती.
क्रमशः
राधा धीरजला होकार देईल का…? धीरज आणि राधाचे लग्न होईल का…? सुलू आत्याच्या नाराजीचा राधाच्या जीवनावर काही परिणाम होईल का…? हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरु नका.
©®आरती निलेश खरबडकार.
कथेचा पहिला भाग इथे वाचा 👇
https://mitawaa.com/जिवलगा-भाग-१/
Next part please
खुप छान