” वहिनी…मला उद्या सकाळी लवकर जायचं आहे ऑफिस ला…माझा टिफीन उद्या लवकर तयार करून देशील…” मल्हार त्याच्या रूम मध्ये जाताना म्हणाला.
” हो भाऊजी…मी करेन लवकर तयार…तुम्ही काळजी करू नका…” भावना म्हणाली.
मल्हार त्याच्या रूम मध्ये निघून गेल्यावर त्याची बायको अंतरा भावनाला म्हणाली…
” तू राहू दे ताई…उद्या सकाळी मीच ह्यांच्यासाठी टिफीन तयार करेन…”
” ठीक आहे…कर तू…” भावना हसून म्हणाली.
अंतरा मल्हार साठी टिफीन तयार करेल म्हणून भावना सकाळी लवकर उठली नाही. ती रोजच्या वेळेवर उठली आणि किचन मध्ये जाऊन बघते तर अंतरा अजुन उठली सुद्धा नव्हती. किचन मध्ये स्वयंपाकाची कोणतीही तयारी दिसत नव्हती. म्हणून मग भावनानेच कंबर कसली आणि पटकन तयार होणारे पालकाचे पराठे मल्हारच्या टिफीन साठी तयार केले. मल्हारची तयारी झाली तोवर त्याचा टिफीन तयार होता. मल्हार टिफीन घेऊन ऑफिसला निघून गेला. थोड्या वेळाने अंतराची झोप उघडली तेव्हा ती पाहते तर मल्हार त्याची तयारी आटोपून ऑफिसला निघून सुद्धा गेला होता.
ती किचन मध्ये येऊन बघते तर सर्वकाही तयार होते. भावना ने नाश्ता सुद्धा तयार करून ठेवला होता. भावनाला पाहून अंतरा म्हणाली…
” सॉरी ताई…मला उठायला उशीर झाला…मल्हार आज तसेच टिफीन न घेता गेले का ऑफिसला…”
” नाही ग…मी दिला त्यांना टिफीन…तू काळजी करू नकोस…पटकन अंघोळ करून ये आणि नाश्ता कर…” भावना म्हणाली.
” तू का केलास टिफीन…मला का नाही उठवले…तू ना मला काही करूच देत नाहीस कधी…नेहमी तुला सगळ्या गोष्टीत पुढे पुढे करायचे असते…कधी म्हणून मला कुठल्या गोष्टीचे श्रेय मिळू द्यायचे नसते तुला…” अंतरा रागाने म्हणाली.
” तू झोपलेली होती म्हणून उठवले नाही तुला…आणि एवढ्याशा गोष्टीत कसलं आलंय श्रेय…” भावना म्हणाली.
” तुझं हे नेहमीचच आहे…सगळं काही करून शेवटी नामानिराळी राहतेस…” एवढे बोलून अंतरा नाक मुरडून रूम मध्ये निघून गेली.
त्यानंतर स्वयंपाकात मदत करायला जेव्हा अंतरा किचन मध्ये आली तेव्हा सुद्धा ती रागातच होती. तिने न बोलताच किचन मधली कामे केली. दोघीजणी बोलत नाहीयेत हे सासूबाईंच्या लक्षात आले होते. पण ह्या दोघींच्या मध्ये काही बोलणे त्यांना उचित वाटले नाही.
बराच वेळ झाला तरीही अंतरा आपल्याशी बोलत नाही हे पाहून मग भावनाच तिच्याजवळ बोलायला गेली.
” अजुन राग गेलाच नाही का तुझा…ही तुझी लहानपणीची सवय आहे…मनाप्रमाणे काही झालं नाही की लगेच चिडतेस…पण आता तू लहान नाहीस…तू थोडं जबाबदारीने वागायला हवं…” भावना म्हणाली.
” हो चिडते मी लवकर…कारण लहानपणी पासून तू मला कधीच कोणत्या कामाचे श्रेय मिळू दिले नाहीस…तू मोठी होती म्हणून सर्वांना कायम तुझंच कौतुक…अभ्यासात हुशार म्हणून कौतुक…घरातल्या कामांना हातभार लावायची म्हणून कौतुक…वागायला नम्र म्हणून कौतुक…तुझ्यासमोर माझं कर्तृत्व नेहमीच झाकोळले गेले…तुझ्यापेक्षा दोन चार टक्के कमी मिळवले की लगेच तुझं उदाहरण दिलं जायचं…तुझ्या ताईला बघ एवढे टक्के मिळालेत…तू आणखी थोडा अभ्यास करत जा…आई बाबांना सतत तुझं कौतुक असायचं…आणि मग लग्न करून आपण दोघीही एकाच घरात आलो पण इथेही तू दोन वर्षांनी लवकर लग्न करून आलीस म्हणून तुझच कौतुक…भावना अशी…भावना तशी…मल्हार ला पण फक्त वहिनीची कामे दिसतात…मला पण कामे करावी वाटतात…सर्वांकडून कौतुक करून घ्यावे वाटते पण तुझ्यामुळे मला कुठेच किंमत नाही…ना माहेरी ना सासरी…तुला गरजेपेक्षा चांगलं राहायची काय गरज आहे ग…?” अंतरा एका दमात बोलून गेली.
अंतराचे बोलणे ऐकून भावना ला धक्काच बसला. दोघी बहिणींमध्ये बरेचदा लहान सहान भांडणे व्हायची. पण अंतरा च्या मनात आपल्याबद्दल एवढं सगळं साठलेलं आहे हे कळल्याने भावनाला खूप वाईट वाटले. ती काहीही न बोलता तिच्या रूम मध्ये निघून आली. पण डोक्यातील विचार काही केल्या थांबत नव्हते.
भावना आणि अंतरा. दोघी सख्ख्या बहिणी. दोघींमध्ये तीन वर्षांचं अंतर होतं. भावना आधीपासूनच समजुतदार. अभ्यासात हुशार आणि आईला प्रत्येक कामात मदत करणारी. स्वभावाने नम्र. अंतराच्या कितीतरी चुका सांभाळून घ्यायची. तिच्या चुकांसाठी स्वतः बोलणी खायची.
पण अंतराला मात्र सतत होणारे ताईचे कौतुक आवडत नसे. तिला वाटायचे की आपण सुद्धा सर्वकाही करू शकतो. मग ताईचेच का सतत कौतुक करतात. अधून मधून दोघींची भांडणे सुद्धा व्हायची पण दोघींमध्ये प्रेमसुद्धा खूप होते. दोघीही एकमेकीं शिवाय राहायच्या नाहीत.
भावनाचे विराजस बरोबर लग्न झाले आणि भावना लग्न करून सासरी आली. अंतरा मात्र भावना ला खूप मिस करायची. त्यामुळे दोघींच्या ही वरचेवर भेटी व्हायच्या. अशातच भावनाच्या लहान दिराची आणि अंतराची चांगलीच मैत्री झाली होती. आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला काहीच वेळ लागला नाही. भावनाला जेव्हा हे कळले तेव्हा तिला खूप आनंद झाला. कारण तिची लाडकी बहीण आता तिची दिरानी बनून तिच्या घरी येणार होती.
भावना ने तिच्या माहेरी आणि सासरी सर्वांना या लग्नासाठी राजी केले. आणि मोठ्या थाटामाटात अंतरा आणि मल्हारचे लग्न झाले. आपली लहान बहीण लग्न करून आपल्याच घरी आल्याने भावना खूप खुश होती. तिने अंतराला कधीच कुठल्याही कामाचे बंधन घातले नाही.
अंतरा आणि मल्हारचे नवीन लागणं झाल्यामुळे त्यांचे सद्ध्या एकमेकांना समजून घेण्याचे, फिरण्याचे दिवस आहेत असा विचार करून भावना ने घरातल्या कामांची जबाबदारी स्वतःवर घेतली होती. अंतरा माहेरा प्रमाणेच सासरी सुद्धा तिच्या मनात येईल तसे वागायची. रात्री मल्हार सोबत फिरायला जाणे, सकाळी उशिरा उठणे, रोज चांगले तयार होऊन संध्याकाळी मल्हारची वाट पाहणे तिला आवडायचे.
पण नव्याची नवलाई जेव्हा कमी होऊ लागली तेव्हा तिच्या लक्षात आले की घरातील सगळी कामे भावना ताई करतेय. आणि त्यामुळे प्रत्येक जण केवळ ताईचेचं गुणगान करतोय. अगदी मल्हार सुद्धा दिवसातून दोनदा तरी वहिनी तू ग्रेट आहेस असे म्हणायचा. आता मात्र अंतरा ला हे सगळे खटकू लागले होते. तिला सुद्धा भावना प्रमाणेच काम करून सगळ्यांची वाहवा मिळवायची होती. कधीतरी ह्यांनी भावना ताईपेक्षा जास्त माझे कौतुक करावे असे अंतराला वारंवार वाटू लागले होते. आणि त्यात आज सकाळी झालेल्या प्रकारामुळे अंतराला आणखीनच राग आला होता आणि ह्या रागामुळे ती भावनाला बरेच काही बोलून गेली होती.
भावना मनातून दुःखी होती. अंतरा सुद्धा तिच्याशी अजिबात बोलत नव्हती. भावना ने तर लहान बहीण समजून अंतरा ला घराच्या कामातून थोडी मोकळीक दिली होती. पण अंतराच्या मनात हे सर्व चाललेय ह्याची तिला अजिबात कल्पना नव्हती.
असेच दोन दिवस गेलेत आणि शनिवारी विराजस सुट्टीत घरी आला. विराजस शासकीय अधिकारी होता. जवळच्याच शहरात त्याची बदली झाल्याने तो कधी रोज जाणे येणे करायचा तर कधी त्याला मिळालेल्या क्वार्टर मध्ये राहायचा. आज शनिवार असल्याने पुढचे दोन दिवस त्याला सुट्टी होती. म्हणून तो घरी आलेला होता. एरव्ही आपण घरी आल्यावर उत्साहात असणारी भावना आज मात्र उदास दिसतेय हे विराजास च्या लक्षात आले होते. त्याने तिला विचारले…
” काय झालंय भावना…तू उदास का दिसत आहेस…काही झालंय का…?”
” नाही…विशेष असे काही नाही…पण आजकाल कशात मन लागत नाहीय…तुमची काही हरकत नसेल तर एक बोलू का..?” भावना म्हणाली.
” अगं बोल ना…माझी काय हरकत असणार आहे…?” विराजस म्हणाला.
” मी पण तुमच्यासोबत येऊ का राहायला…?” भावना ने विचारले.
क्रमशः
दोघी – भाग २ (अंतिम भाग)