” म्हणजे…तुला काय वाटतं…हे लग्न आता थांबणार का…अजिबात नाही…आजपर्यंत कधी ऐकलंस का नवरदेव वरात घेऊन आल्यावर लग्न तुटलं म्हणून…आजवर कमावलेली इभ्रत चव्हाट्यावर येईल अशाने…” आजी म्हणाली.
” पण यामुळे नंदिनीचं आयुष्य खराब होईल त्याचं काय…?” सरलाताईंनी प्रश्न विचारला.
” ती तिच्या नशिबाने राहील…तसंही प्रत्येक जण आपल्या नशिबाने खातो…तिच्या नशिबात चांगलं असेल तर चांगलं होईल…आणि वाईट असेल तर वाईट होईल…आपण तर आपल्या बाजूने प्रयत्न केलेत ना हिच्या सुखासाठी…आता ही भली अन् हिचं सासर भलं…मी नाही का राहिली इतक्या दूर…आम्ही नाही आमच्या आई वडीलांच्या निर्णयावर प्रश्न विचारला कधी…” शालूआत्या म्हणाली.
प्रकाशराव अजूनही गप्प बसले होते. उषाताई समोर येऊन म्हणाली.
” नाही…हे लग्न होणार नाही…आणि हे जे काही घडतंय ते तिच्या नशिबाने नाही तर तुमच्या फसवणुकीमुळे…नंदिनी तुमच्या सख्या भावाची एकुलती एक मुलगी आहे ना…तुमच्या समोरच लहानाची मोठी झालीय हो पोर…तरीसुद्धा जराही विचार नाही आला तिचा तुम्हाला…?”
” काय बोलतेस आणि कुणासमोर बोलतेस ते कळतंय का तुला…” आजी समोर येत म्हणाली.
” हो…जाणून बुजून आम्हाला अंधारात ठेवून आमच्या मुलीच्या आयुष्याचा खेळ मांडणाऱ्या तिच्या आत्याशी बोलत आहे मी…” उषाताई रागाने म्हणाल्या.
” हे बघ उषा…तिला आता नवरदेवाकडून मिळालेलं सोनं बघ…उभ्या आयुष्यात तू बघितलस तरी का एवढं सोन एकत्र… असं सासर प्रत्येकीला नाही मिळत…आणि पुढे होईल सगळं नीट…मी आहे ना तिथे तिला सांभाळून घ्यायला…” शालूआत्या आता समजावणीच्या सुरात म्हणाल्या.
” हे बघा…पुढचं पुढे पाहता येईल…लन हे लग्न पार पडू द्या एकदा…बाकीचं बघून घेऊ…चांगली खरडपट्टी काढू त्यांची.. नाहीच पटलं तर दोन तीन महिन्यात नंदिनीला परत आणू…पण आत्ताच हे वाद नकोत…आता घरात पाहुणे आहेत…त्यांनी सगळं ऐकलं तर सगळीकडे बदनामी होईल…” नंदिनीचे बाबा म्हणाले.
हे ऐकून नंदिनीची भीतीने गाळण उडाली. तर नंदीनीच्या आईला भयंकर राग आला. सरलाताई तर आश्चर्याने प्रकाशरावांकडे पाहू लागली. सरलाताई त्यांना म्हणाल्या.
” अरे काय बोलत आहेस तू प्रकाश…? सगळं काही माहीत झाल्यावर सुद्धा स्वतःच्या मुलीला त्यांच्या सोबत नांदायला पाठवणार आहे का तू…?”
” हो ताई…काही महिन्यांनी नंदिनी घरी कायमची परत आली तरी चालेल…पण आज भरल्या मांडवातून वरात परत निघून गेली तर झालेली बदनामी आम्हाला सहन होणार नाही…” प्रकाशराव म्हणाले.
” अरे लोक पंधरा दिवस बोलतील आणि मग विसरून सुद्धा जातील…पण पुढे काय…आयुष्य तर तुझ्या मुलीचं खराब होणार आहे ना…आज बदनामीच्या भीतीने तिचं लग्न लावून देतो आहेस…उद्या बदनामीच्या भीतीने तिला माहेरी परत यायला सुद्धा नकार देशील तू…अरे अशी गुणाची पोर मिळाली आहे तुला…जरा कदर कर तिची…” सरलाताईंनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
” ते पुढचं पुढे पाहता येईल…मला फक्त एवढंच कळतंय की आज हिचं लग्न झालं नाही तर मी समाजात तोंड दाखवायच्या लायकीचा उरणार नाही…” प्रकाशराव म्हणाले.
” काहीही काय बोलताय ही तुम्ही…स्वतःच्या मुलीपुढे लोकांचा विचार करणार आहात का…? मी माझ्या मुलीचं लग्न ह्या मुलाशी होऊ देणार नाही…” उषाताई समोर येत म्हणाल्या.
उषाताईचे बोलणे बाहेरून घरात येणाऱ्या नवरदेवाच्या बहिणीने ऐकले. आणि ती मोठ्याने ओरडत म्हणाली.
” काय बोलत आहात तुम्ही…? ऐन वेळेवर काय नाटकं लावली आहेत…लग्न नाही करणार म्हणून…सोयरिक जुळवताना तर एकदमच उतावीळ होतात…आता काय सोंग घेताय साधेपणाचं…चला लवकर…उशीर होतोय विधिंना…”
” आधी तुम्ही आम्हाला सगळं काही खरं खरं नव्हतं सांगीतलं…आता आम्हाला सगळं कळलंय…आता हे लग्न नाही होऊ शकत…” उषाताई समोर येऊन म्हणाल्या.
इतक्यात प्रकाशराव त्यांना गप्प करत पुढे आले आणि त्यांना म्हणाले.
” नंदिनीची आई…जरा गप्प बसता का…आम्ही पाहून घेऊ काय करायचं ते…”
नवरदेवाची बहीण सुद्धा आता चांगलीच जोशात आली होती. ती मोठ्याने ओरडुन शालू ताईंना म्हणाली.
” काय हो शालू काकू…तुम्ही म्हणाला होतात ना मुलगी गायीसारखी गरीब आहे म्हणून…एकदा लग्न झालं की मुकाट्याने घरात पडून राहील…कुठलीच तक्रार करणार नाही…आणि आत्ता काय हे…मुलगी तर मुलगी तिची आई सुध्दा पुढे येऊन नकार द्यायला लागली आहे…”
” मी समजावते त्यांना…आणि मुलीच्या आईचं काही मनावर नका घेऊ…तिला एवढं काही कळत नाही…घरातील निर्णय तिला विचारून थोडीच होणार आहेत…सगळं काही माझा भाऊ ठरवेल…आणि तो तयार आहे…” शालूताई म्हणाली
इतका आरडाओरडा ऐकून आता नवरदेवाच्या कडील इतर मंडळी सुद्धा आतमध्ये निघून आली. एव्हाना सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला होता. नवरदेवाचे वडील सुद्धा आता बोलायला लागले.
” काय तमाशा लावलाय इथे…अशाने आमची किती बदनामी होईल…लवकर लग्न लावून मोकळे व्हा…आधीच उशीर झालाय…”
” मी सांगितलंय ना…हे लग्न होणार नाही…तुम्ही वरात घेऊन निघून जा इथून…” उषाताई निर्धाराने म्हणाल्या.
” उषा…” नंदिनीचे बाबा खूप रागात म्हणाले. आजवर त्यांनी कधीच इतक्या मोठ्याने आणि एकेरीत त्यांना आवाज दिला नव्हता.
उषाताई मनातून त्यांना घाबरल्या. पण डळमळल्या नाहीत. त्यांना माहिती होते की आता आपण कमजोर पडलो तर मुलीच्या आयुष्याचं वाटोळं होईल. आज अन् उद्या तिच्या बाबांना कळेलच की ते चुकीचे होते. पण यावेळी मुलीचं आयुष्य वाचवणं गरजेचं होतं.
” हे बघा…तुम्ही खूप जास्त बोलत आहात…आम्हाला वरात घेऊन बोलावल्यावरअसे ऐन वेळेवर लग्न होणार नाही हे सांगणं कितपत योग्य आहे…आणि एवढीच मुलीची काळजी होती तर मुलाला न पाहता सुद्धा लग्नासाठी होकार कसा दिलात तुम्ही…? श्रीमंती पाहूनच ना…मग आता काय नवीनच लावलं हे…”
” हो ना…ऐकावं ते नवलच…आणि आमच्या घरच्या बायका नाही बोलत एवढ्या…ते ही मोठ्या लोकांमध्ये…इथे तर मुलीची आई एवढ्या मोठ्या लोकांमध्ये स्वतःच सांगतेय लग्न करायचं नाही म्हणून…मुलीला समजावणे तर दूरच राहिले…आताच सांगते… बऱ्या बोलणे लग्न मंडपात घेऊन चला मुलीला…नाहीतर आम्ही निघून जाऊ तुमच्या मुलीला लग्न न करता…मग काही कुणी तिच्याशी लग्न करायला तयार होणार नाही….मग आयुष्यभर घरातच बसवून ठेवावं लागेल तिला…काय हो…” नवरदेवाची आई त्याच्या बाबांकडे पाहत म्हणाली.
” नाहीतर काय…समजून काय ठेवलंय ह्यांनी आपल्याला…मी तर म्हणतो आपण निघुया इथून…अशा लोकांशी सोयरिक करायलाच नव्हती पाहिजे आपण…चुकलंच आपलं…चला आता…” नवरदेवाचे वडील म्हणाले.
आणि ते सगळेच घराबाहेर निघाले. बाहेर आल्यावर नवरदेवाची बहीण तिच्या वडिलांना म्हणाली.
” असं का बोललात बाबा तुम्ही…मोठ्या मुश्किलीने हे लग्न जुळले होते…आणि तुम्ही म्हणताय की लग्न न करता निघून जाऊ…”
” अगं असेच म्हणावे लागते ह्यांच्यासमोर…ही गावातील लोक आहेत.. त्यांना मुलीच्या आयुष्यापेक्षा स्वतःची इभ्रत प्रिय असते…आपण असे म्हटल्याने आपल्या मागेच धावत येतील ते…आणि पायावर नाक घासून माफी मागतील…आणि हे लग्न होऊ द्या म्हणून हात जोडून विनवतील सुद्धा…” तिच्या बाबांनी स्पष्टीकरण दिले.
आणि ते लोक तिथून निघायच्या तयारीला लागले. इकडे शालू आत्या आणि तिची आजी उषाताईंवर भयंकर रागावत म्हणाल्या.
” बघितलं ना तुझ्या आगाऊपणा मुळे काय होऊन बसलंय…आता ते जर निघून गेले तर तुझ्या या मुलीचं आयुष्यभर लग्न होऊ शकणार नाही…आपण कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही ते वेगळंच…आजवर कमावलेली प्रतिष्ठा धुळीस मिळाली तुझ्यामुळे…” आजी डोक्यावर हात देत म्हणाली.
” त्यापेक्षा एक काम कर…पटकन जा अन् हात जोडून माफी माग त्यांची…त्यांचं मन पाघळल तर अजूनही लग्न करायला तयार होतील ते…जा पटकन…” शालूआत्या म्हणाली.
” मी नाही जाणार…अन् मी का माफी मागायची…माफी कुणी मागायची असेल तर त्यांनी मागायला हवी…तुम्ही मागायला हवी…आम्हाला फसवल्याबद्दल…” उषाताई आवेशात येऊन म्हणाल्या.
” उषा…गप्प बस…यापुढे एक शब्दही बोलायचा नाही…आधी जाऊन माफी मग त्यांची…नाहीतर पोरीच आयुष्य वाया जाईल…” प्रकाशराव जवळजवळ ओरडतच म्हणाले.
” नाही…या मुलासोबत माझ्या नंदिनीचं लग्न मी अजिबात लावून देणार नाही…” उषाताई कडाडल्या.
” तुझ्याशी तर मी नंतर बोलेन…पण मला आधी नंदिनी शी बोलायचं आहे…” मग नंदिनीकडे पाहत म्हणाले. ” नंदिनी तू आजवर मला कधीच निराश केले नाहीस…आजही करणार नाहीस हे मला माहिती आहे…तुझ्या आईचं डोकं काम करत नाहीये…तिला कळत नाही आहे की अशाने तुझं आयुष्य बरबाद होईल…पण तू तरी शहाण्यासारखी वाग आणि तयारी करून मांडवात चल…मी तोवर त्यांची माफी मागून त्यांना अडवून ठेवतो…” नंदिनीचे बाबा म्हणाले.
आता मात्र नंदिनी काहीही न बोलता जाऊन तिच्या आईच्या पाठीमागे जाऊन उभी राहिली. प्रकाशरावांना मात्र आता खूपच राग आला. ते मोठ्याने म्हणाले.
” तुम्हा दोघींना कळत नाहीये का…आज जर नंदिनीचे लग्न झाले नाही तर पुढे कधीच होऊ शकणार नाही…”
नंदिनीची आई आणि नंदिनी दोघीही आता जरा घाबरलेल्या होत्या. आपण भूमिका तर घेतलीय पण आता पुढे काय हे तिच्या आईला काहीच सुचत नव्हतं. इतक्यात गर्दीतून वाट काढत एक जण तिथे आला आणि म्हणाला.
” नंदिनीचे लग्न होईल…आणि ते सुद्धा आजच…याच मांडवात…पण मुलगा मात्र तो नसेल….”
आणि सगळे जण आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागले.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.
कोण असेल ही व्यक्ती…? नवरदेवाकडील मंडळी इतक्या सहजासहजी परत जातील का…? पुढे नंदिनी आणि तिच्या आईचे काय होईल…? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग पाहायला विसरू नका.