ती दिवसभर घरकामाला हात लावायची नाही. भांडी घासायला तर बाई यायचीच पण स्वयंपाक, नाश्ता आणि साफसफाई अंकिता लाच करावी लागायची. म्हणजे ती स्वतःहून ही सर्व कामे करायची. सुजाताला कधीच तिला कामात मदत करावी वाटली नाही. अंकिता सकाळी लवकर घरातील कामे करायची आणि ऑफिसला जायची.
तिकडून आल्यावर पुन्हा रात्रीचा स्वयंपाक आणि सगळी आवराआवर करायची. तिचं आयुष्य असच चाललं होतं. पगार झाला की बहीण आणि भावांची मागण्यांची भलीमोठी लिस्ट तिच्याकडे यायची. आणि बहीण भावांच करताना तिने कधी स्वतःकडे लक्ष दिलेच नव्हते.
आता ती बत्तीस वर्षांची झाली होती. हिच्या पेक्षा लहान बहीण भावांनी आधी लग्न केल्याने नातेवाईक हिच्यासाठी स्थळं आणत नव्हते. आणि हीच लग्न व्हावं, हीचा संसार असावा अशी मनापासून इच्छा असणार आणि तिची काळजी करणारं असं तिच्या आयुष्यात कुणीच नव्हतं. आणि आपलं लग्न होणार हा विचार सुद्धा आता तिने सोडून दिला होता.
तिचा भाऊ सचिन लग्नानंतर पुढे शिकलाच नाही. नोकरीच सुद्धा काही खरं नव्हतं. एखाद्या ठिकाणी नोकरी लागायची पण हा दोन चार महिन्यांतच ती नोकरी सोडून द्यायचा. त्यानंतर काही महिने पुन्हा घरात राहायचा आणि पुन्हा दुसरी एखादी नोकरी शोधायचा. दर महिन्याला भाडेकरूंकडून मिळणारे भाडे आणि अंकिताचा पगार ह्यावर त्यांचं चांगलं भागत होतं.
सचिन व्यवस्थित नोकरी करत नाही ह्याच त्याच्या बायकोला काहीच वाटायचं नाही. तिला वाटायचं की वरचेवर सगळं भागत आहे म्हणजे झालं. अंकिता ला तर ती नेहमीच गृहीत धरायची. सुजाता आता तिला तिचं आजवर लग्न झालेलं नाही म्हणून तिला टोमणे मारायची. आणि ती तयार होऊन ऑफिस ला जायला निघाली की सतत तिला तिच्या चांगल्या तयार होण्यावरून बोलायची.
लग्न तर झालं नाही…मग कशाला इतकी तयार होते ताई..?
इतक्या चांगल्या रंगाचे कपडे का वापरते…?
तिला ऑफिसला जाण्या येण्यासाठी रोज स्कूटी कशाला लागते…?
हे प्रश्न आता तिच्या समोर सर्रास विचारले जाई. सुजाता च्या सोबतीने आता सचिन सुद्धा त्याच्या मोठ्या बहिणीला असेल प्रश्न विचारू लागला होता. अंकिता मात्र वाद करायचा नाही म्हणून नेहमी गप्प बसायची. दोघेही लहान आहेत. कधीतरी समजून घेतील म्हणून दोघांच्या ही चुका सांभाळून घ्यायची.
पण केव्हातरी तिला वाटायचे की ह्यांना उलटून उत्तर द्यावे की माझं फक्त लग्न झालेलं नाही. मी काही विधवा नाही. मी का म्हणून रंगबिरंगी कपडे घालायचे नाही. मी चांगली कमवते तर रोज स्वतःच्या गाडीने ऑफिस ला का जाऊ नये. साधं नीटनेटक राहण्यासाठी सुद्धा मला लोकांना उत्तरे द्यावी लागणार का…? असे ओरडुन सांगावे. पण तिला माहिती होतं की वाद केल्याने वाद आणखीनच वाढतील म्हणून ती गप्प राहायची.
आज सुद्धा तिला असाच राग आला होता. पण सवयीनुसार ती गप्पच राहिली. ऑफिस संपल्यावर घरी आली आणि पुन्हा स्वयंपाक वगैरे कामे उरकून झोपी गेली.
दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळं आवडून ऑफिस ला जायला निघाली. तेव्हा समोर बघते तर आदित्य सर उभे होते. ते त्यांची गाडी स्टार्ट करत होते. अंकिता ने त्यांना चुकवून तिथून गाडी घेऊन निघण्याचा प्रयत्न केला पण शेवटी सरांनी तिला पहिलेच आणि तिला म्हणाले.
” मिस वाघमारे…तुम्ही इथे कशा काय…? तुम्ही इथे राहता का..?”
” हो सर…हे माझं घर आहे…” अंकिता म्हणाली.
” अच्छा…मी इथेच समोरच्या घरी भाड्याने राहायला आलोय कालपासून…” आदित्य सर म्हणाले.
अंकिता औपचारिक पणे हसली आणि तिने गाडी स्टार्ट केली आणि ती निघून गेली. आदित्य सुद्धा तिच्या मागेच ऑफिस ला गेला.
या दोघांना बोलताना मात्र सुजाता ने पाहिले होते. आणि हा मुलगा कोण आहे ह्याचा शोध घ्यायचे ठरवले होते.
असेच दिवस जात होते आणि समोरासमोर राहत असल्याने कधीतरी अंकिता आणि आदित्य मध्ये थोडेफार बोलणे होऊ लागले होते. पण दोघांच्या मनात एकमेकांबद्दल काहीच दुसरी भावना नव्हती. ऑफिस मध्ये सुद्धा दोघे फक्त कामापुरते बोलायचे.
एकदा ऑफिस सुटल्यानंतर अंकिता गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होती पण काही केल्या गाडी स्टार्ट होत नव्हती. इतक्यात आदित्य बाहेर आला आणि त्याने बघितले की अंकिताने खूप प्रयत्न करूनही तिची गाडी सुरू होत नाही तेव्हा तो तिला म्हणाला.
” मिस अंकिता…तुमची काही हरकत नसेल तर मी सोडतो तुम्हाला घरापर्यंत…ही तुमची गाडी आज ऑफिसच्या पार्किंगला उभी करून द्या…उद्या सकाळी मेकॅनिक येऊन गाडी दुरुस्त करून देईल…”
” नको सर…मी काहीतरी सोय करेन घरी जाण्यासाठी…तुम्ही त्रास करून घेऊ नका…”
” हे बघा मिस अंकिता…आता पाऊस येणार अशी चिन्हं दिसत आहेत…उगाच तुम्हाला जायला वेळ लागेल…तुम्ही चला माझ्यासोबत…”
” नाही सर…बाईक वर तुमच्या सोबत घरी जाणे बरे दिसणार नाही…मी शोधते एखादा ऑटो…” अंकिता म्हणाली.
” ठीक आहे मग…माझ्यासोबत बाईक वरून घरी यायला प्रॉब्लेम आहे ना…मग मी सुद्धा तुमच्यासोबत ऑटो ने घरी येतो आज…” एवढे बोलून अंकीताच्या उत्तराची वाट न पाहता त्यांनी बाईक ऑफिस च्या पार्किंग मध्ये उभी केली आणि तिच्यासोबत ऑटोची वाट पाहू लागले. ते सुद्धा ऑटो ने घरी येणार म्हटल्यावर अंकिता त्यांना नाही म्हणून शकली नाही.
थोड्याच वेळात ऑटो आला आणि दोघेही ऑटोने घरी आले. बाहेरच झोपाळ्यावर बसलेल्या सुजाताने अंकिता ला ऑटोतून बाहेर येताना पाहिले. अंकिता च्या मागोमाग आदित्य ला सुद्धा ऑटो मधून उतरताना पाहून सुजाता ने लगेच आत मधून सचिन ला बोलावून आणले आणि अंकिताला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात म्हणाली.
” बघितलं का तुमची बहीण कोणते रंग उधळत आहे…गेली होती स्कूटी ने आणि परत आली ती एका ऑटोत…आणि ते हो एका तरुण मुलासोबत…”
सुजाता चे बोलणे अंकिता आणि आदित्य दोघांनाही ऐकू आले. अंकिता लगेच गेटच्या आत गेली आणि म्हणाली.
” हे काय बोलत आहेस सुजाता तू…बाहेर कुणी ऐकलं तर काय म्हणेल…”
” तुम्हाला करताना काही वाटत नाही आणि आम्हाला बोलताना काय वाटायला हवं…” सुजाता पुन्हा मोठ्याने म्हणाली.
” गप्प बस सुजाता…आजवर तू बोललेले सर्व काही गप्प राहून ऐकुन घेतले मी…पण आता नाही…आता तू खूप जास्त बोलत आहेस…सचिन तुझ्या बायकोला समजावून सांग…” अंकिता म्हणाली.
” मी तिला काय समजावून सांगणार आहे…तुला असे वागताना लाज नाही वाटली का…तरी सुजाता रोज सांगायची की तू ह्या मुलाशी बोलतेस म्हणून…पण मीच दुर्लक्ष केले…आणि आज ती त्याच्यासोबत फिरायला सुद्धा लागली आहेस…”
” तोंड सांभाळून बोल… आमचे सर आहेत ते…त्यांनी ऐकलं तर ते काय विचार करतील…” अंकिता म्हणाली.
” बस ताई…अग आमचा नाही निदान स्वतःच्या वयाचा तरी विचार करायला हवा होता…रोज चांगली तयार होऊन ऑफिस ला यासाठीच जायची का तू…अग लग्न करायचं होतं तर आम्हाला सांगायचं असतं…आम्ही शोधला असता एखादा मुलगा…पण हे असं फिरणं बरोबर आहे का तुझं…” सचिन म्हणाला.
” आम्ही एका ऑटो तून घरी आलो ह्यावरून नेमकं काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला…” अंकिता रागाने म्हणाली.
” हेच की तुझ्यात आणि त्यांच्यात काहीतरी सुरू आहे…”
” अरे निदान तू तुझ्या मोठ्या बहिणीबद्दल बोलतो आहेस हे तरी लक्षात घे…तूच मला असे म्हणायला लागला तर लोकांना माझ्या वर बोलायची आयती संधीच मिळेल ह्याचा तरी विचार कर…मी लहानपणी पासून तुझा एका आईसारखा सांभाळ केला ह्याची तरी लाज राख…” हे बोलताना अंकिताच्या डोळ्यात पाणी आले होते.
” जगावेगळं असं काहीच नाही केलंस तू…तुझ कर्तव्य होतं ते…आणि मुलगा या नात्याने ह्या घरावर फक्त माझाच अधिकार आहे आणि तुला मी घरात राहू देतो हे काय कमी आहे का…?…आणि इथे राहायचे असेल तर पुन्हा असलं काही घडायला नको…” सचिन म्हणाला.
सचिनचे बोलणे ऐकून अंकिताच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्याला आईच्या मायेने मोठे केले. ज्याच्यासाठी आजवर जगले तो मला माझ्याच घरात आश्रित समजतो. त्याला मी केलेल्या कष्टांची, त्याच्यावरच्या प्रेमाची काहीच जाणीव नाही का..? किती सहजतेने तो माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतो… काल घरात आलेल्या त्याच्या बायकोसमोर मला इतके काही बोलताना त्याला काहीच वाटत नाही का…मी आजवर ज्यांच्यासाठी जे काही केले त्याला ह्यांच्या नजरेत काहीच मोल नाही का…
हा सगळा विचार करून अंकिताला काहीच सुचत नव्हते. ती रात्री जेवण न करताच झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिची लहान बहीण तिच्या नवऱ्यासह घरी हजर झाली होती. आणि अंकिताला पाहताच तिने तोंडाचा पट्टा सुरू केला.
” या वयात असे वागणे शोभते का ताई तुला…अग आमचा तरी विचार करायला हवा होता…उद्या माझ्या सासरच्यांना हे समजले तर काय म्हणतील ते…ऑफिस मध्यल्या साहेबांशी कशाला जास्त बोलायला हवं…?”
क्रमशः
फिरून नवी जन्मेन मी – भाग ३ (अंतिम भाग)