” काय ग…काय झाले…तुझ्या डोळ्यात पाणी का आलं..?” सुप्रिया ने विचारले.
” काही नाही…पण खूप दिवसांनी कुणीतरी हा प्रश्न विचारला ग…खूप छान वाटलं मला…” रोहिणी म्हणाली.
” मग तुझ्या डोळ्यात हे अश्रू का आले…?” सुप्रिया ने विचारले.
” काही नाही ग…सहजच…तू सांग ना आणखी काही…” रोहिणी विषय टाळत म्हणाली.
” सांगायचे तर आहे…पण कसं सांगू काही कळत नाहीय…तुला वाईट तर वाटणार नाही ना…” सुप्रिया म्हणाली.
” नाही वाटणार…सांग तू…” ती निर्धाराने म्हणाली.
” मी काल तुझ्या मिस्टरांना बाहेर एका मुलीसोबत बघितलं…म्हणजे तसं काही असेल असे मला नक्की माहिती नाही…पण बघितलं म्हणून म्हटलं तुला एकदा सांगावं…” सुप्रिया जरा चाचरत म्हणाली.
सुप्रियाला वाटले होते की आपले बोलणे ऐकून रोहिणीला धक्का बसेल. ती दुःखी होईल. निदान आपल्याला ओरडुन सांगेल की तुला काही गैरसमज झाला असेल. पण रोहिणी मात्र सुप्रियाचे बोलणे ऐकुन कमालीची शांत झाली होती. तिला जणू काही फरकच पडला नव्हता.
” काय झालं…तू अशी अचानक गप्प का झालीस…काहीतरी बोल ना…” सुप्रिया म्हणाली.
” मला सगळं माहिती आहे…” रोहिणी शांतपणे उत्तरली.
” मग तू त्यांना काही बोलली नाहीस का…आणि तरीपण तू इथे त्यांच्यासोबतच राहतेस…त्यांना जाब का नाही विचारात तू…” सुप्रिया म्हणाली.
” तुला काय वाटतं…मला कळल्यावर मी त्यांना जाब विचारला नसेल का…?” रोहिणी म्हणाली.
” मग काय म्हणाले ते…?” सुप्रिया ने न राहवून विचारले.
” ह्यांच्याशी लग्न झाले तेव्हा मी वयाने थोडी लहानच होते. मला पुढे शिकायचं होतं पण ह्याचं स्थळ आलं आणि हे म्हणाले की आम्ही मुलीला शिकवतो…मग आई बाबांनी सुद्धा ह्यांची श्रीमंती आणि प्रतिष्ठा पाहून माझं ह्यांच्याशी लग्न लावून दिलं…इतक्या चांगल्या घरी माझं लग्न करून दिल्याने माझ्या माहेरच्यां ची प्रतिष्ठा वाढली होती…त्यामुळे ते निश्चिंत झाले…
मग मी या घरात सून बनून आले…ह्या घरचे वेगळेच नियम होते…सून कितीही शिकलेली आली तरीही इथे नोकरी करण्याची परवानगी नव्हती…हे तर कामानिमित्ताने सतत बाहेर राहायचे…घरात सासुबाई आणि मीच असायचो…आमच्या सासुबाई शिस्तीच्या खूप कडक आहेत…त्यांना कामात जराही चूक झालेली चालत नाही…त्यामुळे मी सतत त्यांना घाबरून असायचे…
मला वाटले एकदा का माझं कॉलेज पुन्हा सुरू झालं की मग मला थोडी मोकळीक मिळेल…पण लग्न झाल्यानंतर चार महिन्यात मला दिवस गेले…आणि शिक्षण वगैरे तिथेच थांबलं…त्यानंतर मला मुलगा झाला आणि सगळं लक्ष मुलाकडे दिलं मी…त्याच्यानंतर दोन वर्षांनी दुसरा मुलगा झाला…मी माझ्या घरात बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाले होते…
आणि इतक्यातच एक दिवस मी चुकून ह्यांचा मोबाईल बागितला. तेव्हा ह्यांचे एका मुली सोबत फार जवळचे फोटो पाहिले. आणि मला धक्काच बसला. मी ह्यांच्याशी खूप भांडले. त्यांना विचारलं की माझ्यात काय कमी आहे. आमच्या दोन मुलांची आठवण करून दिली त्यांना. पण त्यांना काहीच फरक पडला नाही.
ते म्हणाले की पुरुषांसाठी हे नॉर्मल आहे. बायको घरात असतानाही अनेक पुरुष लफडी करतातच. त्यांनी काही वाईट केले असे त्यांना जराही वाटत नव्हते. मग मी त्या मुलीचा पत्ता मिळवला आणि तिच्याशी जाऊन भांडले. पण तिलाही फक्त ह्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशांशी मतलब होता म्हणून तिच्यावर माझ्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट की तिला बोलले हे तिने ह्यांना सांगितले आणि त्या दिवशी ह्यांनी घरी येऊन मला खूप मारले.
आणि दुसऱ्या दिवशी माहेरी नेऊन सोडले. पण फक्त मलाच. माझ्या तीन आणि एक वर्षाच्या मुलांना त्यांनी माझ्यासोबत येऊ दिले नाही. मी खूप रडले. त्यांना म्हटलं की माझा मुलगा अंगावरचे दूध पितो त्याला तरी मला सोबत घेऊन जाऊ द्या. पण काहीच फरक पडला नाही त्यांना.
माझ्या माहेरी मला सोडल्यावर माझ्या घरच्यांना ते म्हणाले की हिला समजवा की फक्त घरात लक्ष दे म्हणून. बाकी काही कामात लक्ष दिलेस तर कायमची माहेरीच राहा म्हणावं. आणि मला माझ्या माहेरी ठेवून ते त्यांच्या घरी निघून गेले. माझ्या माहेरचे मात्र माझ्यावर खूप रागे भरले. त्यांना वाटले की मीच काहीतरी चुकीचे केले असेल.
तेव्हा मात्र की त्यांना सांगितले की ह्याचं बाहेर अफेअर सुरू आहे. माझ्या घरचे थोडा वेळ माझ्यासाठी हळहळले. आणि थोड्या वेळाने आई म्हणाली.
” बाईचा जन्म सहन करण्यासाठी च झाला आहे बाळ…आणि तुला तर काहीच कमी नाही तिथे…नवरा आज नाही तर उद्या सुधरेलच…पण मुलांसाठी तुला हे सहन करावेच लागेल बाई…मनातलं दुःख मनातच ठेव आणि का नवऱ्याच्या घरी परत…”
” नाही आई…मला आता त्या माणसाच्या घरी जायचं नाही…त्याने खूप त्रास दिलाय ग मला…त्यांची चूक असतानाही मला खूप मारले आई त्यांनी…आपण जाऊन माझ्या मुलांना तिथून घेऊन येऊ…आणि की परत नाही जाणार तिथे…” मी म्हणाले.
” मग दोन मुलांना घेऊन कुठे जाणार आहेस…” बाबांनी प्रश्न विचारला.
आणि मी एकदम स्तब्ध झाले. मला वाटलं आई बाबा म्हणतील की आता तू इथेच राहा. नवऱ्याच्या घरी जायची काहीच गरज नाही. पण त्यांनी पूर्णपणे माझी जबाबदारी झटकली होती. ते कमीच बोलले होते पण त्यांच्या बोलण्यातून मला त्यांचा निर्णय कळला होता. आधी जेव्हा मी माहेरी काही दिवसांसाठी पाहुनी म्हणून यायचे तेव्हा घरचे सगळेच मला खूप मानाने वागवायचे.
पण आजच ही परिस्थिती होती तर मला हे माझ्या दोन मुलांसह माहेरी ठेवून घेणार होते का. मला कळून चुकलं की आपल्याला इथे आधार मिळणार नाही. आणि दुसरीकडे कुठेच जायला जागाही नव्हती. त्यात शिक्षणही कमी त्यामुळे नोकरी सुद्धा मिळणं कठीण. आणि काही झालं असतं तरी माझ्या नवऱ्याने माझ्या दोन्ही मुलांचा ताबा मला कधीच मिळू दिसला नसता.
आणि आई सुद्धा म्हणाली की तुझ्या नवऱ्याने मनात आणले तर त्याला लगेच दुसरी बायको मिळेल. आणि तू मात्र आयुष्यभर तुझ्या मुलांना पाहायला सुद्धा मिळणार नाही.
आणि मुलांशिवाय मी जगूच शकले नसते. इतकी वर्षे माझं सर्वस्व की फक्त त्यांच्या घराला दिलं. स्वतःच असं काही नव्हतच ग माझ्याकडे. मैत्रिणींशी संपर्क तर केव्हाचा तुटला होता. मग मनाला समजावलं. म्हटलं की आता हेच तुझ नशीब आहे. जे आहे ते स्वीकारून जगशील तर निदान तुला तुझ्या मुलांसोबत राहता तरी येईल. डोक्यावर हक्काचं छप्पर असेल. आणि माझ्यावर जरी नसलं तरी माझ्या मुलांवर त्यांचं प्रेम होतं.
मग दुसऱ्याच दिवशी नवऱ्याच्या घरी परत आले. माझ्या परत येण्याला माझ्या नवऱ्याने माझी मूकसंमती समजले आणि जे आजवर लपून छपून चाललं होतं ते आता सर्वांच्या समोर होऊ लागलं. म्हणून आता जाब वगैरे विचारण्याचा तर संबंधच येत नाही. मी त्यांना जास्त प्रश्न विचारणे ही सोडून दिले आहे. आता मी फक्त माझ्या मुलांसाठी जगते आहे. त्यांना चांगले संस्कार मिळावे म्हणून प्रयत्न करते आहे. माझी मुलच माझं जग आहे. आणि जे घडतंय ते उघड्या डोळ्यांनी पाहण्यावाचून माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही…” रोहिणी एका दमात एवढं सगळं बोलून गेली आणि सुप्रिया सुद्धा ऐकून दंग झाली.
यावर जास्त काही न बोलता सुप्रियाने रोहिणीचा निरोप घेतला आणि तिच्या घरून निघाली. मनात मात्र असंख्य प्रश्न होते.
तिला आज माहिती पडलं की काही स्त्रिया ह्या खरंच इतक्या लाचार असतात की त्यांच्याकडे सहन करण्या वाचून इतर कुठलाही पर्यायच नसतो. सगळ्यांना एक घाव दोन तुकडे म्हणून लगेच घटस्फोट घेता येत नाही. सगळं काही बघून सुद्धा गप्प राहावं लागतं. तिच्या मनात राहून राहून येत होतं की जर रोहिणी पुढे शिकली असती तर तिला निदान एवढं लाचारीच जगणं जगावं लागलं नसतं. पण जगाचं वास्तव सुद्धा हेच आहे की बऱ्याचदा चांगल्या शिक्षित आणि नोकरी करणाऱ्या स्त्रियांना देखील कोणत्या ना कोणत्या रूपात ह्या सर्व गोष्टींना सामोरे जावं लागतंच.
म्हणून मला वाटतं की स्त्रियांनी आत्मनिर्भर असावं…इतरांसाठी करताना आपलं स्वतःचं अस्तित्व ही विसरून जाऊ नये…आईवडिलांनी ही मुलींना निदान त्यांचं पोट भरता येईल एवढं तरी शिक्षण द्यावं…आणि मुलाकडच्यांच्या आम्ही मुलीला पुढे शिकवू या आश्वासनावर दिले झाकून विश्वास ठेवू नये…
तुम्हाला काय वाटतं ?
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका.
Khup chaan story