” मी सगळच ऐकलं आहे सुमेधा…अगदी पहिल्यापासून…” सुधीर खिन्न पणे म्हणाला.
त्याचे बोलणे ऐकून आई आणि सुमेधाला धक्काच बसला. त्या दोघीही काहीच बोलल्या नाहीत. सुधीर पुढे म्हणाला.
” मला तुझ्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती आई… अगं सगळं काही सुरळीत सुरू असताना सगळ्यांच्या नजरेतून मनिषाला पडायची काय गरज होती…तिने कधी काही त्रास दिला नाही ना आपल्याला…कुठल्याही अपेक्षा न करता तिने आपल्याला जसे आहोत तसे स्वीकारले होते…दिवसभर मी घरी नसायचो…त्यामुळे तू जे सांगायची त्यालाच खरं मानायचो…पण तू त्या गोष्टीचा गैरफायदा घ्यायला नको होता…”
आता मात्र आईला मनापासून वाईट वाटले. त्या चुकल्या होत्या ह्याची जाणीव त्यांना झाली होती. पण सूनेसमोर आणि सुनेच्या आई वडिलांसमोर आपल्या चुका त्यांना कबूल करायच्या नव्हत्या. त्या सुधीरला म्हणाल्या.
” तुझा काहीतरी गैरसमज होतोय सुधीर…आपण याबद्दल नंतर बोलुयात…आता कशाला उगीच वाद वाढवायचा…”
” नाही आई…माझा गैरसमज झालेला नाही आहे…आणि आज जर मी हे सगळं ऐकलं नसतं तर मला नेहमीच तू जे सांगत आहेस ते खरं वाटलं असतं…आणि की पुन्हा मनिषाला चुकीचे समजले असते…आधीच आमच्यात सुसंवाद नाही आणि गैरसमज वाढले असते तर कदाचित मी मनिषाला कायमचे गमावून बसलो असतो…” सुधीर म्हणाला.
” माझं चुकलं मला मान्य आहे…पण ही एवढी मोठी गोष्ट सुद्धा नाही आहे…एवढ्याशा गोष्टीवरून माझ्यावर नाराज होणार आहेस का तू…?” आई म्हणाली.
” हो आई…मला खूप वाईट वाटतंय…कारण तुझ्या बोलण्यात येऊन मी मनीषाचे खूप मन दुखावले आहे…मी तिच्या नजरेला नजर मिळवू शकत नाहीये आज…” सुधीर म्हणाला.
” जावई बापू…तुम्ही वाईट वाटून घेऊ नका…जे काही झालंय ते आता विसरून जा… नव्याने सुरुवात करा…आणि आम्ही आता निघतो…तुम्ही सगळ्यांनी शांतपणे विचार करून गैरसमज दूर करून घ्या…” मनीषाची आई म्हणाली.
आपल्यासमोर सुधीरची आई असहज होत आहे हे कळल्यावर
मनीषाच्या आईने तिच्या वडिलांना इथून चला अशी डोळ्यांनीच खूण केली. मनीषा मात्र सगळं काही ऐकत शांतपणे तिथे उभी होती. ती काहीच बोलत नव्हती. सुधीर मनीषाच्या आईला म्हणाला.
” आई…तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल मनापासून माफी मागतो…आणि यानंतर मनीषाच्या बाबतीत माझ्याकडून अशी चूक होणार नाही ह्याची ग्वाही तुम्हाला देतो…”
” आम्हाला विश्वास आहे तुमच्यावर…” मनीषा चे वडील म्हणाले.
आणि तिथून जायला निघाले. मनीषा ने जेवून जाण्याचा आग्रह केला. पण घरी जायला आणखी दोन तास लागतील असा बहाणा देऊन ते लवकरच जायला निघाले. खरं तर त्यांना मुलीच्या सासरच्या प्रकरणात नाक खुपसायचे नव्हते. सुधीरला सगळं काही कळलं आणि तो मनीषाच्या बाजूने आहे हेच त्यांच्यासाठी पुरेसे होते. शिवाय मनीषा स्वतः देखील खमकी होतीच.
ते निघून गेल्यावर सुधीरची आई त्याला म्हणाली.
” सुधीर…माझं खरंच चुकलं…पण तू निदान माझ्यावर रागे तरी नको भरू…”
” पण तू असे का केले आई…?काय मिळालं असतं तुला असे वागून…?” सुधीर ने विचारले.
” मनीषा सगळ्याच कामात निपुण होती…अगदी चुका काढायला सुद्धा जागा देत नसे…मला वाटले की ती तुझं मन जिंकून घेईल आणि आम्हाला वरचढ होईल…मग माझे आणि सुमेधा चे घरातील महत्त्व आपोआप कमी होऊन जाईल…त्यातून सुमेधा घटस्फोटित आहे…म्हणून मग आम्ही तुझ्या मनात मनीषा विरुद्ध चुकीच्या गोष्टी भरवू लागलो…पण मी स्वतः सुमेधाशी कधीच वाईट वागले नाही…नेहमी चांगलीच बोलत आले मी तिच्याशी…तू हवं तर तिला विचार ना…” त्यानंतर सुमेधा कडे पाहून त्या म्हणाल्या.
” तूच सांग ना सुमेधा ह्याला…मी जशी तुझ्यावर आवाज चढवून बोलले का…?”
” तुम्ही माझ्याशी कधी वाईट बोललेल्या नसल्या तरीही माझ्याशी वाईट मात्र वागल्या आहात…की तुमच्यासाठी सगळं काही करत आले…आजवर कधीच सुमेधा ताईंना घरकामात मदत करा असे म्हटले नाही…इतकंच नाही तर त्यांना हवं नको ते सगळंच विचारते…त्यांचा चहा सुद्धा त्यांच्या खोलीत नेऊन देते…
आजवर एकदा तरी त्यांनी चहाचा रिकामा झालेला कप किचन मध्ये नेऊन ठेवलाय का ते विचारून बघा त्यांना…आणि तुम्ही मात्र या सर्वांच्या बदल्यात मला सगळ्यांच्या नजरेतून उतरवायचा प्रयत्न केला…ह्यांच्या नजरेत दिसणाऱ्या रागाचे कारण मला कळल्यावर खूप वाईट वाटले मला…कारण मी तुम्हाला फक्त आई बोलण्या पुरते नाही म्हणायचे…मी तुम्हाला खरोखरच आई मानले होते…”हे बोलताना मनिषाच्या डोळ्यात पाणी आले होते.
” आणि आई माझ्या मनात मनीषाचे स्थान वरचढ झाले असते म्हणजे सुमेधा चे किंवा तुझे स्थान कमी झाले असते असे नव्हे…अगं प्रत्येकाचे आपले असे स्थान असते…कुणाच्या येण्याने ते कधीच ढळत नाही…शिवाय हे घर जितकं माझं आहे तितकंच ते सुमेधाच सुद्धा आहे…आणि मनीषाने जर तुला खरंच काही त्रास दिला असता तर मी तिच्या सुद्धा विरुद्ध गेलो असतो…” सुधीर म्हणाला.
सासुबाई काहीच बोलू शकल्या नाही. मनीषा मात्र तिथून निघून तिच्या खोलीत निघून गेली. ती जाताना तिचा रडवेला चेहरा सुधीरच्या नजरेतून सुटला नव्हता. सुधीर सुद्धा तिच्याशी बोलायचे म्हणून तिच्या मागेच रूम मध्ये निघून गेला. वृंदा ताई आणि सुमेधा ह्या दोघीच फक्त हॉल मध्ये होत्या. सुमेधा वृंदाताईंना म्हणाली.
” आई…तू काळजी नको करू…ह्याचा राग जाईल एक दोन दिवसात…”
” नाही ग…तो माझ्यावर रागावला ह्यापेक्षा जास्त दुःख ह्याचं होतंय की मी अशी का वागले…”
” म्हणजे…?” सुमेधा ने विचारले.
त्यानंतर सासूबाईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या.
” माझं खरंच चुकलं ग…मनीषाच्या बाबतीत सुद्धा आणि तुझ्या बाबतीत सुद्धा…तुझ्या बाबतीत पण माझ्याच चुका नडल्या बघ…माझ्यामुळेच तुझा संसार तुटला ग…आणि ह्याची जाणीव आज इतक्या उशिरा झाली मला…मी त्या वेळेला तसे वागायला नको होते…”
त्यांचे बोलणे ऐकून सुमेधा ला पुन्हा सगळं काही नव्याने आठवू लागले. ती तिथून तिच्या खोलीत गेली आणि बसून जुन्या आठवणीत हरवली.
इकडे सुधीर रूम मध्ये येऊन मनिषाला म्हणाला.
” मला माफ कर मनीषा…मी खूप चुकलो…”
” मी नाही करणार माफ…” मनीषा रागावून म्हणाली.
” पुन्हा नाही होणार अशी चूक…” सुधीर कानाला हात लावून म्हणाला.
” मला विचार करून सुद्धा भीती वाटते की जर तुम्ही आज स्वतः सगळ्या गोष्टी ऐकल्या नसत्या तर तुम्ही माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नसता…” मनीषा म्हणाली.
” माझं खरंच खूप चुकलं…मी तुझ्याबाबतीत चुकीचा विचार केला…तू हवी ती शिक्षा दे मला…पण माझ्यावर नाराज नको राहू…”
” गोष्ट शिक्षा द्यायची नाही आहे…गोष्ट डोळसपणाची आहे…विश्वासाची आहे…मी सकाळी तुम्ही उठायच्या आधी उठून घरातील सगळी कामे करायचे…अगदी तुम्ही ऑफिसला जाईपर्यंत माझा स्वयंपाक सुद्धा व्हायचा…मी स्वतःच्या हाताने तुम्हाला टिफीन द्यायचे…रात्रीचे जेवण झाल्यावर सुद्धा मला सगळं काही आटोपून रूम मध्ये येईस्तोवर बराच उशीर व्हायचा…आणि तेव्हा माझा फोन रूम मध्येच असायचा…मग तरीही जेव्हा तुमच्या आईने तुम्हाला सांगितले तेव्हा तुम्हाला हे सगळे का नाही दिसले…सगळे काही तुमच्यासमोर स्पष्ट असताना तुम्ही आईने जे म्हटले त्यावर अगदी डोळे बंद करून विश्वास ठेवलात…”
” खरंच मला माफ कर…मला मेल्याहून मेल्यासारखे वाटत आहे…मी खरंच असा विचार सुद्धा केला नाही…”
” मी ठरवून टाकले होते की मी सगळं काही सांगितल्यावर सुद्धा तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नसेल तर मी माझ्या माहेरी निघून जाईल म्हणून…पण बरे झाले तुम्ही स्वतःच्या कानांनी सगळे ऐकले…नाहीतर काय झाले असते काय ठावूक…असे नसते झाले तर आज कदाचित आपण भांडून दूर झालो असतो…मला तर कल्पना सुद्धा करवत नाहीय ह्याची…काहीही झालं तरी माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर…” हे बोलताना मनीषा च्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून आले.
” मी यापुढे अशी चूक करणार नाही…मी आता नेहमीच तुझी बाजू घेत जाईल…” सुधीर म्हणाला.
” आता तुम्ही पुन्हा चुकताय…तुम्ही माझी किंवा आईंची बाजू न घेता खऱ्याची बाजू घ्यायला हवी…मी चुकले असेल तर मला माझी चूक लक्षात आणून देऊ शकता आणि आईची बाजू खरी असेल तर तुम्ही आईच्या बाजूने उभे राहिलेले कधीही आवडेल मला…” मनीषा म्हणाली.
आपल्या समजूतदार बायकोचा सुधीरला अभिमान वाटला. त्याने तिला मिठी मारली. त्याच्या आश्वासक मिठीत तिचा रुसवा विरून गेला होता. कित्येक दिवसांपासून दोघांमध्ये असलेला गैरसमजाचा पडदा आज दूर झाला होता.
इकडे सुमेधा मात्र जुन्या आठवणींमध्ये हरवून गेली होती.
सुमेधाचे दोन वर्षांपूर्वी निशांत रावांशी लग्न झाले होते. निशांत एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होतकरू मुलगा होता. त्याचे वडील वारल्यानंतर त्याच्या आईने मोठ्या कष्टाने त्याला मोठे केले होते. चांगले शिक्षण दिले. आणि चांगली नोकरी सुद्धा मिळाली. सुमेधाचे लग्न झाल्यावर निशांतच्या आईला वाटले होते की आपल्याला सुनेच्या रूपात मुलगी मिळाली.
पण सुमेधा मात्र आधीपासूनच मनात निशांतच्या आईबद्दल पूर्वग्रह घेऊन आली होती. सासू या नात्याबद्दलच्या तिच्या संकल्पना आधीच स्पष्ट होत्या. आणि त्या फक्त आणि फक्त नकारात्मकच होत्या. त्यामुळे लवकरात लवकर तिला निशांत च्या मनात असलेली स्वतःची जागा वरचढ करून घ्यायची होती.
जेणेकरून तो आईचे न ऐकता तिचेच सगळे काही ऐकेल. पण मुलाकडून स्वतःचे म्हणणे खरे करून घेणाऱ्या आयांपैकी निशांतची आई निश्चितच नव्हती. निशांतची आई तर खूपच साधी, सरळ आणि समंजस होती. गरिबीतून वर आलेल्या कुटुंबातील असल्याने त्यांनी चांगले दिवस आल्यावरही कधीच गर्व केला नाही.
सुमेधा सासूबाईंशी गोड गोड बोलायची. पण तिच्या ओठात एक आणि पोटात एक असायचे. सासुबाई मात्र तिला तोंडभरून ‘बेटा ‘ अशी हाक मारायच्या. तिच्या पुढे पुढे घरातील कामे करायच्या. कधीच तील तू जे काम कर वा हे नको करू असे म्हणाली नव्हत्या.
निशांतची आई दिवसभर घरात राब राब राबायची. निशांत आईला म्हणायचा देखील की कामासाठी एखादी कामवाली बाई पाहुयात म्हणून. पण आई नेहमीच म्हणायची की मला कामांची सवय आहे आणि की जर रिकामी बसली ते आजारी पडेल. मग निशांत सुद्धा काही बोलायचा नाही. पण सुमेधाने मात्र या सगळ्याला आईची हुशारी समजले होते.
सुमेधाला वाटत होते की सासुबाई निशांतला दाखवण्यासाठी घरातील कामे करतात. जेणेकरून त्याच्या मनात आईची जागा वरचढ राहील. सुमेधा आधीच सासूबाईंच्या कुठल्याच गोष्टीला साध्या पद्धतीने घेत नसे. तिला प्रत्येक गोष्टीत सासूबाईंना विशिष्ट हेतू दिसायचा. शिवाय आपल्या लेकीच्या मनातील या संशयाला खतपाणी घालायला तिची आई होतीच. त्या सुमेधाला आपल्या परीने बरेच सल्ले द्यायच्या.
क्रमशः
सुमेधा आणि निशांतचा संसार का मोडला असेल…? तिच्या घटस्फोटामागे वृंदाताईंची भूमिका काय होती…? सासुबाई आणि नणंदबाई ह्यांचे मनीषाशी पुढचे नाते कसे असेल हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका…