प्रीती तिच्या आई बाबांची लाडकी होती. दोन भावांच्या प्रेमाच्या सावलीत वाढलेली होती. मागच्या वर्षीच तिच्या मोठ्या भावाचे लग्न झाले होते. वहिनी सुद्धा प्रितीचे खूप लाड करायची. तिला हवं नको ते विचारायची. प्रीती सुद्धा वहिनीला खूप मान द्यायची.
प्रीती नुकतीच बारावी पास झाली होती. शिक्षणात तिची फारशी प्रगती नसल्याने आणि तिला पुढे शिकण्यात फार रस नसल्याने तिने पुढील शिक्षण घेतले नाही. तिच्या गावात मुलींची लग्ने लवकर करून द्यायची पद्धत होती. म्हणून प्रितीच्या घरच्यांनी तिच्या लग्नाचे मनावर घेतले आणि स्थळं पाहायला सुरुवात केली.
मुळात दिसायला सुंदर असणाऱ्या प्रितीचे लग्न ठरायला वेळ लागला नाही. पुण्यात नोकरी करणाऱ्या पंकज सोबत प्रितीचे लग्न ठरले. पंकजला प्रीती पहिल्याच नजरेत आवडली होती. दोन्ही घरच्यांनी पसंती सुद्धा झाली आणि लवकरच एका चांगल्या मुहूर्तावर प्रीती आणि पंकजचे लग्न लावून देण्यात आले.
प्रीती लग्न करून पंकजसोबत पुण्याला राहायला आली. पंकज पुण्यात त्याच्या आई, बाबा आणि लहान भावासोबत राहायचा. त्याला एक मोठी बहीण होती. तिचे सासर सुद्धा पुण्यातच होते.
प्रितीच्या सासूबाईंचा गावातील मुलगी सून करून आणण्यामागे वेगळाच हेतू होता. त्यांना वाटले होते की शहरातील मुलगी आपल्याला वरचढ होईल. पंकजला मुठीत ठेवेल. पण एखादी कमी शिकलेली मुलगी सून म्हणून आणली तर ती आपल्या हाताखाली राहील.
प्रितीच्या सासूबाईंनी लगेच घरातील कामांची जबाबदारी प्रितीवर टाकली. पण प्रीतीला तिच्या मनाप्रमाणे काम करण्याची मुभा अजिबात नव्हती. घरी कोणता स्वयंपाक करायचा हा निर्णय सासूबाईंचा असायचा.
सासुबाई प्रितीच्या कामांवर बारीक लक्ष ठेवत असे. स्वयंपाकाचे साहित्य सुद्धा तिला अगदी मोजून मापून द्यायची. भाजी करताना एवढाच कांदा वापरायचा, पोळ्या मोजक्याच टाकायच्या अशा एक ना अनेक सूचना प्रीतीला द्यायच्या.
इतकंच नाहीतर प्रीतीने दुपारच्या वेळी चहा करून पिऊ नये म्हणून साखर आणि चहाचा डबा स्वयंपाकघरातील एका अलमारीत ठेवून त्याला कुलूप लावायच्या. जर एखादे दिवशी जास्तीचे जेवण झाले तर दुसऱ्या दिवशी ते प्रीतीला खावे लागत असे आणि स्वयंपाक कमी झाला तर प्रसंगी स्वतः उपाशी राहावे लागत असे.
एवढे कमी की काय म्हणून नणंद दर दुसऱ्या दिवसाला येऊन प्रीतीला कसा त्रास द्यायचा ही संधी शोधायची. प्रितीची नणंद घरी आली की दोघी मायलेकी बाहेरून चांगले पदार्थ आणून खायच्या. पण प्रीतीला मात्र साध्या विचारायच्या देखील नाही.
याबद्दल पंकजला सांगून काही फायदा होणार नाही हे प्रीतीला एव्हाना कळून चुकले होते. पंकजचे त्याच्या आईसमोर काहीच चालायचे नाही. महिन्याचा पगार झाला की तो आणि त्याचा भाऊ सगळा पगार आणून आईच्या हाती ठेवायचे.
आई त्यांना खर्चाला काही पैसे द्यायची आणि बाकी सर्व तिच्याकडे जमा करून ठेवायची. प्रीतीने एकदा त्याला पाणीपुरी खावीशी वाटते असे म्हटले तर तो म्हणाला की आईला आवडणार नाही. तेव्हापासून पंकज जवळ काही बोलायची सोय राहिली नव्हती.
प्रीतीने हे सर्व काही तिच्या माहेरी सांगितले. माहेरचे सांगायचे की आज ना उद्या सर्व काही ठीक होईल. एकदा बाळ झालं की सासूबाईंचे वागणे बदलेल. प्रीतीला सुद्धा आता आशा वाटत होती की बाळ झाल्यावर सर्वकाही सुरळीत होईल.
ती आतुरतेने बाळाची स्वप्ने पाहायला लागली होती. आणि लवकरच तिला ती आई होणार असल्याचे कळले. तिला खूप आनंद झाला. तिने ही बातमी घरी सर्वांना सांगितली. तिला वाटले होते की ही बातमी ऐकून घरच्यांना सुद्धा खूप आनंद होईल. तिचा खूप लाड होईल.
पण घरच्यांनी मात्र खूप थंड प्रतिक्रिया दिली. पंकज नुसतं ‘ चांगलं आहे ‘ असं म्हणाला. आणि सासुबाई म्हणाल्या की काम करताना जरा जपून करत जा. नाहीतर वेंधळेपणा करशील. पण तरीही लवकरच परिस्थिती बदलेल ह्या आशेवर प्रीती आला दिवस ढकलत होती.
मात्र गरोदर पणात प्रितीची तब्येत नाजूक बनत चालली होती. सतत उलट्या आणि अशक्तपणा जाणवत होता. तिची काहीबाही खायची इच्छा व्हायची. पण घरात साधा स्वतःहून चहा सुद्धा करता येत नव्हता. तिच्या तब्येतीची खूप हेळसांड होत होती.
तिने सासूबाईंना आपली तब्येत बरोबर नसल्याचे सांगितले. पण त्यांना वाटले प्रीती कामचुकारपणा करण्यासाठी उगाचंच नाटक करत आहे. त्यांनी तिला कामातून जराही उसंत दिली नाही. परिणामी प्रीती शारीरिक आणि मानसिक रित्या खचत चालली होती.
एके दिवशी दुपारी प्रितीच्या सासुबाई काहीतरी कामानिमित्ताने त्यांच्या मुलीच्या घरी गेल्या होत्या. आणि तेवढ्यातच प्रीतीला काहीतरी चटपटीत खायची खूप इच्छा झाली. सासुबाई घरी नाहीत हे बघून तिने शेजारच्या एका लहान मुलाला दुकानातून चिवडा आणायला सांगितले.
तो मुलगा दुकानातून चिवडा घेऊन यायला आणि सासुबाई घरी यायला एकच गाठ पडली. आपल्यामागे आपली सून बाहेरून खायला मागवते हा आयताच विषय सासूबाईंना सापडला होता. सासूबाईंनी घरात जोरदार गोंधळ घातला. बिचाऱ्या प्रीतीला चिवडा तर खायला मिळालाच नाही पण सासूबाईंच्या शिव्यांनीच पोट भरून घ्यावे लागले.
संध्याकाळी पंकज आल्यावर सासूबाईंनी त्याचे कान भरले. पंकज सुद्धा प्रीतीला नको ते बोलला. सासूबाईंनी प्रितीच्या माहेरी फोन करून त्यांना तातडीने पुण्याला बोलावून घेतले.
दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रितीचे दोन्ही भाऊ तिच्या घरी पोहचले. सासुंनी त्यांच्यासमोर प्रितीबद्दल असणाऱ्या त्यांच्या तक्रारींचा पाढा वाचला. प्रीती घरातील एकही काम करत नाही. तब्येत खराब आहे म्हणून कामांचा आळस करते. आम्ही घरात नसताना बाहेरून खायला मागवते वगैरे वगैरे.
प्रितीचे दोन्ही भाऊ तरुण वयाचे आणि अल्लड होते. प्रितीची सासू तिच्याशी कसे वागते हे त्यांना आधीच माहिती होते. म्हणून प्रितीच्या सासूचे बोलणे ऐकून त्या दोघांनी सुद्धा त्यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली.
तुम्ही आमच्या बहिणीला खूप त्रास देता, चहा पावडर आणि साखरसुद्धा कुलूपात ठेवता, तिच्या तब्येती कडे लक्ष ठेवत नाही वगैरे वगैरे. पंकजला त्याच्या आई विरुद्ध बोललेले सहन झाले नाही आणि तो सुद्धा मध्येच बोलायला लागला.
शब्दाला शब्द वाढला आणि क्षणात वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. आणि प्रितीच्या सासूबाईंनी तिला घरातून बाहेर चालते व्हायला सांगितले. प्रितीची घरी जायची इच्छा तर नव्हती पण आता तिचा नाईलाज झाला होता. प्रितीचे भाऊ सुद्धा आम्ही आमच्या बहिणीला सांभाळायला समर्थ आहोत अशा आविर्भावात तिला घरी घेऊन गेले.
प्रितीच्या सासूबाईंच्या तर मनाचेच झाले होते. पंकजला मात्र प्रितीच्या जाण्याने काहीच फरक पडला नव्हता. त्याला वाटले होते की तिचे भाऊ जसे तिला सोबत घेऊन घरी गेलेत तसेच एके दिवशी नाक घासत तिला परत घेऊन येतील.
इकडे प्रीतीला माहेरी आलेली पाहून तिच्या आईवडिलांना आश्चर्य वाटले. नातेवाईकांनी तर तिला परत आलेली पाहून नाकं मुरडली. आधीच सासरच्यांनी घरातून काढून दिलेली आणि दोन जीवांची असलेली प्रीती आयुष्यात आलेल्या ह्या अनपेक्षित वादळाने खचून गेली होती.
सुरुवातीला तिच्या घरचे तिला धीर देत होते. दोन्ही भाऊ तिला सांत्वना देत होते. तुझ्या सासरच्यांना चांगलाच धडा शिकवू म्हणत होते. तिच्या आई वडिलांना वाटत होते की तिच्या सासरची मंडळी कधीतरी स्वतःच तिला घ्यायला येतील. तिच्यासाठी नाही पण तिच्या पोटात वाढणाऱ्या लेकरासाठी तरी येतीलच अशी त्यांना आशा होती.
पण ही आशा आता धूसर होत चालली होती. प्रितीच्या डिलिव्हरीची वेळ जवळ येत होती. तरीपण तिच्या सासरहून कुणी साधा कॉल सुद्धा केला नाही. प्रितीचे माहेरी असणे तिच्या वहिनीला अजिबात आवडले नव्हते. प्रितीच्या वहिनीला सुद्धा नुकताच मुलगा झाला होता. पण आज ना उद्या प्रीती सासरी जाईलच म्हणून ती तिची नाराजी बोलून दाखवत नव्हती.
©®आरती खरबडकर.
क्रमशः
: https://mitawaa.com/एकाच-ह्या-जन्मी-जणू-भाग-२/
भाग ३👇
https://mitawaa.com/एकाच-ह्या-जन्मी-जणू-भाग-३/
भाग ४ 👇
: https://mitawaa.com/एकाच-ह्या-जन्मी-जणू-भाग-४/
भाग ५👇
: https://mitawaa.com/एकाच-ह्या-जन्मी-जणू/
भाग ६👇
https://mitawaa.com/एकाच-ह्या-जन्मी-जणू-भाग-६/
भाग ७👇
https://mitawaa.com/एकाच-ह्या-जन्मी-जणू-भाग-७/
भाग ८👇
https://mitawaa.com/एकाच-ह्या-जन्मी-जणू-भाग-८/
भाग ९ (अंतिम भाग )👇
: https://mitawaa.com/एकाच-ह्या-जन्मी-जणू-भाग-९-अ/
फोटो – साभार गूगल