त्यानंतर तिथे अबोली आणि प्रीतीच्या माहेरची मंडळी सुद्धा प्रीतीला भेटायला आली. सगळ्यांना प्रितीची अवस्था पाहून काळजीच वाटली. त्यांची काळजी पाहून मग उलट प्रितीनेच सगळ्यांना धीर दिला आणि जास्त काही लागले नाही म्हणून समजावून सांगितले. प्रीतीचा कणखरपणा पाहून अबोलीला स्वतःच्या वागणुकीबद्दल आणखीनच वाईट वाटत होते.
थोड्या वेळाने जेव्हा सगळे घरी जायला निघाले. तेव्हा अबोली म्हणाली.
” मला इथे प्रितिजवळच थांबायचे आहे…”
” अगं पण कशाला…प्रशांत आहेतच की इथे… तू घरी जा… मी घेईल सांभाळून…” प्रीती म्हणाली.
” मी आता घरी जाणार नाही…” अबोली मोठ्याने म्हणाली.
आणि प्रीती सहित सगळेच आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. अरुणला ज्या गोष्टीची भीती होती तेच घडले होते. पण तो काही बोलूही शकत नव्हता. अबोली आपल्यावर खूप जास्त रागावली आहे हे त्याला माहिती होते. इकडे प्रीती अबोलीला म्हणाली.
” अगं घरी जाणार नाहीस म्हणजे काय…?”
” प्रीती सहित सगळेच आपल्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत आहेत हे लक्षात आल्यावर अबोली स्वतःची गोष्ट सावरत म्हणाली.
” अगं म्हणजे…तुला अशा अवस्थेत सोडून मी कुठेच जाणार नाहीये…”
आता मात्र सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. प्रीतीने अबोलीला पुन्हा सांगितले की तू घरी जा. आई आणि प्रशांत सांभाळून घेतील. पण अबोली प्रितिजवळ तिथेच थांबली. आणि अरुण एकटाच घरी निघून गेला. अबोलीला सत्य कळल्यावर ती कशी रिऍक्ट होईल हे तर त्याला माहीतच होते.
पण आज तिला सत्य सांगणे सुद्धा खूप गरजेचे होते म्हणून त्याने आज ती हिम्मत केली होती. हे सगळं घरी कळल्यावर काय होईल ह्याची त्याला कल्पना होतीच. आणि आपल्या चुकीची शिक्षा भोगायला तो मनापासून तयार होता. पण अबोलीने आपल्यापासून दूर राहू नये एवढेच त्याला हवे होते. त्याचे अबोलीवर मनापासून प्रेम होते.
इकडे दोन दिवस अबोली प्रीतीजवळ थांबली. तिसऱ्या दिवशी प्रीतीला हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाली होती. तीन महिन्यांसाठी तिच्या हाताला प्लास्टर लागले होते. अबोली सुद्धा प्रीती सोबत माहेरी गेली. दोघींचीही घरे जवळच होती. अगदी एकच भिंत होती दोघींच्या घरांची.
अबोलीने प्रीतीला सगळे सांगितले होते. तिची पुन्हा पुन्हा माफी मागितली होती आणि आपण अरुणला कधीही माफ करणार नाही हे सुद्धा सांगितले होते. त्यावर प्रीतीने अबोलीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण अबोली मात्र काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
इकडे अबोलीला माहेरी येऊन महिना होऊन गेला होता. अरुण तिला खूप कॉल करायचा. वारंवार तिच्या माहेरी येऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. पण अबोली मात्र घरच्यांसमोर त्याच्याशी तुटक वागायची. तिच्या घरच्यांना प्रितीचे इतके दिवस माहेरी राहण्याचे कारण काही लक्षात येत नव्हते. प्रीतीला सुद्धा आता बरे वाटत होते. अबोलीच्या आईने आडून आडून तिला एकदोनदा विचारले सुद्धा होते की तिच्या आणि अरुणमध्ये काही बिघडले आहे का म्हणून. पण अबोलीने अद्यापही घरी काहीच सांगितले नव्हते.
सध्या तरी तिला कोणालाच काही सांगायची इच्छा नव्हती. पण मी काय नेहमी नेहमी येऊन राहते काय आई माहेरी. एकाच शहरात माहेर असल्याने नेहमीच एक दोन दिवस राहून जाते ना. मग आता राहू दे की काही दिवस. असे उत्तर देऊन अबोली त्यांना गप्प करायची. शिवाय अरुण ने सुद्धा काहीच हरकत घेतली नाही म्हणून मग ते सुद्धा काहीच बोलले नाहीत. पण मुलीची काळजी मात्र त्यांना वाटतच होती.
प्रीतीने आडून आडून बरेचदा तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण अबोली मात्र काही ऐकायलाच तयार नव्हती. शेवटी एकदा अबोलीशी स्पष्टपणे बोलून बघायचं म्हणून प्रीती ने तिला घेऊन बाहेर जायचे ठरवले. अबोली तिच्या घरी आल्यावर प्रीती तिला म्हणाली.
” अबोली…मला ना घरात बसून खूप कंटाळा आलाय…आपण दोघी जरा पाय मोकळे करून यायचे का बाहेरून…”
” अगं पण तुला लागलंय ना…” अबोली म्हणाली.
” ते हाताला लागलंय…पायाला नाही…आणि इथेच कोपर्यावरच्या पार्क मध्ये बसू जरा वेळ…” प्रीती तिला म्हणाली.
” ठीक आहे…चल मग…” अबोली म्हणाली.
अबोली आणि प्रीती चालत चालत पार्क मध्ये आल्या. तिथल्या एका बेंच वर बसल्या आणि बोलायला लागल्या. थोड्याफार इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्यावर प्रीतीने सरळ विषयाला हात घातला.
” तू काय ठरवले आहेस अबोली…तू घरी का जात नाहीयेस…?”
” तुला असं वाटतंय का की इतकं सगळं माहिती झाल्यावर सुद्धा मी घरी जावं म्हणून…” अबोली ने तिला उलट प्रश्न केला.
” जे काही झालं ते होऊन गेलंय अबोली…जिजुंना खूप पश्चात्ताप झालाय त्या गोष्टीचा…त्यांनी तेव्हापासून पुन्हा असा विचारही केला नाही…तू सुद्धा त्यांना माफ करून पुन्हा नव्याने सुरुवात नाही का करू शकत ? ” प्रीती म्हणाली.
” नाही करू शकत…मी कधी विचारही नव्हता केला की माझा नवरा कुण्या दुसऱ्या बाईच्या नादाला लागू शकतो म्हणून…हा एकप्रकारे माझा अपमानच केलाय त्यांनी…माफ करणे तर दूर…पण मी हे विसरू सुद्धा शकत नाही…” अबोली म्हणाली.
” मला मान्य आहे त्यांच्याकडून चूक झालीय…पण त्यांनी ती मान्य करून स्वतःमध्ये बदल घडवून आणलाय…त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग…त्यांची एक चूक माफ करू शकत नाहीयेस का तू…?”
” नाही…मला आता त्यांच्यासोबत राहायचे नाहीये…आणि मी लवकरच घ’टस्फो’ट घेणार आहे त्यांच्याकडून…?” अबोली म्हणाली.
” काय…? अगं इतका मोठा निर्णय असा अचानक का घेत आहेस तू…?” प्रीती ने विचारले.
” अचानक घेत नाहीये…मी सर्व विचार करून हा निर्णय घेतलाय…आणि मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही…”
एवढं बोलून अबोली गप्प बसली. प्रीतीने तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच फायदा झाला नाही. अबोलीने स्वतःच वकीला जवळ जाऊन घ’टस्फो’टाची नोटीस अरुणला पाठवली.
अरुणला नोटीस मिळताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने ती नोटीस घेतली आणि तडक अबोलीचे घर गाठले. अबोलीला समोर पाहताच तो तिला म्हणाला.
” अबोली…तू नोटीस का पाठवलीस घटस्फोटाची ?…एवढी मोठी शिक्षा नको देऊस मला…हवं तर तू म्हणशील ते करायला तयार आहे मी…”
अरुण चे हे बोलणे अबोलीच्या घरच्यांनी ऐकले आणि आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अबोली च्या मनात हे असे काही असेल ह्याची त्यांना कल्पना सुद्धा नव्हती. अबोलीचे बाबा मोठ्या आवाजात तिला म्हणाले.
” हे काय चाललंय तुझं अबोली…तू असा विचार तरी कसा करू शकतेस…? एखाद्या गोष्टीवर राग असेल तरीही एवढं मोठा निर्णय घेणे योग्य आहे का…? मुळात तुझी हिम्मत तरी कशी झाली एवढा मोठा निर्णय कुणालाही न सांगता घेण्याची…?”
बाबांचा आवाज अबोलीवर आज पहिल्यांदाच चढला होता. बाबांचे बोलणे ऐकून अबोलीला काय बोलावे आणि काय नको ते सुचत नव्हते. तेव्हा अरुण तिच्या बाबांना म्हणाला.
” ह्यात तिची काहीच चूक नाहीये बाबा…सगळं काही माझंच चुकलंय…”
” म्हणजे…? तुमच्यात काही झालंय का…?” अबोली चे बाबा काळजीच्या सुरात म्हणाले.
तेव्हा अरुणने सगळे काही सत्य अबोलीच्या बाबांना सांगितले. सत्य ऐकल्यावर अबोलीच्या बाबांनाही त्यांचा खूप राग आला. पण जावई असल्या कारणाने एका विशिष्ट मर्यादेपलीकडे ते त्यांना काहीच बोलू शकत नव्हते. नेमकं काय बोलावं ते कुणालाच सुचत नव्हते. अरुण ने झालेल्या चुकीसाठी सगळ्यांची माफी मागितली. पण कोणी काहीच बोलत नव्हते म्हणून मग अरुण थोड्या वेळाने तिथून निघून गेला.
अरुणचा कबुलीजबाब ऐकल्यानंतर अबोलीला तिच्या माहेरचे जास्त विरोध करत नव्हते. पण तरीही तिच्या घरच्यांना वाटायचं की तिने तिचा घ’टस्फो’टाच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा किंवा घ’टस्फो’ट घेऊच नये. पण अबोली मात्र कुणाचे काहीच ऐकत नव्हती. ती तिच्या निर्णयावर ठाम होती. मुळात ती हट्टालाच पेटली होती.
तिच्या हट्टापुढे अरुणचे आणि तिच्या घरच्यांचे काहीच चालले नाही. शेवटी अरुणने सुद्धा तिच्या आनंदासाठी तिच्या मनाप्रमाणे वागायचे ठरवले. पण तिच्यापासून वेगळं होण्याचा विचार त्याला सहनच होत नव्हता. नशिबाने पुढे काय वाढून ठेवलंय ह्याची त्याला काहीच कल्पना नव्हती.
शेवटी कोर्टाकडून त्या दोघांनाही अडीच महिन्यांनंतर ची तारीख मिळाली होती. ह्या कालावधीत अरुणने, त्याच्या आईने, आणि अबोलीच्या माहेरच्यांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, तिला एक संधी मागितली. पण सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. एव्हाना प्रितीची तब्येत चांगली होऊन ती तिच्या सासरी परत सुद्धा गेली होती.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.