” काय आहे हे…अशी असते का भाजी…साधी भाजी कशी करावी हे सुधा कळत नाही का तुला…तुझ्या हाताला चवच नाही… हाताला काय तुझ्या कोणत्याच गोष्टीला चव नाही…मूर्ख कुठली…” सागर ओरडला आणि तसाच न जेवता जेवणाच्या ताटावरून उठून गेला.
सावीला खूप वाईट वाटले. आजकाल हे नेहमीचेच झाले होते. सागरला सावीची कुठलीच गोष्ट आवडत नव्हती. सुरुवातीला हे प्रमाण जरा कमी होते. पण आताशा सागर रोजच घरी आल्यावर सावी वर चिडचिड करायचा. कधी भाजी चांगली नाही तर कधी आणखी काय. आजकाल तिची कुठलीच गोष्ट त्याला आवडत नसे.
आजही तो भरल्या ताटावरुन उठला आणि रात्री उशिरा बाहेरून जेवण करून आला. तो घरी आला तेव्हा सावि जागीच होते. तो न जेवता तसाच बाहेर गेल्यामुळे ती सुद्धा काहीच जेवली नव्हती. तो दिसताच ती त्याला म्हणाली.
” तुम्ही जेवलात ना…?” पण नंतर तिला वाटले की आपण उगाच हा प्रश्न त्याला विचारला म्हणून मग सारवासारव करत ती म्हणाली. ” मी उद्या नक्कीच आजच्यापेक्षा चांगला स्वयंपाक करेन…”
यावर सागर साविला म्हणाला.
” त्यापेक्षा एक उपकार कर माझ्यावर…इथून कुठेतरी दूर निघून जा…नाहीतर मरून तरी जा…पण तू कसली ऐकणार आहेस माझं…त्यापेक्षा एक काम कर…देवाला म्हणावं ह्यालाच एकदाचं घेऊन जा वर…म्हणजे तुला चैन पडेल…”
” अहो असे काय बोलत आहात…मी तुमच्याबद्दल असा वाईट विचार सुद्धा नाही करू शकत…” सावी गहिवरून म्हणाली.
” काय कामाचं आहे ग हे असं जगणं…मी कंटाळलो आहे आता तुझ्यासोबत राहून…तुला अनेकदा म्हटलंय मला घटस्फोट दे…पण तू मात्र फेव्हिकॉल सारखी चिकटलेली आहेस मला…काय तर म्हणे मी तुमच्या मनात पुन्हा एकदा जागा निर्माण करूनच राहील… अगं पण मलाच नकोय ना ते…इतके दिवस झालेत पण मी तुला मनात स्थान नाही देऊ शकलो…त्यापेक्षा देवाने उद्या मला मरण आणलं तरी चालेल…” सागर म्हणाला.
आणि एवढे बोलून तो खोलीत झोपायला निघून गेला. सावीला मात्र त्याच्या बोलण्याने धक्काच बसला. आजवर अनेकदा त्याने तिला सांगितले होते की त्याला तिच्यापासून घटस्फोट हवाय. पण चार वर्षांचा संसार सावीच्याने मोडवत नव्हता.
अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये दाखवल्याप्रमाणे ती सुद्धा तिच्या नवऱ्याला पुन्हा एकदा मिळवून राहील असे तिने ठरवले होते. आणि अनेक दिवसांपासून ती ते प्रयत्न देखील करत होती. पण सागर मात्र तिच्यापासून खूप दूर निघून गेला होता.
त्याच्या लहानपणीच प्रेम असणारी श्वेता पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात आली होती. आणि जे प्रेम आपल्याला तेव्हा नाही मिळू शकलं ते आता सहजपणे मिळतंय म्हटल्यावर तो सावी ला स्वतःच्या मार्गातून हटवण्याचा प्रयत्नात होता. म्हणूनच तो तिच्यापासून घटस्फोट मागत होता.
आणि सावी मात्र पुन्हा एकदा संसार पूर्ववत होईल या आशेवर सागरचे मन वळविण्याचा प्रयत्न करत होती. पण आपल्यासोबत राहण्यापेक्षा त्याला मरायला आवडेल ह्या त्याच्या निर्वाणीच्या बोलण्याने तिची उरली सुरली आशा सुद्धा संपुष्टात आली होती. आता हे नातं आणखी खेचण्यात काहीच अर्थ नाही हे तिला कळून चुकले होते. तसेही त्याचे काही बरेवाईट झल्यापेक्षा आपण त्याच्या आयुष्यातून निघून जाणे केव्हाही चांगले हे तिला कळून चुकले होते.
आता मात्र तिने निर्णय घेतलाच. सागरला ह्या लग्नातून मोकळं करण्याचा. कारण दोघांचे नाते आता फक्त नावापुरतेच उरले होते. ते ही एकतर्फी. सागर तर केव्हाचा श्वेतामध्ये गुंतला होता. आणि हीच योग्य वेळ होती दोघांच्या वाटा वेगळ्या होण्याची.
दुसऱ्या दिवशी सकाळीच सावीने सागरला सांगितले की ती त्याला घटस्फोट द्यायला तयार आहे म्हणून. आणि संध्याकाळपर्यंत घरातून निघून जाईल हे देखील तिने सांगितले होते. सागरने तर अगदी आनंदाने उडीच मारली. कधी एकदा ही बातमी श्वेताला सांगतो असे त्याला झाले होते.
त्यादिवशी आनंदात तो जरा लवकरच ऑफिसला गेला. संध्याकाळी घरी गेल्यावर सावी घरात दिसणार नाही ही कल्पना सुद्धा त्याला खूप आनंद देत होती. श्वेताला हे सांगताच ती सुद्धा खूप खुश झाली होती.
श्वेता सागरची लहानपणीची मैत्रीण होती. दोघेही एकाच वर्गात होते. जसजसे वय वाढायला लागले तसतशी सागरला श्वेता आवडायला लागली. पण त्याने ते प्रेम कबूल करायच्या आधीच दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. सागर शिक्षणाच्या निमित्ताने वेगळ्या शहरात आला आणि तेव्हापासून त्याची आणि श्वेताची भेट झालेली नव्हती.
सागर चांगला शिकला आणि शहरातच नोकरीवर सुद्धा लागला. दरम्यानच्या काळात श्वेताचे लग्न झाल्याची बातमी त्याच्या कानावर आली. त्याला जरा वाईट वाटले पण ती तिच्या घरी सुखी होवो अशी मनोमन प्रार्थना करून त्याने तिचा विचार सोडला होता. आता त्याच्या घरी सुद्धा त्याच्या लग्नाची घाई होत होती.
शहरात चांगल्या नोकरीवर असणाऱ्या सागरसाठी त्याचे वडील चांगले तोलामोलाचे स्थळ शोधत होते. आणि सावीच्या रूपात त्यांचा शोध पूर्ण झाला. सागरला सुद्धा सावी पसंत पडली आणि दोघांच्या लग्नाचा बार दणक्यात उडाला. सावीचे घराणे गर्भश्रीमंत होते. त्यांनी लग्नात बराच खर्च केला होता.
शिवाय जावयाला लग्नात चारचाकी गाडी गिफ्ट केली होती आणि फ्लॅट घ्यायला मदत म्हणून पाच लाख रुपये मदत म्हणून दिले होते. शिवाय सावीला दागिन्यांनी नटवले होते. शहरातील जावई मिळाला ह्या विचारांनी तिच्या घरच्यांना तिच्या सुखाची खात्री वाटत होती. लग्न झाल्यावर काही दिवस अगदी आनंदात गेले. सावी सागरच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.
सुरुवातीचे दोन वर्ष चांगले गेले. पण एकदा एका मिटिंगच्या निमित्ताने एका ऑफिसमध्ये गेला आणि तिथेच इंटरव्ह्यू द्यायला आलेल्या मुलीकडे पाहून तो आश्चर्यचकित झाला. कारण ती श्वेता होती. तिच्याकडे पाहून असे अजिबात वाटत नव्हते की तिचे लग्न झालेले आहे. कारण सौभाग्याचं एकही लेण तिच्या अंगावर दिसत नव्हतं.
सागर त्या दिवशी स्वतःहून तिच्याशी बोलला. तेव्हा त्याला कळले की तिचा घटस्फोट झालाय. सागरला तिच्यासाठी वाईट सुद्धा वाटत होते आणि एकीकडे ती आता सिंगल असल्याचा आनंद सुद्धा होत होता. त्या दिवशी दोघांमध्ये मोबाईल नंबरची देवाण घेवाण झाली आणि दोघांमध्ये फोनवर संभाषण सुरू झाले.
आधी फक्त मित्र म्हणून बोलणारे श्वेता आणि सागर मैत्रीपलिकडे जाऊ पाहत होते. आणि अशातच सागर ने तिला एकेकाळी तिच्यावर असणाऱ्या त्याच्या प्रेमाची कल्पना दिली आणि आपण लग्न करताना खूप घाई केली म्हणून स्वतःला दोष देऊ लागला. श्वेताला सुद्धा तिच्या आयुष्यात पुन्हा एक चांगला जोडीदार हवा होता. आणि सागर तर तिच्यावर पूर्णपणे लट्टू होता.
क्रमशः
गोष्ट एका लग्नाची – भाग ७ (अंतिम भाग)