त्यामुळे त्या दिवशी सगळेजण घरी निघून गेले. कोर्टाने पुन्हा दोन महिन्या नंतरची तारीख दिली होती. कोर्टात हजर राहायच्या आदल्या दिवशी सागरच्या दुचाकीला अपघात झाला होता. आणि त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला होता. म्हणून त्याचा नाईलाज झाला त्या दिवशी. आणि तो कोर्टात हजर नाही राहू शकला. घटस्फोट पुन्हा लांबणीवर गेल्यामुळे तो मनातल्या मनात बराच चरफडला.
पण आता तो काही करू शकत नव्हता. आधीच बराच मार लागलेला होता. त्यामुळे नोकरीवर तर आता त्याला पुढील दोन महिने जाता येणार नव्हते. त्याने सावीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचे आई वडील त्याच्यावर नाराज होते. त्यामुळे त्याने त्यांनाही सुश्रुषेसाठी बोलावले नव्हते.
त्याला वाटले होते श्वेता असताना आपल्याला इतर कुणाचीही गरज नसेल. श्वेता सुद्धा जमेल तसे त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत होती. कधी त्याला डबा आणून द्यायची तर कधी स्वतः येऊन काहीतरी बनवून द्यायची. पण त्याची सेवा करून ती सुद्धा लवकरच कंटाळली. पण तसे न दाखवता तिने त्याला सांगितले की घरच्यांना तिचे असे लग्नाच्या आधी त्याच्या घरी जात येणे जाणे बरे वाटत नाही.
आणि हेच कारण सांगून श्वेताने त्याची सेवा टाळली होती. शेवटी मग त्याचाच एक बॅचलर मित्र त्याच्या घरी काही दिवसांसाठी म्हणून राहायला आला होता. त्यामुळे थोडफार मॅनेज होत होतं. त्याला राहून राहून सावी च्या हातचा जेवणाची आठवण यायची. मग लगेच आपलं खरं प्रेम श्वेताच आहे सावीची आठवण काढणे सुद्धा आपल्यासाठी गुन्हा आहे हे तो स्वतःच्या मनाला समजावत असे.
असेच दिवस जात होते. सागरच्या पायाला प्लास्टर लागून आता एक महिना उलटला होता. श्वेता आता फक्त फोनवर बोलायची त्याच्याशी. नाही म्हणायला महिन्याभरात फक्त दोनदा त्याला भेटायला आली होती. सागरच्या ऑफिसमधील वरिष्ठ मंडळी सध्या त्याच्या परफॉर्मन्स वर खुश नव्हती. मागच्या अनेक महिन्यांपासून त्याच्या प्रगतीचा आलेख जिथल्या तिथेच होता.
त्यामुळे सागरवर वरिष्ठांकडून नोकरीचा राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जात होता. सागरला सुद्धा ह्या दबावाखाली राहावेसे वाटत नव्हते. त्याला माहिती होते की आपल्याला एखाद्या दुसऱ्या कंपनीत चांगला जॉब मिळेलच. मग अशात उगाच दबावाखाली राहून काम केल्यापेक्षा जॉब सोडलेलाच बरा. सगळं काही चांगलं झालं की मग नवीन जॉब सुद्धा शोधता येईल. म्हणून मग त्याने नोकरीचा राजीनामा दिला.
त्यानंतर तीन – चार दिवसांनी श्वेता त्याला भेटायला त्याच्या घरी आली. त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याला काय हवं काय नको ते विचारले. आणि त्याला म्हणाली.
” हे बघ सागर…तू लवकर बरा हो…मी तुला असे पाहू शकत नाही…आणि कामाचा ताण तर अजिबात घेऊ नकोस…बरा झाला की तुझे बॉस सुद्धा विनाकारण तुझ्यामागे भुणभुण लावणार नाहीत…”
तिचे बोलणे ऐकून सागर तिला म्हणाला.
” आता त्या गोष्टीची काळजीच मिटली बघ…”
” म्हणजे…?” श्वेताने आश्चर्याने विचारले.
” मी राजीनामा दिलाय नोकरीचा…सगळं काही स्थिरस्थावर झालं की मग पुन्हा नवीन नोकरीचा शोध घेईल…तसेही आपलं लग्न झाल्यावर आपल्याला फिरायला जायला सुट्ट्या नकोत का…?” सागर लाडात येऊन म्हणाला.
” काय बोलतोयस तू…तू परस्पर नोकरीचा राजीनामा सुद्धा दिलास…मला काहीही कल्पना न देता…” श्वेता जवळ जवळ किंचाळलीच
” अगं पण यात रागवण्यासारखे काय आहे…तू चिडत का आहेस…?” सागरने काहीही न कळल्याने तिला प्रश्न केला.
” डोक्यावर पडला आहेस का तू…आधीच तुला तुझ्या बायकोला पाच लाख रुपये कॅश द्यायचे आहेत…तुझी गाडी सुद्धा तुझ्याकडे राहणार नाहीय…दागिने तर काय तुझे स्वतःचे नव्हतेच… कशीतरी एक चांगली नोकरी होती ती पण गमावलीस…आणि वरून खुश होत म्हणतोस की लग्न झाल्यावर बाहेर फिरायला जाऊ…पण त्याच्यासाठी पैसा लागतो…सगळ्याच गोष्टींसाठी पैसा लागतो आजकाल…” श्वेता रागातच म्हणाली.
” अगं त्यात काय एवढं…एक नोकरीच तर होती ना…आणि माझं क्वॉलिफिकेशन एवढं चांगलं तरी नक्कीच आहे की कुणीही मला डोळे झाकून नोकरी देईल…आणि तू चिडू नकोस…आपण दोघं सोबत असलो की सगळं चांगलच होणार बघ…आपण आपल्या प्रेमाने अशक्य असलेल्या गोष्टी शक्य करू शकतो…” सागर तिला समजावत म्हणाला.
” पैशांसमोर प्रेमाची किंमत शून्य आहे…खिशात पैसा नसेल तर माणसाला कसलीच किंमत नाही…नुसतं प्रेमाच्या भरवशावर जगता आलं असतं तर मी कशाला घटस्फोट घेतला असता माझ्या आधीच्या नवर्यापासून…” श्वेता रागातच म्हणाली.
” पण तू तर म्हणाली होतीस की तुझा नवरा तुला मारहाण करायचा…तुझ्या चारित्र्यावर संशय घ्यायचा…आणि त्यानेच तुला त्याच्या घरातून बाहेर काढले आहे म्हणून…” सागर आश्चर्याने म्हणाला.
” खोटं बोलले होते मी… खरंतर मला आधी लग्न करण्याची इच्छाच नव्हती…पण आई बाबांनी मला इमोशनल ब्लॅकमेल करून माझं लग्न त्याच्याशी लावून दिलं…त्यांना मुलगा खूपच आवडला होता म्हणून… काय तर म्हणे सरळमार्गी आहे…साधा – भोळा आहे…तुला सुखात ठेवेल…
पण महिन्याला तीस हजाराच्या आसपास पगार घेणारा तो बायकोच्या इच्छा कशा पुऱ्या करणार…त्यातच घरात म्हातारे आईवडील सुद्धा होते…लग्न झाल्यावर माझ्या खूप इच्छा होत्या…नवरा दूरवर फिरायला घेऊन जाईल…नवनवीन फॅशनचे कपडे…हॉटेलमध्ये जेवायला जाणे…आवडेल ते आणि आवडेल तसे शॉपिंग करणे…
पण ह्यातील एकही इच्छा पूर्ण होत नव्हती…शिवाय त्याच्या आई बाबांचं करावं लागायचं ते वेगळंच…मग मी सुद्धा कंटाळली ह्या सगळ्याला…मी रोज त्याच्याशी वाद घालायला लागले आणि भांडून आई बाबांच्या घरी आले…आणि आईबाबांना सांगितलं की तो मला मारहाण करतो…माझ्या चारित्र्यावर संशय घेतो…
आई बाबांनी मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण की काहीच ऐकून घेतलं नाही…त्यांना सांगितलं की मला आता त्याच्या घरी पुन्हा जायचं नाही…शेवटी माझ्या हट्टापुढे हार मानून त्यांनी माघार घेतली आणि मला त्याच्यापासून घटस्फोट मिळाला…” श्वेता आज रागाच्या भरात सगळंच काही बोलून देत होती.
तिचे बोलणे ऐकून सागरला एकामागून एक धक्के बसत होते. शेवटी त्याने तिला विचारले.
” मग तू मला खोटे का सांगितलेस…तू खरं सुद्धा सांगू शकली असती ना…”
” तुला काय वाटतं…मी तुला सांगितलं असतं की माझा नवरा चांगला होता…माझ्यावर प्रेम करायचा तरीही मी त्याला घटस्फोट दिला कारण की त्याच्याजवळ जास्त पैसा नव्हता म्हणून…मी असे सांगितले असते तर तू माझ्याबद्दल काय विचार केला असतास…” श्वेता म्हणाली.
” अगं पण तुझं प्रेम होतं ना माझ्यावर…मग खरं सांगायची हिम्मत केली असतीस तरी मी तुला काहीही म्हणालो नसतो ह्यावर विश्वास ठेवून पाहायचा असता ना एकदा…” सागर म्हणाला.
” कमाल आहे बघ तुझी…मी आता एवढं सगळं सांगितलं तरीही तुला असेच वाटतेय की माझं शाळेपासून तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तुझं लग्न झालेलं असताना ही मी तुझ्या सोबत होते…” श्वेता म्हणाली.
” म्हणजे…?” सागर ने आश्चर्याने विचारले.
” म्हणजे मला जशी लाईफस्टाईल हवी होती तशी तू मला देऊ शकणार होतास…तुझा हा चांगला फ्लॅट…कार…नेहमी फिरायला, शॉपिंगला जाणे…महागड्या हॉटेल मध्ये जेवायला जाणे…शिवाय तुझं माझ्यावर खूप प्रेम होतं ह्याची सुद्धा कबुली तू दुसऱ्या भेटीतच दिली…मग मला वाटले की कुणाशी तरी दुसरं लग्न करायचेच आहे तर तुझ्याशीच का करू नये…
पण मला काय माहिती होते की ह्या सगळ्यांमध्ये तुझ्या बायकोच्या माहेरच्यांची मेहेरबानी आहे…मला वाटले होते की तुझ्याशी लग्न केल्यानंतर तिच्याजवळ असलेले सगळे दागिने माझे होतील…पण नंतर मला कळले की ते सगळेच तिच्या माहेरच्यांनी तिला दिले होते…सोबत तुझी जमापुंजी सुद्धा तिला द्यावी लागणार आहे…गाडी सुद्धा गेलीच म्हणून समज…
उरलं काय होतं तर हा फ्लॅट आणि तुझी नोकरी…नोकरीचा तर तू राजीनामा दिलासच आणि हा फ्लॅट तुझ्यासोबत च तुझ्या बाबांच्या सुद्धा नावाने आहे हे सुद्धा मला नंतरच कळले…मग एवढं सगळं पाहून मी पुन्हा पहिल्यासारखीच चूक नाही ना करू शकत…आता तू तो सागर नाहीस राहिला हो माझ्या सगळ्याच इच्छा एका पायावर पूर्ण करेल…” श्वेता म्हणाली.
” तू माझी फसवणूक केली आहेस श्वेता…मी किती मनापासून प्रेम केलं तुझ्यावर…आणि तू मात्र फक्त स्वतःची सोय बघत राहिलीस…मला तू नको आहेस माझ्या आयुष्यात…जा तू इथून…” सागर रागात म्हणाला.
सागरने श्वेताला जायला सांगितल्यावर तो तशीच त्याच्या आयुष्यातून निघून जाणार का…? सागर आणि सावीच्या लांबणीवर पडलेल्या घटस्फोटाचे पुढे काय होईल…? सावीच्या आयुष्यात पुन्हा कधी प्रेम येणारच नाही का…? ह्याची उत्तरे मिळतील पुढील भागात…
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार
फोटो – साभार गूगल
गोष्ट एका लग्नाची – भाग ७ (अंतिम भाग)
Interesting story
Exiciting for the next part