राधा पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. घरच्यांनी तिच्या लग्नाचं मनावर घेतलं होतं. सख्ख्या चुलत मिळून राधाच्या एकूण तीन बहिणी आणि दोन भाऊ होते. दोन बहिणींची लग्न आधीच उरकलेली. तिसरा नंबर राधाचा होता.
इतक्यात लग्न उरकायची तिची इच्छा नव्हती पण तिच्या काकांची मुलगी जीचा लग्नासाठी चौथा नंबर लागणार होता काकांनी तिच्यासाठी मुलगा बघून ठेवला होता. आणि राधाचं लग्न उरकल्याशिवाय तिचं लग्न कसं होणार हे त्यामागील प्रयोजन.
राधा एकत्र कुटुंबात राहायची. तिचे आई, बाबा, दोन काका, काकू आणि त्यांची मुले. दोन बहिणींची लग्न आधीच झालेली. त्यांच्या घरी पाहुणे पाहायला आले की अस वाटायचं जणू एखादा सण साजरा होतोय. त्यादिवशी घरी विशेष स्वयंपाक बनत असे. शक्यतोवर पाहुण्यांना जेवूनच पाठवत.
राधाच यंदा कर्तव्य आहे हे जवळच्या नातेवाईकांना कळवले. आपापल्या परीने सर्वांनी शोधमोहीम सुरू केली. तिच्या बाबांनी बऱ्याच स्थळांमधून चार पाच स्थळे निवडली आणि मुलगा पाहायचे ठरवले. एके दिवशी नांदकी ( वर आणि वधुपक्षामधील मध्यस्थ ) घरी आले. त्यांनी एक दिवस निश्चित केला आणि त्या दिवशी मुलाकडील मंडळी राधाला पाहायला येणार हे निश्चित झाले. मुलगा सरकारी नोकरी करत होता. घरीसुद्धा एकुलता एक होता.
पाहुणे पाहायला आल्यावर कोणकोणते प्रश्न विचारतील ? त्यांना कसे उत्तर द्यायचे ? नमस्कार कसा करावा ? डोक्यावर पदर कसा घ्यावा ? या सर्वांचे नियमित अभ्यासवर्ग सुरू झाले. प्रश्नोत्तराचा इतका सराव झाला होता की कोणी राधाला झोपेतून उठवून सर्व प्रश्न विचारले असते तरी तिने खडाखडा उत्तरे दिली असती.
पाहुणे पाहायला येण्याचा दिवस उजाडला. पाहुणे दुपारी एक वाजता येणार होते. घरात लगबग सुरू झाली. महीलामंडळी स्वयंपाक घरात मोर्चा सांभाळत होत्या. आणि पुरुष मंडळी अधून मधून सूचना करत होते.
राधाच्या आईने तिच्यासाठी एक सुंदर पिवळ्या रंगाची साडी घेतलेली होती. आमच्याकडे पहिल्यांदा पाहुणे पाहायला आले की आवर्जून पिवळ्या रंगाची साडी नेसतात.( कारण पिवळ्या रंगामुळे मुलीचं सौंदर्य खुलून दिसते असे म्हणतात.) तिच्या आईने तिला छान साडी नेसून दिली. वेळेच्या आधीच सर्व तयारी पूर्ण झाली होती.
स्वयंपाक घरातून छान सुगंध येत होता. कधी नव्हे ती आज नाश्त्याची पहिली प्लेट तिला आणून दिली. तिला खूप स्पेशल वाटलं. पण ती खूप नर्व्हस होते. घरी याआधी सुद्धा पाहायला पाहुणे आले होते. आणि हा सर्व थाटमाट तिने आधीसुद्ध्या पाहिला होता पण आज या कार्यक्रमाची प्रमुख पाहूणी ती स्वतः होती.
इतक्यात तिचा भाऊ गडबडीने घरात आला. आणि त्याने इशाऱ्यानेच पाहुणे आल्याचे सांगितले. मुख्य दारातून आत आले की बैठकीत जाईपर्यंत घरातील महीला मंडळींना नवऱ्या मुलाचे दर्शन होई. मग त्या तिथेच ठरवायच्या की मुलगा पसंत आहे किंवा नाही. पण अंतिम निर्णय हा घरातील मोठी माणसे घेत असत.
आज राधाने सुद्धा खिडकीतून मुलाला बघितले होते. मुलगा तसा तिला बरा वाटला. पाहुण्यांचे चहापाणी झाले. नंतर रीतसर कांदेपोहे सुद्धा झाले. आणि नंतर राधाला बैठकीत बोलावण्यात आले. राधासोबत तिची काकुसुद्धा बैठकी पर्यंत गेली पण राधाला आत पाठवून स्वतः मात्र दाराजवळ उभी राहिली.
राधाला अजूनही धडधडत होतं. ती पाहुण्यांसमोर एका खुर्चीवर बसली. डोक्यावर पदर घेऊन खाली मान टाकून राधा बसली होती. सुरुवातीला कोणी काही बोललं नाही. मग त्या मध्यस्थांनी मध्यस्थी केली आणि पहिला प्रश्न विचारला.
सुरुवातीला तिचे नाव विचारले, नंतर शिक्षण आणि छंद कोणते ते विचारले. त्यांच्यासोबत एक म्हातारे गृहस्थ आले होते. त्यांनी तिला एक दोन प्रश्न विचारले. पण ते काय बोलत आहेत हे राधाला स्पष्टपणे ऐकू येत नव्हते. त्यामुळे राधा चा थोडा गोंधळ उडाला होता. ( नंतर कळले की मुलीची श्रवण क्षमता किती आहे हे तपासण्यासाठी मुद्दाम कमी आवाजात प्रश्न विचारल्या जातात.)
बरीच प्रश्नोत्तरे झाल्यावर राधाला बैठकीतून परत पाठविण्यात आले. राधा ने सुटकेचा निःश्वास सोडला. निदान आजच्या पुरती तिची परीक्षा संपली होती. पुढचं पुढे पाहू म्हणत ती आता निश्चिंत झाली होती.
त्यानंतर मोठ्या मंडळींची आपापसात चर्चा झाली. नंतर पाहुण्यांचे जेवण झाले. आणि मुलगी पसंत आहे की नाही ते नंतर कळवतो असे सांगून ते पाहुणे निघून गेले.
दोन दिवसांनी पाहुण्यांचा फोन आला. आणि मुलगी पसंत असल्याचे सांगितले. पुढच्या चार पाच दिवसांनी परत बैठक होणार होती. आता बैठक मुलाच्या घरी होणार होती. मुलीकडून बैठकीला कोण कोण जाणार हे आधीच ठरवून घेतले.
बैठकीचा दिवस उजाडला. सर्वमंडळी घरून चहा नाश्ता घेऊन अकरा वाजताच्या सुमारास घरून निघाली. गाव तसं काही फार दूर नव्हतं. साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं. पण उशिरा गेल्याने त्यांच्यावर वाईट इम्प्रेशन पडू नये म्हणून सर्वजण वेळीच निघाले.
त्यांना घरी परत येता येता संध्याकाळी चार वाजले होते. घरी आल्यावर राधाच्या वडिलांचा आणि तिच्या काकांचा चेहरा पडलेला दिसत होता. नंतर कळलं की मुलांनी पाच लाख रुपये हुंडा मागितला होता. म्हणे मुलगा सरकारी नोकरीवर आहे. आणि तिथेच बैठक विस्कटली. राधाच्या बाबांनी मुलाकडच्यांना सरळ नकार दिला होता.
हुंडा तर ते देऊ शकत होते. राधा त्यांची एकुलती एक मुलगी सुद्धा होती. पण त्यांना हुंडा देणाऱ्यांचा आणि घेणाऱ्यांना फार तिटकारा होता. मध्यस्थांनी त्यांना समजावले देखील. की सरकारी नोकरीवर असलेल्या मुलासाठी पाच लाख ही रक्कम काही जास्त नाही म्हणून. पण त्यांना मुलाकडच्या लोकांचा व्यवहार अजिबात आवडलेला नव्हता.
त्यांनी सगळ्यात आधी हाच प्रश्न केला की तुमची किती द्यायची तयारी आहे. आम्हाला तर पाच लाख पूर्ण हवेत. ते ही लग्नाच्या आधी. आणि मानपान वेगळा. ह्या लोकांना मुलीपेक्षा देण्याघेण्यात जास्त रस आहे ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी त्या स्थळाला सरळ नकार दिला.
राधाला तर खूप छान वाटले. निदान काही काळासाठी का होईना लग्न टळले होते. काही दिवस आणखी कॉलेजला जाता येईल ह्या विचाराने तिला आनंद झाला होता. दोन महिन्यांत तिची पदवीची परीक्षा होती. निदान परीक्षा तरी देता आली असती. घरच्यांचे मात्र स्थळे पाहणे सुरूच होते.
एके दिवशी संध्याकाळी मधस्थ त्यांच्या घरी आले. त्यांना पाहून राधाला कळले की एखाद्या नवीन स्थळाबद्दल सांगायला आलेले असावेत म्हणून. त्यांना पाहून तिने बाबांना आवाज दिला आणि बाबांनी इशाऱ्यानेच तिला चहा ठेवायला सांगितल्यावर ती निघून गेली.
ते मध्यस्थ राधाच्या बाबांना म्हणाले.
” असंच संबंधांच्या गोष्टी सुरू असताना कळलं की शिरजगावच्या विनायक रावांचा मुलगा धीरज सुद्धा लग्नाचा आहे…यंदा त्याच्यासाठी सुद्धा मुली बघणं सुरू केलंय त्यांनी…”
” तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते मला कळलं नाही…?” राधाचे वडील म्हणाले.
” म्हणणं तर सरळ अन् सोप्पं आहे…आपल्या राधाची अन् त्यांच्या मुलाची जोडी छान दिसेल…शिवाय मुलगा चांगला शिकलेला आहे…शहरात चांगली नोकरी आहे मुलाला…आणि तो सुद्धा एका नात्याने आपल्या राधाचा आतेभाऊच लागतो…मग ही सोयरिक झाली तर चांगलचं आहे की…” ते म्हणाले.
” ते सगळं ठीक आहे…पण नात्यात मुलगी द्यायची जरा भीतीच वाटते… जुनं अन् नवं नातं ह्यांची सांगड नीट घालता येईल की नाही ह्याची…शिवाय पुढे काही झालं तर बोलताही यायचं नाही…शिवाय आक्का जरा रुसलेली आहे आजकाल आमच्यावर…” राधाचे वडील म्हणाले.
” बहीण भावाच रुसण म्हणजे काही रुसण असते का…आणि आक्काच्या घरी थोडीच सून करून पाठवणार आहोत आपण राधाला… आक्काच्या पुतण्यासोबत होईल लग्न…म्हणजे जर सगळं काही आलबेल झालं तरच…तसेही मुलगा गावी राहणारच नाही ना… तो तर बायकोला घेऊन शहरातच राहणार आहे…” ते म्हणाले.
यावर राधाचे वडील विचार करत बसले. तेव्हा ते मध्यस्थ त्यांना म्हणाले.
” मला तर वाटतं ही सोयरिक झाली तर चांगलच होईल…इतका चांगला मुलगा शोधूनही सापडणार नाही…अनोळखी लोकांच्या घरी मुलगी दिल्यापेक्षा तर बरंच आहे ना हे…जास्त विचार करत बसाल तर हे स्थळ सुद्धा हातून निघून जाईल…मला वाटतं की इतर गोष्टींचा विचार करण्याआधी राधाच्या भविष्याचा विचार केलेला कधीही चांगला…”
आक्का म्हणजे सुलू आत्या म्हणजेच सुलोचनाताई देशमुख. राधाच्या वडिलांची एकुलती एक मोठी बहीण. सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी सुलु आत्यांना खूप मान होता. घरातील लहान सहान निर्णयांमध्ये आत्याचा सहभाग असायचाच. सूलू आत्याचा सुद्धा त्यांच्या भावांवर आणि त्यांच्या मुलांवर खूप जीव होता. पण सुलू आत्या जरा तापट स्वभावाची होती.
मागच्या वर्षी जेव्हा राधाच्या मोठ्या बहिणीसाठी कावेरी साठी स्थळ पाहायला सुरुवात केली होती. तेव्हा सुलू आत्याने कावेरीला आपल्या मोठ्या मुलासाठी म्हणजे माधवसाठी मागणी घातली होती. पण राधाच्या वडिलांनी त्यांना नकार दिला. नजर मिळेल अशी अपेक्षा त्यांना अजिबात नव्हती. आणि तेव्हापासून त्या त्यांच्या भावावर रुसून बसल्या त्या आतापर्यंत सुद्धा नीट बोलत नव्हत्या.
कावेरीच्या लग्नात देखील त्यांनी कशातच सहभाग नोंदवला नाही. एकदम लग्नाच्या दिवशी आल्या आणि नवरीची पाठवणी होताच निघून सुद्धा गेल्या. मग त्यांनी जिद्दीने माधवचे लग्न लवकरात लवकर ठरवले. माधवच्या लग्नात सुद्धा त्या त्यांच्या भावाशी फार काही बोलल्या नाही.
राधाच्या वडिलांना त्यांच्या लाडक्या बहिणीचा रुसवा काढायचा होता. पण ते काही त्यांना अजूनही जमले नव्हते. या लग्नाच्या निमित्ताने दोन घरातील संबंध सुद्धा पूर्ववत होईल आणि धीरज सारखा चांगला मुलगा देखील राधाला मिळेल म्हणून त्यांनी या स्थळाला होकार द्यायचे ठरवले.
मध्यस्थांना तसे कळवले देखील. वेगाने हालचाली व्हायला लागल्या आणि धीरजच्या घरची मंडळी राधाला पाहायला येण्याचा दिवस ठरला.
राधाच्या घरच्यांनी त्या दिवशी खूपच जय्यत तयारी केली. धिरजच्या घरच्यांनी राधाला आणि राधाच्या घरच्यांनी धीरजला आधी पाहिले होतेच, त्यामुळे अर्थातच घरच्या ज्येष्ठांचा लग्नाला होकार होताच. आता बाकी होती फक्त औपचारिकता. आणि समोरून होकारच येईल हे जवळपास निश्चित झाल्याने तयारी जोरदार सुरू होती.
राधाने सुद्धा धीरजला पाहिले होते. त्याच्यात नाव ठेवण्यासारखे काहीच नव्हते. तरीही राधाच्या मनाची तयारी मात्र अजूनही होत नव्हती. तिला सारखी धडधड होत होती.
क्रमशः
धीरजला राधा पसंत पडेल का…? या दोन्ही घरात सोयरिक साधली जाईल का…? सुलू आत्याचे याबाबत काय मत असेल…त्यांचा रुसवा जाईल का…? हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरु नका.
©®आरती निलेश खरबडकार.