” तू राधाला तिच्या माहेरी सोडून ये…हे लग्न झालंय हे आपण विसरून जाऊ…आपल्याला त्यांच्याशी काहीच संबंध नाही ठेवायचा…” सुलोचना ताई म्हणाल्या.
हे ऐकून राघवला धक्काच बसला. केशवराव आणि माधव सुद्धा त्यांचे बोलणे ऐकून अगदीच स्तब्ध झाले. एका कोपऱ्यात उभी राहून सुलोचना ताईंचे बोलणे ऐकत असलेली राधा सुद्धा हे ऐकून पार हादरून गेली. आपल्या नशिबात आणखी काय वाढून ठेवलंय ह्याचा तिला अंदाजच येत नव्हता.
” काय बोलतेयस तू हे…तुला कळतंय तरी का…?” केशवराव मध्येच येऊन म्हणाले.
” अगं आई ती आपली राधा आहे…तिच्यासोबत आपण असे नाही ना वागू शकत…” माधव म्हणाला.
” मला राघव कडून उत्तर हवंय…तोच म्हणाला ना की तो माझ्यासाठी काहीही करू शकतो म्हणून…” सुलोचना ताई म्हणाल्या.
” नाही…असे नाही होऊ शकत आई…मी असे नाही करू शकत…कधीच नाही…मी असे वागलो तर धीरज आणि माझ्यात काय फरक राहील…” राघव म्हणाला.
” आणि आपल्या आईचं काय…तिच्या मनाचा विचार नाही का करवत तुला…?” सुलोचना ताई कडाडल्या.
” हे बघा माधव ची आई…मला वाटतं झालं तेवढं पुरेसं आहे…आता पुरे झाला तुमचा रुसवा…तुम्ही सगळं काही विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करावी असे मला वाटते…” केशवराव समजावणीच्या सुरात म्हणाले.
” नाही…मला हे मान्य होणे शक्यच नाही…तुम्हाला माझं ऐकावंच लागेल…हे काय चाललंय ते थांबवा आणि तिला नेऊन सोडा घरी…” सुलोचना ताई हट्टाने म्हणाली.
” असे काहीच होणार नाही…” केशवराव म्हणाले.
” मग की सुद्धा जाहीर करते की या घरात एकतर राधा राहील किंवा मी…तुम्हाला मी या घरात हवी असेल तर तुम्हाला तिला घरातून काढावेच लागेल…” सुलोचना ताई म्हणाल्या.
” ठीक आहे आई…तुझी हीच इच्छा असेल तर असेच होईल…” राघव म्हणाला.
आई खुश झाली. त्यांना वाटले की राघव राधाला सोडायला तयार झालाय. केशवराव आणि माधव मात्र आश्चर्याने राघव कडे पाहत राहिले. राघव नंतर आईकडे जाऊन म्हणाला.
” ही पूजा झाली की मी राधाला घेऊन कुठेतरी निघून जाईल…पण तू या घरातून बाहेर जाण्याचा विचार करू नकोस…”
” म्हणजे…तुला म्हणायचे काय आहे…तू आईला सोडू शकतोस पण बायकोला नाही…” सुलोचनाताई म्हणाल्या.
” तसं नाही आई…पण राधा माझी बायको आहे…मी तिला असे सोडून नाही देऊ शकत…तिची जबाबदारी आहे माझ्यावर…मी जिथे राहील ती सुद्धा तिथेच राहील…मग जर तू इथे तिच्यासोबत नाही राहू शकत तर ठीक आहे…हे घर सगळ्यात आधी तुझं आहे…तू निवांत राहा आई…आम्ही जाऊ कुठेतरी…” राघव म्हणाला.
राघवचे बोलणे ऐकुन सुलोचनाताई मटकन सोफ्यावर बसल्या. एकाच दिवसात राघव असा आईला सोडून बायकोच्या बाजूने जाईल ह्याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. केशवराव सुलोचना ताईंना म्हणाले.
” हे बघा माधवची आई…मला वाटतं तुम्ही वेळेवर सावरलेले बरे… नाहीतर सगळच हातून निसटून जाईल तुमच्या या हेकेखोरपणामुळे… मला वाटतं तुम्ही सगळं काही विसरून पूजेत सामील व्हावं आणि नवदाम्पत्याला आशीर्वाद द्यावा…”
आता मात्र सुलोचनाताई काहीच बोलल्या नाहीत. त्या चुपचाप तिथे बसून विचार करू लागल्या. त्यांच्या दृष्टीने एकाच रात्रीत त्यांचा नवरा आणि मुलगा त्यांच्यापासून दूर झाले होते. ते ही फक्त राधामुळे. त्यांच्या डोक्यात दुसरे विचारच येत नव्हते. राधावर असलेल्या रागामुळे त्यांना त्यांच्या मुलाचा आणि नवऱ्याचा चांगुलपणा सुद्धा दिसत नव्हता. त्या तेव्हा कसातरी स्वतःचा राग गिळून पुजेजवळ बसून राहिल्या.
पूजेसाठी केशवरावांनी राधाच्या माहेरी निमंत्रण दिले होते. शिवाय राधाला मांडव परतनीसाठी सुद्धा घेऊन जायचे होते. राधाच्या अशा लग्नामुळे तिच्या सासरी काय परिस्थिती आहे हे सुद्धा जाणून घ्यायचे होते. म्हणून मग राधाचे काका आणि तिचे भाऊ तिथे आले होते. त्यांच्या समोर सुलोचना ताई काहीच बोलल्या नाहीत. पण त्यांच्याशी सुद्धा एकही शब्द बोलल्या नाहीत. राधा चे काका आणि भाऊ सुद्धा मग काहीच बोलले नाहीत. त्यांना त्यावेळी शांत राहणं जास्त योग्य वाटलं
राधा आणि राघव पूजा करत होते. राधाच्या मनात मात्र पूर्णवेळ विचारच सुरू होते. आपल्यामुळे राघवच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स सुरू आहेत ही अपराधीपणाची भावना तिला सतत टोचत होती. पूजा झाली आणि राधा आणि राघव दोघेही सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायचा म्हणून सगळ्यांच्या पाया पडू लागले.
जेव्हा ते सुलोचना ताईंच्या पाया पडू लागले तेव्हा सुलोचना ताईंनी आपले पाय मागे खेचले आणि तणतणतच तिथून निघून गेल्या. पूजा संपन्न झाल्यावर राधा लगेच तिच्या माहेरी जायला निघणार होती. त्यासाठी बॅग घ्यायची म्हणून ती तिच्या रूम मध्ये गेली. राघव सुद्धा तिथे गेला. त्याला पाहून राधा म्हणाली.
” मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे…”
बऱ्याच वेळानंतर राधाने राघवशी स्वतःहून बोलायची तयारी दाखवली होती. म्हणून राघवला कुतूहल वाटले. तो राधाला म्हणाला.
” बोल…”
” हे सगळं काही जे सुरू आहे ते सगळं चांगलं होऊ शकतं…” राधा म्हणाली.
” ते कसं काय…?” राघव ने विचारले.
” तू मला सोडून दे…मी आज माहेरी गेली की तू मला घ्यायलाच येऊ नकोस…माझ्यामुळे हे सगळं होतंय…मी माहेरी सांगून देईल की मलाच इथे नाही यायचं म्हणून…” राधा म्हणाली.
राधाचं बोलणं ऐकून राघवला राग अनावर झाला. त्याने जोरात तिथे असलेल्या टेबलवर हात आपटले. आणि तिला म्हणाला.
” खेळ वाटतोय का तुला हा…लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ आहे का…की मी घेतलेली जबाबदारी पूर्ण न करणारा दुबळा माणूस वाटतो तुला…परिस्थितीला तोंड न देता हार मानणाऱ्यातला नाही मी…मी लग्न केलंय…कोणता गुन्हा नाही…लग्न निभवायची पूर्ण तयारी होती म्हणूनच लग्न केलं मी…यानंतर माझ्यासमोर अशा गोष्टी करू नकोस…”
राघवला रागात पाहून राधा चांगलीच घाबरली. तो असे काही रिॲक्ट होईल असे तर तिला स्वप्नातही वाटले नसेल. राघव काहीही न बोलता रागातच रूमच्या बाहेर निघून गेला. राधा ने सुद्धा आपली बॅग घेतली आणि ती सुद्धा बाहेर निघून आली. केशवराव तिच्या काकांशी बोलतच होते.
सगळ्यांचा निरोप घेऊन राधा मांडव परतनी साठी घरी जायला निघाली. राधा गाडीत बसेपर्यंत राघव तिच्या सोबतच होता. पण तो तिच्याशी बोलायचे तर दूर तिच्याकडे पाहत सुद्धा नव्हता. त्याच्याशी नेमके काय बोलावे आणि कसे बोलावे हे राधाला कळत नव्हते. कधी नव्हे ते तिला आज त्याच्याशी बोलायची भीती वाटत होती. ते जायला निघाले तरी राघव ने तिच्याकडे पाहिले सुद्धा नाही.
राधाला वाटले की राघवला मॅसेज करून त्याची माफी मागावी. पण तेव्हाच तिच्या लक्षात आले की कालच्या गोंधळामुळे ती तिचा फोन घरीच विसरली होती. माहेरी पोहचल्यावर सगळ्यात आधी फोन घेऊन राघवला मॅसेज करायचा असे तिने ठरवले.
ती घरी पोहचली तेव्हा सगळे जण जणू तिचीच वाट पाहत होते. ती दारातून आता येताच तिच्या आईने धावतच जाऊन तिला मिठी मारली. सगळ्या बायका सुद्धा तिच्या आजूबाजूला येऊन बसल्या. तिच्या आईच्या डोळ्यात तर आनंदाश्रू तरळले होते. सगळ्या बायका सुद्धा कौतुकाने तिला पाहत होत्या. ते पाहून ती तिच्या आईला म्हणाली.
” काय झालंय आई…तुझ्या डोळ्यात अश्रू का आहेत…?”
” आनंदाचे अश्रू आहेत ग पोरी हे…आपल्या पोरीच्या आयुष्याचं भलं झालेलं पाहून आनंद नाही का होणार…?” आई तिला म्हणाली.
” हो तर…राघव सारखा चांगला मुलगा आपल्याला शोधूनही सापडला नसता…” तिची दूरची मावशी म्हणाली.
” अजिबात आडमुठेपणा न करता लगेच लग्नाला तयार झाला तो…आणि केशवराव सुद्धा देवासारखे धावून आले आपल्या मदतीला…” तिचे बाबा समोर येत म्हणाले.
सगळेच जण आनंदात होते. काल ज्यांच्या चेहऱ्यावर दुःख आणि काळजी दिसत होती आज त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होतं. सुरुवातीला तिने विचार केला होता की सुलूआत्या जे काही बोलली ते सगळंच घरी सांगून टाकावं. पण सगळ्यांना आनंदात पाहून तिने काहीच सांगितले नाही.
राधाचे घरी खूप कोडकौतुक झाले. दोन दिवस घरी फक्त तिच्याच आवडीचे पदार्थ केले होते.राधाची आई तिला काय हवं नको ते विचारत होती. दोन दिवस अगदी पंख लागल्यासारखे उडून गेले. राधाचा सासरी जायचा दिवस उगवला आणि तिचे आई आणि बाबा भावूक झाले. राघव दुपारीच तिला घ्यायला आला होता.
सगळ्यांची जेवणे, नवीन जावयाची सरबराई ह्यात वेळ कसा निघून गेला ते कळलच नाही. राधा जेव्हा जायला निघाली तेव्हा महत्प्रयासाने रोखलेल्या अश्रूंना तिची आई थांबवू शकली नाही. दोघीही मायलेकी एकमेकींना बिलगून मनसोक्त रडल्या. पण राघवकडे पाहून राधाच्या आईला राधाची फारशी काळजी वाटली नाही. त्यानंतर सगळ्यांनी राधाला निरोप दिला.
राधा आणि राघव घरी जायला निघाले. घरी जाताना राघव गाडी चालवत होता आणि राधा त्याच्या बाजूच्याच सीट वर बसलेली होती. राधा अधून मधून राघव कडे पाहायची पण राघव मात्र अजूनही रागातच होता. तो तिच्याकडे अजिबात पाहत नव्हता. शेवटी न राहवून राधा त्याला म्हणाली.
” तुम्ही रागावला आहात ना माझ्यावर…?”
” तुला काय वाटतं…तू त्या दिवशी जे बोलली त्यानंतर मला तुझा राग यायला नको होता का…?”
आता मात्र राधा गप्प बसली. मग थोड्या वेळाने म्हणाली.
” मला माफ करा…माझी चूक झाली…” राधा खाली मान घालून म्हणाली. राघव काहीच बोलत नाहीये ये पाहून राधा पुन्हा त्याला म्हणाली.
” पण तुम्हाला नाइलाजाने माझ्याशी लग्न करावं लागलं…म्हणून मी तशी बोलले तुम्हाला…”
” तुला काही कळतं की नाही…” राघव म्हणाला.
” म्हणजे…?” राधा ने विचारले.
” अगं म्हणजे मी काय लहान मुलगा आहे का… मी जे काही केलं ते जाणीवपूर्वक केलंय…लग्नासाठी मला कुणी बळजबरी नव्हती केली तरीही मी स्वतःहून लग्नाला तयार झालो…ह्याचा अर्थ कळतोय का तुला…?” राघव म्हणाला.
” हो.. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही आमच्या वाईट काळात आमची मदत केली आणि माझ्या घरच्यांना बदनामी पासून वाचवलं…” राधा निरागसतेने म्हणाली.
आता मात्र राघवने कपाळावर हात मारून घेतला आणि गप्प बसला. राघव काहीच का बोलत नाहीये हे पाहून राधा पुन्हा त्याला म्हणाली.
” तुम्ही काही बोलत का नाही आहात…?”
” मी बोललेले कळते का तुला…आणि मघापासून हे सारखं तुम्ही तुम्ही काय लावलय…”
” ते…आपलं लग्न झालंय ना आता…म्हणून…” राधा म्हणाली.
” हे बरं कळतंय तुला…” राघव म्हणाला.
राधाला राघवच बोलणं काही कळत नव्हतं. मग ती गप्पच बसली. थोड्याच वेळात ते घरी पोहचले. सुलोचना ताई आणि मीनाक्षी जणू तिचीच वाट पाहत बसल्या होत्या. राधा तिथेच थांबली आणि राघव राधाचं सामान ठेवायचं म्हणून रूम मध्ये निघून गेला.
राधा हॉल मध्ये एकटीच उभी होती. तिला लग्न सुलोचना ताई म्हणाल्या.
” या सूनबाई…प्रवासात कसला त्रास नाही ना झाला…?”
आपल्या सासूला इतकं गोड बोलताना पाहून राधाला त्यांच्या मूडचा काही अंदाज येत नव्हता.
क्रमशः
सुलोचनाताई राधाशी एवढं गोड का बोलत आहेत…? राघवला राधाला नेमकं काय समजावून सांगायचं आहे…? ह्या दोघांच्या आयुष्यात धीरज आणखी काही वादळ घेऊन येणार नाही ना…? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरु नका.
©®आरती निलेश खरबडकार.