” अरे पण तू त्यांना अशी विनंती का म्हणून केली होतीस…?” सुलोचना ताईंनी त्याला विचारले.
” कारण की माझं प्रेम होतं मीनाक्षी वर…आणि तिचं ही माझ्यावर प्रेम होतं…मला मीनाक्षी शिवाय कोणाशीच लग्न करायचं नव्हतं…पण तू मात्र त्यावेळी कावेरीशिवाय दुसऱ्या मुलीचा माझ्यासाठी विचार ही करायला तयार नव्हतीस…ती मीनाक्षीला स्वीकारणार नाहीस हे मला कळलं होतं..
मग मीच मामाला जाऊन विनंती केली की माझ्या स्थळाला नकार द्या म्हणून…मग मामाही तयार झाले…मामांनी माझ्या स्थळाला नकार दिलास म्हणून तू सुद्धा इरेला पेटली आणि त्यानंतर आलेल्या सगळ्यात पहिल्या स्थळाला होकार द्यायचे ठरवले स…मग मी हे सगळे बाबांना समजावून सांगितले…बाबांनी सुद्धा मला साथ दिली आणि सर्वात आधी मीनाक्षीचे स्थळ सुचवले…”
माधवने हे सांगितल्यावर सुलोचना ताईंनी केशवरावांकडे पाहिले. त्यांनी होकारार्थी मान हलवली आणि सुलोचना ताई एकदम कोलमडूनच गेल्या. मीनाक्षी तर मटकन खाली बसली आणि डोक्यावर हात दिला. माधव पुढे आईला पाहून म्हणाला.
” मग तू सुद्धा काहीच विरोध न करता आमच्या लग्नाला तयार झालीस आणि मीनाक्षीला सुद्धा प्रेमाने स्वीकारलेस…पण मला वाटलं की वेळेसोबत तुझी मामावर असणारी नाराजी कमी होईल पण ती काही झालीच नाही…उलट तुझा राग वाढतच गेला…इतका की राधा जेव्हा सून बनून घरी आली तेव्हा तू तिचा राग राग केलास…पण तरीही ती डगमगली नाही…तिने पूर्ण प्रयत्न केला चांगली सून बनायचा…पण तुम्ही कशा वागलात तिच्याशी…”
मग मीनाक्षीकडे वळून म्हणाला.
” आणि मीनाक्षी तू ग…तुझ्यासाठीच मी हे सगळं काही केलं…मामा आणि आई मध्ये दुरावा निर्माण केला मी तुझ्याशी लग्न करण्यासाठी आणि तू हे असं वागलीस…आज मला खूप पश्चात्ताप होतोय की मी तुझ्यासारख्या मुलीवर प्रेम केलं…तुझ्यावर प्रेम करणं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती…”
माधव रागारागाने म्हणाला. त्यावर मीनाक्षी गयावया करत म्हणाली.
” मला माफ करा…मला खरंच हे माहीत नव्हते…माझ्याकडून खूप मोठी चूक झाली…”
” चूक…चूक नाहीये ही…हा गुन्हा आहे…एका सभ्य आणि चारित्र्यवान मुलीला तू चारित्र्यहिन ठरवलेस…तुला माहिती आहे ह्याचा तिच्या मनावर, तिच्या आयुष्यावर आणि तिच्या आई वडिलांवर काय परिणाम झाला असेल…? मी तुमचं बोलणं ऐकलं होतं म्हणून हे सत्य सगळ्यांसमोर आलं नाहीतर सगळ्यांनी तिलाच दोषी मानले असते…
आपल्या नवऱ्याच्या नजरेत पडून जगणं मरणापेक्षाही कठीण असतं बायकोसाठी…काय वागलीस ग तू तिच्याशी…एखादा शत्रू सुध्दा असं वागणार नाही…अगं कधी विचार केलास का की तिच्या जागी तू असतीस तर काय झाले असते…” माधव म्हणाला.
आणि त्यासरशी मीनाक्षी खजील झाली. खजील तर सुलोचनाताई सुद्धा खूप जास्त होती. त्यानंतर केशव राव सुलोचना ताईंना म्हणाले.
” काय करून बसल्या तुम्ही माधवची आई…स्वतःच्या सख्ख्या भावाशी कुणी असं वागत…आणि जिला अंगा खांद्यावर खेळवले त्या भाचीशी असं वागलात…मी तर कल्पना ही नाही करू शकत की खोट्या अहंकारापायी एखादी बहीण आपल्या भावाशी असे वागू शकते.
राघवने जेव्हा राधाशी लग्न केले तेव्हा तर तुम्हाला त्याचा गर्व वाटायला हवा होता…सर्वथा योग्य निर्णय घेतला होता त्याने…पण तुम्ही तर त्यालाच चुकीचे ठरवले…अन् राधाचा राग राग केला…तिला दिवसरात्र घरकामात जुंपले…तरीही मी काहीच म्हणालो नाही…मला वाटलं की आज ना उद्या तुम्ही तिला स्वीकारालच…
पण तिला स्वीकारायचं तर दूर…तुम्ही तर तिला चारित्र्यहीन ठरवून हाताला धरून तिला बाहेर काढलत… अहो असं करायला तुमचं मन तरी कसं धजावलं…मी डोळ्यांनी पाहिलं असतं तरीही यावर विश्वास ठेवू शकलो नसतो…तुमची तर सख्खी भाची ना ती…मग तुम्ही कसं काय दुसऱ्यांच्या बोलण्यात येऊन तिच्यावर आरोप केलात…”
त्यानंतर मात्र सुलोचना ताई पूर्णपणे खचल्या. त्यांनी किती मोठी चूक केलीय हे त्यांना कळून चुकले होते. ज्या भावाने त्यांच्या मुलाचे म्हणणे ऐकून स्थळाला नकार देऊन त्यांचा राग सुद्धा ओढवून घेतला त्या भावाला त्या नको नको ते बोलल्या होत्या. त्याचे संस्कार सुद्धा काढले होते त्यांनी.
त्यांच्या दोन्ही मुलींना नको नको ते बोलल्या होत्या. आणि सर्वात वाईट तर त्या राधाशी वागल्या होत्या. नव्हे. राधापेक्षाही वाईट त्या कुणाशी तरी वागल्या होत्या. ते म्हणजे राघवशी. राघवच प्रेम होतं त्याच्या बायकोवर. आणि सुलोचना ताईंनी तिला दिलेली प्रत्येक जखम त्याच्या काळजावर कोरली गेलेली होती. सुलोचना ताई राघवकडे आल्या आणि त्यांना म्हणाल्या.
” राघव… बाळा…मला माफ कर…माझं चुकलं…”
राघव अगदी सुन्न झाला होता. काय बोलावं, कसं बोलावं, काय प्रतिक्रिया द्यावी हे त्याला कळतच नव्हते. पण आई त्याच्या समोर आल्यावर तो आईला म्हणाला.
” का केलंस ग आई असं…का वागलीस माझ्या राधाशी अशी…मला वाटलं होतं माझ्या मागे तू तिचा आधार बनाशिल…पण तू तर तिचा आधारच काढून घेतलास..तिला हाताला धरून बाहेर हाकललेस तू…माझ्याच्याने तर कल्पनाही नाही करवत आई…पण तू ते केलस…अगं या जगात माझं सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावर होतं आई…तुझा खूप आदर करायचो मी…तू का केलंस असं…” नंतर खाली बसत म्हणाला.
“आता मी राधाला कोणत्या तोंडाने आणायला जाऊ…? मामाची माफी कशी मागू…? मला काहीच कळत नाहीये…”
” तू काळजी नको करुस…मी आणते राधाला परत…मी माफी मागेल माझ्या भावाची…गरज पडली तर हातापाया पडेल पण राधाला परत आणेन…” सुलोचनाताई म्हणाल्या.
त्यावर राघव काहीच बोलला नाही. नेमकं काय करावं ते त्याला अजिबात कळत नव्हते. तरीही जर आईने मामांची माफी मागितली तर सगळं काही चांगलं होईल ह्या विचाराने त्याने आईला तिचे प्रयत्न करू द्यायचे असे ठरवले. सुलोचना ताईंनी अजिबात वेळ न दवडता माधवला गाडी काढायला सांगितली.
माधव आईवर जरा रागावलेला होताच पण आई जर प्रयत्न करतेय तर करू देऊ म्हणून तो काहीच बोलला नाही. त्याने काहीही न बोलता गाडी काढली. सुलोचना ताईंसोबतच मीनाक्षीसुद्धा गाडीत बसली.
इकडे राधाच्या घरी राधाच्या काकूंची खुसफुस सुरूच होती. शेवटी तिची मोठी काकू राधाला म्हणाली.
” काय गं राधा…आता काय नवे दिवे लावलेस तू…?”
” तुम्ही काय बोलत आहात काकू…?” राधा कावरी बावरी होत म्हणाली.
” बरोबरच बोलतेय…काही दिवे लावल्याशिवाय का त्यांनी घराबाहेर काढलंय तुला…काढायचं च असतं तर इतके दिवस ठेवलं नसतं तुला तिथे…नक्कीच तू काहीतरी केलंस म्हणून हाताला धरून काढून दिलंय तुला…ते ही सामानाशिवाय…”
राधाचे आई आणि बाबा दोघेही तिघे आले. काकुंचे बोलणे दोघांनीही ऐकले होतेच. राधाची आई काकूला म्हणाली.
” जाऊबाई…आधीच माझी राधा काळजीत आहे…तिला आधार देण्या ऐवजी तुम्ही तिलाच दोष देताय…?”
” नाहीतर काय करायला हवं…आणि मला सांगा सगळ्या चुकीच्या गोष्टी नेहमी हीच्याच बरोबर का घडतात…हीची काहीतरी चूक असेल म्हणूनच ना…सुलोचना ताईंनी हिला घराबाहेर काही उगाच काढलं असेल का…लग्नात काय कमी तमाशा झाला का हिच्या…आणि लग्नाला महिना उलटला नाही अजुन तर हीच तेच सुरू आहे…अशाने लोक काय म्हणतील…हीच्यामुले बाकीच्या बहिणींना सुद्धा त्यांच्या सासरी बोल ऐकून घ्यावे लागतील… ते काही चालणार नाही…”
” चालणार नाही म्हणजे काय…?” राधाच्या बाबांनी विचारले.
” म्हणजे लवकरात लवकर सुलू ताईंनी माफी मागा आणि हिला हिच्या सासरी नेऊन घाला…इथे राहील तर उगाच नाचक्की होईल नवऱ्याने टाकलंय म्हणून…” काकू हातवारे करत म्हणाली.
” काय बोलताय तुम्ही वहिनी…जिथे तिला मान नाही तिथे ती जाणार नाही…आणि ती इथे नाही राहील तर कुठे राहणार…?” राधा चे वडील म्हणाले.
” तिला पाठवून द्या तिच्या सासरी…आपल्या घरी आजपर्यंत कुणी लेक माघारी आली नाही…” काकू म्हणाली.
” नसेल आली…ही तर चांगलीच गोष्ट आहे ना…त्यांच्या सासरी त्यांना काही त्रास झालं नाही म्हणून त्या माघारी आल्या नाही…पण हे दोन्ही वेगळे विषय आहेत… माझी राधा इथेच राहील…स्वतःच घर असताना ती का नाही राहणार इथे…?” राधाच्या बाबांनी प्रश्न विचारला.
” का म्हणजे…आमचा विरोध आहे ह्याला…आमच्या मुलांवर वाईट परिणाम होईल ह्याचा…आहे की नाही हो…” राधा च्या काकूंनी राधा च्या काकांकडे पाहत म्हटले.
तेव्हा राधा चे काका सुद्धा समोर आले आणि म्हणाले.
” तुझी वहिनी बरोबर बोलतेय…राधाला तिच्या घरी पाठवण्यात आपले हित आहे…”
” आपले हित…जिथे ती सुखी नाही तिथे तुला पाठवून आपण सुखी राहू शकतो का…राधाच्या लग्नाच्या वेळी सुद्धा तुम्ही असेच केले होते…आणि तुमचा जर विरोध असेल तर आपण एकत्र राहायलाच नको…जिथे कठीण काळात साथ न देता फक्त टोमणे आणि विरोधच केला जातो तिथे मलाही एकत्र राहायचे नाही… ” राधाचे बाबा म्हणाले.
आणि सगळ्यांनाच धक्का बसला. सगळ्यात जास्त धक्का तर राधाला बसला. आपल्यामुळे आपल्या बाबांना आज वेगळं निघाव लागतंय ह्याचे तिला खूप वाईट वाटत होते. राधाची आई सुद्धा राधाच्या वडिलांना म्हणाली.
” अहो असं काय करताय…?”
” मी बरोबरच करतोय शालिनी…हेच बरोबर आहे…ह्यांच्या वागण्यातून तुला कधीतरी असे वाटले का की ह्यांनी आपल्या मुलांना सुद्धा स्वतःच्या मुलांप्रमाणे समजतात म्हणून…कधीच नाही…उलट नेहमीच वाईट वेळ आली की दुरून मजा पाहतात आणि आता तर स्वतःच्याच मुलीला तिच्या घरात राहायला विरोध करतायत…मी घेतलेला निर्णय च आपल्यासाठी उत्तम आहे…” अस म्हणून ते तिथून निघून जाणार इतक्यात बाहेर सुलोचना ताई, मीनाक्षी आणि माधव पोहचले.
राधाच्या घरी पोहचल्यावर सुलोचना ताईंनी सर्वात आधी राधाला आवाज दिला. तसे राधाच्या घरचे सगळे जण बाहेर आले. पाठोपाठ राधा सुद्धा आली.
राधाला पाहून सुलोचनाताई म्हणाल्या.
” राधा…पोरी मला माफ कर…अन् घरी चल…”
नेमकं काय होतंय ते राधाला कळलंच नाही. ती भांबावून त्यांच्याकडे पाहत राहिली. तेव्हा माधव राधाला म्हणाला.
” आम्हा सगळ्यांना सत्य काय ते समजलंय…मीनाक्षीने सिद्ध तिचा गुन्हा कबूल केलाय…आणि माधवने सुद्धा मला सगळं सांगितलय…”
आता मात्र राधाच्या डोळ्यात एकदमच अश्रू दाटून आले. आणि पाठोपाठ एक हुंदका सुद्धा आला. राधाच्या वडिलांनी हे ऐकले आणि त्यांचा राग अनावर झाला.
” म्हणजे…आधी अर्धवट सत्य ऐकून माझ्या मुलीला चारित्र्यहिन ठरवून घरातून बाहेर काढलत…आणि आता सत्य समजल्यावर तिला घ्यायला सुद्धा आलात…माझ्या मुलीचं आयुष्य काय खेळ वाटलाय का तुम्हा लोकांना…”
” तसं नाही रे…माझी चूक झाली होती…चूक नव्हे तर गुन्हा घडका माझ्या हातून… या मीनाक्षी च्या बोलण्यात येऊन अशी वागले मी…तुझ्या मोठ्या बहिणीला माफ कर…” सुलोचनाताई म्हणाल्या.
” मी तुझा भाऊ आणि ही राधा तुझी भाची आहे हे आता आठवतंय का तुला आक्का…काय अन् किती अपमान केलास ते विसरली का…?” राधाचे बाबा म्हणाले.
” आता मागचं सगळं विसरून जाऊया…मुलांचा विचार करून पुढे जाण्यातच शहाणपण आहे…” सुलोचना ताई म्हणाल्या.
” मुलांचा विचार करूनच मी निर्णय घेतलाय आक्का…” राधाचे वडील म्हणाले.
” कोणता निर्णय…?” सुलोचनाताईंनी साशंकतेने विचारले.
” राधाला राघव पासून घ”टस्फो”ट घ्यावा लागेल…” राधाचे बाबा म्हणाले.
” काय…?” सुलोचना ताई म्हणाल्या.
राधाला तर एकदमच धक्का बसला.
क्रमशः
खूप छान
धन्यवाद 😊🙏
खुप छान
पुढील भागाची आतुरता
धन्यवाद 😊🙏