राघवला असं आत्मविश्वासाने घरातून निघताना धीरजने पाहिले होते. दोनच दिवसांपूर्वी घरात इतका तमाशा झालेला असताना आणि स्वतःच्या बायकोला घरातून चक्क हाकलून दिलं असताना हा इतका निश्चिंत होऊन नेमका कुठे चाललंय ते धीरजला कळत नव्हते.
त्या दिवशी झालेल्या प्रसंगापासून धीरजचे सगळे लक्ष राघव च्या घराकडेच लागून होते. राधा आणि राघवचा संसार मोडावा अशी धीरजची मनापासून इच्छा होती. त्या शिवाय त्याच्या मनाला शांती मिळणार नव्हती. पण राघव नेमकं काय करणार आहे हे त्याला कळतच नव्हतं.
काल राघवच्या घरचे सगळेच राधाच्या घरी गेले होते आणि राधाच्या बाबांनी राधाला पाठवले नाही ह्याची माहिती कालच त्याने काढली होती. त्याला वाटले की राघव आता खूप जास्त टेंशनमध्ये असेल. आणि अशातच एकांतात जाऊन आपण त्याला चांगलेच डिवचू असा विचार केलेल्या धीरजला राघवचे वागणे काही समजत नव्हते.
धीरज विचार करत असतानाच शनाया तिथे आली आणि म्हणाली.
” तू काय करतोयस इथे…?”
” काही नाही…राघवचा विचार करतोय…” धीरज म्हणाला.
” त्याचा कसला विचार…?” शनायाने विचारले.
” आज एकदमच आत्मविश्वासाने कुठेतरी गेलाय तो…सोबत बॅग सुद्धा होती…बायको माहेरी असल्याचं जराही दुःख त्याचे चेहऱ्यावर दिसत नव्हतं…त्याच्या मनात नेमकं काय सुरू हेच कळत नाहीये…त्याला राधाला परत आणायचं आहे की नाही ते कसे कळेल…” धीरज म्हणाला.
” तो तिला परत आणो किंवा न आणो…तुला काय घेणं देणं आहे त्याच्याशी…मला तर वाटतय की त्या राघवपेक्षा तुलाच घाई आहे तिच्या परत येण्याची…” शनाया म्हणाली.
” हे तू काय बोलत आहेस शनाया…मी असा का म्हणून विचार करेन…?” धीरज म्हणाला.
” कारण मी त्या दिवशी तुम्हा दोघांचं सगळंच बोलणं ऐकलं होतं…” शनायाने सांगितले.
हे ऐकून धीरजला धक्काच बसला. तरीही तो तिला म्हणाला.
” मग तरीही तू तिच्यावर असा आरोप का केलास की तिनेच मला तिथे बोलावले होते म्हणून…?”
” असाच…मला तिचा खूप राग येतो म्हणून…” शनाया म्हणाली.
” काय…?” धीरज जवळ जवळ ओरडलाच.
” हो…आणि आता तू सुद्धा तिचा विचार करणं सोडून दे…आठ दिवसांची सुट्टी घेतली होती ऑफिसमधून…आता फक्त चारच दिवस उरलेत…जरा इतर कामांमध्ये ही लक्ष घाल…”शनायाने त्याला सुनावले.
” हो…एक काम तर आठवतय मला…” धीरज म्हणाला.
” ते कोणतं…?” शनायाने विचारले.
” अगं तुझ्या बाबांच्या प्रॉपर्टीसंबंधी चे सगळे काम पूर्ण करावे लागेल…तसेही आपण मृत्युपत्रात असणारी लग्नाची अट तर पूर्ण केलीच आहे…या कागदपत्रांच्या कामाला खूपच वेळ लागतो…आताच प्रक्रियेला सुरुवात केलेली बरी…” धीरजने आठवण करून दिली.
हे ऐकून शनाया जरा चपापली. अन् मग विषय टाळत म्हणाली.
” मी बघते कधी सुरू करायचं ते…” शनाया म्हणाली.
शनाया आणि धीरजचे बोलणे धीरजची आई ऐकत होती. धीरजच्या आईला या दोघांचे हे वागणे अजिबात पटले नव्हते पण त्यांना काही बोलायला मार्गही नव्हता. शनायाला काही बोलले की ती लगेच उलटून बोलायची. धीरजला तर काही बोलायची सोयच नव्हती. शनायापुढे त्याचे काहीच चालायचे नाही.
शनायाचा घरकामाला तर आल्या दिवसापासून हात लागला नव्हता. फक्त सकाळपासून हुकूम सोडायची. सकाळीच अंघोळ न करता किचन मध्ये यायची अन् म्हणायची ” चहा झालाय का..?” धीरजची आई मग तिला चहा करून द्यायची. नाश्ता आणि जेवणाच ही तसच. धीरज आपल्या या निर्णयावर पस्तावेल हे तर त्यांना ठावूकच होते. पण ती वेळ अजूनतरी आली नव्हती.
इकडे आपला हिरो म्हणजेच राघव त्याच्या सासुरवाडीला पोहचला. आपली बाईक छान झाडाच्या गर्द छायेखाली उभी केली आणि बॅग पाठीशी लटकवून त्याच्या मामाच्या दारासमोर येऊन उभा राहिला. बहुतांश गावातील दरवाजे जसे दिवसा उघडेच असतात तसाच राधाच्या घराचा दरवाजा ही उघडाच होता. तरीही त्याने दारावर ठकठक केली.
आतून राधाची आई बाहेर आली. राघवला पाहून एकदमच आश्चर्य चकित झाली. त्याला म्हणाली.
” राघव…म्हणजे जावईबापू तुम्ही…?”
” तुमच्या तोंडून राघवच खूप छान वाटतं मामी…” राघव हसत म्हणाला.
राधाची आई काही बोलणार इतक्यात राधाचे बाबा बाहेर आले आणि राधाच्या आईला म्हणाले.
” काय ग…? कोण आलंय बाहेर…?”
राघव ला पाहून ते ही आश्चर्य चकित झाले. काल सुलू ताईला तोंडावर स्पष्ट नकार दिल्यावरही आज राघव पुन्हा इथे आलेला पाहून खरं तर त्यांना नवलच वाटले होते. कारण आपण राधाला परत पाठवायला नकार दिल्यावर साहजिकच सुलू ताईंचा स्वाभिमान दुखावेल आणि ती राधाला परत नेण्याचा विचार सोडून देईल असे त्यांना वाटले होते. पण आज राघवची त्यांच्या घरी असलेली उपस्थिती आणि त्याच्या बोलण्यात झळकणारा आत्मविश्वास पाहून त्यांना नवल वाटले होते.
” तू…? तू काय करतोयस इथे…?” त्यांनी राघवला विचारले.
” काय म्हणजे काय मामा…माझ्या मामांच घर आहे हे…आणि आता तर सासुरवाडी सुद्धा आहे…” राघव छान स्माईल देत म्हणाला.
” मामाच घर…सासुरवाडी…काय बोलतोयस तू मला कळत नाहीये…” मामांनी गोंधळून विचारले.
” म्हणजे माझ्या इथे येण्याचं कारण म्हणजे माझी एकुलती एक बायको राधा आहे मामा…” राघव पुन्हा म्हणाला.
राधाच नाव काढल्यावर राधाच्या बाबांना सगळे काही स्पष्ट आठवले. राधाचा झालेला अपमानसुद्धा. इतक्यात राधा सुद्धा तिथे आली. राघवला पाहून चेहऱ्यावर आलेलं हास्य ती प्रयत्न करूनही लपवू शकली नव्हती. आता राधाच्या घरची इतर मंडळी सुद्धा तिथे जमा झाली होती.
” पण मी काल स्पष्ट सांगितलेलं आक्काला की मी राधाला परत पाठवणार नाही म्हणून…” राधाचे वडील आता रागाने म्हणाले.
” अन् मी सुद्धा घरी स्पष्ट सांगून आलोय की राधाला घेतल्याशिवाय मी परत घरात पाय सुद्धा टाकणार नाही म्हणून…” राघव म्हणाला.
” ह्याचा अर्थ काय…?” मामांनी विचारले.
” हाच की मी राधाला सोबत घेऊनच घरी जाईल…नाहीतर नाही जाणार…” राघव निर्धाराने म्हणाला.
” मग कुठे राहणार आहेस…?” मामांनी आश्चर्याने विचारले.
” कुठे म्हणजे काय…? इथेच राहील…” राघव म्हणाला.
” इथे…? नाही…हे शक्य नाही…आपले संबंध आता पूर्वी प्रमाणे राहिलेले नाहीत…तू इथे नाही राहू शकत…” मामा म्हणाले.
राघवच्या प्रत्येक वाक्यासोबत राधाच्या जीवात जीव येत होता. राघव आपल्याला चुकीचं समजत नाही हे तर तिला माहिती झाले होते. बाबा अन् राघव एकमेकांशी भांडणार तर नाही ना ह्या विचाराने ती घाबरली होती पण त्याचे असे तिच्यासाठी तिच्या बाबांसमोर उभे राहणे तिला कुठेतरी सुखावून सुद्धा गेले होते. राधाचे काका अन् काकू सुद्धा सगळं काही पाहतच होते. ते राधाच्या बाबांना म्हणाले.
” काय भाऊजी…घरी आलेल्या जावयाला तुम्ही घरात सुद्धा घेणार नाही का…?”
” ह्यांच्याशी ते नातं ठेवायचं नाही जा निर्णय झालाय माझा…” मामा म्हणाले.
” पण जुन्या नात्याचे काय…? हे घर त्याच्या मामांचं सुध्दा आहेच की…त्या नात्याने तो या घरात राहू शकतोच…” राधा चे काका म्हणाले.
” ह्या घरात तुम्ही राघव ला राहू देत असाल तर मी माझ्या मुलीला घेऊन कुठेतरी दुसरी कडे जातो राहायला…” मामा तावातावाने म्हणाला.
” तू असं का बोलतोयस दादा…तुझा राग आहे ते समजू शकतो पण म्हणून आक्काच्या लेकाला घरात नाही घ्यायचं का…? तो आपल्या एकुलत्या एक बहिणीचा मुलगा सुद्धा आहे…” काका म्हणाले.
” बस…बस…माझ्यामुळे तुम्ही भांडू नका प्लिज…”
” म्हणजे…तुला पटलंय ना की तू घरात आल्याने भांडणे वाढणार म्हणून…” राधा चे बाबा म्हणाले.
” हो…अंदाज आलाय मला…”
” मग आता घरी जा…” राधाचे बाबा म्हणाले.
बाबांचे बोलणे ऐकून राधा हिरमुसली. राघव निघून जाईल म्हणजे काय. इतक्यात राघव म्हणाला.
” मी राधाला घेतल्याशिवाय घरी जाणार नाही…”
” पुन्हा तेच…तू इथे राहणार नाहीस…घरी जाणार नाही…मग जाणार तरी कुठे आहेस…?” राधाच्या वडिलांनी विचारले.
” मी तुमच्या घरात राहू शकत नाही…पण शेतातल्या झोपडीत तर राहू शकतो ना…” राघव म्हणाला.
” तिथे…अरे पण तिथे कसा राहणार तू…रात्रीच्या वेळेला तिथे जनावर फिरतात…ती फक्त दिवसा सावली साठी म्हणून बांधलीय…” काका म्हणाले.
” मी राहीन काका…माझं प्रेम मला पुन्हा मिळावं म्हणून मी ते ही करेन…माझ्या राधासाठी मी जीव द्यायला ही तयार आहे…मग ही तर खूप छोटी गोष्ट आहे…” राघव म्हणाला.
” संध्याकाळ झाली की आपसूकच पळून जाशील तिथून…आणि प्रेमाचं भूत सुद्धा उतरून जाईल डोक्यावरून…” राधाचे बाबा म्हणाले.
आणि आता जायला निघाले. आता येताना राधाला सोबत आतमध्ये ये असे सांगायला ते विसरले नाहीत.
राधा अन् तिचे बाबा आतमध्ये गेल्यावर राधाचे काका राघवला म्हणाले.
” राघव…अरे ते खरेच खूप धोकादायक आहे रे बाळा…कशाला उगीच जोखीम पत्करायची…त्यापेक्षा तू घरी जा…दादा आता रागात आहे…त्याचा राग शांत झाला की तो त्याचा निर्णय बदलेल…” लहान काका म्हणाले.
” नाही मामा… मी ठरवलंय…आता माघार घ्यायची नाही…आणि रागात असताना त्यांनी काही चुकीचा निर्णय घेऊ नये ह्यासाठीच माझे इथे राहून त्यांचा राग घालवणे जास्त गरजेचे आहे…” राघव म्हणाला.
त्यावर मामा काहीच बोलू शकले नाही. राधाच्या काकूंना सुद्धा राघवचा निर्णय मूर्खपणाचा वाटत होता. आणि त्याहून जास्त मूर्खपणाचा निर्णय राधाच्या बाबांचा वाटत होता. इतका चांगला जावई असूनही ते आडमुठेपणा ने वागत होते असेच त्यांना वाटत होते. काल राधाच्या घरचे सगळे जण न्यायला आले तेव्हाही नकार दिला आणि आज जेव्हा तिचा नवरा स्वतः आलाय तेव्हा सुद्धा नकार देत आहेत म्हणजे काय. पण राधाचे बाबा सध्या खूप रागात असल्याने त्यांना कुणी काही म्हणुही शकणार नव्हते.
शेवटी राधा चे काका त्याच्या सोबत शेतातील झोपडी पर्यंत गेले. झोपडी अगदी हाकेच्या अंतरावर होती. आणि घरापासून स्पष्ट दिसत सुद्धा होती. झोपडीच्या भिंती, छत आणि दरवाजा सुद्धा तुरीचे पीक आल्यावर त्याच्या ज्या काड्या असतात त्यांच्यापासून बनवलेली होती. कामापुरती ठीक होती पण एवढीही सुरक्षित नव्हती. चांगली गोष्ट ही होती की घरापासून खूप जवळ होती. म्हणजे तिथून दिलेला आवाज लगेच घरापर्यंत पोहचणार होता.
क्रमशः
अनेक वाचकांनी भाग मोठा लिहायला सुचवले होते. म्हणून आज एकाच दिवशी दोन भाग टाकलेत. कथेच्या पुढील भागाची लिं’क खाली दिलेली आहे.
राघवच्या तिथे राहिल्याने खरंच राधाच्या बाबांचा निर्णय बदलेल का…? धीरजला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप कधी होईल…? राघवचे झोपडीत राहणे धोकादायक तर नाही ना ठरणार…? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरु नका.
जिवलगा – भाग १७