” होय तर लहानपणी पासून…” राघव म्हणाला.
” तसे कसे काय..?” राधाने विचारले.
” तुला आठवतेय का…आजी आणि माझी आई नेहमीच म्हणायचे की राधा तुझी नवरी आहे…मग मी सुद्धा तसेच मानायचो…मग जरा मोठा झाल्यावर कळलं की ते थट्टा करायचे…” राघव म्हणाला.
” मग…?” राधाने उत्सुकतेने विचारले.
” मग काय…सगळे जरी मस्करी करत असले तरी मला मात्र तू खरेच खूप आवडायची…पण तू मात्र कधीच मला भाव दिला नाही…मग मला वाटलं की तुला मी नसेल आवडत…म्हणून मग मी तो विषय मनातून काढून टाकला…” राघव म्हणाला.
आता मात्र राधाला हसू आवरेना. आणि तिला असे हसताना पाहून राघव आणखीनच गोंधळला. तो तिला म्हणाला.
” तू अशी का हसते आहेस ग…?”
” तुला सांगितलं तर तू सुद्धा हसशील…?” राधा म्हणाली.
” सांग ना…” राघव म्हणाला.
” मलासुद्धा असच वाटायचं की तू खरेच माझा नवरा आहेस…” राधा म्हणाली.
” काय…?” राघवने आश्चर्याने विचारले.
” हो…खरंच…” राधा म्हणाली.
” मग तेव्हाच का नाही सांगितले…” राघव म्हणाला.
” काहीही हं राघव…लहान होतो तेव्हा आपण…” राधा म्हणाली.
” पण तेच बघ ना किती छान होतं. ” राघव म्हणाला.
” ते कसं ?” राधाने विचारले.
” तेव्हा आपल्या मनात नव्हतं तरीही आपल्या घरचे मात्र खूपच सकारात्मक होते आणि आता जेव्हा आपलं एकमेकांवर प्रेम आहे…आपल्याला सोबत राहायचे आहे तेव्हा ह्यांचा इगो आडवा येतोय…” राघव म्हणाला.
” ते ही आहे म्हणा…पण तुमच्या मनात नक्की काय आहे…म्हणजे तुम्ही असे इथे का राहायला आलात…?” राधाने विचारले.
” मी काहीही हालचाल नसती केली तर तुझ्या बाबांनी आपल्याला दूर करण्याची पूर्ण तयारी केली होतीच…” राघव म्हणाला.
” पण ह्याने काय होणार आहे…?” राधाने विचारले
” ह्याने तुझ्या बाबांना कळेल की राघव त्याच्या राधा साठी काहीही करू शकतो…काहीही सहन करू शकतो आणि कितीही वाट पाहू शकतो…” राघव म्हणाला.
” आणि मग काय होईल…?” राधाने विचारले.
” मग त्यांना माझ्या तुझ्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव होईल आणि ते तुला माझ्यासोबत पाठवायला तयार होतील…” राघव म्हणाला.
” पण तरीही बाबांचा राग नाही गेला तर…” राधा ने विचारले.
” असे नको म्हणुस ग बाई…”राघव म्हणाला.
” तसे काही नाही…मी गंमत करतेय…बाबांचा राग फार दिवस नाही राहणार…त्या दिवशीच्या प्रसंगानंतर बाबांचा राग अनावर झाला होता…पण मी सांगेल ना बाबांना…तुमची बाजू पटवून देईल…त्यांना लवकरच कळेल की त्यांची राधा तिच्या राघव शिवाय नाही राहू शकत…” राधा म्हणाली.
” त्याच दिवसाची वाट पाहत आहे…” राघव म्हणाला.
” मी पण…” म्हणताना राधा चक्क लाजली.
मग कितीतरी वेळ दोघांच्या गप्पा तशाच सुरू होत्या. रात्र सरत होती. पण दोघांना वेळेचे भान उरले नव्हते. शेवटी नवीन नवीन प्रेमात पडले होते दोघे. अचानक दोघांना पलीकडल्या शेतात कसलीशी हालचाल जाणवली. अन् दोघेही भानावर आले. राघव ने राधाला लगेच झोपडीच्या आत नेले आणि तो झोपडीच्या दाराशी उभा राहून हालचाल कशाची आहे त्याचा कानोसा घेऊ लागला.
तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की दिवस उजाडायला लागलाय आणि पलीकडल्या शेतात आलेला माणूस बहुधा शेतीला पाणी द्यायला आलाय. त्या माणसाला पाहून राघवला हायसे वाटले. त्याला आधी वागले होते की एखादे जनावर असेल पण माणूस पाहून त्याच्या जीवात जीव आला. तो राधाला म्हणाला.
” बहुतेक पिकाला पाणी द्यायला आलेत ते…”
” हो…सकाळी आठ वाजता लाईट जाते ना म्हणून पिकाला पाणी द्यायला सकाळीच आलेत ते…” राधा म्हणाली. ” मग काहीतरी आठवून म्हणाली.” माझ्या घरचे पण उठतीलच थोड्या वेळात…मला निघायला हवं…बाबांनी पाहिलं तर आणखी रागावतील…”
” ठीक आहे…जा तू…” राघव म्हणाला.
आणि राधा घरी जायला निघाली. सुदैवाने घरी अजुन कुणाला जाग आली नव्हती. राधा चुपचाप जाऊन अंथरुणात शिरली. पण झोप काही केल्या येत नव्हती. राधाला तर राघवच्या गोष्टी आठवून गुदगुल्या होत होत्या. इतके दिवस तणावात घालवल्यावर आज जणू ती एका वेगळ्याच विश्वात गेली होती.
तिचे पाय आज जमिनीवर टिकत नव्हती. प्रेम असतेच अशी गोष्ट. एकदा प्रेमात पडलं की माणूस वेगळ्याच विश्वात पोहचतो. आणि पहिल्या प्रेमाची तर गोष्टच न्यारी. राधाला सुद्धा हा अनुभव होत होता. राधाने ठरवले होते की वेळ पाहून बाबांशी बोलेन म्हणून. बाबांना सांगेन की राघव वर माझं खूप प्रेम आहे आणि मला त्याच्याच सोबत राहायचं म्हणून.
ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतच तिचा डोळा कधी लागला ते राधाला कळलं देखील नाही. जाग आली तेव्हा सगळेच उठले होते. आज तिला उठायला उशीर झाला होता. ती उठली आणि आईजवळ जाऊन म्हणाली.
” काय ग आई.. आज उशीर झाला मला उठायला…तू मला लवकर का नाही उठवले…”
” अगं एखादे दिवशी उशिरा पर्यंत झोपली तर काही बिघडत नाही…आणि मला माहिती आहे ना कितीतरी दिवसांपासून तुला नीट झोप लागत नाहीये…म्हणून म्हटलं आज झोपू द्यावं…” आई म्हणाली.
मग राधा काहीच बोलली नाही. आईने तिला चहा दिला आणि झोपडीच्या बाजूला असलेल्या खिडकीतून बाहेर पाहत राधा चहा घेऊ लागली. इतक्यात दारावर कुणीतरी आल्याचा तिला आवाज आला. कुणाला माहिती पडू नये म्हणून राधाच्या बाबांनी लगेच त्यांना आत घेतले आणि त्यांना सोबत घेऊन स्वतःच्या खोलीत जाऊन बोलू लागले.
पण राधाला मात्र तो आवाज ओळखीचा वाटत होता. तिने कानोसा घेतला तर ते तेच मध्यस्त होते ज्यांनी धीरजची सोयरिक राधासाठी आणली होती. हे आता इथे काय करत असतील असा राधाला प्रश्न पडला. कारण तिच्या नंतर लग्नाची एक चुलत बहीण होती पण काकांनी तिचं लग्न आधीच ठरवलेलं होतं.
दोन चुलत भाऊ पण होते पण ते ही लहान होते. बाबांच्या मनात नेमकं काय चाललंय हे कळायला राधाला मार्ग नव्हता. मग ती तिथेच बाहेर उभी राहून त्यांच्या गोष्टी ऐकू लागली. ते मध्यस्थ तिच्या बाबांना म्हणत होते.
” मला वाटतंय तुम्ही घाई करताय…राधा घरी येऊन अजुन आठ दिवस सुद्धा नाही झालेत…अजुन डिव्होर्सची नोटीस सुद्धा गेली नाहीये तिच्या घरच्यांना…आणि तुम्ही आतापासूनच तिच्यासाठी स्थळं शोधायचं म्हणताय…”
” अहो हे सगळं तर होतच राहील…पण स्थळ शोधणं काय सोपं काम आहे का…ह्यावेळी मला राधासाठी योग्य स्थळ हवंय…आणि आज शोधायला गेली म्हणजे आजच सापडेल असे नाही…तुम्ही सुरुवात तर करा…तसेही मी आजच वकिलांना भेटून त्यांना नोटीस पाठवणार आहे…आता सुरुवात केली तर घटस्फोट होईपर्यंत एखादा सुयोग्य मुलगा शोधू आपण…” राधा चे वडील म्हणाले.
” पण तरीही मला वाटतंय की तुम्ही घाई करताय…?” ते मध्यस्थ म्हणाले.
” हे बघा…तुम्हाला जमत नसेल तर मी दुसऱ्या कुणाला सांगतो…तसेही राधाच्या भल्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करायची तयारी आहे माझी…” राधाचे बाबा म्हणाले.
बाबांचे बोलणे ऐकून राधाला एकदमच धक्का बसला. बाबा या निर्णयाप्रत जातील असा विचार तिने अजिबात केला नव्हता. आताच तिच्या अन् राघव च्या प्रेमाची सुरुवात झाली होती आणि बाबा तिच्या घटस्फोट आणि दुसऱ्या लग्नाबद्दल विचार करत होते.
” नाही…कधीच नाही…” ती स्वतःशीच म्हणाली.
राधा बाबांचे बोलणे ऐकुन सैरभैर झाली होती. आता मात्र बाबा आणि त्या मध्यस्थांचे बोलणे ऐकण्याची इच्छा नव्हती. त्यांचे बोलणे जणू तिच्या कानात शिसे ओतत होते. ते मध्यस्थ गेले आणि तिचे बाबा तिच्याजवळ येऊन म्हणाले.
” अरे राधा…उठलीस तू…”
राधा काहीच बोलली नाही. मग बाबा पुढे तिला म्हणाले.
” लवकर आटोप आणि तयार हो…आज आपण तालुक्याला जाणार आहोत…”
” मला नाही यायचं…” राधा म्हणाली.
” हे काय राधा…मी काय म्हणतोय ते निदान ऐक तरी…” बाबा समजावणीच्या सुरात म्हणाले.
” नाही बाबा…मी तुमचे बोलणे ऐकले आताच…मला माहिती आहे तुम्हाला माझा अन् राघवचा घ’टस्फो’ट हवाय…पण मला नकोय…मला रहायचंय राघव सोबत…” राधा म्हणाली.
” राधा अजुन तू लहान आहेस…लोकांना ओळखू शकत नाहीस…राघवच्या आताच्या वागणुकीवरून जरी तो तुला एखाद्या सिनेमातल्या हिरो सारखा वाटत असेल तरीही वस्तुस्थिती त्याहून वेगळी आहे…आज तो असा वागतोय म्हणजे उद्याही तसाच वागेल असे नाही…शेवटी तो सुलू आक्काचा मुलगा आहे…आक्का खूप हट्टी आहे…आज तुझ्याशी चांगली वागते म्हणजे उद्याही वागेल असे काहीच नाही…तुझ्याकडुन एखादी चूक झाली की तुला पुन्हा हाकलून द्यायला सुद्धा ती मागेपुढे पाहणार नाही…आक्काचा गुण त्याच्यातही असेलच…उद्या त्याचा स्वभावही बदलला तर…” बाबा म्हणाले.
आजही कथेचे दोन भाग प्रकाशित केले आहेत. कथेची लिं’क खाली दिलेली आहे
क्रमशः
राधा च्या बाबांची काळजी तुम्हाला रास्त वाटते का…? राधा तिच्या बाबांना काय समजावेल…? राघव ला हे कळल्यावर राघव काय करेन…? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरु नका.
जिवलगा – भाग १९
©®Aarti lodam kharbadkar