” आई…तू हे काय बोलते आहेस…?” राधा आईला म्हणाली.
” योग्य तेच बोलते आहे…” राधाची आई म्हणाली.
” पण मला हे पटत नाहीये मामी…” राघव म्हणाला.
” मलापण नाही पटत आहे आई…” राधा म्हणाली.
” मी सगळा विचार करूनच बोलतेय…राधाचे बाबा आता काहीच ऐकण्या पलीकडे गेले आहेत…एरव्ही खूप चांगले असणारे राधाचे बाबा या मान अपमानाच्या नाटकात तुमच्या प्रेमाचा बळी देतील…त्यांचा राग जाईल तेव्हा जाईल…पण तोवर त्यांनी काही चुकीचा निर्णय घेतला तर…मग हातात पश्चात्ताप करण्यावाचून काहीच राहणार नाही…” राधाची आई म्हणाली.
” पण हे पाऊल उचलणे गरजेचेच आहे का…काही दुसरा मार्ग सुद्धा असू शकतो ना…” राघव म्हणाला.
” तुम्हाला काय वाटतं…मी या सगळ्यांचा विचार केला नसेल का…? राधाच्या बाबांना जर ऐकायचच असतं तर आज मी आणि राधाने विरोध केल्यावरही ते वकिलांकडे गेले नसते…त्यांनी एखाद्या कागदावर राधाला सही करायला सांगितले विरोध करण्याची हिम्मत आहे राधा तुझ्यात…एकदा का त्यांनी नोटीस पाठवली तर मग ते अजिबात माघार घेणार नाहीत…
आणि राघव तू किती दिवस असा इथे झोपडीत राहणार आहेस…अशाने त्यांचा राग जाईल असे मला नाही वाटत…मग सगळ्याच गोष्टी बिघडत जातील…आता निदान सुलूताई तुमच्या बाबतीत सकारात्मक आहेत…विषय बिघडल्यावर सगळीच नाती बिघडतील…मग तुमच्या नात्याच भवितव्य काय असेल ते मी नाही सांगू शकत…” राधाची आई म्हणाली.
” मग कुठे जायचं…आणि कधी…?” राघव म्हणाला.
” आजच…आजच निघा…संध्याकाळ पर्यंत राधाचे बाबा परत येतील…परत आल्यावर त्यांना कळेलच की आम्ही दोघी इथे शेतावर तुझ्याकडे आलो होतो…आणि त्या रागात ते काय करतील काही सांगता येत नाही…त्या आधीच तुम्ही निघालेले बरे…” राधाची आई म्हणाली.
” पण ते तुम्हालाच जबाबदार धरतील या सगळ्याला…” राघव ने काळजी बोलून दाखवली.
” एक तर तुम्ही दोघेही नवरा बायको आहात…? आणि राधाचे बाबा त्यांच्या मुलीच्या बाबतीत जरा अतीकाळजी आणि घाई करत आहेत…पण याचा अर्थ असा नाही की ते मला काही करतील…इतकेही वाईट नाहीत ते…फक्त जरा जास्तच दुखावल्या गेले आहेत…आणि म्हणूनच चुकीचे निर्णय घेत आहेत…आणि जेव्हा त्यांचा राग ओसरेल तेव्हा त्यांना कळेलच की त्यांची काय चूक होती ते…” राधाची आई म्हणाली.
इतक्यात राघवच्या फोनची रिंग वाजली. महत्त्वाचा फोन असल्याने राघवने लगेच फोन रिसिव्ह केला आणि बाजूला जाऊन बोलला. बोलताना त्याच्या चेहऱ्यावरील भाव आपोआपच बदलत होते. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसून येत होता. बोलून झाल्यावर त्याने फोन कट केला आणि राधा अन् तिच्या आईकडे येत म्हणाला.
” कदाचित यावेळी हेच योग्य असेल मामी…म्हणूनच तर आपोआप असे योगायोग घडून येत आहेत…” राघव म्हणाला.
” म्हणजे…?” राधा ने विचारले.
” मुंबईहून कॉल आला होता…मी माझ्या प्रोजेक्टमध्ये इंवेस्टमेंट साठी ज्यांना भेटलो होतो त्यांना माझं प्रोजेक्ट पसंत पडलंय…आणि त्याच बाबतीत बोलणी करण्यासाठी त्यांनी मला मुंबईला बोलावले आहे…त्यामुळे दोन दिवस आपण मुंबईला जाऊ शकतो…” राघव म्हणाला.
संध्याकाळी जेव्हा राधाचे बाबा घरी आले तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी विचारले की
” राधा कुठे आहे…मला तिच्याशी बोलायचे आहे…”
राधाची आई काहीच उत्तर देत नव्हती. त्यांनी परत विचारले.
” राधा कुठे आहे…?” त्यांनी पुन्हा विचारले.
तिथे राधा ची काकू आली आणि म्हणाली.
” राधा तर दुपारपासून दिसत नाहीये…”
” काय…?” राधाचे बाबा म्हणाले.
” हो…आणि राघव पण कुठेतरी निघून गेलाय…” काकू म्हणाली.
” कुठे गेलाय तो…गेला असेल घरी निघून…एक दिवस पण राहू शकला नाही झोपडीत…” राधाचे बाबा म्हणाले.
” तुमच्या लक्षात येत नाहीये भाऊजी..राधा आणि राघव दोघेही कुठे दिसत नाहीयेत…” काकू म्हणाली.
” काय…?” राधा चे बाबा मोठ्याने ओरडले. आणि राधा च्या आई जवळ जाऊन म्हणाले.
” राधा कुठे आहे राधाची आई…?”
” मघापासून दिसत नाहीये…” राधाची आई राधाच्या बाबांच्या नजर टाळून बोलली.
” म्हणजे…राधा राघव सोबत पळून गेली…असे म्हणायचे आहे का तुम्हाला…?”
त्यावर राधाची आई काहीच बोलली नाही. मग राधाची काकू राधाच्या आईला म्हणाली.
” तुम्हाला काही बोलले होते का वहिनी ते दोघे मघाशी…जेव्हा तुम्ही अन् राधा राघवला भेटायला गेला होतात…”
” तू कशाला गेली होतीस त्याला भेटायला आणि राधाला कशाला घेऊन गेली होतीस…?”
” त्याला नाश्ता द्यायला गेले होते…दुपार होत आली तरी ही काहीच खाल्ल नव्हतं त्याने…”
आता मात्र राधा च्या बाबांना भयंकर राग आला. आणि ते म्हणाले.
” मी त्या राघवला सोडणार नाही…त्याने फूस लावून पळवून नेले ना माझ्या मुलीला…मी आताच पोलिसात तक्रार करतो त्याची…”
” काय तक्रार करणार आहात…नवरा कधी बायकोला पळवून घेऊन जात असतो का..?”
आता मात्र राधाचे बाबा थोडे भानावर आले. राघव विरोधात पोलिस कंप्लेंट होऊ शकत नाही हे त्यांना कळले होते.
” मी त्या दोघांना शोधायला जातोय…आणि त्या राघवला जन्मभराची अद्दल घडवतो…” ते म्हणाले.
” हो…अद्दल तर त्याला घडवायलाच हवी ना…त्याने खूप मोठा गुन्हा जो केलाय तुमच्या मुलीवर प्रेम करण्याचा…आणि प्रमाणापेक्षा जास्त चांगलं असणं हा देखील गुन्हाच आहे आजच्या काळात…” राधाची आई म्हणाली.
” हे तू काय बोलते आहेस शालिनी…?” राधा चे बाबा म्हणाले.
” योग्य तेच बोलत आहे…भर समाजात तुमची अन् राधाची इभ्रत वाचवली त्याने…राधाला भर मांडवात एकटीला पाहून सगळे तिला कमनशिबी समजून दोष देत होते…तेव्हा राघव अन् त्याचे बाबाच आले ना मदतीला…राघवने मागचा पुढचा काहीही विचार न करता लग्न केलंना आपल्या राधा सोबत…
राधाला तिच्या सासूने घराबाहेर काढले तेव्हा तो होता का तिथे…मग त्याला कसे काय गुन्हेगार समजताय तुम्ही…एका व्यक्तीच्या गुन्ह्याची शिक्षा इतरांना का म्हणून…त्यानंतर तिच्या घरचे तिला घ्यायला असेल तेव्हा तुम्ही पाठवले नाही ते मी समजू शकते…पण राघव स्वतः तिला घ्यायला आला तेव्हा तुम्ही कसे वागलात त्याच्याशी…
बिचारा रात्रभर शेतातल्या झोपडीत राहिला…तिथे राहणे किती धोकादायक आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे…पण राघव ने कशाचाच विचार नाही केला…एकदा विचार करा तिथे त्याच्यासोबत काही बरं वाईट झालं असतं तर तुम्ही स्वतःला आयुष्यभर माफ करू शकलं असतं का…?” राधाची आई म्हणाली.
आता मात्र राधाच्या बाबांना आईचं म्हणणं थोडं थोडं का होईना लक्षात येत होतं. तरीही ते मान्य करायला मन धजावत नव्हतं. ते म्हणाले.
” आक्का कशी वागली तिच्याशी ते माहिती आहे ना तुला…?”
” हो…अनेकदा ऐकून झालंय माझं…पण या सगळ्यांवर हाच एक उपाय आहे का…शिवाय त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झालीच होती ना…ज्या हाताने राधाला धरून घराबाहेर काढले त्याच हाताने सुलू ताईंनी हात जोडून माफी सुद्धा मागितली…मीनाक्षी सुद्धा तुम्हाला विनवण्या करत होती…चूक सगळ्यांकडून होते पण माफी मागितल्याने त्या चुकीची थोड्या प्रमाणात का होईना भरपाई होतेच…त्यांना माफ करून तुम्ही राधाचं सुख तिच्या पदरात टाकू शकले असते…” राधा ची आई म्हणाली.
” पण मी तर तिच्याच साठी हे सगळं करत होतो ना… तिच्याच भल्यासाठी मी तो निर्णय घेतला होता ना…” बाबा पुन्हा म्हणाले.
” राधा चे बाबा…मुलींच्या बाबतीत तुम्ही जरा हळवे आहात हे माहिती आहे मला…त्यांच्यावर खूप प्रेम आहे तुमचं…पण एका वेळेनंतर मुलांना त्यांच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेऊ द्यावेत…आपण मात्र भक्कम आधार बनून त्यांच्या पाठीशी राहायचं असतं…
राधाने जर राघव पासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला असता तर आपण दोघेही खंबीरपणे तिच्या पाठीशी राहिलो असतो…पण तिला तसे करायचे नाही…तिला राघव सोबत संसार करायचा आहे…आणि आपण घेतलेले निर्णय मुलांसाठी सर्वथा योग्य असतातच असे नाही ना…” राधा ची आई म्हणाली.
” आई वडिलांचे निर्णय मुलांसाठी कसे काय अयोग्य असू शकतात…?” राधा चे बाबा पुन्हा म्हणाले.
” मला सांगा राधासाठी धीरजला तुम्हीच निवडले होते ना…राधा ला तर साधे विचारले सुद्धा नव्हते…मग धीरज कसा निघाला…योग्य वेळी राघव लग्नाला तयार झाला नसता तर काय झालं असतं ह्याची कल्पना सुद्धा नाही करू शकत तुम्ही…आणि आताही त्या धीरजने राधावर चुकीचा आरोप केला…आणि म्हणूनच एवढा सगळा तमाशा झाला ना…म्हणून निदान आता तरी मुलांचे निर्णय मुलांना घेऊ द्यात…” राधा ची आई म्हणाली.
आता मात्र राधाचे बाबा विचारात पडले. काय करावे आणि काय नको ते त्यांना काहीच कळत नव्हते.
राधा आणि राघव मुंबईला जायचं म्हणून दुपारीच घरातून निघाले होते. तीन तासांच्या बाईक वरच्या प्रवासानंतर ते दोघेही मुंबईला जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसणार होते. पण संध्याकाळ होता होता प्रवासात राघव ची बाईक पंक्चर झाली. आता मात्र राघव ला जरा टेंशन आले. कारण गाडी शहरापासून साधारण पाच किलो मीटर दूर होती.
जवळपास कोणते पंक्चर काढायचे दुकान नव्हते. गाडी चालवत न्यायचं म्हटलं तरी बराच उशीर लागला असता आणि आता अंधार पडायला सुरुवात झाली होती. काय करावं आणि काय नाही ह्याच टेंशन आलेलं असताना मागच्या त्यांच्या समोरून एक कोणती तरी चारचाकी येत असल्याचे त्यांना दिसत होते. पण नेमकी कोणाची गाडी असेल आणि त्यांना मदत मागणे सेफ राहील का हा विचार राघव करत होता. इतक्यात गाडीचा स्पीड मंदावला. राघवला आता टेंशन यायला लागले होते.
क्रमशः
राधा चे बाबा आता काय पाऊल उचलतील…? राधा आणि राघव सुखरूप मुंबईला पोहचतील का…? धीरज ला त्याच्या कर्माची शिक्षा कोणत्या प्रकारे मिळेल…? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरु नका.
©®आरती निलेश खरबडकार.
Mitwaa- kharach khup chhan love story samoril part lavkar post kara pls
Awsome episide, Waiting for Next part