केशवरावांना गाडीबाहेर उतरताना पाहून सुलू ताई त्यांना म्हणाल्या.
” काय झालं हो तिकडे…धीरज आला का…?”
केशवराव काहीच बोलत नाहीत हे पाहून त्या पुन्हा म्हणाल्या.
” अहो सांगा ना तिकडे काय परिस्थिती आहे ते… राधाच्या काळजीने मला राहवत नाहीये इकडे…सोन्यासारखी पोर बिचारी आणि इतक्या लहान वयात काय काय सहन करावं लागत आहे तिला…आणि माझ्या भावावर सध्या काय परिस्थिती ओढवली असेल ह्याची तर कल्पना सुद्धा नाही करवत माझ्याच्याने…”
सुलोचना ताईंचे बोलणे ऐकून केशव राव काहीही न बोलता गाडीकडे गेले आणि गाडीचा दरवाजा उघडून म्हणाले.
” बाहेर या…”
त्यासरशी आधी राघव गाडीतून खाली उतरला आणि त्याने राधाला सुद्धा गाडीतून उतरायला मदत केली. वधू वेशातल्या राधाला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. हा नेमका काय प्रकार आहे हे त्यांना कळत नव्हते. इतक्यात माधवची बायको मीनाक्षी म्हणजेच राघवची वहिनी समोर आली आणि राधाला पाहून म्हणाली.
” ही इथे काय करतेय…धीरज भाऊजी लग्नाला आले नाही म्हणून हीलाच इथे पाठवलेलं दिसतंय हिच्या घरच्यांनी…”
” अहो राधाला इथे कशाला आणलय तुम्ही…” सुलोचना ताई म्हणाल्या. मग राधाजवळ जात म्हणाल्या. ” काय झालं राधा…तू ठीक आहेस ना…इथे काय करतेस…?”
राधा काहीच बोलली नाही. राघव सुद्धा गप्प होता. मग सुलोचना ताईंचे लक्ष राधाच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे गेले. आणि लगेच त्यांना राघव आणि तिचे गठबंधन सुद्धा दिसले.
आणि त्यांना धक्काच बसला. त्या राघवला मोठ्याने किंचाळत म्हणाल्या.
” हे काय आहे राघव…तुझ आणि हीचं गठबंधन का का बांधलेलं आहे…? हे काय चाललंय…?”
त्यावर केशवराव म्हणाले.
” मी राधा आणि राघवच लग्न लावून दिलंय…”
” काय…?” हे म्हणताना सुलोचना ताई धक्क्याने खाली कोसळणार इतक्यात माधव ने त्यांना सांभाळले. त्यानंतर मीनाक्षी ने त्यांना एका खुर्चीवर बसवून पानी दिले. नंतर त्या केशव रावांना म्हणाल्या.
” मला न विचारता न सांगता माझ्या मुलाचं लग्न लावून दिले तुम्ही…”
” मला त्यावेळी जे योग्य वाटलं मी तेच केलं…धीरज निघून गेल्यावर राधाच्या घरच्यांची अवस्था खूप वाईट झाली होती…ते तर राधाचं कुण्याही मुलाशी लग्न लावायला तयार होते…पण मीच स्वतःहून राधाचा हात राघव साठी मागितला…” केशवराव ठामपणे म्हणाले.
” तुम्ही असे कसे करू शकता…धीरज नव्हता तर दुसरा कुणी मुलगा मिळाला असताच ना…मग माझ्या राघवचेच लग्न का लावून दिले तुम्ही…?” सुलोचनाताई म्हणाल्या.
” राधाला दुसरा मुलगा मिळाला असता पण आपल्या राघवला राधासारखी मुलगी नसती ना मिळाली…” केशवराव म्हणाले.
” ते काही नाही…हिच्या बाबाने कावेरीच्या वेळी आपल्याला नकार दिला होता…आपल्याशी सोयरिक करणे तेव्हा त्यांना कमीपणाचे वाटले होते…मग आज जेव्हा त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता तेव्हा माझ्या साध्या भोळ्या राघवला फसवले त्यांनी…ते काही नाही…त्यांची मुलगी आपल्या घरात नकोच…तुम्ही हिला अशीच्या अशीच परत सोडून या…” सुलोचनाताई रागाने म्हणाल्या.
आईने असे म्हणताच राघव ने बेचैन होऊन राधाचा हात स्वतःच्या
” असे नाही होऊ शकत…मी त्यांना राधाला सांभाळायचं वचन देऊन आलोय…” केशवराव ठामपणे म्हणाले.
” असे कसे वचन देऊन आलात तुम्ही…मला काहीही न विचारता एकटेच कसे निर्णय घेऊ शकता तुम्ही…?” सुलोचनाताई म्हणाल्या.
” आजपर्यंत घरातील प्रत्येक निर्णय आपण मिळून घेतलेत… मुलांच्या बाबतीत सुद्धा सगळेच निर्णय तूच घेतलेस…मग मी आज हा एक निर्णय नाही घेऊ शकत का…? माझ्या मुलावर माझा एवढाही हक्क नाही का…? आणि राधा कुणी परकी नाही…तुझ्या सख्ख्या भावाची मुलगी आहे…अशा काळात तर तू माझ्या आधी हा विचार करायला हवा होता…” केशवराव सुद्धा आता ठामपणे बोलत होते
” अहो पण…” सुलोचना ताई आता जरा नरमल्या होत्या. आपण आपल्या भावाच्या मुलीबद्दल असे बोलतोय हे जर लोकांना कळले तर उद्या ते आपल्याला नावे ठेवतील म्हणून त्या जरा गप्प बसल्या.
” पण बिन काही नाही…माझा निर्णय झालाय…सूनबाई…जा आणि दारात आरतीच ताट तयार ठेव…” केशवराव मीनाक्षीला पाहून म्हणाले.
आता सुलोचना ताई काहीच बोलू शकल्या नाहीत. केशव रावांनी उभ्या आयुष्यात कधीच त्यांच्यावर आवाज चढवला नव्हता. पण आज सगळ्यांसमोर त्यांनी सुलोचना ताईंना सुनावले होते. ते ही राधामुळे. त्यामुळे त्यांच्या मनात राधा बद्दल आणखीनच राग उफाळून आला. पण लोक काय म्हणतील ह्याचा विचार करून त्या काही बोलल्या नाहीत.
धीरज पळून गेलाय म्हटल्यावर त्यांच्या मनात राधाबद्दल सहानुभूती आणि काळजी निर्माण झाली होती. पण राधा आणि राघव च लग्न झालंय हे पाहून त्यांना आता तिचा राग आला होता. राघव च्या लग्नासाठी त्यांनी कितीतरी स्वप्ने पाहिली होती. पण त्यांची सगळी स्वप्ने भंगली होती आज.
केशवराव राघव आणि राधाला म्हणाले.
” मुलांनो…चला घरी जाऊयात…”
सुलोचनाताई जणू त्यांच्या जागेवर खिळून बसल्या होत्या. राघव पुढे निघाला आणि राधा सुद्धा यंत्रवत त्याच्या मागे चाकू लागली. मीनाक्षीने स्वागताची तयारी केली होती. पण राधाला पाहून तिला अजिबात आनंद झाला नव्हता. मीनाक्षीच्या मम्मीने राघवसाठी तिच्या मावसबहीणीचे स्थळ आणले होते. फक्त सुलोचना ताईंनी अजुन राघव च्या लग्नाचे अजुन मनावर घेतले नव्हते म्हणून त्यांच्या कानावर घातले नव्हते.
मीनाक्षी मात्र खूप स्वप्ने रंगवली होती. तिची बहीण तिची लहान जाऊ म्हणून या घरात आली असती तर तिच्यासाठी चांगलच होतं. पण आज अगदीच अनपेक्षित पणे राधा तिची जाऊ बनून आली होती. अर्थातच मीनाक्षी या सगळ्याला मनाने तयार नव्हती म्हणून तिला हे स्वीकारणे खूप कठीण झाले होते. तिने नाराजीनेच सगळी स्वागताची तयारी केली होती.
राधा आणि राघव दारासमोर आले. सुलोचनाताई सुद्धा मागून आल्या. केशवराव त्यांच्याशी काही बोलणार इतक्यात त्या फणकाऱ्याने स्वतःच्या रूम मध्ये निघून गेल्या. मग केशवरावांनी मीनाक्षीला राधाला ओवाळायला सांगितले.
मीनाक्षीने नाईलाजाने राधाला ओवाळले. राधा घरात आली तसे केशवराव राघवला म्हणाले.
” राघव…दोघेही मिळून देवाला नमस्कार करा आणि राधाला तुमच्या खोलीत घेऊन जा…”
राघवने मान होकारार्थी हलवली आणि तिला घेऊन घरातील देवघरात गेला. तिथे त्याने देवांना हात जोडले. इतक्या वेळात राधाने पहिल्यांदा राघवकडे पाहिले होते. राघवच्या चेहऱ्यावर टेंशन स्पष्ट ओळखू येत होते. राधाला अगदी कसतरी झालं. आपल्यामुळे आज राघवला स्वतःच्या आईच्या नाराजीचा सामना करावा लागतोय ही अपराधीपणाची भावना तिच्या मनात आली.
धीरज ऐंन लग्नात आला नाही ह्यात राघवची तरी काय चूक होती. आपल्या नशिबाचे भोग आपल्यासोबत राघवला सुद्धा भोगावे लागत आहेत असे वाटून तिला स्वतःचाच राग आला. इतक्यात राघवने सुद्धा तिला पाहिले. तिला पाहून तो म्हणाला.
” तू ठीक आहेस ना राधा…?”
तिने मान हलवून तिचा होकार कळवला. राघवशी नेमके काय बोलावे आणि काय नको हे तिला कळत नव्हते. मग तोच तिला म्हणाला.
” चल…रूम मध्ये जाऊन थोडा आराम करून घे…”
असे म्हणून तिच्या उत्तराची वाट न पाहता तो स्वतःच पुढे निघाला. राधा मुकाट्याने त्याच्या मागून चालू लागली. तो तीला रूम मध्ये घेऊन आला. नंतर त्याच्या लक्षात आले की तिची बॅग गाडीतच राहिलीय म्हणून. मग तो जाऊन तिची बॅग घ्यायला बाहेर निघून गेला.
तो बाहेर निघताच राधाला जोरात हुंदका आला. आणि ती जमिनीवर बसून ओक्साबोक्सी रडायला लागली. सकाळपासून धरून ठेवलेला सहनशक्तीचा आता अंत झाला होता. दिवसभर काय काय झालं ते तिला स्पष्ट आठवू लागले. धीरज पळून गेलाय हे माहिती झाल्यावरची तिच्या बाबांच्या चेहऱ्यावरची अगतिकता आणि आईचा काळजी आणि अश्रूंनी डबडबलेला चेहरा तिला आठवला.
तिच्या काकूंनी तिला दिलेला दोष आठवला. नंतर सागरचा विषय आणि मग राघव शी लग्न हे सगळच तिला आठवत होतं. इथे आल्यावर तिच्या आत्याचा तिच्या लग्नाला असणारा विरोध आणि ती विखारी नजर. प्रत्येक आठवणी सरशी तिच्या मनात एक कळ उठत होती. तिचं रडणं काही केल्या थांबत नव्हत.
इतक्यात राघव बॅग घेऊन तिच्याजवळ आला. तिला रडताना पाहून त्याला कसतरीच वाटलं. तो तिच्या जवळ गेला. तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.
” रडू नकोस राधा…सावर स्वतःला…”
त्याला पाहून ती जरा सावरली आणि त्याला म्हणाली.
” मला काही वेळ एकटं राहायचं आहे…मला आत्ता कुणाशीच बोलायचं नाही…”
त्यासरशी राघव एक उशी आणि चादर घेऊन त्याच्या रूमच्या बाल्कनीत गेला. राघवला खरेतर रूमच्या बाहेर जायचे होते पण राधाची मनस्थिती सद्ध्या ठीक नाही आणि तिला असे एकटे सोडणे जीवघेणे ठरू शकते हे जाणून तो तिथे बाल्कनीत गेला होता.
राधा हमसून हमसून रडतच होती. राघव तिच्याकडे पाहत होता पण तिच्याशी नेमके काय बोलावे हे त्याला कळत नव्हते. राधा ने ती रात्र रडत रडतच घालवली आणि राघवने रात्रभर जागून विचार करत ती रात्र घालवली.
इकड धीरज एका फाईव स्टार हॉटेलमध्ये शनाया सोबत थांबला होता. त्याने आजच शनायाशी एका मंदिरात लग्न केले होते. आपल्या मित्रांना शनायाबद्दल माहिती आहे हे जाणून त्याने शनाया किंवा स्वतःच्या फ्लॅट वर राहणे सध्या तरी बरोबर नाही म्हणून ही पर्यायी व्यवस्था केली होती. आपण घरातून निघून आल्यावर राधा आणि आपल्या घरचे आपल्याला शोधायला फिरत असतील हे त्याला माहिती होते.
म्हणूनच त्याने आपला फोन स्विच ऑफ करून ठेवला होता. त्याला कालचा दिवस आता स्पष्ट आठवू लागला होता. घरी त्याच्या हळदीचा कार्यक्रम होता. तो खूपच जास्त खुश होता. उद्या राधा कायमची आपली होईल म्हणून. त्याचा फोन बरेचदा वाजत होता. शेवटी त्याने फोन पाहिलाच. शनायाचे अनेक मिस्ड कॉल दिसत होते.
यावेळी शनायासोबत बोलायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. त्याला तर आज राधाला फोन करून तिचे हळदीचे फोटो मागवायचे होते. पण शनायाला नेमकं काय म्हणायचं आहे ते तरी जाणून घेऊ म्हणून त्याने तिचा फोन उचलला. फोन उचलल्यावर तो तीला हळूच म्हणाला.
” हा बोल शनाया..काय म्हणत होतीस…तुला माहिती आहे ना आज घरी हळदीचा कार्यक्रम आहे म्हणून…”
” हो रे.. ते मला माहिती आहेच…पण इथे मोठा प्रॉब्लेम झालाय…”
” कसला प्रॉब्लेम…?” धीरज म्हणाला.
” अरे मला कालच कळलय की माझ्या बाबांनी मृत्यूपूर्वी त्यांची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केलीय…”
हे ऐकून धीरज एकदम उडालाच. तिचे बाबा चांगलेच श्रीमंत होते हे तो ऐकून होताच. एका वर्षापूर्वी त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. शनायाला आई होती पण ती एकटीच त्यांच्या दूर असलेल्या त्यांच्या वडिलोपार्जित बंगल्यात राहायची. शनायाला भाऊ किंवा बहीण नव्हतेच. शनाया सुद्धा एकटीच या शहरात राहायची. धीरज तिला म्हणाला.
” अगं ही तर आनंदाची गोष्ट आहे…ह्यात प्रॉब्लेम कसला…?”
” पण बाबांनी त्यांच्या मृत्युपत्रात एक अट घातली आहे…”
” अट…ती कोणती…?” धीरजने विचारले.
क्रमशः
राधा आणि राघव चे वैवाहिक जीवन कसे असेल…? सुलोचना ताई आणि मीनाक्षी इतक्या सहजा सहजी राधाला घरात टिकू देतील का…? धीरज ने शनायाशी लग्न करण्याचे नेमके कारण कोणते असेल…? शनाया च्या वडिलांनी मृत्युपत्रात कोणती अट घातली असेल..? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरु नका.
®®आरती निलेश खरबडकार.