जिवलगा – भाग ९
” माझ्या बाबांनी त्यांच्या मृत्युपत्रात असे स्पष्ट लिहिले आहे की त्यांची प्रॉपर्टी मला तेव्हाच मिळेल जेव्हा माझे लग्न होईल…” शनाया म्हणाली.
” काय…ही कसली अट…आणि ह्यात प्रॉब्लेम काय आहे…?”
धीरजने विचारले.
” खूप मोठा प्रोब्लेम आहे…” शनाया म्हणाली.
” तो कोणता…?” धीरजने पुन्हा अधिरतेने विचारले.
” माझं तुझ्यावर प्रेम आहे…आणि तुझ्याशिवाय मी कोणाशी लग्न करायचा विचार सुद्धा नाही करू शकत…” शनाया म्हणाली.
” मग…तुला नेमकं म्हणायचं तरी काय आहे…?” धीरज ने अधिरतेने विचारले.
” तू राधाशी लग्न करू नकोस…तू माझ्याशी लग्न कर…” शनाया म्हणाली.
” काय…” धीरज अक्षरशः किंचाळत म्हणाला.
” हो…मला असं वाटतं की तू राधाशी लग्न मोडून माझ्याशी लग्न करावं…कारण एकदा का राधाशी तुझं लग्न झालं तर कायदेशीर रित्या आपण दोघे लग्न नाही करू शकणार…आणि मग माझ्या बाबांची प्रॉपर्टी मला नाही मिळणार…म्हणजे त्यासाठी मला दुसऱ्या कुणाशी तरी लग्न करावे लागेल…मग आपण पुन्हा कधीच एकत्र येऊ शकणार नाही…”
” अगं पण मी असं नाही करू शकत…लग्नाच्या सगळ्याच तयाऱ्या झाल्या आहेत…मला हळद सुद्धा लागली आहे…मी जर हे लग्न करायला नकार दिला तर राधा च्या घरचे आणीं माझ्या घरचे मला सोडणार नाहीत…गावातल्या लोकांना त्यांची इभ्रत सगळ्यात जास्त प्रिय असते… मी नाही म्हटलं तरी जबरदस्ती ते माझं लग्न लावतीलच…आता माझ्या हातात काहीच उरलेलं नाही…माझी कितीही इच्छा तरीही मी असं काही करु शकत नाही…” धीरजने तिला समजावून सांगितले.
” तू त्यांना काहीही न सांगता निघून येऊ शकतोस…फोन बंद करून ठेव काही दिवस…घरचे आठ दहा दिवस रागावतील तुझ्यावर…पण मग आपण त्यांना समजावून सांगू…तू घरातील एकुलता एक मुलगा आहेस…तुझ्यावर असे किती दिवस रागावतील ते…” शनाया म्हणाली.
” अगं पण…” धीरज काहीतरी बोलणार इतक्यातच शनाया त्याला म्हणाली.
” मला कळतंय… तुझं सुद्धा खूप प्रेम आहे माझ्यावर…पण तरीही तू तुझ्या मनात येईल तसेच वाग…मला माहिती आहे की फक्त काही कोट्यवधींच्या रकमेसाठी तू असं राधाला आणि तुझ्या घरच्यांना फसवून येणार नाहीस…तू तुझं कर्तव्य पूर्ण कर…माझं काय…मी करेल दुसऱ्या कुणाशी तरी लग्न…” शनाया म्हणाली.
आता मात्र धीरजच्या डोक्यात एकदमच प्रकाश पडला. शनायाशी लग्न केलं तर तिची कोट्यावधीची संपत्ती ह्यालाच मिळाली असती. आणि जर हातात पैसा असेल तर राधा सारख्या कितीही मुलीला तो मिळवू शकेल असा त्याने विचार केला.
राधाला मिळवण्याची इच्छा पैशांपुढे एकदमच फिकी वाटू लागली त्याला. त्याला ही संधी गमवायची नव्हती. एकदा तर त्याने विचार केला की इकडे राधाशी लग्न करून पुन्हा शनायाशी लपून लग्न करावे म्हणून. पण त्याला आता पैशांच्या बाबतीत तरी कोणतीच रिस्क नको होती. तो शनायाला म्हणाला.
” मला पैशात अजिबातच इंटरेस्ट नाहीये शनाया…पण तुला तर माहिती आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते…अगं हे लग्न सुद्धा मी तुझ्या सांगण्यावरून करतोय…पण हे लग्न झाल्यावर जर मी तुला गमवत असेल तर मला हे लग्नच नाही करायचं बघ…तुझं कुणा दुसऱ्याशी लग्न झालेलं मला सहनच होणार नाही बघ…”
” मग…तू काय ठरवलं आहेस…?” शनाया चेहऱ्यावर विजयी हसू आणत म्हणाली.
” मी तयार आहे…मी आताच निघतोय तिकडे येण्यासाठी…इथून लगेच सटकतो आणि तुझ्याजवळ पोहचतो…” धीरज म्हणाला.
” ठीक आहे… जसं तुला ठीक वाटेल तसे कर… मी इकडे लग्नाच्या सगळ्या अरेंज मेंट करून ठेवते…” असे म्हणून शनाया स्वतःशीच कुत्सित हसली.
धीरज ने पैशांच्या मोहासाठी ना राधाचा विचार केला ना त्याच्या आई वडिलांचा. त्याला वाटले की एकदा त्याच्या हाती पैसा आला की आई बाबांना पण त्याचा अभिमानच वाटेल. म्हणूनच सगळ्यांची नजर चुकवून एका छोट्या बॅगेत आपल्या कामाच्या वस्तू घेऊन तो तिथून सगळ्यांच्या लपून निघाला.
आणि डायरेक्ट शहरात शनायाजवळ गेला. शनायाने सुद्धा लग्नाची सगळी तयारी करून ठेवली होती. तिला ही संधी गमवायची नव्हती. तसेच धीरजने चांगल्या वाईटाचा विचार करायच्या आधी तिला त्याच्याशी लग्न करायचे होते. आणि तिने तसे केले देखील. धीरजला काहीच लक्षात येत नव्हते. लग्न केल्यावर मग आपल्याला कुणी शोधू नये म्हणून तो एका हॉटेलमध्ये शनाया सोबत थांबला होता.
इकडे रात्रभर रडून राधाची हालत खराब झाली होती. सकाळ झाली तरीही ती एकाच जाग्यावर बसून होती. राघवने लवकर उठून आपले आवरले आणि राधाला सुद्धा स्वतःचे आवरता यावे म्हणून तो रूमच्या बाहेर निघून गेला. इकडे केशवराव आणि सुलोचना ताई सुद्धा रात्रभर झोपल्या नव्हत्या. सुलोचना ताईंनी केशवरावांसोवत अबोला धरला होता.
माधव आणि मीनाक्षी हे दोघेही सकाळीच उठले होते. राघव ला सकाळीच उठून बाहेर आलेलं पाहून मीनाक्षी मुद्दाम त्याला म्हणाली.
” काय मग भाऊजी… कसं वाटतंय लग्न करून…?”
यावर राघव काहीच बोलला नाही.
मग पुन्हा मीनाक्षी म्हणाली.
” राधा मॅडम उठल्या नाहीत वाटतं…”
तेव्हा माधव तिला म्हणाला.
” मीनाक्षी…तू नीट बोलणार नाहीयेस का त्याच्याशी…जा…किचन मध्ये जाऊन आम्हा दोघांसाठी चहा घेऊन ये…”
हे ऐकून नाक मुरडतच मीनाक्षी किचन मध्ये निघून गेली.
माधव राघव जवळ गेला आणि म्हणाला.
” राघव…मला माहिती आहे तू कुठल्या परिस्थितीत हे लग्न केलंय ते…पण खरं सांगायचं म्हणजे मला तुझ्या निर्णयावर गर्व आहे…राधासोबत वाईट झालेलं मी सुद्धा पाहू शकलो नसतो…बाबांचं निर्णय अगदी योग्य होता…”
राघवला हे ऐकून एकदमच बरे वाटले. तो फक्त “दादा” एवढेच म्हणू शकला त्याने माधवला मिठी मारली.
” तू काळजी नको करुस…सगळं काही ठीक होईल…” माधव म्हणाला.
” पण दादा…आई तर खूप नाराज आहे…” राघव काळजीने म्हणाला.
” अरे शेवटी आईच आहे ना ती…जास्त दिवस नाराज नाही राहू शकणार…” माधव म्हणाला.
इतक्यात तिथे केशवराव सुद्धा आले आणि ते राघवला म्हणाले.
” राघव…राधाला सांग लवकर तयार व्हायला…आज घरी सत्यनारायणाची पूजा ठेवलीय…”
राघव आश्चर्याने बाबांकडे पाहत म्हणाला.
” पण बाबा…आई…म्हणजे आईने परवानगी दिली का…?”
” ह्यासाठी तुझ्या आईची परवानगी घ्यायची काय गरज…जे व्हायला हवं ते तर होणारच ना…लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करायची पद्धत आहे आपली…ती बदलून थोडेच चालेल…आणि कुणी कितीही नाराज असले तरी हे सत्य बदलता येत नाही की तुझं आणि राधाचं लग्न झालंय आणि ती आपल्या घरची सून आहे…” केशवराव म्हणाले.
त्यावर राघव काहीच बोलू शकला नाही. त्याला बाबांचे म्हणणे एकदमच पटले होते. आई नाराज आली तरीही राधा त्याची बायको होती. त्याने स्वतःच्या मर्जीने तिच्या सोबत लग्न करायला होकार दिला होता. आणि त्याची कर्तव्ये आणि जबाबदारी त्याला पार पाडायचीच होती.
” जा…राधाला सांगून ये…आज सत्यनारायणाची पूजा करायची आहे ते…”
” हो बाबा…” एवढे बोलून राघव आपल्या रूम मध्ये निघून गेला.
राधाची नुकतीच अंघोळ झाली होती. कालपासून तिने काहीच खाल्लेले नव्हते. सध्या तिच्या पोटात भुकेचा डोंब उसळला होता. तसे काही खाल्ले तर राघव नेही नव्हते पण त्याच्या सहनशक्तीचा अंत अजुन झालेला नव्हता. राघव रूममध्ये आला आणि तिला पाहून म्हणाला.
” राधा…आज घरी सत्यनारायणाची पूजा आहे…तू लवकर तयार हो…”
” सत्यनारायणाची पूजा…पण का…?”
” लग्न झाल्यावर पूजा करण्याची पद्धत असते म्हणून…”
आता मात्र राधा चिडली. आधी भूक शांत बसू देत नव्हती आणि आता सत्यनारायणाच्या पूजेची गोष्ट ऐकून ती म्हणाली.
” कोणतं लग्न…? तेच जे परिस्थितीपुढे हतबल होऊन तुला माझ्याशी करावं लागलं…एका नवरीला अर्ध्यावर सोडून तिचा नवरदेव पळून गेला म्हणून तुला जबरदस्तीने लग्नमंडपात उभ रहावं लागलं…जे तुझ्या आईला अजिबात मान्य नाही ते लग्न…? असं उपकार केल्यासारख नको वागुस माझ्याशी…”
” काय बोलतेयस तू राधा…?” राघव म्हणाला. राघव पुढे काही बोलणार इतक्यात दारावर टकटक झाली. राघव ने पुढे जाऊन दार उघडले. तर समोर माधव दादा उभा होता. राघव त्याला पाहून म्हणाला.
” दादा…” राघव पुढे काही बोलणार इतक्यात माधव ने त्याला थांबवले, हातातील पिशवी त्याच्याकडे दिली आणि हळूच आवाजात म्हणाला.
” मी तुम्हा दोघांसाठी बाहेरून नाश्ता बोलावलाय…लवकर खाऊन घ्या…घरी आज तुम्हा दोघांना लवकर नाश्ता मिळेल ह्याची काही शाश्वती नाही…”
पिशवी घेत राघव म्हणाला.
” थॅन्क यू सो मच दादा…”
त्यावर माधवने एक गोड स्माइल दिली. राघव ने नाश्ता एका प्लेटमध्ये काढून राधाच्या समोर ठेवला. राधाला खूप भूक लागली होती. तिने अधाशा सारखा तो नाश्ता लगेच संपवला. राधाचे बोलणे ऐकुन नाराज झालेल्या राघवला आताही तो नाश्ता खावासा वाटला नाही. तो काहीही न बोलता तयार व्हायला लागला. त्याला तयार होऊन खोलीच्या बाहेर पडताना पाहून राधा म्हणाली.
” तू नाश्ता नाही केलास अजुन…”
त्यावर राघवने तिच्याकडे पाहिले पण तो काहीच बोलला नाही.
” नाही…म्हणजे तू पण कालपासून काहीच खाल्लेलं नाही ना…”
” पोट भरलं माझं…तुझे बोलणे ऐकून…” राघव म्हणाला आणि बाहेर निघून गेला.
आता मात्र राधाच्या लक्षात आलं की आपण राघवला काय बोलून बसलो ते. मघाशी भूक सहन होत नव्हती त्याचा राग तिने राघव वर काढला होता. खरे पाहता त्याची काहीच चूक नव्हती. उलट त्याच्यामुळेच आज ती आयुष्यात मानाने उभी होती. त्याचे तिच्यावर आणि तिच्या कुटुंबावर अनंत उपकार होते. आणि अशा उपकार केलेल्या देवमाणसाला आपण वाईट बोललो ह्याचे तिला आता खूपच वाईट वाटत होते. तिने त्याची माफी मागण्याचे ठरवले.
इकडे राघव तयार होऊन बाहेर आला. माधव सुद्धा तयार झाला होता. आणि त्यानं मीनाक्षी ला सुद्धा तयार राहायचे सांगितले होते. म्हणून मग मीनाक्षी सुद्धा तयार झाली होती. केशवरावांनी गुरुजींना सांगून सत्यनारायणाची सगळी तयारी करून घेतली होती. माधव ने सुद्धा सगळे साहित्य व्यवस्थित आणले होते.
रात्रभर जागून काढलेल्या सुलोचनाताई सकाळी लवकर रूमच्या बाहेर आल्या नव्हत्या. कालपासून रागात असलेल्या सुलोचना ताईं जेव्हा बाहेर आल्या तेव्हा सत्यनारायणाच्या पूजेची तयारी आणि सगळ्यांना चांगल्या कपड्यात तयार झालेलं बघितलं तेव्हा त्यांचा राग अनावर झाला. आपल्याला कुणी समजवायला आले सुद्धा नाही.
आपण नाराज आहोत ह्याची साधी दखल सुद्धा घेतल्या गेली नाही आणि सगळ्यांनी आपल्याला काहीही कल्पना न देता पूजेची तयारी सुद्धा केली आणि सगळे तयार सुद्धा झालेत ह्याचे सुलोचना ताईंना अधिकच वाईट वाटत होते. त्यातच राघव तयार होऊन त्यांच्या नजरेसमोर आला. त्याला पाहून मोठ्या आवाजात सुलोचना ताई म्हणाल्या.
” राघवा…काय रे हे…तुझ्या लेखी तुझ्या आईला काडीचीही किंमत नाहीये का…?”
” असं काहीच नाहीये आई…पण तू असे का बोलत आहेस…?”
” असे नाही बोलू तर काय करू…? एक तर माझ्या अपरोक्ष तू हे लग्न केलंस…आणि आता सत्यनारायण पूजा करून माझ्या जखमेवर मीठ चोळत आहेस…हा माझा अपमान नाही का…?” सुलोचनाताई त्याला म्हणाल्या.
” नाही आई…तू असे का बोलत आहेस…? तुझा अपमान करायचा मी स्वप्नातही विचार नाही करू शकत…माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर…तुला दुखावण्याचा मी विचार देखील नाही करू शकत.. ” राघव म्हणाला.
” माझ्यासाठी तू काय करू शकतोस..?” सुलोचना ताईंनी विचारले.
” काहीही करू शकतो आई…तू जे म्हणशील ते सगळंच करू शकतो…फक्त तू माझ्यावर रुसू नकोस प्लिज…तू सांग ना मी काय करू म्हणजे तुझा आमच्यावरचा राग जाईल…” राघव म्हणाला.
त्यावर सुलोचना ताईंच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य झळकले. आपण आपल्याला हवं ते राघव कडून करून घेऊ शकतो हे त्यांनी हेरले आणि त्या राघवला म्हणाल्या.
क्रमशः.
सुलोचना ताई राघव ला नेमकं काय करायला सांगतील…? सत्यनारायणाची पूजा व्यवस्थित पार पडेल का…? धीरज ला खरंच शनायाची प्रॉपर्टी मिळेल का…? की त्याला त्याच्या निर्णयाचा केवळ पश्चात्ताप होईल…? हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.
कथेचे मागील भाग खाली इथे वाचा.
©®आरती निलेश खरबडकार
खुप छान
Chhan