निशाला आपल्या कडून डिव्होर्स हवाय हे ऐकून साकेत एकदम बिथरलाच होता. आपण तिच्यावर एवढे प्रेम केले ह्याची तिला अजिबात जाणीव नाही हा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्याला आताशा निशाचा भयंकर राग येऊ लागला होता. निशाच्या वागण्यावर विश्वास तर अजिबातच बसत नव्हता.
अशातच एके दिवशी त्याच्या घरी डिव्होर्स नोटीस आली. त्यामध्ये निशाने त्याच्यावर बरेच आरोप सुद्धा केले होते. आता मात्र साकेतच्या घरच्यांना ही निशाचा राग आला होता. म्हणून ते ही आता दोघांच्या मध्ये पडले नाही. घटस्फोटाला तयार आहे असे म्हणत साकेत ने सुद्धा नोटीसीला उत्तर पाठवले.
निशाने जेव्हा ती नोटीस पाहिली तेव्हा ती धावतच तिच्या बाबांकडे गेली आणि म्हणाली.
” बाबा…साकेतला डिव्होर्स मान्य आहे असे लिहून दिलेय त्याने…लवकरच कोर्टात सुद्धा जावे लागणार आहे…तुम्ही तर म्हणाला होतात की नोटीस पाठवल्या वर तो आपल्या इथे येऊन राहायला तयार होईल…पण हे तर उलटेच होत आहे…”
” त्याला वाटले की डिव्होर्स ला तयार आहे असे माहीत झाले तर तू त्याच्याकडे जाऊन त्याची नाक घासून माफी मागशील आणि कायमची तिथे राहायला तयार होशील…म्हणून नाटकं करत आहे तो…तो तुला डिव्होर्स देणारच नाही…तुझ्या इतकी चांगली मुलगी त्यांना साता जन्मात मिळणार नाही…” वसंतराव मोठ्या अभिमानाने म्हणाले.
” पण बाबा…या नोटिसित खूप सारे आरोप केले आहेत साकेतवर आणि त्याच्या घरच्यांवर…अशाने तर तो खूप रागवेन…तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही त्याच्यावर काहीच आरोप करणार नाही…फक्त त्याला घाबरवून द्यायला नोटीस पाठवणार आहात म्हणून…” निशा म्हणाली.
” तुला माझ्यावर विश्वास आहे ना…मी जे काय करत आहे ते तुझ्या भल्यासाठीच करतोय…तू फक्त पुढे काय होतंय त्याची मजा बघ…” वसंतराव म्हणाले.
बाबांचे बोलणे ऐकून निशा गप्प बसली. खरंतर तिला ही नोटीस वगैरे पाठवायची नव्हतीच. तिला साकेत ला तिच्या माहेरी राहायला सुद्धा बोलवायचे नव्हते. तिला फक्त हवे होते की साकेतने तिची माफी मागून, तिचा रुसवा काढून तिला परत घेऊन जावे. अगदी नेहमीप्रमाणेच.
पण यावेळी मात्र गोष्ट खूप जास्त ताणल्या गेली होती. वसंतरावांनी तिच्या डोक्यात साकेतला घरजावई म्हणून इथेच बोलावं असे तिच्या डोक्यात भरवले होते. त्यांना वाटायचे की निशा तिथे सुखात राहू शकणार नाही. निशा सुद्धा बाबा जसे सांगतील तशीच वागत होती.
साकेतची इथे येऊन राहायची कल्पना तिला खूप भारी वाटत होती. त्यापुढे तिला इतर कशाचीही पर्वा नव्हती. म्हणूनच बाबांनी तयार करवून घेतलेल्या नोटीसवर न वाचता तिने सही केली होती. जेव्हा साकेतने नोटीसला उत्तर पाठवले तेव्हा तिने ती नोटीस वाचली आणि तेव्हा तिला ह्या गोष्टी समजल्या होत्या. पण आता बाबांचं ऐकण्यावाचून तिच्याकडे दुसरा काही मार्ग नव्हता.
आशाताई मात्र हे सगळं पाहूनही काहीच बोलू शकत नव्हत्या. कारण वसंतराव आणि निशा दोघेही त्यांच्या मनात येईल तसेच वागत. आशाताईंच्या मतांना तर निशाच्या लेखी काहीच किंमत नव्हती. आशाताईंना कळून चुकले होते की हे वादळ निशाच्या संसाराला टिकू देणार नाही. पण बोलून काहीच फायदा नव्हता.
ठरलेल्या दिवशी कोर्टात जाताना निशाच्या मनात धाकधूक होतीच. पण बाबा तिला वारंवार समजावून सांगत होते. काहीही झालं तरी साकेतला पाहून विरघळून जायचं नाही. त्याच्याशी स्वतःहून बोलायला जायचं नाही. तो स्वतःच येईल आपल्याजवळ. हा डीव्होर्स मला नको म्हणायला. निशासुद्धा स्वतःच्या मनाला समजावत होती.
कोर्ट परिसरात आल्यावर तिची नजर साकेत वर गेलीच. साकेतने सुद्धा तिच्याकडे पाहिले. दोघांच्याही मनात प्रेमाचा ओलावा अजूनही शिल्लक होता. पण सद्यपरिस्थिती खूप वेगळी होती. मागच्या काही दिवसात दोघांच्याही नात्यात खूप कटुता आली होती. त्यामुळे साकेत ने रागाने तिच्यावरून नजर फिरवली आणि दुसरीकडे पाहिले.
साकेतला पाहून निशाच्या मनात सुद्धा विचार आला की जाऊन त्याला मीठी मारावी, सगळे गैरसमज दूर करावे, दोघांनीही कायम सोबत राहावे. पण तिचा अहंकार आणि साकेत कडून आपली गोष्ट मनवून घेण्याची लालसा तिला असे करू देत नव्हती.
कोर्टात जजसमोर जेव्हा साकेत ला प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला हा डीव्होर्स हवाय का. तेव्हा साकेत ने काहीही विचार न करता होकार दिला. हे ऐकून निशाला एकदम धक्काच बसला. तिने अगतिक नजरेने साकेत कडे पाहिले. पण साकेत अजिबात तिच्याकडे पाहत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर एकप्रकारचा ठामपणा दिसत होता. मग निशा ने तिच्या वडिलांकडे पाहिले. तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावरील भाव सुद्धा निर्विकार होते. जणू त्यांना खात्रीच होती की इथे असेच काहीतरी होईल. निशा त्यांच्या शी काही बोलणार इतक्यात जजसाहेबांनी निशाला प्रश्न केला.
” तुम्हालाही हा डिव्होर्स हवाय का..?”
काय बोलावे ते निशाला कळत नव्हते. इतक्यात तिने तिच्या बाबांकडे पाहिले. तिचे बाबा डोळ्यांनीच तिला हो म्हणण्याचा इशारा करत होते. निशा एकदमच दगड झाली होती. काय करावं तिला कळत नव्हतं. तिने पुन्हा एकदा तिच्या वडिलांकडे पाहिले. त्यांनी आताही तिला हो म्हणायलाच खुणावले. तसा तिने होकार कळवला.
आणि पाहता पाहता घटस्फोटाची प्रक्रिया पार सुद्धा पडली. निशा पुरती कोलमडून गेली होती. सगळं काही आटोपल्यावर जेव्हा निशा जायला तिच्या बाबांसोबत गाडीत बसली तेव्हा एकदमच तिला हुंदका दाटून आला. त्याबरोबर तिचे बाबा म्हणाले.
” निशा…रडू नकोस…अशा माणसासाठी कशाला रडत आहेस…त्याला अजिबात तुझी कदर नाही…”
” पण बाबा…तुम्ही म्हणाला होतात की हा घटस्फोट होणार नाही म्हणून…” निशा काहीशी चिडून म्हणाली.
” अगं पण त्याला तुझ्यासोबत राहायचच नसेल तर आपण काय करू शकतो…तो तुझ्या लायकीचा नव्हताच कधी…तू आता नवीन आयुष्य सुरु कर…सगळं काही व्यवस्थित होईल…” वसंतराव म्हणाले.
” पण मला त्याच्या सोबतच राहायचं आहे…” निशा म्हणाली.
” पण त्याला नाही राहायचं ना तुझ्यासोबत…असे असते तर त्याने घटस्फोटाला होकार दिलाच नसता…किंवा आपल्या इथे राहायला तयार झाला असता…पण असे त्याने काहीच केले नाही…त्याच्या मनातच नव्हतं असं काही…म्हणून तू सुद्धा त्याचा फार विचार न करता तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात कर…” वसंतराव निशाला समजावत म्हणाले.
निशाला साकेत पासून वेगळे झाल्याचे खूप जास्त दुःख झाले होते. पण तुला आता बाबांचे म्हणणे सुद्धा हळूहळू पटू लागले होते. साकेत चे आपल्यावर खरे प्रेम असते तर साकेत ने आपली अट मानली असती असेही तिला वाटत होते. मनोमन ती साकेत वर चिडली सुद्धा होती. माझ्यासाठी तो एवढं सुद्धा करू शकला नाही ह्याचं तिला वाईट वाटत होतं.
पाच वर्षानंतर –
” बाबा…या दिवाळीत आपण घराला छान कलर करूयात…मला माझ्या रूमसाठी थोडं फर्निचर सुद्धा घ्यायचं आहे…” वृषाली म्हणाली.
” अगं पण काय गरज आहे या सगळ्याची… दोनच वर्ष आधी मी स्वतः तुमच्या रूमचे इंटेरियर केले होते. ” निशा म्हणाली.
” पण मला काही चेंजेस करायचे आहेत…” वृषाली म्हणाली.
” अगं कर ना मग…तुला जे बदल करायचे आहेत ते कर…” वसंतराव म्हणाले.
आता मात्र निशा पुढे काहीच बोलली नाही. आजकाल बाबा निशाच्या मतांपुढे वृषालीच्या मतांना जास्त महत्त्व द्यायला लागले होते. वृषाली ही निशांतची बायको आणि वसंतरावांची सून होती. ती घरात लग्न करून आली तेव्हा निशा चे घरातील महत्त्व जरा जास्तच होते. आणि हे तिच्या लवकरच लक्षात आले होते.
आता मात्र निशाला तिच्या बाबांचं हे बोलणं आवडलं नाही. हे काय आजकाल अनेकदा वृषाली घराच्या बाबतीत स्वतःचे मत मांडते आणि बाबा सुद्धा कधी कधी तिच्या कलाने घेतात. आजवर तर बाबा माझ्यापुढे कोणाचंच मत गृहीत धरायचे नाहीत या विचाराने निशा जरा अस्वस्थ झाली होती. या आधी निशांतने सुद्धा कधीच आपले म्हणणे डावलले नाही. मग ही वृषाली तर आताच या घरात आलीय. तरीसुद्धा ही नेमकी आपल्या विरोधात बोलते असे निशाला वाटायला लागले होते.
निशांतचे नुकतेच लग्न झाले होते. वृषाली सून बनून आली आणि इथेच तिच्यात आणि निशामध्ये वादाला सुरुवात झाली. घरात निशा म्हणेल तीच पूर्व दिशा अशी परिस्थिती होती. निशाच्या पुढे निशांतचे सुद्धा काही चालायचे नाही. म्हणजे त्याचा मुलं स्वभावच शांत होता. तो सहसा कोणत्या गोष्टीला विरोधच करायचा नाही.
पण वृषालीच्या मात्र हे खूपच लवकर लक्षात आले की घरात निशाचेच चालते. निशाताईच्या समोर ना सासुबाई काही बोलतात ना निशांत. आणि वृषालीला हेच आवडत नव्हतं. म्हणूनच तिने सुरुवातीपासूनच घरच्यांचा स्वभाव ओळखायला सुरुवात केली होती.
हळूहळू वृषाली निशाच्या लहान सहान गोष्टींना विरोध करायला लागली होती. पण सौम्य आणि गोड शब्दात. त्याउलट निशा मात्र लगेच चिडत असे. निशाची चिडचिड सगळ्यांच्या लक्षात यायची. त्या उलट वृषाली मात्र गोड बोलून काम काढून घेते हे मात्र सहसा कुणाच्या लक्षात यायचं नाही.
क्रमशः
भाग ४ –
तुझ्याविना मी – भाग ४