आता तर हळूहळू वृषाली घरात रुजू लागली होती. स्वतःचा अधिकार गाजवू लागली होती. अशातच तिला गोड बातमीची चाहूल लागली. ह्या बातमीने घरात आनंदी आनंद झाला. वसंतराव तर अगदी हरखून गेले होते. घरात बाळ येणार हे ऐकून निशाला ही खूप आनंद झाला होता.
अर्थातच यामुळे वृषालीचे घरातील महत्त्व खूप जास्त वाढले होते. आता स्वयंपाक फक्त वृषालीच्या आवडीचा व्हायचा. घरातल्या प्रत्येक निर्णयात वृषालीच्या मताचा सर्वप्रथम विचार केल्या जायचा. निशाला यामुळे जरा वगळल्या सारखे वाटायचे पण हल्ली ती हरकत घेत नसे.
वृषालीने हुशारीने आणि गोड बोलून सगळ्यांना आपल्या बाजूने करून घेतले होते. अशातच जेव्हा तिला बाळ झाले तेव्हा तर घरातले तिचे स्थान एकदमच महत्त्वाचे झाले होते. निशाला मात्र आता या सगळ्यांमध्ये एकदम वगळल्यासारखे वाटायचे. घरातले निर्णय घेताना निशाचे मत आता जास्त महत्वाचे वाटत नसे.
निशा दिवसभर बाळाला सांभाळायची. त्यावेळी वृषाली आणि निशांत मात्र छान बाहेर जायचे. फिरून यायचे. एव्हाना एखाद्या कार्यक्रमात जेव्हा वसंतरावांना निशाबद्दल विचारल्या जायचे तेव्हा ती घटस्फोटित आहे हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर आताशा वेगळेच भाव यायला लागले होते. ते सहसा तो प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करत.
निशाला हे सुद्धा कळून चुकले होते. त्यामुळे मागच्या दोन वर्षात निशाच्या स्वभावात सौम्यपणा आला होता. वृषाली सुद्धा निशा वर अधिकार गाजवायचा प्रयत्न करायची. या सगळ्यात फक्त एक आशाताईच होत्या ज्यांना निशाच्या मनाची चलबिचल कळायची. पण एवढ्या वर्षात निशाने कधीच मनाने आईला फार महत्त्व दिले नसल्याने दोघींच्या नात्यात एक सहजपणा अजूनही आलाच नव्हता.
पण निशाने साकेतला घटस्फोट देऊन खूप मोठी चूक केलीय असे वाटणाऱ्या फक्त आशाताईच होत्या.
एकदा वृषालीचा मुलगा घरात खेळत असताना सोफ्यावरून खाली पडला. खाली कार्पेटवर पडल्याने त्याला फारसे लागले नव्हते पण बाळ घाबरल्याने नुसतेच रडत होते. निशा पटकन खोलीतून बाहेर आली. त्याला जवळ घेतले. एवढ्यात वृषाली आणि सगळे घरचे सुद्धा तिथे आले.
निशाच्या जवळून त्याला खेचतच वृषाली म्हणाली.
” हे काय निशा ताई…तुम्हाला बाळावर जराही लक्ष ठेवता आले नाही का…? बाळ किती जोरात पडला…अजूनही शांत होत नाही आहे…”
” अगं पण मी आतमध्ये गेली तेव्हा बाळा जवळ तूच होतीस
ना…” निशा म्हणाली.
” हो…पण मला खूप काम असतात घरात…तुमच्या सारखी दिवसभर आराम करत नसते मी…मग बाळाला पाहायला काय जाते तुम्हाला…” वृषाली फणकाऱ्याने म्हणाली.
” अगं काय बोलत आहेस तू…आणि माझा आराम काय काढतेस…हे माझं घर आहे…त्यामुळे इथे कसं राहायचं ते माझं मी पाहून घेईन…आणि तुला कसली कामे असतात…घरात कामाला बाई येते ना रोज…” निशा म्हणाली.
” मला काय उलट बोलत आहात तुम्ही…घरात दिवसभरात खूप कामे निघतात…तुम्हाला काय माहित म्हणा…तुम्ही कुठे टिकलात सासरी… स्वतःला तर अजिबात संसार करता आला नाही अन् इथे येऊन शहाणपणा शिकवत आहात…” वृषाली म्हणाली.
” हे बघ…तू आता खूप जास्त बोलत आहेस…माझ्या खाजगी गोष्टीत लुडबुड करायची गरज नाही…तू फक्त तुझ्या गोष्टींवर लक्ष देत जा…” निशा म्हणाली.
” लुडबुड मी नाही…तुम्ही करताय माझ्या संसारात…” वृषाली म्हणाली. आणि तणतणतच तिच्या खोलीत निघून गेली. निशांत तिला काहीतरी म्हणेल या आशेने तिने त्याच्याकडे पाहिले तर निशांत गुपचूप वृषालीच्या मागे खोलीत निघून गेला. मग निशा तिच्या वडिलांना म्हणाली.
” पाहत आहात बाबा…कशी बोलली ती मला…हिला काय माहित हो माझ्या लग्नाबद्दल…मला म्हणतेय संसार करता नाही आला…”
तिचे बाबा गप्पच होते.
” बाबा…तुम्ही काही बोलत का नाही आहात तिला…?” निशा पुन्हा म्हणाली.
” हे बघ…तिचा मुलगा पडला म्हणून तिला राग येणं स्वाभाविक आहे…तू जरा लक्ष ठेवायला हवं होतंस…आणि जरा नरमाई बोलत जा तिच्याशी…” असे म्हणत वसंतराव तिथून निघून गेले.
आता मात्र निशा एकदम आश्चर्य चकित झाली. तिचे बाबा तिच्या बाजूने न बोलता चक्क वृषालीच्या बाजूने बोलत होते. ते ही वृषाली त्यांच्याच समोर ताडताड तिला बोलून गेली तरीही. पूर्वी निशा चुकीची असली तरीही तिची बाजू धरून बोलणारे तिचे बाबा आज तिला एवढं अपमानास्पद बोलल्या वरही तिच्याकडून दोन शब्द ही बोलायला तयार नव्हते.
निशा आता स्वतःच्याच घरात परकेपणा अनुभवत होती. तिची आई तिच्याजवळ आली आणि म्हणाली.
” निशा…वृषाली ने तुला असं तोडून बोलायला नको होतं…”
” म्हणजे झाल्या प्रकरणात माझी चूक नव्हती…वृषालीची होती असे म्हणायचे आहे का तुला…” निशा ने विचारले.
” हो…” आई म्हणाली.
” पण बाबांना तसे वाटत नाही ना…आता त्यांना माझ्या मानापमानाची जराही काळजी नाही…” निशा म्हणाली.
” हे बघ निशा…परिस्थिती नेहमीच एकसारखी राहत नाही…आणि माणसे सुद्धा परिस्थिती नुसार बदलतातच…म्हणूनच आयुष्यातले निर्णय घेताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे असते…नाहीतर हातात पश्चात्ताप करण्यावाचून काही शिल्लक राहत नाही…” आई म्हणाली आणि तिथून निघून गेली.
निशा मात्र आईच्या बोलण्याचा विचार करत राहिली. आई हल्ली काय बोलते ह्याचा तिला संदर्भच लागत नाही. या आधी आई आपल्याला असे काही बोलायची नाही पण हल्ली काहीही बोलायला मागे पुढे पाहत नाही. आई आपल्याला काय सुचवू पाहतेय ते तिला कळतच नव्हते.
त्यानंतर असे प्रकार रोजच घडायला लागले. वृषाली आता कशाचीही भीड न ठेवता निशाला सुनावून द्यायची. घरकामात तिच्याकडून हक्काने मदत मागायची. एकदा ती वसंतरावांना म्हणाली.
” बाबा…मला, निशांत ला आणि बाळाला आता आमची रूम लहान वाटतेय…बाळाचे सामान सुद्धा वाढले आहे त्यामुळे रूम अगदीच भरलेली वाटते…”
” मग…तुझ्या डोक्यात काही उपाय आहे का ह्यावर…?” वसंतरावांनी विचारले.
” हो…म्हणजे मला असं वाटतंय की निशा ताईंची आणि आमची खोली जर एक केली तर बरीच मोठी रूम होईल…” वृषाली म्हणाली.
” काय…? माझी रूम…?” निशा मोठ्याने म्हणाली.
” हो…म्हणजे तुम्ही एकट्याच असता…तुम्हाला एवढ्या मोठ्या रूमची काय गरज…आणि तसेही तुम्ही काय नेहमी या घरात राहणार आहात…आज ना उद्या तुमचे दुसरे लग्न होईल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या हक्काच्या घरी जाल…मग तुम्हाला एवढ्या मोठ्या रूमची गरज तरी काय ना…?” वृषाली खोटे खोटे हसत म्हणाली.
” दुसरं लग्न…? माझं…? बाबा ही काय बोलतेय…?” निशा ने आश्चर्याने विचारले.
वसंतराव काही बोललेच नाही. मग वृषालीच पुढे म्हणाली.
” म्हणजे…? तुम्हाला अजून कल्पनाच नाही तर…बाबा तुमच्यासाठी स्थळ पाहत आहेत…”
” हे काय ऐकतेय मी बाबा…माझ्यासाठी स्थळे कशाला पाहताय तुम्ही…? तुम्हाला माहिती आहे मला दुसरं लग्न करायची अजिबात इच्छा नाही…” निशा म्हणाली.
” हे बघ…आता तुझी इच्छा असून नसून काही उपयोग नाही… तसंही तुला आता ते कळणार सुद्धा नाही…मी जे काही करतोय ते तुझ्या भल्यासाठीच…शेवटी आणखी किती दिवस तू अशीच माहेरी बसून राहणार आहेस…आम्हाला सुद्धा लोकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात…म्हणून आम्ही ठरवलंय की तुझं दुसरं लग्न करायचं…” वसंतराव निर्धाराने म्हणाले.
” पण मी दुसरं लग्न करणार नाही…” निशा ओरडतच म्हणाली.
” तुला करावंच लागेल…एकदा तुझ्या मनाप्रमाणे लग्न लावून दिलं होतं ना तुझं…पण तुला संसार टिकवता आला नाही…म्हणून आता सगळं काही मी ठरवेल…आणि तुला सुद्धा माझी निवड मान्य करावीच लागेल…” वसंतराव म्हणाले आणि तिथून निघून गेले.
निशा एकदमच भूतकाळात गेली. तिने कधीच विचार केला नव्हता की तिचे बाबा असे वागतील. तिला वाटले होते की बाबांसाठी ती कधीच भार होणार नाही. कारण ती बाबांची सगळ्यात जास्त लाडकी आहे असेच तिला वाटायचे.
पण वेळेनुसार आपल्या माणसांचे वागणे सुद्धा बदलते ह्याची तिला जाणीव होत होती. आणि या एका जाणिवेने तिने आजवर केलेल्या सगळ्याच चुकांची तिला नव्याने जाणीव होत होती. आपण भूतकाळात किती वाईट निर्णय घेतले आहेत ह्याची तिला उपरती होत होती.
निशा मनापासून दुःखी होती. तिचे वडील तिच्यासाठी मुलगा शोधत होते. ह्यावेळी निशाचा संसार नव्याने उभा करणे हे उद्दिष्ट नसून फक्त समाजात नाचक्की होण्यापासून वाचणे हे होते. मग त्यांना कसेही स्थळ चालले असते. फक्त मुलगा तोलामोलाचा असावा हीच त्यांची अपेक्षा होती.
क्रमशः