एकदा निशाला तिच्या एका मैत्रिणीचा रेणुकाचा फोन आला. तिचे नुकतेच बाळंतपण झाल्याने ती सध्या माहेरीच होती. सहज म्हणून तिने निशाला फोन लावला आणि बोलता बोलता घरी भेटायला हे असे म्हणाली. एरव्ही कुणाच्याही घरी लवकर जायला तयार न होणारी निशा लगेच तयार झाली. त्याचे मैत्रिणीला ही नवल वाटले. कारण कॉलेज मध्ये निशा नेहमीच तोऱ्याने वागायची. तिच्या एक दोन मैत्रिणी सोडल्या तर तिचं कुणाशीच पटायचं नाही.
निशा रेणुकाच्या घरी आल्यावर खूप आपुलकीने वागली होती. तिच्या मुलाला तर सतत खेळवत होती. रेणुकाला तिला पाहून खूप नवल वाटले. शेवटी न राहवून ती निशाला म्हणाली.
” निशा…तू तर पूर्णपणे बदललीस ग…तुझ्या आधीच्या आणि आताच्या स्वभावात कमालीचा बदल झालाय… असे नेमके काय घडले की तुझा स्वभाव इतका बदलला…”
” परिस्थिती सगळं काही बदलायला भाग पाडते…सगळे दिवस सारखे नसतात ग…पण कधीकधी ह्या गोष्टीची जाणीव व्हायला खूप उशीर होतो…अन् मग उरतो तो फक्त पश्चात्ताप…” निशा म्हणाली.
” मला कळतंय…तू अजूनही साकेतला विसरू शकलेली नाहीस…पण असे काय घडले तुमच्यात की गोष्ट सरळ घटस्फोटापर्यंत येऊन पोहचली…” रेणुका ने विचारले.
इतक्या दिवसांनंतर जुन्या जखमेवरची खपली निघाल्याने निशाच्या मनाचा बांध फुटला आणि तिने रडतच रेणुकाला झालेल्या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली. आणि सोबत हे सुद्धा सांगितले की तिला कधीच साकेत पासून वेगळे व्हायचे नव्हते. पण नेमकं काय अन् कुठे चुकलं ते तिचं तिलाही कळलं नव्हतं.
निशाचे बोलणे ऐकून रेणुका म्हणाली.
” खरंय…नवरा बायकोच्या नात्यात कुण्या तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप झाला की नातं बिघडायला वेळ लागत नाही…इथे तू सुद्धा खुश नाहीस आणि तिकडे बिचारा साकेत…”
साकेतचा उल्लेख आला बरोबर निशाने आश्चर्याने विचारले.
” साकेत बद्दल काय म्हणालीस तू… बिचारा साकेत म्हणजे…? कसा आहे तो…? दुसरं लग्न केलं असेल ना त्याने…?”
” म्हणजे…तुला खरंच साकेत बद्दल काहीच माहिती नाही का…?” रेणुका ने आश्चर्याने विचारले.
” नाही…आधी माझ्यातल्या अहंकाराने आणि नंतर पश्चात्तापाने मी साकेत बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्नच नाही केला…उलट मला भीती वाटायची की तो कधी त्याच्या दुसऱ्या बायको आणि मुलांसोबत दिसला तर मला ते सहन होणार की नाही…” निशा म्हणाली.
” अगं…त्याने दुसरं लग्न केलंच नाही…तुमचा घटस्फोट झाल्यावर काही दिवस तो कुणाशीच बोलत नव्हता…मग हळूहळू दारूकडे वळला…आणि दोन वर्षापूर्वी दारूच्याच नशेत त्याचा अपघात झाला…” रेणुका ने सांगितले.
” काय…? साकेतचा अपघात झाला…? कसा आहे तो…?” निशा जवळपास किंचाळतच म्हणाली.
” तो आता बरा आहे…पण अपघातामुळे त्याचा उजवा हात जवळपास निकामी झालाय…” रेणुका ने सांगितले.
” पण तो ठीक आहे ना आता…?” निशाने विचारले.
” हो…तो ठीक आहे…म्हणजे मी सुद्धा हे सगळं बाहेरून ऐकलंय…इतक्या वर्षात मी सुद्धा त्याला पाहिलेलं नाही…” रेणुका म्हणाली.
हे ऐकून मात्र निशा बेचैन झाली. ती तशाच मनस्थितीत घरी आली. काय करावे तिला कळत नव्हते. त्या दिवसापासून ती जरा गप्प गप्पच असायची. पण तिच्या या अवस्थेकडे आशाताईंचे सोडून कुणाचे फारसे लक्ष गेले नाही. पण आशाताई सुद्धा काही करू शकत नव्हत्या.
इकडे वसंतरावांना निशासाठी लवकरच त्यांच्या अपेक्षेप्रमाणे स्थळ मिळाले. नवरा मुलगा चांगलाच श्रीमंत होता. त्याला पंचक्रोशीत मान होता. वसंतरावांनी वेळ न दवडता त्यांना मुलगी पाहण्यासाठी आमंत्रण देऊन टाकले. निशा लग्नाला तयारच होत नव्हती.
मात्र त्यांनी घराण्याची इभ्रत वाचवायची असेल तर तुला लग्न करावेच लागेल अशा एक ना अनेक प्रकारे गोड बोलून तिची समजूत घातली. नाईलाजाने ती कशीतरी तयार होऊन मुलाकडच्यांसमोर गेली. पण हे लग्न करण्याचे तिच्या मनातच नसल्याने तिने तिला पाहायला आलेल्या मुलाला बघितले सुद्धा नाही.
थोडा वेळ पाहुण्यांसमोर राहून ती पुन्हा आत निघून आली. पण आशा ताईंनी जेव्हा नवऱ्या मुलाला पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. तो खूपच वयस्कर होता. वसंतरावांपेक्षा सात आठ वर्षांनी लहान असेल बहुधा. पाहुणे मंडळी गेल्यावर आशाताईंनी वसंतरावांना विचारले.
” अहो तुम्ही हे काय करताय…? त्या मुलाचे वय किती जास्त आहे…तुमच्यापेक्षा थोडाच लहान असेल तो…त्याच्याशी तुम्ही आपल्या निशाचे लग्न कसे काय लावू शकता…?”
” तिचं पहिलं लग्न नाहीये…दुसरं लग्न आहे…आणि दुसऱ्या लग्नात एवढ्या मिजास बऱ्या नाहीत…आणि त्यांच्या घरी कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही…निशा राणीसारखी राहील तिथे ह्याची खात्री आहे आम्हाला…आणि ही सोयरिक झाली तर समाजात पत वाढेल आपली…” वसंतराव म्हणाले.
” अहो पण निशाचे वय खूप कमी आहे…त्यांना निशापेक्षा थोड्याच लहान वयाची दोन मुलं आहेत…कसं होईल पोरीचं…?” आशाताईंनी शंका उपस्थित केली.
” तुम्ही काळजी नका करू…सगळं काही ठीक होईल…” वसंतराव म्हणाले.
इकडे निशा मात्र काळजीत होती. तिला दुसरे लग्न करायचे नव्हतेच मुळी. अजूनही ती साकेतला विसरू शकली नव्हती. अशातच त्याच्याबद्दल ऐकून तर ती अजूनच बेचैन झाली होती. अशातच तिच्या वडिलांनी तिच्या दुसऱ्या लग्नासाठी दाखवलेली घाई बघता तिच्या बाबांशी लवकर बोलून त्यांना नकार कळवणे तिला गरजेचे वाटले.
त्या दिवशी ती बाबांच्या खोलीत गेली आणि त्यांना म्हणाली.
” बाबा…मला दुसरं लग्न करायचं नाही…”
” आणि मी पण तुला सांगितलंय की तुला दुसरं लग्न करावेच लागेल…किती दिवस अशी माहेरी बसून राहणार आहेस…लोक आम्हाला नाही नाही ते प्रश्न विचारतात…तुझ्यामुळे बरेचदा मला चारचौघांसमोर गप्प राहावे लागते…पण आता हे आणखी चालणार नाही…” वसंतराव म्हणाले
” पण बाबा… तुम्हीच म्हणायचा ना की मी तुम्हाला भार नाही…तुम्हाला मला नेहमी आनंदात पाहायचं म्हणून…मग आता का माझ्या मनाविरुद्ध माझं लग्न लावायचा विचार करत आहात…? आणि मी माहेरी राहणे तुम्हाला आवडत नसेल तर मग साकेत सोबत माझा घटस्फोट का घडवून आणलात…?” निशा ने विचारले.
” कारण त्या साकेतच घराणं आपल्या तोलामोलाचं नव्हतंच मुळी…तरीही मी केवळ तुझ्या हट्टाखातर तुझं त्याच्याशी लग्न लावून दिलं…पण तिथेही तू निभावून घेऊ शकली नाहीस…मग त्या घराशी नातं तोडण्याची ती एक संधीच होती ना…आणि एका घटस्फोटित मुलीला असं किती दिवस घरात बसवून ठेवणार आहे मी…मलाही याच समाजात राहायचं आहे…त्यामुळे हे लग्न होणारच हे निश्चित आहे…मी परवा त्यांना साखरपुड्याचे आमंत्रण दिले आहे…आणि पुढच्या पंधरा दिवसात लग्न होईल…आणि हे नक्की आहे…ह्यात अजिबात बदल होणार नाही…आणि तुला माझे ऐकावेच लागेल…” वसंतराव निर्धाराने म्हणाले.
आता मात्र निशाचा धीर सुटत चालला होता. आधीच जुन्या चुका आठवून ती पश्चात्तापात जळत होती आणि वरून तिच्या मनाविरुद्ध तिच्या बाबांनी परस्पर तिचं दुसरं लग्न ठरवलं देखील. त्या दिवशी ती रात्रभर झोपू शकली नाही. तिने रात्रभर विचार केला. आणि कसल्याशा निर्धाराने सकाळीच ती कुणालाही न सांगता घराबाहेर पडली.
घरातून निघाली तशी ती तडक रेणूकाच्या घरी गेली. सकाळीच तिला आपल्या घरात पाहून रेणुका म्हणाली.
” निशा…तू इतक्या सकाळी…आणि ते ही न कळवता…?”
” हो…कारणच तसे आहे…मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे सध्या…” निशा म्हणाली.
” कसली मदत…?” रेणुका ने विचारले.
” मला साकेतशी बोलायचे आहे…” निशा म्हणाली.
” साकेत शी…पण काय बोलायचंय…?” रेणुका ने विचारले.
” ते तर मलाही माहित नाही…पण तू प्लिज काहीतरी करून माझी त्याच्याशी भेट घालून दे ना…” निशा म्हणाली.
मग रेणुकाने सुद्धा फारसे आढेवेढे न घेता तिच्या भावाला सांगितले की साकेतला फोन करून काहीतरी कारण सांगून तातडीने घरी बोलाव.
साकेत रेणुकाच्या घरी आला तोच साशंक मनाने. कारण हल्ली तो फारसा लोकांमध्ये मिसळत नसे. त्यामुळे रेणुकाच्या भावाला आपल्याशी इतक्या तातडीचे काय काम पडले ते त्याला कळत नव्हते. तो घरी आला आणि आल्यावर त्याची नजर निशावर पडली. इतक्या वर्षानंतर अचानक ध्यानी मनी नसताना निशा समोर दिसल्यावर त्याला धक्काच बसला.
क्रमशः
भाग ६ –
तुझ्याविना मी – भाग ६