निशाला अचानक समोर पाहून काय बोलावे आणि काय प्रतिक्रिया द्यावी हे साकेतला काही कळत नव्हते. तिला पाहताच भूतकाळाच्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर तरळल्या. क्षणात त्याच्या डोळ्यात राग आणि प्रेम ह्या दोन्ही भावना दाटून आल्या. पण प्रेमावर रागाच्या भावनेने विजय मिळवला आणि तो तिथून निघून जायचे म्हणून परत फिरला. तोच निशा घाईने त्याच्या समोर येऊन उभी राहिली. त्यानंतर मात्र साकेतचे पाऊल पुढे पडायला तयार झाले नाही. मग निशाच त्याला म्हणाली.
” साकेत…तू कसा आहेस…?”
” तुला काय त्याचं…?” साकेत नाराजीने म्हणाला.
” मला माहित आहे…तू खूप जास्त नाराज आहेस…तुला माझा खूप राग येत असेल…पण मला तुझ्याशी काही बोलायचं आहे… प्लिज ऐकून घे…” निशा काकुळतीला येऊन म्हणाली.
” आता काय बोलायचं आहे तुला…आता बोलण्यासारखं काय आहे…?” साकेत चिडून म्हणाला.
” मला तुझी माफी मागायची आहे…” निशा म्हणाली.
” माफी…आणि आता…इतक्या वर्षानंतर…आणि त्याने काय होणार आहे…?” साकेत पुन्हा चिडून म्हणाला.
” तू मला माफ केलंस तर माझ्या मनावरचं ओझं कमी होईल…” निशा म्हणाली.
” तुझ्या मनावरचं ओझ कमी होईल…इथे ही स्वतःचाच विचार करणार आहेस ना तू…जाऊदे…दुसरं करणार तरी काय आहेस तू…जा…मी माफ केलं तुला…” साकेत म्हणाला.
” मग मला आणखी एक संधी देशील…?” निशा ने विचारले.
” संधी…? कसली संधी…?” साकेत ने चमकून तिच्याकडे पाहत म्हटले.
” मला पुन्हा तुझ्या आयुष्यात जागा दे…” निशा म्हणाली.
साकेतला क्षणभर काही सुचलेच नाही. मग निशा पुन्हा म्हणाली.
” मला माझ्या चुकांच प्रायश्चित्त करू दे…माझ्या हट्टामुळे मोडलेला संसार पुन्हा एकदा उभा करू दे…” निशा म्हणाली.
” तू काय बोलत आहेस तुझं तुला तरी कळतंय का…?” साकेत ने कसेबसे विचारले.
” हो…मला सगळं कळतंय…आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे…” निशा म्हणाली.
” पण अचानक का…? आणि तेव्हा तू माझ्यासोबत नाही राहू शकलीस तर आता कशी राहू शकणार आहेस…आता मी पूर्वीप्रमाणे नाही राहिलो…अनेक कामांसाठी मला इतरांवर विसंबून राहावे लागते… अशात मी तुला कसा आधार देणार…? की तू माझ्यावर दया येऊन असे म्हणत आहेस…” साकेत म्हणाला.
” असे नाही साकेत…मी आधी खूप चुकीची वागले हे मला मान्य आहे…पण तेव्हा ही माझे तुझ्यावर खूप प्रेम होते आणि आज ही आहे…फक्त तेव्हा माझा अहंकार माझ्या प्रेमावर भारी पडला होता आणि आज माझं प्रेम इतर सगळ्या गोष्टींवर मात करून तुझ्या दिशेने धाव घेत आहे…” निशा म्हणाली.
” निशा…तू अविचार करत आहेस…असे भावनिक होऊन पुन्हा एकत्र येणे योग्य नाही…मला कुणावर ओझे बनून राहायचे नाही…हे मला मान्य नाही…” साकेत म्हणाला. आणि तिथून जायला लागला. निशा पुन्हा त्याच्या समोर येऊन त्याला अडवत म्हणाली.
” ओझे… प्लिज असे काही नको बोलूस… उलट तू मला तुझ्या आयुष्यात जागा दिलीस माझ्यासारखे भाग्यवान कोणी नसेल…मला गरज आहे तुझी…तुझ्या प्रेमाची…आज मी सगळे मोहपाश तोडून तुझ्याकडे आलीय…तुझ्याकडे तुझ्या प्रेमाची, तुझ्या सोबतीची याचना करतेय…तू प्लिज माझा स्वीकार कर…नाहीतर माझ्या आयुष्यात काहीच उरणार नाही…तू माझ्या आयुष्यात नसलास तर इतर कोणतेही सुख मला नको आहे…” निशा म्हणाली.
आता मात्र साकेत विरघळला. निशावर त्याचे प्रेम अजूनही होतेच. फक्त त्याला रागाचे पांघरून पडले होते. पण आज निशा ने स्वतःहून त्याच्या आयुष्यात पुन्हा यायची याचना केल्यावर त्यालाही राहवले गेले नाही. तो तिला म्हणाला.
” निशा… खरंतर मलाही तू माझ्या आयुष्यात हवी आहेस…तू जेव्हा नको त्या हट्टापायी घर सोडून गेलीस तेव्हा मी सुद्धा स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून तुला समजावण्याचा प्रयत्न करायला हवा होता…पण तसे न करता मी सरळ घटस्फोटाचा मार्ग निवडला…माझे ही चुकलेच…तुझ्याशिवाय मी सुद्धा घुटमळत होतो आजवर…पण तू पुन्हा माझ्या आयुष्यात येशील असा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता… पण जर हे शक्य असेल तर मलाही हे हवे आहे…” साकेत म्हणाला.
हे ऐकून निशाच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने पुढे येऊन साकेतला मिठी मारली. काही क्षण दोघेही त्या मिठीत हरवले होते. नंतर जेव्हा भानावर आले तेव्हा बघितले तर रेणुका त्यांना बघून हसत होती. तिला बघून दोघेही ओशाळले. त्यानंतर साकेतनेच बोलायला सुरुवात केली.
” आता पुढे काय करायचे ठरवले आहेस…? घरच्यांना जाऊन आपल्याबद्दल सांगायचे का…?”
” नाही…आपलं ठरलंय ना…मग आधी जाऊन लग्न करायचे…ते सुद्धा लवकरात लवकर…म्हणजे उद्याच…” निशा म्हणाली.
” उद्याच…?” साकेत ने आश्चर्याने विचारले.
” हो…उद्याच…” निशा ठामपणे म्हणाली.
तिकडे निशाच्या घरी इतक्या सकाळी सकाळी निशा कुठे गेली म्हणून तिचे बाबा तिच्या आईला विचारत होते. तेव्हा आई म्हणाली.
” अहो…तिच्या मैत्रिणी कडे गेली असेल…तिलाही बरं वाटतं जरा बाहेर पडली की…” आशाताई म्हणाल्या.
” हो…पण दोन दिवसात साखरपुडा आणि पंधरा दिवसात लग्न उरकायच आहे…आणि अशात तिचे एकटीने बाहेर जाणे बरोबर नाही…” वसंतराव म्हणाले.
” मी सांगेन तिला…” आशाताई म्हणाल्या.
इतक्यात निशा घरी आली. तिला घरी आलेलं पाहून वृषाली मुद्दाम मोठ्याने म्हणाली.
” निशाताई…आल्यात का बाहेर फिरून…?”
यावर निशा काहीच बोलली नाही. मग वृषालीच पुढे येत म्हणाली.
” निशा ताई…आता लवकरच तुमचं लग्न होणारच आहे तर रूम मधील तुमचं गरजेचं समान पॅक करायला सुरूवात करा…म्हणजे आम्हालाही शिफ्ट व्हायला जरा बरं पडेल…”
” तू काळजी नको करू वृषाली…लवकरच रूम खाली करेन मी…” वृषाली म्हणाली.
” नाही…म्हणजे तशी मला काही घाई नाही…पण तुमचं जे महत्त्वाचं सामान असेल ते इथेच राहायला नको म्हणून सांगतेय…” वृषाली म्हणाली.
” ठीक आहे…” एवढे बोलून निशा तिच्या खोलीत निघून गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच निशा तिच्या घरून बाहेर पडली आणि सरळ आदल्या दिवशी ठरलेल्या गावाबाहेर असलेल्या देवीच्या मंदिरात गेली. तिथे रेणुकाच्या भावाने लग्नाची सगळी तयारी आधीच करून ठेवलेली होती. रेणुका आणि साकेत सुद्धा तिथे हजर होते. देवीच्या आशीर्वादाने लवकरच दोघांचे लग्न लागले.
पहिल्या लग्नाच्या वेळी सुद्धा तिला जितका आनंद झाला नसेल तितका आज झाला होता. आयुष्याने जणू तिला एक दुसरी संधीच दिली होती जगण्याची. दोघांच्या नजरेतून आनंद ओसंडून वाहत होता आणि ते पाहून रेणुकाला सुद्धा ह्या दोघांना एकत्र आणल्याचा खूप आनंद होत होता.
इकडे आजही निशा सकाळी सकाळपासून घरी नाही हे वृषालीच्या लक्षात आले आणि तिने ते जाणूनबुजून वसंतरावांच्या लक्षात आणून दिले. वसंतराव आशाताईंना जोरात म्हणाले.
” मी तुम्हाला काल सांगितले होते ना की निशाला जरा समजावून सांगा…काय चालवलंय हिने…”
” अहो…तिची मनस्थिती जरा चांगली नाही…अशा वेळेला आपण तिला समजून घ्यायला हवं…” आशाताई म्हणाल्या.
” मनस्थिती वगैरे ठिक आहे तिची…ती स्वतःचा हट्ट खरा करू पाहत आहे…तिला वाटतंय तिच्या अशा वागण्याने मी हे स्थळ नाकारेल…पण मी सुद्धा तिचा बाप आहे…मी तिच्या अशा वागण्याला मुळीच बळी पडणार नाही…काहीही झालं तरी हे लग्न लवकरात लवकर करून देईल मी…मग तिच्या सासरी बसून कर म्हणावं असले नखरे…” वसंतराव तावातावाने म्हणाले.
” अहो पण तुम्ही खरंच पुन्हा एकदा विचार करा ना…तो मुलगा खूप वयस्कर…” आशाताई म्हणाल्या पण वसंतरावांनी त्यांच्याकडे रागाने पाहिले तसे त्यांच्या तोंडातील शब्द तोंडातच राहिले. वसंतराव पुढे म्हणाले.
” मला फक्त तिचं लग्न होऊन ती सासरी गेलेली हवीय…मग मुलगा कसा ही असला तरी मला पर्वा नाही…” वसंतराव म्हणाले.
इतक्यात दारावरची बेल वाजली. वृषालीने दार उघडले आणि समोरचे दृश्य पाहून मोठ्याने ओरडली.
” निशाताई…”
तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून सगळ्यांनी दरवाजाकडे पाहिले. तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला. दारात निशा आणि साकेत नवरदेव आणि नवरीच्या वेशात, गळ्यात हार घालून समोर उभे होते. वसंतराव मोठ्याने ओरडले.
” हे सगळं काय आहे…हा इथे काय करतोय…आणि तू कुठे गेली होतीस सकाळी सकाळी…आणि हे कपडे काय घातले आहेस…”
निशा खाली मान घालून गप्प उभी होती.
” खाली काय बघत आहेस…माझ्याकडे बघ…हे सगळं काय चाललंय…?”
” बाबा…मी लग्न केलंय…साकेतशी…” निशा बाबांकडे पाहत म्हणाली. निशाच्या नजरेत निर्धार दिसत होता.
” काय…? ज्याच्याशी घटस्फोट घेतलास त्याच्याशीच पुन्हा लग्न केलंस…आणि तुझी हिम्मत कशी झाली असे करण्याची…? कुणाला विचारून हा निर्णय घेतलास तू…?” वसंतराव रागाने थरथरत म्हणाले.
” माझ्या जवळ दुसरा पर्याय नव्हता बाबा…तुम्ही माझं काहीच ऐकायला तयार नव्हते…तुम्हाला काहीही करून माझे लग्न लावून द्यायचे होते…पण मी आजवर साकेत सोडून इतर कुणाचाही विचार केला नाही…माझं साकेत वर खूप प्रेम आहे…मी त्याच्यापासून वेगळी राहिली पण मनात नेहमीच त्याची आठवण जपली…मी त्याचापासून दूर राहून कशीतरी जगले पण तो माझ्या मनात असताना मी इतर कोणाचाही विचार करू शकत नाही…लग्नाचा तर नाहीच नाही…पण तुम्ही काहीच ऐकायला तयार नव्हते…म्हणून मी तुम्हाला न सांगता साकेतशी पुन्हा एकदा लग्न केले…” निशा म्हणाली.
” आणि इतकं सगळं केल्यावर तुझी हिम्मत तरी कशी झाली माझ्यासमोर येऊन उभ राहायची…तुला काय वाटलं…मी तुम्हाला आशीर्वाद देणार…कधीच नाही…मला आधी सुद्धा हा कधीच पसंत नव्हता…आणि आता तर एका हाताने अधू झालाय…आमच्या घरचा जावई म्हणून मी ह्याला कधीच स्वीकारणार नाही…त्याला म्हणावं माझ्या घरातून निघून जा…” वसंतराव पुन्हा रागाने म्हणाले.
क्रमशः
भाग ७ –
तुझ्याविना मी – भाग ७