इतकी वर्षे लाडाकोडात वागवलेल्या आपल्या मुलीचे आपण स्वतःहून अशा माणसाशी लग्न लावणार होतो ह्या जाणिवेने त्यांच्या काळजात धस्स झाले. स्वतःच्या चुकीची जाणीव आणि निशा ला दिलेल्या वाईट वागणुकीचा पश्चात्ताप एकत्रच त्यांच्या डोळ्यात तरळला. आता त्यांना निशाला भेटण्यावाचून चैन पडणार नव्हते. ते तसेच तिथून निघायला लागले.
इतक्या वेळ ह्या दोघांच्याही गोष्टी ऐकत असलेली वृषाली अचानक वसंतरावांच्या समोर आली आणि त्यांना म्हणाली.
” काय झाले बाबा…? इतक्या तडकाफडकी कुठे निघालात…?”
” निशाकडे…तिची माफी मागायला…?” वसंतराव घाईघाईने म्हणाले.
” निशाताईंची माफी मागायला…म्हणजे त्यांनी जे काही तुमच्यासोबत केले ते तुम्ही विसरणार आहात का…? त्यांनी तुमच्या इभ्रतीचा विचार न करता त्या साकेत सोबत लग्न केले हे तुम्ही विसरणार आहात का…?” वृषाली ने आश्चर्याने विचारले.
” मला कळून चुकलय की मी अजाणतेपणी चूक करणार होतो…माझ्या मुलीचा हात एका नराधम माणसाच्या हातात देणार होतो…ते ही फक्त इभ्रतीचा विचार करून…उलट तिने तर साकेतशी लग्न करून मला एक गुन्हा करण्यापासून रोखले आहे…नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो…” वसंतराव म्हणाले आणि घाईघाईने तिथून जायला निघाले.
” पण बाबा…” वृषाली काहीतरी बोलणार होती पण ते ऐकायला वसंतराव तिथे उभे नव्हतेच. वृषाली तिथेच चरफडत उभी राहिली. इतक्यात तिच्यासमोर आला. त्याला पाहून ती म्हणाली.
” अहो तुम्ही बघताय ना…बाबा एकदम तडकाफडकी निशा ताईकडे गेलेत…तुम्ही तरी अडवा त्यांना…”
” निशाताई बाबांची सगळ्यात लाडकी आहे…ते काही वेळापुरते तिच्यावर नाराज होते पण ही नाराजी फक्त काही दिवसांसाठी च आहे हे मला चांगलेच माहिती होते…आणि मला वाटतं आता तू ही हे सत्य स्वीकारायला हवे…तुझ्या बोलण्यात येऊनच बाबांनी त्या श्रीकांत पाटलांचे स्थळ निशाताई साठी पसंत केले होते हे मला चांगलेच माहीत आहे…पण दैवयोगाने तसे काही घडले नाही…माझ्या निशाताईचे आयुष्य वाचले…
त्यामुळे ह्यातून काय समजायचं ते समजून घे आणि वेळीच सावर…निशा ताई जरा हट्टी होती आणि त्यामुळे लग्न करून आल्यावर तुला घरात अडजस्ट करायला खूप त्रास झाला हे मला मान्य आहे…पण निशाताई मनाने वाईट नाही…माझ्या ताईचा इतका राग नको करुस की पुढे तुलाच पश्चात्ताप होईल…” निशांत म्हणाला आणि तिथून निघून गेला.
निशांतचे बोलणे ऐकून वृषाली खजील झाली. आपण निशा ताईचा नको तितका राग केला हे तिला कळून चुकले होते आणि स्वतःची चूक लक्षात सुद्धा आली होती. इकडे वसंतराव तडक निशाकडे जायला निघाले होते.
निशाच्या सासरी ते पोहचले तेव्हा त्यांना पाहून निशाच्या सासरची मंडळी आश्चर्यचकित झाली. कारण ह्या लग्नाबद्दल त्यांची असणारी नाराजी ते जाणून होते. आताही आणि पूर्वीही. आज ते अचानक का आले असतील हे त्यांना कळत नव्हते. आणि त्यांना नेमके विचारायचे कसे हे सुद्धा साकेतच्या वडिलांना कळत नव्हते.
निशा च्या वडिलांनी सुद्धा इकडच्या तिकडच्या गप्पा न करता सरळ त्यांना प्रश्न विचारला की निशा कुठे आहे. तेव्हा त्यांनी सांगितले की ते दोघेही शेतावर गेलेत. मग जास्त औपचारिक न होता वसंतराव तिथून सरळ त्यांच्या शेताकडे जायला निघाले. कारण त्यांना यावेळी सर्वात आधी त्यांच्या मुलीला भेटायचे होते. तिला पाहायचे होते.
निशा चे सासरे सुद्धा त्यांच्यासोबत शेतात जायला सोबत म्हणून आले होते. वसंतराव शेतात पोहचले आणि दुरूनच त्यांना शेतमालाची पाहणी करताना निशा आणि साकेत दिसले. सोबत काही मजूर सुद्धा होते. ते निशाकडे जायला निघाले. निशाने सुद्धा दुरून येणाऱ्या वसंतरावांना पाहिले आणि ती सुद्धा त्यांच्या दिशेने चालायला लागली.
साकेत या दोघांकडे आश्चर्याने बघत उभा होता. नेमकं काय चाललंय हे त्यालाही कळत नव्हतं. पण वसंतरावांना असे अचानक पाहून काहीतरी वाईट तर होणार नाही ना अशी आशंका त्याच्या मनात दाटून आली. इकडे निशा मात्र इतक्या दिवसानंतर वडिलांना पाहून खूप आनंदली होती. त्याच आनंदाच्या भरात ती झपझप पावलं टाकत त्यांच्याकडे चालली होती.
अचानक तिच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला आणि काही कळायच्या आतच ती खाली कोसळली. मात्र वसंतरावांनी वेळीच येऊन तिला सावरले. पण तिला असं बेशुद्ध झालेलं पाहून ते घाबरले होते. इतक्या दिवसांनंतर त्यांनी त्यांच्या मुलीला पाहिले होते.
आज सगळा अबोला संपवून आपल्या लेकीला जवळ करायला आलेल्या वडिलांना मुलीला अशा अवस्थेत पाहून काहीच सुचत नव्हते. इतक्यात साकेत, त्याचे वडील आणि त्याच्या शेतातील काही मजूर धावतच तिथे आले आणि सगळ्यांच्या मदतीने निशाला लगेच दवाखान्यात घेऊन गेले.
वसंतरावांनी लगेच फोन करून निशांतला निशाच्या तब्येतीबद्दल कळवले. तो सुद्धा त्याच्या आईला घेऊन हॉस्पिटलला जायला निघाला. वसंतरावांना आता निशाची खूप काळजी वाटत होती. इकडे साकेत सुद्धा निशाला अशा अवस्थेत पाहून जरा घाबरलाच होता. वसंतराव साकेत जवळ आले आणि त्यांनी त्याच्या खांद्यावर आश्वासक असा हात ठेवला.
दोघांमध्ये ही काहीच संवाद झाला नाही पण वसंतरावांची आश्वासक नजर पाहून साकेतला जरा धीर आला. इतक्यात डॉक्टर बाहेर आले. त्यांना पाहताच वसंतराव त्यांना म्हणाले.
” निशाला काय झालंय डॉक्टर…सगळं काही ठीक आहे ना…”
” सगळं ठीक आहे…काळजी करण्याचे काही कारण नाही…फक्त अशा अवस्थेत त्यांना जरा जास्त जपावे लागेल…” डॉक्टर म्हणाले.
” अशा अवस्थेत म्हणजे…?” साकेत ने विचारले. एव्हाना सगळ्यांना हाच प्रश्न पडला होता.
” म्हणजे त्या प्रेग्नेंट आहेत…” डॉक्टर म्हणाले.
डॉक्टरांचे बोलणे ऐकून साऱ्यांनाच आनंद झाला. साकेत तर अगदी हरखून गेला होता. वसंतरावांच्या डोळ्यात सुद्धा आनंदाश्रू दाटून आले होते. त्यांच्या लाडक्या निशाच्या बाळाला खेळवण्याचे स्वप्न त्यांनीही आधी अनेकदा पाहिले होते. आज ते प्रत्यक्षात उतरत होते. त्यांना निशाला भेटण्याची घाई झाली होती. म्हणून त्यांनी डॉक्टरांना विचारले.
” आम्ही निशाला भेटू शकतो का डॉक्टर…?”
” हो…नक्कीच…इन्फॅक्ट तुम्ही आता त्यांना घरी घेऊन जाऊ शकता…” डॉक्टर म्हणाले.
त्यासरशी सगळेच निशा जवळ गेले. निशा बाळाची बातमी ऐकून खूप आनंदात होती. वसंतरावांना पाहून तर ती आणखीनच खुश झाली. वसंतराव तिच्याजवळ गेले तेव्हा काय बोलावं अन् काय नाही ते त्यांना कळतच नव्हते. तेव्हा निशा स्वतःहून म्हणाली.
” बाबा…कसे आहात…? आणि इतका उशीर का केलात तुमच्या निशाला भेटायला…?”
निशाचे बोलणे ऐकून वसंतरावांना गहिवरून आले. ते निशाला म्हणाले.
” तुझा बाप स्वतःच्या अहंकारात पार बुडून गेला होता बाळ…त्याच नादात स्वतःचा लेकराला दुःख देऊन बसला…मला माफ कर बाळा…”
” माफी का मागताय बाबा… उलट तुम्हीच मला माफ करा…माझ्या हट्टी स्वभावामुळे आजवर तुम्हाला खूप त्रास झालाय…मी नेहमीच तुमच्याकडून स्वतःचा हट्ट पूर्ण करून घेतलाय…मी चांगल्या मुलीसारखं नाही वागू शकले… खरंच मला माफ करा…” निशा रडवेली होत म्हणाली.
” नाही निशा…उलट मी जाणूनबुजून तुझ्या आयुष्याचे निर्णय स्वतःच्या मनाप्रमाणे घेत आलोय… तुझं साकेतरावांशी झालेलं लग्न मला कधीच मनापासून मान्य नव्हतं…म्हणून मी ठरवून तुमचा घटस्फोट घडवून आणला…त्यानंतर सुद्धा कधीच तुझ्या मनाचा विचार नाही केला…उलट लोक काय म्हणतील ह्याचा विचार करून तुझ्या मनाविरुद्ध तुझं लग्न लावायला निघालो होतो…” वसंतराव म्हणाले.
वसंतरावांचे बोलणे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. विशेषकरून साकेत आणि त्याचे बाबा…ते आश्चर्याने वसंतरावांकडे पाहू लागले. ते समजल्याने वसंतराव साकेत कडे पाहून म्हणाले.
” हो साकेतराव…तुम्ही जे ऐकताय ते खरं आहे…निशाला कधीच तुमच्यापासून घटस्फोट घ्यायचा नव्हता… मी शेवटच्या दिवसा पर्यंत तिला हेच सांगत होती की मी तुमचा घटस्फोट होऊ देणार नाही…पण फायनल हियरिंगच्या दिवशी मी स्वतःहून अशी परिस्थीती घडवून आणली…कारण मला निशासाठी तोलामोलाचे स्थळ हवे होते… खरेतर मीच तुमच्या दोघांच्या इतक्या वर्षांच्या दुराव्याला कारणीभूत आहे…” वसंतराव पश्चात्तापाने दग्ध होत म्हणाले.
क्षणभर कोणीच काही बोललं नाही. खरेतर साकेतला ह्या गोष्टीमुळे वसंतरावांचा राग आला होता. पण दुसऱ्याच क्षणी त्याचा हा राग ओसरला सुद्धा. त्याला आजच्या आनंदाच्या क्षणी भूतकाळातल्या कटू आठवणींना आठवायचे नव्हते. म्हणून मग तोच स्वतःहून म्हणाला.
” जे घडलं ते घडून गेलं बाबा…आता या गोष्टीचा आपण कुणीही विचार करायचा नाही…झालेल्या प्रकारात माझी अन् निशाची सुद्धा चूक होतीच…आम्हीच एकमेकांना समजून घेण्यात कमी पडलो… चुकांवर चुका करत गेलो…पण आता त्या चुकांना पुन्हा पुन्हा आठवून काही उपयोग नाही ..आता सगळे नव्याने सुरुवात करूयात…जिथे कुणाच्याही मनात रुसवा, फुगवा, राग, लोभ काहीच नसेल…असेल तर फक्त एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम…आम्हीपण सगळं विसरून नव्याने सुरुवात करतो अन् तुम्हीपण मागचं काहीच आठवू नका…” साकेत म्हणाला.
साकेतच्या मनाचा मोठेपणा पाहून वसंतरावांना भरून आले. ते त्याला म्हणाले.
” मी खरंच माणसांना ओळखू शकत नाही साकेतराव…माझ्या मुलीचं नशीब थोर म्हणून मला तुमच्यासारखा जावई मिळाला…पण मी तुमच्या चांगुलपणाला पाहू शकलो नाही… मी आजवर फक्त माणसांच्या संपत्तीवरून त्यांचं मोल करायचो…पण आयुष्याच्या या वळणावर मला कळलय की खरी संपत्ती ही पैसा नसून माणसांच्या मनाच्या श्रीमंतीवर अवलंबून आहे…खरंच मला माफ करा साकेत राव…”
वसंतरावांना आज अशी सगळ्यांची माफी मागताना पाहून निशाला सुद्धा कसेतरी वाटले. ती तिच्या बाबांना म्हणाली.
” बाबा… मोठ्यांनी लहानांची माफी मागू नये…फक्त आशीर्वाद द्यावेत…आम्हाला सुद्धा फक्त तुमचे आशीर्वाद आणि प्रेमच हवे आहे…माफी नाही…”
” पण मी तर माफी मागू शकते ना निशा ताई…लहान समजून मोठ्या मनाने मला माफ करा…” वृषाली मागून पुढे येत म्हणाली.
” अगं माफी काय मागत आहेस…तुझ्यावर अजिबात नाराज नाहीये मी…जसा निशांतच्या कुठल्याच गोष्टीचा मला राग येत नाही तसेच तुझ्या सुद्धा कुठल्याच गोष्टीचा मला राग आलेला नाही…” निशा म्हणाली.
त्यासरशी या गंभीर झालेल्या वातावरणाला हरा हलके करण्यासाठी निशांत म्हणाला.
” आता तुम्हा सर्वांचे हे माफी पुराण संपले असेल तर जरा ताईच्या गोड बातमीचा आनंद सुद्धा साजरा करूयात…नाहीतर तुमचे असेल गंभीर चेहरे पाहून ते सुद्धा रडके होईल…”
त्यासरशी सर्वच जण दिलखुलास हसले. मग त्यानंतर कुणीही मागच्या गोष्टी पुन्हा आठवल्या नाहीत. वसंतरावांनी निशा आणि साकेतच्या लग्नाला मनापासून स्वीकारल्याने आशाताई कृतकृत्य झाल्या.
पुढे काही दिवसांनी निशाने एका गोड मुलाला जन्म दिला. सगळेच खूप आनंदी झाले. योग्य फिजिओथेरपीच्या मदतीने साकेतचा हात सुद्धा पूर्ववत काम करू लागला होता. त्याने बाळाला सर्वात आधी जेव्हा हातात घेतले तेव्हा आनंदाने त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. दोघांनाही इतक्या आनंदात पाहून घरचे सुद्धा अत्यंत समाधानी झाले होते.
अशाप्रकारे साकेत आणि निशाच्या नव्या संसाराची सुरुवात नव्याने केली. या दोघांनाही आयुष्याने एकमेकांसोबत जगण्याची दुसरी संधी दिली पण प्रत्येकालाच ही संधी मिळते असे नाही. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक निर्णय हा भविष्यातील त्याचे फायदे तोटे लक्षात घेऊन घ्यायला हवा.
समाप्त.