” अग ह्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी काय असेल…मी तर केव्हाचा तुला म्हणतोय चल म्हणून…पण तूच आपली पुढे ढकलत होतीस…अंतरा घरात नवीन आहे… तिला एकदा घरात रुळली की मग येईन म्हणत होतीस…पण आता एकदाचं तू ठरवलं आहेस ना…मग उशीर नको करायला…तू आजपासूनच तयारी कर…आपण सोमवारी सकाळी निघू घरून…” विराजस आनंदाने म्हणाला.
भावना ला सुद्धा आनंद झाला.तिला पण वाटायचे की विराजस ची बसली झाल्यावर त्याच्यासोबत राहायला जावे पण तेव्हा नुकतेच अंतरा आणि मल्हार चे लग्न झाले होते. आणि अंतरा अजुन घरात नवीन होती. तिला या घरातील पद्धती शिकायला मदत व्हावी या विचाराने भावनाने विराजस सोबत जाणे पुढे ढकलले होते.
पण तिला आता जाणीव झाली होती की आपल्या अती चांगुलपणाचा अंतराला त्रासच होतोय. आणि तिला जर आता तिच्या जबाबदाऱ्या निभावायच्या असतील तर ते चांगलेच आहे. भावनाला वाटले की हीच ती योग्य वेळ आहे जेव्हा अंतरा सगळे काही स्वतःहून शिकेल. म्हणून भावना आता निश्चिंत पणे विराजस सोबत जायला तयार होती.
भावना विराजस सोबत राहायला जाणार म्हणून तिने घरातल्या सगळ्यांना कल्पना दिली होती. भावना जाणार म्हणून तिच्या सासुबाई थोड्या भावनिक झाल्या होत्या. कारण आजवर भावना ने त्यांना आई समजून त्यांची काळजी घेतली होती. त्यांच्या घराला जपले होते. पण दोन्ही मुले एकमेकांच्या सोबत राहील म्हणून त्या आनंदित होत्या. पण अंतरा मात्र मनातून खुश होती. कारण आता तिला स्वतःच काहीतरी करायला मिळणार होतं. घरातील सर्वांना ती तिचं कर्तृत्व दाखवून देणार होती.
भावना आणि विराजस घरून गेले आणि घरातील कामांची सर्व जबाबदारी अंतरावर येऊन पडली. पहिल्या दिवशी अंतरा सकाळीच उठली. स्वतःच आवरून सगळ्यांसाठी चहा नाश्ता करण्यातच ती थकून गेली. पण तरीही तिला भावना पेक्षा चांगल्या पद्धतीने कामे उरकायची असल्याने तिने आलेली मरगळ झटकली आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागली.
तिने आज पहिल्यांदा एकटीने स्वतः सर्व स्वयंपाक केला होता. तितकासा जमला नव्हता पण तरीही सर्वांनी तिच्या स्वयंपाकाची स्तुती केली. भांड्यासाठी बाई होती. पण वरची कामे अंतरालाच करावी लागणार होती.
घरच्यांचे कपडे धुणे, सासूबाईंना देवपूजा करताना काय हवे ते बघणे, बाजारातून भाजी आणणे, झाडू मारणे, लादी पुसणे, किराणा सामानाची यादी तयार करून त्यानुसार सर्व सामान आले की नाही ह्याची शहानिशा करणे, त्यानंतर ते व्यवस्थित डब्यांमध्ये भरणे, भाजी निवडणे, दिवसभरातून तीनदा सर्वांसाठी चहा करणे, आल्या गेल्या पाहुण्यांचे करणे ही कामे सुद्धा घरात असतात ह्याची अंतराला कल्पनाच नव्हती.
तिला वाटले होते की सकाळचा चहा नाश्ता आणि दोन वेळचे जेवण फक्त एवढेच काम आहे घरात. भावना मुळे तिचा माहेरी वा सासरी कामाशी जास्त संपर्क आलेला नव्हता. पण आता मात्र तिला कळून चुकले होते की घरकाम म्हणजे गृहिणींसाठी खेळ नाही. एक सर्वगुणसंपन्न गृहिणी होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात ह्याची तिला आता जाणीव होत होती.
दिवसभर इतकी सारी कामे करून अंतरा थकून जायची. त्यामुळे रात्री लवकर झोप यायची तिला. त्यामुळे तिचा आधीच दिनक्रम अगदी ढासळला होता. आधी दिवसातून दोनदा आवरून तयार होणारी अंतरा आता मुश्किलीने दिवसातून एकदा केस विंचारायची. आता थकल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मल्हार सोबत गप्पा मारणे तिला जमायचे नाही. दर दोन तीन दिवसातून बाहेर फिरायला जाणे तर आता जवळ जवळ बंदच झाले होते.
सकाळी उशिरापर्यंत झोपण्याचे सुख तिच्या नशिबी केवळ भावना मुळे होते हे तिला कळून चुकले होते. तिने आणि मल्हारने एकमेकांसोबत वेळ घालवावा ह्यासाठी भावना सगळी कामे स्वतः करायची ह्याची जाणीव सुद्धा अंतरा ला झाली होती. तिला आठवले की भावना कशाप्रकारे माहेरी सुद्धा तिची कामे स्वतःच करायची.
अनेकदा तिच्यामुळे तिच्या ताईने तिच्या बाबांचा ओरडा खाल्ला हे सुद्धा तिला आठवले. बाबा एकाच घरात दोन मुली द्यायला मागेपुढे बघत होते तेव्हा भावनाने कशाप्रकारे बाबांना समजावून सांगितले ह्याची आठवण तिला झाली. आणि सासरी सुद्धा अंतरा किती चांगली आहे हे पटवून दिले होते भावनाने.
ताईने केवळ आपल्या भल्यासाठी घराची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतलेली पण आपण मात्र तिला श्रेय हवे म्हणून ती हे सर्व करतेय असाच विचार करत होतो ह्याचे अंतरा ला आता खूप वाईट वाटत होते. भावना ला नको ते बोलल्या बद्दल आता तिचे मनच तिला खात होते. तिला भावना ची माफी मागायची होती पण तिच्याशी बोलायची आता अंतराची हिम्मत होत नव्हती.
त्यानंतर काही दिवसात विराजस आणि भावना दोघेही सुट्टीत घरी आले होते. दोघांच्या येण्याने घर आनंदून गेले होते. घरात जणू नवीन चैतन्य बहरले होते. भावनाला भेटून आज अंतरा मनापासून आनंदी होती. तिच्या मनात भावना बद्दल जे काही गैरसमज होते, जी ईर्ष्या होती ती आता कुठेच नव्हती. अंतराचा राग दूर झालाय हे पाहून भावना सुद्धा आनंदात होती. भावना आज स्वतःहून अंतराशी बोलायला आली होती.
” अंतरा…तू खूप छान सांभाळते आहेस घर…आई सांगत होत्या की तू प्रत्येक काम खूप चांगल्या पद्धतीने शिकत आहेस…मला तुझा खूप अभिमान वाटतोय अंतरा…” भावना म्हणाली.
” नाही ताई… तुझ्यासारखे काहीच नाही जमत ग मला…तू इतकी निस्वार्थ कशी काय ग आधीपासूनच…मी लहान होते तेव्हा तू माझी आई बनून माझी काळजी घेतलीस…पण मी मात्र तुझी चांगली बहीण सुद्धा नाही बनू शकले…आणि लग्न झाल्यावर लहान बहीण म्हणून मला जपले पण मी मात्र सतत तुला एक जेठानी म्हणून पाहत आले जिला सगळ्या कामाचं श्रेय हवं असतं.. मी नको ते बोलले ग तुला…शक्य असल्यास मला माफ कर ताई…” अंतरा हे बोलताना हळवी झाली होती. तिला सावरत भावना म्हणाली.
” वेडी कुठली…अग मला तुझा राग आला नव्हता पण वाईट वाटलं होतं…कारण तू मनात इतका जास्त विचार करत होतीस आणि मला मात्र काही सांगितले नव्हते…मला हे समजून घ्यायला पाहिजे होते की आता आपले नाते बदलले आहे…त्यामुळे मी सुद्धा तुला आधी प्रमाणे गृहीत धरले होते…पण मी इथून जाण्याचा निर्णय घेतला ते बरंच झालं…तू सुद्धा तुझ्या जबाबदाऱ्या समजून घेतल्यास ह्याचा मला आनंदच आहे…” भावना म्हणाली.
” म्हणजे तू माझ्यावर रागावलेली नाहीस…” अंतरा ने विचारले.
” मुळीच नाही…” भावना म्हणाली.
” मग तू इथेच राहा ना माझ्यासोबत… आपण दोघीपण पूर्वीप्रमाणे राहूया…” अंतरा म्हणाली.
” नाही ग…आधी मी फक्त तू या घरात ॲडजस्ट व्हावी स म्हणून थांबले होते…पण तू या घराच्या चालीरीती लवकर समजून घेतल्या आहेस…तू आता तुझा संसार कर…तुझ्या मना प्रमाणे…आणि मी सुद्धा वीराजस सोबत खूप खुश आहे तिथे…आपण बहिणी असलो तरीही ह्या नव्या नात्याच्या मात्र काही मर्यादा आहेत…आणि त्या आपण पाळायला हव्या…आणि आम्ही सुट्टीत येतच जाऊ की इथे…आणि फोन वर एकमेकींच्या संपर्कात राहूच…” भावना हसून म्हणाली.
भावनाचे बोलणे ऐकुन अंतरा मात्र मनात असूनसुद्धा भावनाला इथेच राहायचा हट्ट करू शकली नाही.
आपल्या आयुष्यात बरेचदा असे घडते. काही गोष्टी ह्या आपल्या चांगल्यासाठीच असतात पण आपण त्या वेळेवर ओळखू शकत नाही. आपण आपल्या आयुष्यात चांगल्या लोकांची कदर केली नाही तर भविष्यात आपल्याला ह्या गोष्टीचा पश्र्चाताप करावा लागतो. पण आपल्या चुकीमुळे आपल्यापासून दुरावलेली व्यक्ती पुन्हा परत येईल ह्याची शाश्वती मात्र देता येत नाही.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका