आरवला दिवसभर घरी सोडून जाताना अर्पिताचा जीव खाली वर व्हायचा पण घरी सर्वांसोबत आरव छान रुळला होता. त्यामुळे त्याची काही फारशी काळजी करण्याची गरज नव्हती म्हणून अर्पिता आता आरवला आई वडिलांकडे सोडून नोकरीवर जायला लागली होती.
तरीपण सुधीर चे प्रीशा आणि आरव साठी सारख्याच वस्तू आणणे मीनाला खूप खटकायचे. अशातच आरवचा वाढदिवस आला आणि सुधीरने त्या दिवशी ऑफिस मध्ये सुट्टी टाकून घरी छान डेकोरेशन केले. आरवच्या वाढदिवसाची जय्यत तयारी केली आणि वाढदिवस अगदी थाटात साजरा केला.
हे सर्व पाहून मीना मनातून चरफडली. पुन्हा तिच्या डोक्यात विचार यायला लागले की सुधीर प्रिशाच्या वाटचे पैसे आरव वर खर्च करतोय. पण ती सर्वांसमोर काहीही न बोलता गप्प बसली. पण तेव्हा तिच्या रागाचा उद्रेक झाला सुधीर ने आरवच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून सोन्याचे पेंडेंट आणलेले पाहिले. ते पाहून मीना ताडताड तिच्या रूम मध्ये रागातच निघून आली. तिच्या वागण्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. सुधीर सुद्धा तिच्या मागूनच खोलीत आला आणि मीनाला म्हणाला.
” अगं बाहेर सगळेच थांबलेले आहेत…पाहुणे सुद्धा आहेत…आणि तू त्यांच्यासमोर अशी रागात का उठून आली… अर्पिता अन् आई बाबांना काय वाटले असेल…?”
हे ऐकून मीना आणखीनच रागाने म्हणाली.
” तुम्हाला अजूनही तुमच्या बहिणीची च काळजी आहे…मला आणि माझ्या मुलीचा जराही विचार केला नाही तुम्ही असे वागताना…”
” असे वागताना म्हणजे…असा काय चुकीचा वागलोय मी…?” सुधीर ने प्रश्न केला.
” असे हजारो रुपये तुमच्या बहिणीच्या मुलावर उधळले तर आम्हा मायलेकींना पुढे रस्त्यावर आणाल तुम्ही… वाढदिवस साजरा केला तोवर ठीक होतं पण त्याला सोन्याचं पेंडेंट द्यायची काय गरज होती…” मीना रागातच म्हणाली.
” तू काय बोलतेस ते तुझं तुला तरी कळतंय का…? माझ्यासाठी जशी प्रिशा तसाच आरव…आणि प्रिशा चा वाढदिवस सुद्धा इतक्याच थाटात झाला होता अन् तिच्यासाठी सुद्धा मी सोन्याचं पेंडेंट आणलं होतं ना…” सुधीर म्हणाला.
” तुम्ही प्रि शा ची आणि आरव ची बरोबरी कशी करू शकता… प्रिशा आपली सख्खी मुलगी आहे अन् आरव दुसऱ्यांचा मुलगा…त्याला अन् त्याच्या आईला आपण घरी आश्रय देतोय हाच आपल्या मनाचा मोठेपणा आहे…पण त्याच्यावर असा पैसा उधळणे बरोबर आहे का…? त्याचं बघायला अन् त्याला गिफ्ट द्यायला त्याचा बाप आहे ना…त्यांचं ते पाहत बसतील…मी तर म्हणते तुम्ही अर्पिताला सांगून टाका की जा बाई एकदाची तुझ्या घरी…अन् कर आम्हाला मोकळं…नाहीतरी नवरा तयार आहे ना दोन बायकांना वागवायला….” मीना रागात भडाभडा बोलून बसली.
आता मात्र सुधीर ला मिनाचा खूप राग आला. तो रागातच तिला म्हणाला.
” माझी बहिण इथून कुठेच जाणार नाही…हे तिचं हक्काचं घर आहे…माझ्या वडिलांनी बांधलंय हे घर…त्यामुळे हे घर जितकं माझं आहे तितकंच अर्पिताचं सुद्धा आहे…इथून पुढे असा विचार देखील मनात आणला ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही…”
” अच्छा…ह्या घरावर तुमच्या बहिणीचा पण अधिकार आहे तर…मग माझा अधिकार कुठे आहे…माझ्या मुलीचा अधिकार कुठे आहे…ते काही नाही…मी निक्षून सांगते…या घरात एक तर अर्पिता राहील किंवा मी…तुम्ही आजच तिला सांगा तिच्या नवऱ्याच्या घरी नांदायला जा म्हणून…नाहीतर मी माहेरी निघून जाईल….” मीना रागारागात बोलून बसली.
” जा निघ…नाहीतरी तुझे माझ्या बहिणी बाबत असलेले विचार ऐकून मलासुद्धा तुझ्यासोबत राहणे कठीण आहे…” सुधीर सुद्धा रागाने म्हणाला.
मग काय. मीना ने तडक बॅग भरली आणि माहेरी फोन करून तिच्या भावाला बोलावून घेतले व आरवच्या वाढदिवसाच्या मधूनच प्रिशाला घेऊन माहेरी निघून गेली. लहानगी प्रिशा मीना सोबत जायला अजिबातच तयार होत नव्हती तरीसुद्धा मीना तिला जबरदस्तीने सोबत घेऊन गेली.
आरवच्या वाढदिवसाचा पार बेरंग झाला होता. घरचे सगळेच काळजीत पडले होते. आपल्यामुळे वहिनी घर सोडून गेल्याने अर्पिताच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली होती. नशिबाने आपल्याला लाचार करून ठेवल्याचे तिला अतीव वाईट वाटले. सुधीरचे आई बाबा सुद्धा काळजीत होते.
पण सुधीर ला मात्र तिच्या घर सोडून जाण्याचे अजिबात वाईट वाटत नव्हते. मुळात तिच्या वागण्याने तो खूप जास्त दुखावला गेला होता. एका लहान मुलाचा मीनाने इतका जास्त तिरस्कार करेल हे त्याने कधी ध्यानीमनी आणले नव्हते. इतके दिवस ती आरवचा राग राग करायची हे कळल्याने त्याचा संताप अनावर झाला होता.
तिकडे मीना माहेरी गेल्यावर तिने सगळ्यांना तिची बाजू पटवून सांगितली. माहेरच्यांनी सुद्धा तिला सहानुभूती दाखवली. तिची आई तर म्हणाली की आम्ही तुझ्या बाजूने भक्कम पणे उभे आहोत. सगळेच अर्पिताच्या विरुद्ध बोलत होते. ती कसे माहेरी येऊन मीनाच्या संसारात ढवळाढवळ करते आहे, मीनाच्या आणि तिच्या मुलीच्या हिस्स्याचे स्वतःसाठी जमा करत आहे ह्याचा आवेशात येऊन वर्णन करत होते. पण ह्या सर्वात तिची वहिनी सारिका मात्र गप्प बसून होती.
तिकडे सुधीरच्या आई बाबांनी आणि अर्पिताने सुधीरला समजावण्याचा प्रयत्न केला की मीनाला समजावून घरी घेऊन ये म्हणून. पण सुधीरच्या मनातील राग अजुन तसूभर ही कमी झाला नव्हता. मुळात मीनाच्या मनात एवढं काही सुरू असताना आपल्याला आधी का कळले नाही ह्याचे त्याला नवल वाटत होते.
तिकडे मीनाला माहेरी सहानुभूती मिळत होती. नवऱ्याने मिनासोबत असे करायला नको होते असे म्हणत सगळेच तिच्या बाजूने बोलत अर्पिताला दूषण देत होते. सुधीर एक दिवस नाक घासत येईल अन् तुझी माफी मागेल असे सांगून समजूत काढत होते. मीना सुद्धा स्वतःला जरा जास्तच पीडित समजून या सहानुभूतीचा चांगलाच फायदा घेत होती.
सतत स्वतःच्या रूम मध्ये तासनतास बसून राहणे. लहानग्या प्रिशाला घरातील इतर सदस्यांच्या भरवशावर सोडून नेहमी आपल्याच भावविश्वात रमून राहणे. सतत आपल्यावर किती अन्याय झालाय ह्यावरच बोलणे. आणि बसल्या बसल्या रूम मधून तिच्या वहिनीला ऑर्डर सोडणे. फक्त एवढ्यातच तिचा दिवस निघून जायचा.
इकडे मीना काही स्वतःहून तिच्या सासरी जायचे नाव घेत नव्हती आणि सुधीर तिला परत आणायला पुढाकार घेत नव्हता. पण मीनाच्या दिनक्रमात मात्र ह्यामुळे काहीच बदल होत नव्हता. सारिका गप्प राहून दिवसभर मुकाटपणे तिच्या ऑर्डर्स पूर्ण करायची. कधी मीना म्हणायची की वहिनी मला हेच खायचे आहे अन् कधी म्हणायची की मला हेच हवे आहे.
ते ही सगळे तिला जागेवर लागायचे. आताशा तिची वहिनी सुद्धा या सगळ्याला कंटाळली होती. पण लहानग्या प्रिशाच्या अवती भोवती बागडण्याने तिचा हा कंटाळा आपोआप दूर व्हायचा. मीनाच्या वहिनीच्या लग्नाला दोन वर्ष झाले होते. पण अजून तिला बाळ नव्हते. म्हणून तिला प्रिशाचा लळा लागला होता.
एके दिवशी अचानक तिच्या वहिनीला तिच्या माहेराहून फोन आला आणि तिला कळले की तिच्या वडिलांची तब्येत बरी नाही. ते हॉस्पिटल मध्ये ॲडमित होते. अशातच ते सारखे सारखे सरिकाचे नाव घ्यायचे. म्हणून मग घरच्यांनी सारिकाला तातडीने बोलावणे पाठवले होते. सारिका ने सासरी सगळ्यांना आपल्या वडिलांच्या तब्येतीची कल्पना दिली आणि आपल्याला लगेच माहेरी जाणे गरजेचे आहे हे सांगितले. घरातील काही बोलतील या आधीच मीना म्हणाली.
” वहिनी… अगं तुझ्या वडिलांना पाहायला तिकडे सर्वजण आहेत…पण इथे तुझी जास्त गरज आहे…तुझी नणंद बिचारी एवढी दुःखी होऊन माहेरी आली आहे…अन् तू इथली सगळी जबाबदारी झटकून तुझ्या माहेरी निघाली आहेस…? तुला शोभते का ग हे…?”
मीना चे बोलणे ऐकून इतके दिवस गप्प बसून तिचं सगळं ऐकणारी सारिका म्हणाली.
” मीना ताई…हे तुम्ही म्हणताय…तुम्ही नेमकं काय बोलताय हे कळतंय का तुम्हाला…आणि माझी जबाबदारी मी नीटपणे पार पाडते आहे…माझ्या वडिलांची तब्येत जास्त खराब नसती तर मी कधीच इतक्या तातडीने जायला निघाले नसते…तुमच्या सारखे विनाकारण माहेरी जाऊन बसायला मी एवढीही अविचारी नाही…” सारिका म्हणाली.
” विनाकारण….तुला वाटतंय मी विनाकारण माहेरी येऊन बसलीय… अगं माझ्या बरोबर काय घडले ते माहिती असून सुद्धा तू अशी बोलत आहेस…तुझी नणंद चांगली आहे म्हणून बरंय…माझ्यासारखी कायमची येऊन डोक्यावर बसली असती तर कळलं असतं…” मीना रागाने म्हणाली.
क्रमशः
नात्यांचे वर्तुळ – भाग ३ (अंतिम भाग)