मग मिनाची आई म्हणजेच सारिकाची सासू सारिका ला म्हणाली.
” सारिका…तुला काय माझी मुलगी भार झालीय का…विसरू नकोस की हे घर तुझ्या आधी तिचं आहे… जेवढा हक्क या घरावर तुझ्या नवऱ्याचा आहे तेवढाच हक्क माझ्या मुलीचा पण आहे…म्हणून तुला तिला बोलण्याचा काहीही हक्क नाही…तिला हवे तेवढे दिवस ती तिच्या हक्काच्या घरात राहील…अगदी कायमची राहिली तरी मला माझी मुलगी काही भारी नाही…”
” मग हेच मीना ताईंच्या नणंदेच्या बाबतीत लागू नाही का होत आई…?” सारिका ने प्रतिप्रश्न केला.
सारिकाच्या या प्रश्नावर घरचे सगळेच चूप झाले आणि विचारात पडले. खरं पाहता सारिका ने काहीच चुकीचा प्रश्न केला नव्हता. कोणीही काहीच बोलत नाहीये हे पाहून सारिका पुढे म्हणाली.
” मीना ताईंच्या नणंदेचा सुद्धा त्यांच्या माहेरावर तितकाच अधिकार आहे जितका मीना ताईंचा ह्या घरावर आहे…अन् मीना ताईंच्या तुलनेने त्यांचे दुःख जास्त मोठे अन् रास्त आहे…त्यांच्या नवऱ्याने फसवलय त्यांना…मग अशा परिस्थितीत त्या स्वतःच्या माहेरचा आधार नाही घेणार तर कुठला घेणार…पण अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना साथ द्यायची सोडून त्यांचा तिरस्कार केलात…
इतकंच नाही तर त्यांच्या लहानग्या मुलाचा सुद्धा रागराग केलात…एकदम क्षुल्लक कारणावरून वाद घालत घर सोडून निघून आलात…तसे पाहता तुम्हाला तिथे अजिबात त्रास नव्हता हे तुम्हाला माहिती आहे…पण नणंद तुम्हाला नजरेसमोर नको होती किंवा त्या घरात तिचा वाटा तुम्हाला मान्य नव्हता…मग हे सगळं तुमच्या बाबतीत घडतं असेल तर तुम्ही वाईट का वाटून घेताय…?” सारिका म्हणाली.
” तुझ्या नणंदेला इतकं सूनवायची तुझी हिम्मत कशी झाली…ते ही माझ्यासमोर… अगं हीची नणंद हिच्याशी कशी वागते ते तुला माहिती तरी आहे का…?” सारिकाची सासू तिच्यावर ओरडत म्हणाली.
” अर्थात मला माहिती आहे…अर्पिता ताई मीना ताईंच्या बरोबरीने घरकामात मदत करतात…वरून त्यांच्यामुळे घरावर आर्थिक भार पडू नये म्हणून नोकरीवर सुद्धा जातात… बरं त्यांच्यामागे त्यांच्या मुलाला त्यांचे आई वडील म्हणजेच ताईंचे सासू सासरे सांभाळतात…त्यामुळे ताईंवर आरव ला सांभाळायची जबाबदारी त्या टाकतच नाही…घरी आल्यावर सुद्धा अर्पिता ताई बरोबरीने स्वयंपाक घरात सुद्धा मदत करतात… मिनाताईंना फक्त अर्पिता ताईंचा राग ह्यामुळे येतो कारण त्यांना वाटतं की त्यांनी तिथे राहू नये… आयुष्यात इतक्या कठीण काळातून चाललेली नणंद ह्यांना त्यांच्या घरात राहिलेली चालत नाही तर एका क्षुल्लक कारणासाठी माहेरी आलेल्या नंदेला मी तरी का म्हणून सहन करायचं…मला यावेळी सगळ्यात जास्त महत्त्वाची माझ्या वडिलांची तब्येत आहे…आणि मी आता त्यांच्याजवळ असणं जास्त गरजेचं आहे… त्यामुळे मी आता निघते…” एवढं बोलून सारिका तिच्या खोलीत बॅग भरायला निघून गेली.
सारिका गेल्यावर तिच्या सासुबाई मीना जवळ आल्या आणि म्हणाल्या.
” मीना…तू काळजी नको करुस… तु इथे असताना मी ह्या सारिका ला अजिबात माहेरी जाऊ देणार नाही… आताच तुझ्या भावाला फोन करते अन् हीचे नखरे सांगते…मग तीच येऊन सरळ करेल हिला…”
” नाही आई… प्लिज असे काही करू नकोस…आधीच खूप चुका झाल्यात माझ्याकडून…आता आणखी चुकांची भागीदार नाही व्हायचं मला…वहिनीला जाऊदे तिच्या वडिलांच्या भेटीला…” मीना खाली मान घालून म्हणाली.
” अगं हे काय बोलत आहेस तू… तुझं काहीही चुकलेले नाही…” आई मीनाला म्हणाली.
” नाही आई…माझं खरंच खूप चुकलं गं… मी खरंच अर्पिताशी असे वागायला नको होते…ती खरोखर खूप त्रासात आहे अन् मी तिच्या परिस्थितीला समजून न घेता कायम तिलाच दोषी मानत आलीय…मी खूप वाईट वागले ग तिच्याशी…कितीतरी वेळा मी अप्रत्यक्षपणे टोमणे मारून तिला नवऱ्याच्या घरी जायला सुचवले… प्रत्यक्षात मी तिला अशा नवऱ्यापासून दूर राहायला सुचवायला हवे होते…पण मी तिथेही माझा स्वार्थ पाहत राहिले…हे आरवचा सुद्धा प्रिशा इतकाच लाड करायचे ते सुद्धा मला सहन व्हायचे नाही… खरं तर एवढ्या मोठ्या मनाचा नवरा मला मिळाला ह्याचा मला आनंदच व्हायला हवा होता…पण स्वतःच्या विकृत मानसिकते पायी मी एवढे दिवस त्या लहानग्या जीवाचा सुद्धा राग राग केला ग…आणि आज जेव्हा ह्या सगळ्याची जाणीव मला होतेय तेव्हा शरमेने मान खाली जातेय माझी…मी स्वतः एक स्त्री असून दुसऱ्या स्त्री शी अशी का वागली असेल हे मलाही कळत नाहीय…मला कळत नाहीय की मी कोणत्या तोंडाने अर्पिताची माफी मागू…ह्यांना काही सामोरी जाऊ…?” मीना पश्चात्तापाने रडवेली होत म्हणाली.
इतक्यात सारिका तिच्या खोलीतून बॅग भरून बाहेर आली सुद्धा. मीनाला खरं तर तिची सुद्धा माफी मागायची होती पण ह्यावेळी तिचे तिच्या वडिलांकडे जाणे जास्त गरजेचे होते म्हणून मीना काही बोलली नाही. सारिका मात्र अजूनही रागातच होती. ती बाहेर जायला दार उघडणार इतक्यात बाहेरून कुणीतरी बेल वाजवली.
सारिकाने दार उघडले तर समोर मिनाची नणंद अर्पिता आलेली होती. तिला यावेळेला इथे पाहून सारिका सोबत सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. मीना तर तिच्या नजरेला नजर सुद्धा मिळवू शकली नाही. सारिका नेच तिला आत यायला सांगितले.
आतमध्ये बसल्यावर सारिका ने अर्पिताला पाणी प्यायला दिले. कुणीच काही बोलत नाहीये हे पाहून अर्पितानेच बोलायला सुरुवात केली. ती मीना कडे पाहून म्हणाली.
” वहिनी…मला माफ कर…माझ्या संसारात अडचणी निर्माण झाल्यात म्हणून मी माहेरी निघून आले…पण माझ्या मनात हा विचार आला नाही की माझ्या अशा माहेरी निघून आल्याने तुझ्या संसारात माझी अडचण होईल… खरंतर मी हा विचार आधीच करायला हवा होता…माझ्यामुळे दादा आणि तुझ्यात वाद होत आहेत हे लक्षातच आले नाही माझ्या…म्हणून मी तुझी माफी मागायला आलेय… माझ्यामुळे तुला तुझ्या हक्काच्या घरात असुरक्षित वाटतेय हे कळलंय मला…आणि म्हणूनच मी असा निर्णय घेतलाय जेणेकरून तुला तुझ्या संसारात माझी अडचण होणार नाही…”
अर्पिता काय बोलत आहे हे लक्षात न आल्याने मीना ने तिला विचारले.
” तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे मला कळलं नाही…काय निर्णय घेतलाय तुम्ही…?”
” मी माझ्या नोकरीच्या ठिकाणी बदलीचा अर्ज दिलाय…पुढचौकही दिवसात तो मंजूर सुद्धा होईल…मग मी आरवला घेऊन दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होऊन जाईल…तिथे आरवला माझ्या नोकरीच्या वेळेप्रमाणे पाळणा घरात ठेवत जाईल…माझी बदली झाली हे सांगितल्यावर घरचे सुद्धा काही म्हणणार नाहीत…आणि दादाला सुद्धा याबद्दल मी काहीच कळू देणार नाही…फक्त तू मला माफ कर आणि पुन्हा तुझ्या हक्काच्या घरी राहायला ये…” अर्पिता डोळ्यात पाणी आणत म्हणाली.
आता मात्र अर्पिताचे बोलणे ऐकून मीनाला गहिवरून आले. सारिकाचे सुद्धा डोळे ओले झाले. आणि मीनाच्या आईला सुद्धा आज अर्पिताला पाहून भरून आले. अर्पिताच्या बाबतीत आपण किती वाईट विचार केला ह्याचा आज मीनाच्या आईला पश्चात्ताप होत होता. त्या काही बोलणार इतक्यात मीना म्हणाली.
” अर्पिता…तुला जर वाटत असेल की मी सगळं काही विसरून पुन्हा तिथे राहायला यावं तर माझी एक अट आहे…”
मीना चे बोलणे ऐकून सारिका ला खूप वाईट वाटले. अर्पिता एवढ्या मोठ्या मनाने मीना ताईंना घरी न्यायला आलीय आणि ह्या आता सुद्धा तिला अटी घालत आहेत ह्याचे तिला वाईट वाटले. पण अर्पिता मात्र लगेच म्हणाली.
” मला तुझी प्रत्येक अट मान्य आहे वहिनी…तू फक्त सांग मी काय करायला हवे…”
” तुम्ही आपलं घर सोडून कुठेही जायचा विचार करणार नाही…आपण सर्वांनी प्रत्येक परिस्थितीत एकत्र राहायचे…एकमेकांचा आधार बनून…” मीना म्हणाली.
वहिनी आता जे काही बोलली ते अर्पिता साठी अनपेक्षित होतं. अर्पिता मीनाला म्हणाली.
” म्हणजे…?”
” म्हणजे मला माझी चूक कळली आहे…मी खूप वाईट वागली आहे तुझ्याशी…मला माफ कर… खरं तर मला हेच कळत नव्हते की मी तुझी माफी कोणत्या तोंडाने मागू…पण तुझं मन एवढं मोठं आहे की माझ्यासाठी तू तुझ्या हक्काचं माहेर सुद्धा सोडायला निघाली होतीस…आणि मी मूर्ख फक्त माझ्या सोयीचा विचार करत बसले होते…मला आज माझ्या वागण्याची खूप लाज वाटत आहे…मला माफ कर अर्पिता…आणि तू आपलं घर सोडून कधीच कुठे जायचा विचार सुध्दा नको करुस…” मीना म्हणाली.
” मी नाही जाणार कुठे आपले घर सोडून…फक्त तू अन् प्रिशा घरी चला…” अर्पिता अत्यानंदाने म्हणाली.
हे ऐकून सारिकाने सुद्धा मीनाचा हात हातात घेतला आणि म्हणाली.
” मीना ताई…मला सुद्धा माफ करा…मी रागाच्या भरात नको नको ते बोलले तुम्हाला…”
” हा सगळा बदल तुझ्या थोड्या वेळापूर्वी च्या कानउघाडणी मुळेच झालाय…त्यामुळे ह्याच सगळं श्रेय तुलाच जातं…” मीनाची आई सारिकाला म्हणाली.
त्यासरशी त्या गंभीर वातावरणात थोडा हशा पिकला. आणि सगळ्यांच्या मनावरचे ओझे कमी झाले. मीना आनंदाने त्याच दिवशी अर्पिता सोबत सासरी गेली आणि तिने सगळ्यांची माफी मागितली. त्या दिवशी नंतर प्रीशा आणि आरव मध्ये मीना ने कधीच फरक केला नाही. अर्पिता आणि मीनाचे नाते आता इतके चांगले झाले आहे की त्यांना न ओळखणाऱ्या लोकांना ह्या दोघी बहिणीच वाटतात.
मीनाच्या आईला सुद्धा आपल्या सुनेचा सारिकाचा अभिमान वाटतो. कारण आज तिच्यामुळेच मीनाने आपली चूक दुरुस्त करून आपल्या सुखी संसाराची नव्याने सुरुवात केली होती. मीनातील हा बदल सुधीरला सुद्धा आवडला होता. आणि अर्पिताच्या मनातील अपराधीपणाची भावना आता नष्ट झाली होती. आणि ती नवीन आयुष्याची नव्याने सुरुवात करायला सज्ज झाली होती.
समाप्त.
©® आरती निलेश खरबडकर.
https://youtu.be/gn8oj8OzRfE