रवीचे बाबा म्हणाले.
” ते तुमचं तुम्ही पाहा…पण आम्हाला आता तुमची मुलगी आमच्या घरात नकोय…घरी न्या…आमच्या मुलाला तर नाही वाचवू शकली…ना त्याची दारू सोडवू शकली…काही फायदा नाही झाला हिच्याशी लग्न करून…घेऊन जा हिला…”
सुजाताच्या बाबांनी अनेकदा विनंती केली की सुजाताला इथेच ठेवा म्हणून. पण रवीचे आईबाबा काही ऐकायलाच तयार नाही म्हटल्यावर त्यांचाही नाईलाज झाला. आता काय करावे या विवंचनेत असताना बाजूच्या खोलीतून धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज आला.
सगळे येऊन बघतात तर सुजाता चक्कर येऊन खाली कोसळली होती. आणि तिच्या हाताच्या धक्क्याने बाजूची फुलदाणी सुद्धा पडून फुटून गेली होती आणि त्याचाच एवढा मोठा आवाज झाला होता. तिला खाली पडलेली पाहून तिच्या आई बाबांना आता काळजी वाटू लागली होती.
घरात अजूनही काही पाहुणे होतेच. त्यांनी रवीच्या आई बाबांना डॉक्टरला बोलवा म्हणून सुचवले. रवीच्या आईबाबांना डॉक्टरांना बोलावण्याची अजिबात इच्छा नव्हती पण आता त्यांचाही नाईलाज झाला. कारण पाहुण्यांसमोर कसे म्हणणार की आम्हाला डॉक्टरांना बोलवायचे नाही. मग हिच्या जीवाचे काहीही झाले तरी चालेल.
पण आधीच स्वतःच्या दारुड्या मुलासाठी एका गरीब घरातील मुलीला फसवून लग्न करून आणले असे बोलताना त्यांनी अनेक लोकांना ऐकले होते. आता जर हे सगळं पाहुण्यांनी पाहिले तर त्यांना बोलायला जागा मिळेल. लोक आपल्याला नावे ठेवतील.
सुनेला छळतात असे म्हणतील असे वाटून त्यांनी डॉक्टरांना फोन लावून घरी बोलावले. डॉक्टर घरी आले. त्यांनी सुजाताला तपासले. तिला तपासताना त्यांची मुद्रा गंभीर बनत चालली होती. तिला तपासून झाल्यावर डॉक्टर बाहेर आले तेव्हा सुजाताच्या बाबांनी त्यांना विचारले.
” काय झाले डॉक्टर…? सुजाता अशी का पडली चक्कर येऊन…?”
” त्या प्रेग्नंट आहेत…माझ्या अंदाजाने तीन महिने झाले असावेत प्रेग्नेंसीला…तरीही सगळ्या तपासण्या आणि सोनोग्राफी करावी लागेल…पेशंट ची तब्येत जरा जास्तच खालावल्या सारखी दिसत आहे… खूप अशक्त वाटत आहेत…काळजी घ्या आणि मी ज्या टेस्ट सांगितल्या आहेत त्या टेस्ट करा…मी एका डॉक्टरांचा पत्ता देतो…त्या चांगल्या स्त्रीरोग तज्ञ आहेत…त्यांना भेटा…” डॉक्टर म्हणाले.
ही अशी अगदीच अनपेक्षित बातमी ऐकून सगळेच आश्चर्याने सुजाता कडे पाहू लागले. रवीच्या आईबाबांना तर कळतच नव्हते की आता काय करावे. सुजाताच्या वडिलांना सुद्धा धक्का बसला होता. कारण सुजाताला माहेरी नेण्यातच त्यांना इतका जास्त प्रॉब्लेम होता तर आता तिच्या मुलाची जबाबदारी सुद्धा उचलावी लागणार नाही ना हा धाक त्यांना वाटत होता.
बराच वेळ कुणीही काहीही बोलले नाही. मग रवीच्या आईची मावशी जी खूप वयस्कर होती ती म्हणाली.
” परमेश्वराची लीला सुद्धा अगाध आहे बघ…तुझा मुलगा हिरावून घेतला पण त्याजागी तुझ्या सुनेच्या पोटी त्याचा अंश देऊन गेला…असे समज की तुझा रवी परत येतोय तुझ्याकडे…जेव्हा असे वाटले की तुझ्या मुलासोबत तुमचा वंश थांबला तेव्हाच त्याने हा आशेचा किरण दाखवलाय…नक्कीच काहीतरी पुण्य केले असशील तू म्हणून देवाने हे दान तुझ्या पदरात टाकलंय.. “
आपल्या मावशीचे बोलणे ऐकुन मात्र रवीची आई हळवी झाली. रवीचं बाळ या जगात येईल ह्या विचारानेच त्या हुरळून गेल्या. ज्या मुलाला लहानाचा मोठा केला, पस्तीस वर्षे तळहाताच्या फोडागत वागवले तो असा सोडून गेला, पण जाताना स्वतःचा अंश त्यांच्यासाठी सोडून गेला.
त्यांनी सुद्धा अनेक स्वप्ने पाहिली होती. रवीच्या बाळाची. स्वतःच नातवंडं ही कल्पनाच किती गोड होती त्यांच्यासाठी. ते ही रवी या जगात नसताना तर आता हीच एक आशा उरली होती त्यांच्यासाठी. मग त्यासाठी सुजाता ला घरी ठेवावे लागले तरी बेहत्तर.
नाहीतरी काहीच तक्रार न करता निमूटपणे जसे वागवले तशी राहते. खायला नाही दिले तर उपाशी राहील पण तोंडातून आवाज काढणार नाही. तिला वागवणे काहीच कठीण नव्हते त्यांच्यासाठी. अन् तिच्याकडून जर आपल्याला आपलं नातवंडं मिळत असेल तर हरकत काय आहे या सगळ्याला.
सुजाताच्या सासूबाईंना तर काय करू आणि काय नको असे झाले होते. त्यांच्या डोळ्यांत रवीच्या आठवणीने अश्रू दाटून आले होते. तिच्या सासरे बुवांची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. फक्त ते सासूबाईंसारखे हळवे झाले नव्हते. त्यांचा विचार स्पष्ट होता.
त्यांनी एवढी सगळी जी प्रॉपर्टी कमवून ठेवली आहे तिला वारसदार मिळणार होता. त्यांचं नाव पुढे नेण्यासाठी हाच वारसदार त्यांच्या कामी येणार होता. मग मुलगा असो वा मुलगी पण आपल्या रवीचे अपत्य ही खूप मोठी गोष्ट होती त्यांच्यासाठी. त्यांचेही ठरले होते.
आता सुजाताला माहेरी पाठवायचे नाही. कारण रवीच्या आईबाबांनी कितीही नाकारले तरी मनातून त्यांना माहीत होते की सुजाता खूप चांगली मुलगी आहे. अन् आता तर ती रवीच्या बाळाची आई होणार होती. त्यामुळे तिला गमावणे त्यांना अजिबात परवडणारे नव्हते. सगळे विचारात होते. मग सुजाताचे वडील म्हणाले.
” अहो आता तर ती तुमच्या मुलाच्या बाळाची आई होणार आहे…तुमचा वंश वाढवणार आहे…आणि अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही तिला माहेरी पाठवाल का…?”
” आता तुम्ही म्हणताय ते सुद्धा बरोबरच आहे…सुजाता ला राहू द्या इथेच…आम्ही वागवू तिला…” रवीचे वडील म्हणाले.
मग काय. रवीच्या वडिलांनी स्वतःहून सुजाताला घरी ठेवून घेतो म्हटल्यावर त्यांचा निर्णय बदलायच्या आधी इथून निघन्यातच आपला फायदा आहे हे ओळखून लवकरच आपल्या घरी प्रस्थान केले. सुजाता पुन्हा तिथेच थांबली. तिच्या नशिबात अजुन पुढे काय लिहून ठेवले आहे ह्याचा अंदाज अजूनही तिला आलेला नव्हता.
नंदिनी मात्र नकुल आणि मुग्धाच्या मैत्रीमुळे अजूनही त्राग्यात होती. पण तिला नेमकं काय वाटतंय हे तिलाही कळत नव्हतं. तिला फक्त एवढेच वाटायचे की नकुलने एवढे मोकळे आणि हसून फक्त तिच्याशीच बोलावे. सतत आपल्याच आजूबाजूला राहावे. पण नंदिनीशी नकुल फक्त कामापुरते बोलायचा.
आताशा नंदिनीला त्याचा राग यायला लागला होता. मुग्धा दर दिवसाआड घरी येते हे सुद्धा तिला अजिबात आवडत नव्हते. एकदा मुग्धा घरी आली आणि नंदिनी जवळ गेली. नंदिनी ला म्हणाली.
” नंदिनी…शेतात जेवायला येणार का आमच्यासोबत…? आम्ही सगळे घरचे जातोय…”
” नाही…मला जरा काम आहे घरी…” नंदिनी तिला टाळण्यासाठी म्हणाली.
” अगं चल ना…इतके दिवस झाले मला येऊन पण तुझी माझी अजिबात गट्टी जमली नाही…तेवढाच सोबत वेळ घालवू आपण…” मुग्धा म्हणाली.
” नको…नंतर कधीतरी जाऊ…” नंदिनी म्हणाली.
” ठीक आहे…नंतर जाऊयात कधीतरी आपण…” मुग्धा म्हणाली.
नंदिनीने होकारार्थी मान डोलावली आणि ती तिथून जाणार इतक्यात मुग्धा नकुलला म्हणाली.
” नंदिनी तर नाही म्हणतेय यायला…मग तुला एकट्यालाच यावं लागेल…ये मी वाट पाहतेय…”
नकुल जाणार हे ऐकून नंदिनीला आपण जायला नकार दिल्याचा पश्चात्ताप झाला. मुग्धा तिच्या घरी गेली आणि नकुल तयारी करून जायला निघाला. इतक्यात नंदिनी सुद्धा तयारी करून घाईघाईने आतून बाहेर आली. नकुल गाडी काढणार इतक्यात तिने त्याला आवाज दिला.
” थांबा…मी पण येतेय…”
” तू…पण तू तर नकार दिला होतास ना यायला…?” नकुल ने आश्चर्याने विचारले.
” आता माझं मन बदललंय…मला सुद्धा यायचं आहे…” नंदिनी म्हणाली.
” चल मग…” नकुल म्हणाला.
त्या दोघांना जाताना पाहून आत्या विचारात पडली. नंदिनी ची चिडचिड सुद्धा त्यांच्या नजरेतून सुटत नव्हती.
नंदिनी आणि नकुल दोघेही शेतात पोहचले. तिथे मुग्धाच्या घरची सगळीच मंडळी आधीच हजर होती. शेतात स्वयंपाक सुरू होता. नंदिनी ला आलेलं पाहून मुग्धा म्हणाली.
” छान केलंस तू आलीस…तुला पाहून चांगलं वाटलं…”
” हो…नंतर मला वाटलं तू इतक्या प्रेमाने बोलावलं तर यायला हवं…म्हणून आले…” नंदिनी म्हणाली.
मुग्धाच्या घरची मंडळी स्वभावाने खूप मोकळी आणि चांगली वाटली नंदिनीला. सगळेजण नंदिनीची प्रेमाने विचारपूस करत होते. नकुल सुद्धा अगदी त्यांच्या कुटुंबातला असल्याप्रमाणे वागत होता. नंदिनीला तिथे येऊन खूप छान वाटत होते. सगळ्यांच्या गप्पा ओघात आल्या होत्या. इतक्यात नंदिनी च्या बाबांना काहीतरी आठवलं आणि ते म्हणाले.
” अरे देवा…घाईघाईने निघालो म्हणून जेवणाच्या पत्रावळी आणि द्रोण वगैरे घरीच सुटलेत माझ्याच्याने…मी लगेच जाऊन आणतो…”
” तुझी राहू द्या काका…मी घेऊन येतो…” नकुल म्हणाला.
” बरं जा…मुग्धा तू पण सोबत जा…आणि आजीला विचार कुठे ठेवलेल्या आहेत ते..तिला माहित आहेत…” मुग्धा चे बाबा म्हणाले.
” हो बाबा…” नंदिनी म्हणाली.
” मी जाऊ का त्यांच्यासोबत…?” नंदिनी मध्येच म्हणाली.
नंदिनीचे बोलणे ऐकुन नकुल पुरता खजील झाला. मुग्धा अन् तिच्या घरचे मात्र गालातल्या गालात हसत होते. मुग्धा तिला म्हणाली.
” अगं विचारतेस का…जा ना..”
नकुल पुढे निघाला अन् नंदिनी त्याच्या मागे. दोघेही गाडीवर बसले आणि निघाले. गावात आल्यावर नकुलने एका जागी गाडी थांबवली अन् तिला म्हणाला.
” काय चाललंय तुझं… त्यांच्यासमोर का म्हणालीस सोबत येते म्हणून…घरी पण आधी येणार नाहीस असे म्हणालीस अन् नंतर यायला तयार झालीस…काय झालंय तुला…कधी तुला माझ्यासोबत यायला आवडत नाही आणि कधी यायचा हट्ट करतेस…आणि हा काय पोरकटपणा लावला आहेस तू…? सगळ्यांसमोर कशाला माझ्यासोबत यायचा हट्ट केलास…?”
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.
सुजाताच्या आयुष्याला पुढे कोणते वळण मिळेल…? नकुल आणि नंदिनीच्या मध्ये असलेला दुरावा कमी होईल का…? नंदिनी आणि नकुल मध्ये नेमके कोणाचे चुकतेय…? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.
आणि अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेजला भेट द्यायला विसरू नका.