” म्हणजे…तुमच्या मनात नक्की काय सुरू आहे बाबा…” रेवा ने विचारले.
” हेच की सुजाताशी सध्या गोड बोलून, चांगले बोलून तिचा विश्वास संपादन करावा आणि बाळ जेव्हा आपल्या हातात येईल तेव्हा तिला थोडे पैसे देऊन परत माहेरी पाठवायचे…” रेवा चे बाबा म्हणाले.
” काय…? पण ती जायला तयार होईल का…?” रेवा ने प्रश्न केला.
” तिच्या बापाला एकदा पैशांचे आमिष दाखवले की तो स्वतःच घेऊन जाईल तिला…मग तिचे काहीएक ऐकणार नाही तो…” रेवाचे बाबा म्हणाले.
” अन् आई…? आई तर एकदमच तिच्या जाळ्यात अडकली आहे…आईने तर पार डोक्यावर बसवले आहे तिला…” रेवा ने शंका उपस्थित केली.
” तुझ्या आईला मी समजावेन…हळूहळू ती सुद्धा आपले म्हणणे समजून घेईल…” रेवाचे बाबा रेवाला समजावत म्हणाले.
” पण बाबा…तुम्ही म्हणताय तसे तिने माहेरी जायला नकार दिला किंवा तिच्या बाबांच्या मनात आपल्या इस्टेटी बद्दल लालसा निर्माण झाली तर…ती हिस्सा मागायला सुद्धा मागेपुढे पाहणार नाही…आणि कोर्टाची पायरी चढली तर मग हे सर्व आणखीनच कठीण होऊन जाईल…” रेवा म्हणाली.
” हो…तू बोलतेस ते सुद्धा अगदीच खरे आहे…ही शक्यता ही नाकारता येत नाही…” रेवाचे बाबा विचार करत म्हणाले.
” तुम्ही एक काम करा ना बाबा…सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावरून कुण्या विश्वासू माणसाच्या नावावर करा…ते ही कुणालाही न कळू देता…म्हणजे उद्या तिने हिस्सा मागितला तरी तिचे काहीच चालणार नाही…” रेवा ने सल्ला दिला.
” बरोबर बोलत आहेस…तुला खरंच खूप काळजी आहे आपल्या घराची… प्रॉपर्टी कुण्यातरी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करायला हवी…”
रेवाचे बाबा विचार करत म्हणाले. मग काहीतरी सुचल्याने ते म्हणाले.
” अगं तू असताना कुण्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर कशाला करायला हवी… मी सगळं काही तुझ्या नाहीतर जावई बुवांच्या नावावर करून ठेवतो…नाहीतरी आमच्या नंतर हे सर्व तुझंच आहे…म्हातारपणी तूच आमचा आधार आहेस अन् आमच्या नंतर रवीच्या मुलाला सुद्धा तू चांगले सांभाळशिल ह्याची खात्री आहे मला…”
हे ऐकून तर रेवा आनंदाने फुलून गेली. तिला हेच तर हवे होते. तिच्या मते रवी नंतर तिच्या आई वडिलांच्या सगळ्या इस्टेटीवर तिचा हक्क आहे आणि तिच्या वडिलांनी सगळं काही तिच्या नावाने करण्याचा निर्णय घेतलाय म्हटल्यावर तर मग काही प्रश्नच येत नव्हता. रेवा मनातून खूप खुश झाली.
इकडे नंदिनी माहेरी आली होती पण तिचे सगळे लक्ष नकुल कडेच होते. आता तिला माहेरी करमत नव्हते. पण स्वतःहून घरच्यांना तरी कसे म्हणणार की मला इथे करमत नाही मला सासरी जायचे म्हणून. एकतर तिला यायला चार पाच दिवसच झाले होते. त्यात घरचे काही विषय काढत नव्हते आणि आत्या सुद्धा फोन करून स्वतः बोलवत नव्हती.
पण नंदिनीच्या मनाची चलबिचल उषाताईंना चांगलीच कळत होती. तिच्यात आणि नकुल मध्ये सगळं काही आलबेल नाही आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. नंदिनी स्वतःहून काही सांगेल असे त्यांना वाटले होते. पण घरी येऊन इतके दिवस झाल्यावर ही नंदिनी ने काहीच सांगितले नाही म्हणून मग उषाताईंनी स्वतःच नंदिनी शी बोलायचे ठरवले.
त्याच दिवशी रात्री सगळ्यांची जेवणे आटोपल्यावर उषाताईंनी शतपावली साठी म्हणून नंदिनी ला सोबत घेतले आणि बाहेर अंगणात आल्या. बाहेर आल्यावर त्यांनी सरळ तिला प्रश्न विचारला.
” काय ग नंदिनी…? तुझ्यात आणि नकुल मध्ये काही बिनसलंय का…?
” नाही आई…म्हणजे असे काही नाही…” नंदिनी म्हणाली. मग थोडा वेळ थांबून पुन्हा म्हणाली. ” पण तू असे का विचारत आहेस…तुला कोणी काही सांगितले आहे का…?”
” नाही…मला कुणी काही सांगितले नाही…पण मी स्वतः पाहतेय ना…”
” काय पाहत आहेस…?”
” तुमच्या दोघांमध्ये नवीन जोडप्यांमध्ये असते तशी अधीरता नाही…एकमेकांना भेटण्याची ओढ वाटत नाही…इतकेच नाही तर तुम्हाला कधी जास्त वेळ फोनवर बोलताना सुद्धा पाहिले नाही मी…”
” त..त..तसे काही नाही आई…ते आमचं नातं अजुन तसलं नाही ना म्हणून…म्हणजे आमचं जरा भांडण झालंय… म…म्हणजे भांडण नाही म्हणता येणार पण जरा वाद झालाय…” नंदिनी अडखळत म्हणाली.
” अगं नक्की काय बोलायचं आहे तुला…जरा स्पष्ट सांगणार आहेस का…?” उषाताईंनी विचारले.
मग नंदिनी ने तिच्या आईला तिच्या आणि नकुल च्या नात्याबद्दल सांगितले. हे सगळं ऐकून उषाताईंचे पार डोकेच गरगरले. त्या नंदिनीला म्हणाल्या.
” अगं पण तुम्ही असे का वागताय.. ? म्हणजे लग्नाला तर स्वतःहून तयार झाला होतात ना तुम्ही दोघं…मग काय झालं…?”
” हो…पण लग्न झालं त्या दिवशी तो मला म्हणाला की तुझ्या आई बाबांनी माझ्या आई बाबांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तुझं लग्न माझ्याशी लावलय…त्यानेच सांगितलं होतं की आपण फक्त कामापुरते बोलायचे…म्हणून…” नंदिनी म्हणाली.
” अगं त्यावेळी रागात असेल तो…म्हणून असे तोडून बोलला असेल तुझ्याशी…कधीकधी आपल्याला जे बोलायचं नसतं ते सुद्धा रागात बोलून जातो आपण…पण त्यानंतर त्याच्या वागण्या बोलण्यातून तुला कधी असे जाणवले का की त्याला तू किंवा तुमचे नाते नकोसे आहेत म्हणून…” उषाताईंनी विचारले.
” नाही…त्यानंतर तो कधीच तसा बोलला किंवा वागला नाही…” नंदिनी खाली मान घालून म्हणाली.
” मग… बरं तू मला एक सांग…तू तुझ्याबाजूने काय प्रयत्न केलेत या नात्याला पुढे नेण्यासाठी…?” उषाताईंनी विचारले.
” काहीच नाही…” नंदिनी ची आता आईकडे पाहण्याची हिम्मत होत नव्हती.
” नकुल ने कधी प्रयत्न केला का…? त्याने तुला बायको म्हणून स्वीकारले का…?” उषाताईंनी पुन्हा विचारले.
” नाही म्हणजे तो बरेचदा मला म्हणायचा की तू माझी बायको आहेस म्हणून…” नंदिनी ने स्पष्टीकरण दिले.
” अगं मग तू तुझ्याबाजूने का नाही प्रयत्न केलेत…? तुला आवडतो ना तो…?” उषाताईंनी थेट प्रश्न केला.
” हो…पण मी कशी काय स्वतःहून त्याच्याशी बोलणार …बोलायला पुढाकार तर त्याने घ्यायला हवा ना…” नंदिनी तोंडातल्या तोंडात पुटपुटली.
” अगं मग कधीतरी स्वतःहून पुढाकार का नाही घेतलास तू…नाती अशी चालतात का…? त्यानेही त्याच्या बाजूने प्रयत्न केला असेल पण तू लक्षच नसशील दिलं… तुझं आपलंच काहीतरी चालू आहे…तू त्या घरात चांगली रमली आहेस…सरलाताईंना आणि भावजींना त्यांच्या मुलीसारखी आहेस…ते खूप लाड करतात तुझे…
नकुल सुद्धा खूप चांगला मुलगा आहे…मग तुझ्या या वागण्याला काय अर्थ आहे…एका पद्धतीने हा त्यांच्या प्रेमाचा गैरफायदा घेणे नव्हे का…तुला अजूनही कल्पना नाहीये की नकुलच्या ऐवजी तुझे लग्न रवीशी झाले असते तर तुला काय काय भोगावे लागले असते…
सुदैवाने तुला नकुल सारखा चांगला नवरा मिळाला आहे पण तुला अजूनही त्याचे मोल नाही असे दिसते आहे… तू तुझ्या वागण्याने उगाच तुम्हा दोघांमध्ये गैरसमज निर्माण करते आहेस…पुढाकार नेहमीच पुरुषाने घ्यावा असा काही नियम नाही… ज्याला नातं टिकवायचं आहे त्याला पुढाकार घ्यावाच लागतो…
तू तुझ्या अशा वागण्याने तुम्हा दोघांच्या नात्यात दरी निर्माण करते आहेस…तुला जर अजूनही ह्याचं गांभीर्य कळले नसेल तर एकदा स्वतःशीच विचार करून बघ की नकुल पासून दूर राहून तू खुश राहू शकणार आहेस का…? मग तुला आपोआप सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील…” उषाताई म्हणाल्या.
आता मात्र नंदिनीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. आजवर घडलेल्या सगळ्या घटना एखाद्या माहितीपटासारख्या झरझर तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेल्या. तिच्या डोळ्यांत अश्रू पाहून उषाताईंनी तिला जवळ घेतले आणि म्हणाल्या.
” अगं रडतेस काय…मी फक्त समजावून सांगतेय तुला…कारण मला तरी तुझं हे असं काहीच न झाल्यागत अलिप्त राहणे पटले नाहीये…संसार असा करायचा नसतो बाळा…आपल्या सगळ्या नात्यांना जपावं लागतं…” उषाताई म्हणाल्या.
” आई…मला सगळं कळतंय तू काय म्हणते आहेस ते…पण आता बहुतेक खूप उशीर झालाय…” नंदिनी रडतच म्हणाली.
” अगं काय बोलत आहेस तू…उशीर झाला आहे म्हणजे काय…?” उषाताईंनी विचारले.
” त्याची एक मैत्रीण आहे…मुग्धा नाव आहे तिचं…तो सतत तिच्याशी हसून बोलतो…मनमोकळ्या गप्पा मारतो…माझ्याशी नाही बोलत तसा… तो माझ्यापेक्षा जास्त तिच्याशी प्रेमाने बोलतो…”
” म्हणजे…तुला काय म्हणायचं ते सरळ सांग…” उषाताई म्हणाल्या.
मग नंदिनीने सगळे काही तिच्या आईला सांगितले. मुग्धा आल्यापासून नकुल कसा वागतोय. आपण कसं वागतोय. काय काय घडलं ते सगळं विस्ताराने सांगितले.
क्रमशः
सुजाताच्या सासरे बुवांच्या मनातील सगळे हेतू पूर्ण होतील का…? सुजाता तिच्या सासूबाईंच्या साह्याने तिच्या आयुष्यातील अडचणींवर कशी मात करेल…? उषाताईंच्या मध्यस्थी ने नकुल आणि नंदिनी मधील गैरसमज दूर होतील का…?” जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.
©®आरती निलेश खरबडकार.