नंदिनी या लग्नाला तयार नाही आणि कधी नव्हे ती तिची आई सुद्धा विरोधात उभी आहे त्यामुळे नंदिनीचे लग्न रवीशी लावणे तिच्या बाबांसाठी जरा कठीण झाले होते. शिवाय नवरदेवाकडील मंडळी स्वतःहून मांडवातून निघून गेल्याने त्यांच्या मनातील ते ओझं जरा कमी झालं होतं. म्हणूनच मग त्यांनी सुनीलरावांच्या प्रस्तावाचा विचार करायचे ठरवले.
नंदिनीची आई तर आधीच तयार होती. त्यांनी नंदिनीला सुद्धा नकुलच्या बाबतीत समजावून आश्वस्त केले होते. आपल्यावर काहीही संकट आले तरी आपली आई आपल्या समोर कायम ढाल बनून उभी राहील ह्याचा आता नंदिनीला विश्वास होता. म्हणून ती सुद्धा या लग्नाला तयार होती.
प्रकाशरावांना सुद्धा पुढे होणाऱ्या बदनामीपेक्षा आज नंदिनीचे नकुलशी लग्न लावून देणे सोयीचे वाटत होते. सुनीलरावांनी स्वतःहून मागणी घातल्याने त्यांच्यासमोर आयुष्यभर लाचार बनून राहण्याची गरज सुद्धा नव्हती. नंदिनीच्या आईच्या मनाने होत असल्याने पुढे त्यांच्या लग्नात काही अडचण जरी आली तरी सगळी जबाबदारी तिच्या आईवर ढकलता आली असती.
पण राहून राहून शालूआत्याचा विचार सुद्धा येत होता. आपण आपल्या बहिणीच्या विरोधात जाऊन चूक तर नाही करत आहोत ना ही भावना सुद्धा मध्ये मध्ये डोकावत होती. पण यावेळी जे सगळ्यात जास्त सोयीचे तेच करायचे असे प्रकाशरावांनी ठरवले होते. म्हणून मग त्यांनी सुनीलरावांना होकार दिला. मग बाहेरच्या मांडवात पुन्हा एकदा लग्नाची तयारी सुद्धा होऊ लागली.
इकडे सरलाताई नकुल जवळ आल्या आणि त्याला म्हणाल्या.
” तुझ्या बाबांचा निर्णय तर तू ऐकताच आहेस नकुल..पण माझीसुद्धा मनापासून अशी इच्छा आहे की हे लग्न व्हावं…नंदिनी खूप चांगली मुलगी आहे…आपल्या घरात येईल तर आपल्या घराला शोभा येईल…”
” पण माझी तयारी नाहीये आता लग्न करायची…आणि तुम्ही लगेच तयार सुद्धा झालात…तुमचा स्वभाव चांगला आहे या गोष्टीचा फायदा घेत आहेत हे लोक…आधी त्यांना श्रीमंत मुलगा दिसला म्हणून त्याला न पाहता सुद्धा लग्नाला तयार झालेत हे लोक…आणि आता कळलय की तो दारुडा आहे तर नकार दिला…सगळं काही त्यांच्या सोयीने चाललं आहे आई… एवढीच काळजी होती तर आधी एकदा मुलगा पाहायला का नाही गेलेत हे लोक…” नकुल चिडून म्हणाला.
” असे नाहीये बाळा…माझा भाऊ आहे…मी ओळखते ना त्यांना… शालूच्या बोलण्याला भुलले आणि चूक करून बसले…आणि राहिली गोष्ट नंदिनीची तर ती लहान आहे वयाने…तिच्या शब्दाला आणि मताला किंमत आहे का मोठ्यांच्या समोर…” सरलाताई त्याला समजावत म्हणाली.
” जी मुलगी ऐन मांडवात आल्यावर आपला नकार देऊ शकते ती लग्न ठरण्याच्या आधी नाही का देऊ शकत…? उगाच ह्या सगळ्याचा भुर्दंड मला का…?” नकुल म्हणाला.
” हे बघ नकुल…कधी ना कधी तुझं लग्न होणारच आहे ना…मग ते आज का नको…आणि तुला जर एखादी दुसरी मुलगी पसंत असेल तर आत्ताच सांग…अन् तसे काही नसेल तर ह्या लग्नाला तयार होऊन जा…तुझ्या बाबांनी शब्द दिलाय त्यांना…आणि प्रसंग सुद्धा खूप नाजूक आहे…त्यांच्यावर नाही निदान आपल्या आई बाबांवर विश्वास ठेवून लग्नाला तयार हो…तुला या निर्णयावर कधीच पश्चात्ताप करायची वेळ येणार नाही ह्याची ग्वाही घेते मी…” सरला ताई म्हणाली.
त्यावर नकुल बराच वेळ गप्प राहील. त्यानंतर हळूच त्याच्या आईला म्हणाला.
” ठीक आहे…असे असेल तर मी तयार आहे…”
सरलाताईंना आनंद झाला. लगेच नकुलला तयार करायला लागल्या. थोड्याच वेळात बाहेर लग्न विधिंना सुरुवात झाली. लग्न विधी पार पाडताना अचानक उषाताईंना काहीतरी आठवले. त्या घरात गेल्या आणि रवीच्या घरच्यांनी नंदिनीला लग्नासाठी दिलेली साडी अन् दागिने घेतले.
बाहेर आल्या अन् त्यांच्या बहिणीच्या मुलाजवळ ते सगळं सामान दिलं अन् रवीच्या घरचे सगळे परत निघायच्या आधी त्यांना नेऊन दे म्हणून मारुती मंदिरात पाठवलं. लग्नच नाही झाल तर त्यांची ही ठेव आपल्या जवळ कशाला ठेवायची म्हणून.
खरे तर शालू आत्या असो वा नवरदेवाकडील मंडळी असो. प्रत्येकाला ठावूक होते की दागिने यांच्याकडेच आहेत अजुन. पण जाताना कुणीच मुद्दाम दागिन्यांचा विषय काढला नाही. कारण त्यांना वाटले होते की लग्न तर होणारच आहे म्हणून. नंदिनीचा मावसभाऊ मंदिराकडे जायला निघाला.
इकडे लग्नाच्या विधी होत होत्या. नंदिनी अगदीच शून्यात नजर ठेवून लग्नविधिंसाठी बसलेली होती. तर नकुल मात्र अजूनही मनातून धुसफूसत होता. त्याला अजूनही वाटत होते की त्याच्या साध्या भोळ्या आईवडिलांना ह्यांनी ह्यांच्या सोयीने वापरले आहे म्हणून.
तिकडे तो मावसभाऊ मंदिरात पोहचला देखील. तिथे त्याच्या ओळखीची फक्त शालूआत्या होती. तिला पाहून तो म्हणाला.
” आत्या…उषामावशीने तुमच्यासाठी हे पाठवलंय… मुलाकडच्यांना द्यायला सांगितलं आहे…”
त्याला पाहून शालू आत्याला मनातून आनंदच झाला. त्यांना वाटले की आधी हा आलाय आणि मागून बाकीचे घरचे येतीलच माफी मागायला. आपल्या चेहऱ्यावरील हा आनंद लपवून उगाच बेफिकीर असल्याचा आव आणत म्हणाल्या.
” काय दिलंय आता तिने…? आणि आता कशाला आमच्या मागेमागे येताय म्हणा…आम्हाला काही गरज नाही आता त्यांची…बस म्हणावं आता तुझ्या नंदिनी बाळाला आयुष्यभर घरात घेऊन…”
यावर काय बोलावं हे त्याला कळतच नव्हतं. तो तसाच तिथे उभा राहिला.
” बरं…कोण कोण येत आहात मागून…तुझी उषामावशी पण यायला निघाली असेल ना…” शालू आत्याने विचारले.
” नाही.. ते कशाला येतील…तिकडे लग्न चालू असताना त्यांना तिथेच थांबावे लागेल ना…त्यांनी फक्त हे दागिने अन् साडी पाठवली आहे…मावशी म्हणाली की आता त्यांच्याशी लग्न करायचीच काही गरज नाही तर त्यांचे दागिने परत करून ये…” तो म्हणाला.
त्याची गोष्ट ऐकून सगळ्यांनीच कान टवकारले. रवीचे आई बाबा, बहीण आणि तो स्वतः असे सगळेच जण त्याच्या आजूबाजूला येऊन उभे राहिले. रवीचे बाबा त्याला म्हणाले.
” काय रे…काय बोलत आहेस तू…? कुणाचे लग्न होत आहे…? आणि कुठे होत आहे…?”
” त्याच मांडवात लग्न होत आहे…नंदिनी आणि नकुलचे…” तो सहजपणे म्हणाला.
” काय…?” रवी जवळजवळ किंचाळलाच. ” असे कसे होऊ शकते…लग्न तर आमचं ठरलंय ना…दुसऱ्या कुणाशी तिचं लग्न कसं काय होऊ शकतं…?”
” हो ना… डोकी फिरलीत का त्यांची…? आणि हा नकुल कोण आहे…?” रवीच्या बाबांनी विचारले.
” ती सरला आहे ना माझी चुलत बहीण…तिचा मुलगा आहे…” शालूआत्याने सांगितले.
” तोच का जो रात्रीपासून आपली सोय पाहत होता…?” रवीच्या बाबांनी विचारले.
” हो तोच…” शालू आत्याने सांगितले.
” मूर्ख आहेत का हे लोक…त्याच्याशीच लग्न करायचं होतं तर आम्हाला कशाला बोलावलं इकडे…” रवीचे बाबा रागाने म्हणाले.
” अहो…तुम्ही इकडे बोलत काय बसलाय…? चला लवकर…हे लग्न थांबवूया…असे कसे ते दुसऱ्या मुलाशी लग्न लावू शकतात…” रवीची आई म्हणाली.
” नंदिनी माझी होणारी बायको आहे… चांगलं माझं लग्न होणार होतं तिथे…पण तुम्हीच मला मांडवातून इकडे आणलत…आता तुम्हीच माझं लग्न लावून द्या तिच्याशी…काहीही करा पण हे लग्न थांबवा…लवकर चला…” नंदिनीच्या लग्नाच्या बातमीने नशेतून खडखडीत जागा झालेला रवी म्हणाला.
” पण आता काही फायदा नाही…मघाशी मी आलो होतो तेव्हा लग्न तर जवळपास होत आलं होतं…आता तर झालं सुद्धा असेल…” नंदिनीचा मावसभाऊ म्हणाला.
यावर सगळेच चरफडले. आता सगळे जण लग्न मंडपाच्या दिशेने जायला निघाले. इकडे लग्न तर संपन्न सुद्धा झाले होते. आता कन्यादान सुरू होते. रवीच्या घरचे आले अन् मांडवात उभे राहून जोरजोरात ओरडू लागले. हे सगळं पाहायला एव्हाना आता सगळा गाव जमला होता.
प्रकाशरावांना तर मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. तिकडे लग्न होऊ शकलं नाही म्हणून रविचे आई बाबा मुलिकडच्यांना वाट्टेल ते अन् वाट्टेल तसे बोलत होते. ते तर इथवर म्हणाले की नंदिनी अन् नकुलचे आधीच काही प्रकरण चालू असेल. म्हणूनच ह्यांनी आम्हाला फसवून ऐन वेळेवर त्याच्याशी लग्न केले असेल.
असे एक ना अनेक आरोप सुरू होते. प्रकाशराव तर काहीच बोलत नव्हते. मग सरला ताई आणि सुनील राव स्वतःहून समोर आले. त्यांनी रवीच्या घरच्यांचा चांगल्या शब्दात खरपूस समाचार घेतला. सरला ताई त्यांना म्हणाल्या.
” इतका वेळ तुमचं भरपूर ऐकून घेतलं…पण आता जास्त बोलायचं काम नाही…तुम्ही आम्हा लोकांवर फसवणुकीचा आरोप करताय…मग तुम्ही जे केलं ते काय होतं…लग्नासाठी कुठला फोटो पाठवलात तुम्ही मुलाचा…आठवत नसेल तर मीच सांगते…” असे म्हणून त्यांनी उषाकडून घरचा फोन मागवून घेतला आणि त्यातील फोटो बाहेर काढून दाखवत म्हणाल्या.
” काय आहे हे…काही दिसतंय का…? आता मला सांगा…ह्या नवरदेवात आणि ह्या फोटोत काहीतरी साम्य वाटत आहे का…विचारलं तर म्हणे लग्नाच्या तयारीत होता म्हणून वजन जरा कमी झालं…जगात काय फक्त ह्याचच लग्न होत आहे का…बाकीचे नवरदेव नाहीत बदलत…”
आता मात्र रवीचे बाबा जरा सकपकले. मग त्याची आई म्हणाली.
” ती काही आमची चुकी नाही…ह्यांना मुलीची इतकीच काळजी होती आणि इतकाच सुंदर नवरा पाहिजे होता तर आधीच पाहून घ्यायचं असतं ना समोरासमोर…अन् मुलीची आत्या खूप दिवसांपासून ओळखते मुलाला…”
” तरीही तिने आमच्यापासून सत्य लपवून ठेवले हे आमचं दुर्दैव…पण यामुळे तुमची चूक कमी होत नाही…” सरला ताई म्हणाल्या.
क्रमशः
रवीच्या घरचे इतक्या सहजासहजी परत जातील का…? नकुल नंदिनीला स्वीकारेल का…? प्रकाशराव पुढे काय करतील…? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.
पुढील भाग इथे वाचा
निर्णय – भाग ९