रेवा घरी आल्यावर तिच्या बाबांनी तिच्या जवळ विषय काढला. पण आणि तिच्या सासूबाईंना कळू द्यायचे नव्हते म्हणून बाहेरच्या बागेत त्यांचे बोलणे सुरू होते. ते रेवाला म्हणाले.
” रेवा…मला तो नवीन हायवे च्या जवळचा प्लॉट विकायचा आहे…माझा एक मित्र त्यासाठी खूप चांगली किंमत देत आहे…मी सौदा पक्का करून घेतो…तुला फक्त खरेदीच्या दिवशी यावं लागेल सही करायला…”
” पण बाबा… तो तर मोक्यावरचा प्लॉट आहे…तो कशाला विकायचा… ” रेवा त्रासिक स्वरात म्हणाली.
” मोक्यावर चा प्लॉट आहे म्हणूनच चांगली किंमत मिळत आहे त्याला…आणि मागच्या काही दिवसात खूप जास्त खर्च झालाय…पुढे सुद्धा बराच खर्च होणार आहे…म्हणून विकायचा आहे…” तिचे बाबा म्हणाले.
” पण तो तर तुम्ही माझ्या नावाने केलाय ना…आणि मला नाही विकायचा आहे तो प्लॉट…” रेवा म्हणाली.
” तू काय बोलत आहेस रेवा…तुला कळतंय का…? तुझ्या नावाने का केली सगळी प्रॉपर्टी त्याचे कारण तुला माहिती आहे…मला पैशांची गरज आहे म्हणून विकत आहे…आणि की इतके वर्ष हे असले व्यवहार करतोय त्यामुळे मला माहिती आहे मी काय करतोय ते…आणि तू नकार कसा देऊ शकतेस…?” तिचे बाबा आश्चर्याने म्हणाले.
” हे बघा बाबा…तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही ते रवीच्या नावावर असणारे दुकान विका नाहीतर आईजवळ खूप सोनं आहे त्याने सध्या काम भागवा…पण माझ्या हिस्स्याची एकही वस्तू मी तुम्हाला अशी उधळू देणार नाही…” रेवा म्हणाली.
” अगं काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का…? तू अशी कशी करू शकतेस…तुला माहिती आहे ना तुझी आई सध्या कोणत्या परिस्थितीत आहे…आताच दवाखान्यातून घरी आली आहे…तिची काळजी करायची सोडून तू हिस्स्याची गोष्ट करते आहेस…तिचं स्त्रीधन विकायला सांगते आहेस…कशी मुलगी आहेस तू…” तिचे बाबा अविश्र्वासाने म्हणत होते.
” हो बाबा…कारण तुम्ही आता भावनिक होऊन त्या सुजाता वर अन् तिच्या बाळावर पैसे उधळून द्याल…आणि ह्यांना त्या जमिनीवर काहीतरी बांधायचे आहे असे म्हणाले होते ते…त्यामुळे मी तुम्हाला ती विकू देणार नाही…” रेवा ठामपणे म्हणाली.
” मला ती विकण्या साठी तुझ्या परवानगी ची गरज नाही…की स्वबळावर हे सगळं उभ केलंय…तुला फक्त प्रॉपर्टी सेफ राहावी म्हणून सगळं नावाने करून दिलंय…आणि तू तुझ्या वडिलांना स्वतःची मालमत्ता विकायला नकार देते आहेस…” तिचे वडील रागात म्हणाले.
” हो…कारण आता ती माझ्या नावाने आहे…आणि माझ्या नावावर असलेलं काहीच मी तुम्हाला विकू देणार नाही…तुम्हाला हवं असेल तर मी ह्यांच्याकडून काही पैसे घेऊन देईल तुम्हाला…पण प्लिज वायफळ खर्च नका करत जाऊ…” रेवा उपकार केल्यासारखे म्हणाली.
” रेवा…तू तुझ्या बापाला असे बोलत आहेस…तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही…” तिचे बाबा म्हणाले.
” बरोबरच बोलत आहे बाबा… वडिलांच्या सगळ्याच गोष्टीवर त्यांच्या मुलांचा अधिकार असतो…आणि रवी नंतर मी तुमचं एकमेव अपत्य आहे…तुम्ही माझ्या नावाने जे काही केलंय त्यावर माझाच अधिकार आहे…तुमच्या नंतर सगळं मलाच मिळालं असतं…तर मग आताच ते माझ्या जवळ आलंय तर मी का नाकारू…” रेवा बेफिकिरी ने म्हणाली.
” तू सरळ सरळ माझी फसवणूक करत आहेस…” तिचे बाबा म्हणाले.
” नाही बाबा…तुम्हाला कितीदा सांगायचं मी समजावून…मी जे काही करतेय ते योग्यच करतेय आणि आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच करतेय…हे त्या जमिनीचा एखाद्या चांगल्या व्यवसाय साठी उपयोग करतील आणि त्यांना फायदा सुद्धा होईल त्यात…त्यामुळे आता तरी मी तुम्हाला तो जमीन विकू देणार नाही…आणि फक्त ती जमीनच नाही तर कुठलीच गोष्ट विकू देणार नाही…” रेवा म्हणाली.
असे म्हणून रेवा तावातावाने तिथून निघून गेली. तिच्या बाबांनी डोक्यावर हात मारून घेतला. इस्टेट रेवाच्या नावाने करून आपण किती मोठी चूक केली ते त्यांना कळले होते. सुजाता ला ह्यातलं काहीच मिळायला नको ह्या हेतूने त्यांनी सगळं काही गमावलं होतं.
आपण दुसऱ्या बद्दल वाईट विचार केला तर आपल्या सोबत ही वाईटच घडतं हे आजवर त्यांनी नुसतं ऐकलं होतं. आज अनुभव सुद्धा घेतला. वर गेल्यावर रवी ला कोणत्या तोंडाने सामोरं जायचं ह्या विचाराने त्यांच्या डोक्यात धुमाकूळ घातला होता.
आज जेव्हा त्यांच्या बायकोसाठी, सुनेसाठी आणि होणाऱ्या नातवंडा साठी काहीतरी करण्याची वेळ आहे तेव्हाच आपले हात कफल्लक व्हावे ह्या विचाराने ते सुन्न झाले होते. ह्या वयात ते आता काही काम सुद्धा करू शकणार नव्हते. होते नव्हते सगळे रेवाच्या नावाने दिले होते.
ते विचारांच्या खोल गर्तेत बुडाले होते. समोर फक्त अंधकार दिसत होता. इतक्यात त्यांच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. त्यांनी चमकून वर पाहिले. तर तिथे सुजाता होती. तिला पाहून ते स्वतःला सावरायचा प्रयत्न करू लागले. जणू काही झालेच नाही. तिला ते कसे सांगणार होते की त्यांच्या पोटच्या मुलीने त्यांची एवढी मोठी फसवणूक केली आहे म्हणून.
ते काही बोलणार त्या आधी सुजाता च त्यांना म्हणाली.
‘ तुम्ही काहीच बोलू नका बाबा…काहीच स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आहे तुम्हाला…की सगळं ऐकलंय…”
” काय..? तू सगळं ऐकलं..?” सासरे बुवा आश्चर्याने म्हणाले.
” हो बाबा…आणि मला नाही वाटत ह्यात तुमची काही चूक होती…” सुजाता त्यांना समजावत म्हणाली.
” नाही ग पोरी…जे झालं त्यात सर्वस्वी माझी चूक होती…उद्या चालून तू या इस्टेटीवर हक्क सांगशील या भीतीने मी सगळं काही रेवा च्या नावाने केलं…आणि आता ती बापाला लाचार बनवू पाहतेय…म्हणते की पैसे पाहिजे असतील तर नवऱ्याला मागून देईल…पण वायफळ खर्च करायचे नाहीत…
वायफळ म्हणजे काय ग…आम्ही दोघेही नवरा बायको आधीपासूनच ऐशो आरामात जगत आलोय…आता या वयात काटकसरीने जगणे होईल का आमच्या ने…आधीच तुझी सासू आजारी आहे…खूप जास्त खर्च झालाय…आमच्या होणाऱ्या नातवंडासाठी खूप काही करायचे आहे आम्हाला…
रवीला आणि रेवाला केले त्यापेक्षा सुद्धा जास्त…आणि माझ्या प्रत्येक खर्च साठी मी तिच्या पुढे हात पसरायचे का आता…एवढी मोठी चूक मी काही काय करू शकतो…मला ना आता स्वतःचीच लाज वाटत आहे…” सुजाता चे सासरे म्हणाले.
” नाही बाबा…तुम्ही काही चुकीचे नाही वागलात… तुमच्या जागी इतर कुणी असते तर ते सुद्धा असेच वागले असते…” सुजाता म्हणाली.
” म्हणजे… माझं वागणं चुकीचं नाही असं म्हणायचं आहे का तुला…” सासरेबुवांनी विचारले.
” हो.. म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या तुम्ही चुकलेले असलात तरी भावनिक दृष्ट्या तुम्ही घेतलेला निर्णय वाईट नव्हता…आयुष्याच्या या वळणावर तुम्हाला सर्वात जास्त विश्वास तुमच्या रक्ताच्या नात्यावर असणे स्वाभाविक आहे…
त्यात रेवाताई तुमची मुलगी आहे…त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणे हाच पर्याय त्या वेळेला योग्य वाटला असेल तुम्हाला…पण रेवाताईंच्या मनात मात्र लोभ निर्माण झाला…पण त्यावेळी तुम्हाला ह्याची काही कल्पना नव्हती…
कोणत्याही बापाला आपल्या मुलाच्या बाबतीत अविश्वास वाटणे जरा कठीणच आहे…त्यामुळे तुम्ही एक वडील म्हणून योग्यच वागलात… इथे रेवा ताईंचे चुकत आहे…त्यांनी नात्यांपुढे पैशांना महत्त्व दिले…त्यामुळे तुम्ही एवढे वाईट वाटून घेऊ नका…” सुजाता म्हणाली.
” तुला वाईट वाटत नाहीये का…? मी तुझ्या होणाऱ्या बाळाला जे द्यायचं ते सुद्धा तिला दिले…तुला माझा राग नाही येत आहे का…?” सासरे बुवांनी आश्चर्याने विचारले.
” नाही बाबा…माझ्या बाळासाठी आणि माझ्यासाठी खरी संपत्ती तुम्ही दोघे आहात…त्याला फक्त अन् फक्त त्याच्या आहे आजोबांचे प्रेम हवे आहे…आणि मला तुमच्या दोघांची सोबत आणि आशीर्वाद…आज माझ्यात जी काही हिम्मत आली आहे ती फक्त अन् फक्त तुमच्या दोघांमुळे आली आहे…म्हणून तुम्ही अशी लगेच हार मानू नका…जे काही आपण गमावलंय ते आपण परत मिळवू शकतो…पण त्यासाठी आपल्याला असं हातपाय गाळून चालणार नाही…” सुजाता समजावत म्हणाली.
सुजाताच्या समजावून सांगण्यामुळे तिच्या सासर्यांची अपराधी पणाची भावना जरा कमी झाली आणि त्यांना थोडी उमेद मिळाली. आता हातपाय गाळून चालणार नव्हते. सासुबाई आता हळूहळू बऱ्या होत होत्या. त्यांना या सगळ्या घडामोडींबद्दल अजुन काहीच सांगितले नव्हते. त्या काळजी करतील म्हणून.
घरातील परिस्थिती पाहून आपल्याला बाबांची मदत करण्यासाठी काहीतरी करावे लागेल हे तर काहीतरी करावे लागेल हे सुजाता ला कळून चुकले होते. अचानक च तिला काहीतरी आठवले. ती सासरे बुवांकडे गेली आणि तिने त्यांना विचारले.
” बाबा… ह्यांच्यासाठी तुम्ही जी दुकाने घेतली होती ती अजूनही आपल्या जवळच आहेत ना…”
” हो…” सासरे म्हणाले.
” मग आपण पुन्हा दुकान सुरू नाही का करू शकत…?” सुजाता ने विचारले.
थोडा विचार करून तिचे सासरे म्हणाले.
” दुकान सुरू करायचं म्हणजे साधी गोष्ट नाही बाळा…त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील…तू या अवस्थेत जास्त धावपळ करणे बरोबर नाही…माझ्याच्याने काही होणार नाही अन् तुझ्या सासुबाई तर आता थोडफार चालायला लागल्या आहेत… आपल्याच्याने ही सगळी धावपळ होणे अशक्य आहे ग…”
” पण बाबा…काहीतरी करावे तर लागणारच ना…आणि आजकाल पैसे दिले की प्रत्येक काम आपण कमीत कमी कष्टात करून घेऊ शकतो…” सुजाता म्हणाली.
” त्यासाठी खूप पैसा लागेल…आणि आपल्याकडे आता एवढं पैसा शिल्लक नाहीये बाळ…” सासरे म्हणाले.
सासऱ्यांचे बोलणे ऐकून सुजाता थोडी निराश जरूर झाली. पण आपण काही ना काही नक्कीच प्रयत्न करू ह्या मतावर ती ठाम होती. मोठ्या प्रमाणावर नाही होऊ शकले तरीही लहान प्रमाणावर का होईना काहीतरी सुरू करायचे हे तिने ठरवले होते. त्यामागे आपण असताना आपल्या सासू सासऱ्यांना कधीच लाचारीने कुणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये हा एकच उद्देश होता.
आणि अंधारात आशेचा किरण सापडावा तसाच एके दिवशी रवीचा एक मित्र त्यांच्या घरी आला. आणि त्याने जे सांगितले ते ऐकून त्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने सांगितले की रवीने जेव्हा नव्याने दुकानाचे काम सुरू केले होते.
तेव्हा त्याने कुठूनतरी शेअर बाजाराबद्दल माहिती मिळवली आणि मित्रांच्या सल्ल्याने काही गुंतवणूक केली. नंतर इतर अनेक घडामोडींमध्ये त्या गुंतवणुकीचा त्याला विसर पडला. तो जेव्हा आजारी होता तेव्हा त्याचा तो मित्र त्याला भेटायला आला होता.
त्याने सांगितले की त्या शेअर्स ना आता खूप चांगला भाव आलाय. ती रक्कम कैकपटीने वाढलीय म्हणून. रवी आता या सगळ्यांच्या खूप पुढे निघून गेला होता. आपली शेवटची वेळ आलीय हे त्याने ओळखले होते. आणि त्याच काळात त्याला सुजाता सोबत केलेल्या अन्यायाची जाणीव सुद्धा झाली होती.
आपल्यानंतर सुजाताचे हाल होतील हे माहीत होते त्याला. अंथरुणावर खिळलेल्या अवस्थेत का होईना त्याला सुजाता साठी काहीतरी करायचे होते. तेव्हा रवीने त्याच्या मित्राला सांगितले की त्याला त्या शेअर्स साठी नॉमिनी म्हणून सुजाताचे नाव टाकायचे आहे.
मग मित्राने ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यात त्याला मदत केली. अशा प्रकारे त्याने सुजाता च्या भविष्यासाठी तजवीज करून ठेवली होती. ही रक्कम थोडीथोडकी नसून चक्क बावीस लाख एवढी होती.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.
रवीच्या या निर्णयावर त्याच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय असेल…? रेवाला जेव्हा हे कळेल तेव्हा ती काय करेल…? सुजाताच्या अडचणी यामुळे संपतील का…? जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचायला विसरू नका.
अशाच मराठी कथा वाचण्यासाठी मितवा या पेजला भेट द्यायला विसरू नका.