रवी ने सुजाता चा एवढा विचार केला होता हे माहीत झाल्यावर त्याचे आई बाबा कृतकृत्य झाले होते. आपला मुलगा मनाने वाईट नव्हता हे ते जाणून होते. फक्त व्यसनामुळे तो तसा बनला होता. पण स्वतःची जबाबदारी आणि कर्तव्ये त्याला आयुष्याच्या शेवटच्या घडीला सुद्धा ठावूक होते आणि त्याने आपले कर्तव्य बजावले सुद्धा.
तरीही जाताना त्याला ह्या गोष्टीची जाणीव सुद्धा नव्हती की त्याचं बाळ सुजाता च्या पोटात वाढत आहे. पण जबाबदारीची जाणीव झाली आणि त्याने ती पार पाडली ही त्याच्यातील माणूसपण आणि भावना जागृत असल्याचीच निशाणी होती. आज त्यांना आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता.
सुजाता तर हे सगळे ऐकून अगदीच धक्क्यात होती. रवी ने आपला एवढा विचार केला हे माहिती झाल्यापासून तिच्या मनात भावनांचा कल्लोळ माजला होता. रवीने मनापासून आपल्याला बायको मानले आणि आपल्या बाबतीत असणारी कर्तव्ये बजावायला त्याने मागेपुढे पाहिले नाही ही तिच्या साठी खूप मोठी गोष्ट होती.
तिला आता वाटायला लागले होते की आपल्या मनात दुकान पुन्हा सुरू करायचे आले आणि लगेच रवीने आपल्यासाठी ठेवलेले पैसे सुद्धा आपल्याला मिळाले ही परमेश्वराने आपल्याला दिलेली संधीच असावी. आपला प्रामाणिक हेतू आणि कष्ट करण्याची तयारी ह्यामुळे बरोबर वेळेवर ही रक्कम मिळाली.
त्यामुळे आता थांबून चालणार नव्हते. म्हणून सुजाताने तिच्या सासऱ्यांच्या मदतीने दुकान सुरू करायची तयारी सुरू केली. दुकानाला नवीन रंग देण्यापासून सगळंच करायचं होतं. ह्यांची तयारी सुरू झाली. त्या दुकानात काम सुरू आहे ही बातमी कुठूनतरी रेवा च्या नवऱ्याला माहीत झाली. त्याने रेवा कडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्याला म्हणाली.
” करून करून काय करतील…एवढी मोठी दुकान सुरू करायची म्हणजे खूप पैसा लागेल…आणि आता बाबांच्या जवळ एवढा पैसा नाहीये…मला म्हणत होते की त्या नवीन बायपास जवळचा प्लॉट विकायचा म्हणून…मी म्हटलं की मी नाही विकू देणार म्हणून…”
” काय…? तू अशी बोललीस त्यांना…” तिचा नवरा म्हणाला.
” हो…” तिने सांगितले.
” अगं पण तू नकार का दिलास…?” नवऱ्याने प्रश्न केला.
” कारण त्या प्लॉट ला चांगली किंमत मिळेल पुढे आपल्याला…आणि जर तो प्लॉट बाबांनी माझ्या नावावर केलाच आहे तर मी कशाला विकू देऊ…” रेवा म्हणाली.
” अगं…त्या एका लहानशा प्लॉट च्या तुकड्यापायी तू आपलं किती मोठं नुकसान करत आहेस ते तुला कळत नाही का..?” तिचा नवरा म्हणाला.
” म्हणजे…” रेवा ने विचारले.
” अगं अजूनही तुझ्या बाबांचं घर आणि रवीच्या नावाने असलेली दुकाने त्यांच्याकडेच आहेत…या काही लाखांच्या प्लॉटसाठी तू करोडो रुपयांच नुकसान करत आहेस…” तिच्या नवऱ्याने सांगितले.
” ते कसं काय…?” रेवा ने प्रश्न केला.
” अगं तुझ्या बाबांचं घर आज कमीत कमी दीड दोन कोटींचे असेल…आणि दुकाने सुद्धा एकाच लाईन मध्ये चार आहेत…ते सुद्धा अटॅच…त्यांची किंमत सुद्धा कोटींच्या घरात आहे…आणि तू काही लाखांच्या प्लॉट साठी त्यांना नकार देऊन नाराज केलेस…एक नंबरची मूर्ख बाई आहेस तू…निदान मला तरी विचारायचे असतेस…” नवरा म्हणाला.
” मला हे सुचलेच नाही…” स्वतःच्या मूर्खपणावर नाराज होत रेवा म्हणाली.
” जा…जाऊन माफी माग तुझ्या बाबांची…आणि पाहून ये दुकानाला रंग वगैरे कशासाठी देतायत ते…” तिचा नवरा म्हणाला.
मग रेवा सुद्धा विचारात पडली. तिला तिच्या नवऱ्याचे म्हणणे पटले होते. मग तिने सुद्धा वेळ न दवडता दुसऱ्याच दिवशी माहेर गाठले. समोर आईला पाहून तिला एकदमच बिलगली. कोणत्याच गोष्टीची कल्पना नसलेली तिची आई तिला म्हणाली.
” काय ग रेवा…यावेळी खूप दिवसांनी चक्कर मारलास…सगळं ठीक आहे ना घरी…?”
” हो ग आई…सगळं ठीक आहे…मुलांच्या परीक्षा सुरू होत्या म्हणून वेळ मिळाला नाही…पण तुम्हाला कुठे माझी जास्त गरज आहे आता…सुजाता असली की माझी आठवण पण येत नाही तुम्हाला हल्ली…” रेवा लाडिकपणे म्हणाली.
” नाही ग…आमच्या साठी जशी सुजाता तशी तू…दोघीही मुलीचं आहेत ना आमच्या…” तिची आई तिला म्हणाली.
ह्यांचा हा संवाद सुरू असताना तिथे रेवा चे बाबा सुद्धा आले. त्यांना पाहून रेवा म्हणाली.
” कुठे गेला होतात बाबा…?”
त्यांना तर रेवाचा खूप राग आला होता. तिच्याशी बोलायचा इच्छा सुद्धा नव्हती. पण तिच्या आईसमोर तसे न दाखवता ते म्हणाले.
” अगं बाहेर दुकानात गेलो होतो…जरा काम सुरू आहे दुकानात…”
” दुकानात..? म्हणजे आपल्या दुकानात का…?” रेवा ने विचारले.
” हो…रवीच्या दुकानात काम सुरू आहे…?” रवीच्या दुकानात हा शब्द मुद्दाम उच्चारत ते म्हणाले.
” कसलं काम… काय करणार आहात तुम्ही ?” रेवा ने विचारले .
” दुकान पुन्हा सुरू करणार आहोत…?” बाबांनी उत्तर दिले.
” अहो पण कशाला बाबा…? आणि तुम्हाला या वयात झेपेल का हे…?” रेवा ने विचारले.
” कशाला म्हणजे काय…? आणि की एकटा नाही आहे…सुजाता सुद्धा आहे सोबतीला…मुळात ही कल्पना तिचीच आहे…” बाबांनी माहिती दिली.
” काय…?” रेवा मोठ्याने ओरडतच म्हणाली.
” अगं इतकं नवल वाटायला काय झालं…? सुजाता खूप मेहनती मुलगी आहे…आणि ह्यांचा एवढ्या वर्षांचा अनुभव कामी येईलच ना…” तिची आई म्हणाली.
त्यावर रेवा कसनुशी हसली. मग काहीतरी आठवून तिच्या बाबांना म्हणाली.
” बाबा…सुजाताला या अवस्थेत किती दगदग होईल हे सांभाळण्यात…त्यापेक्षा तुम्ही आमच्या ह्यांना का नाही सोबतीला घेत…त्यांना तर खूप अनुभव आहे या सगळ्यांचा…मी तर म्हणते अशाने तुम्हाला काम करायची सुद्धा गरज पडणार नाही…ते सगळं स्वतःच सांभाळतील…”
” नको…” बाबा रागातच म्हणाले. त्या सरशी रेवाच्या आईने त्यांच्याकडे पाहिले. मग ते त्यांची बाजू सावरत म्हणाले. ” अगं त्यांना कशाला त्रास…आणि सुजाताला काहीतरी करून पाहायचे आहे आणि आम्ही फक्त तिला साथ देतोय…”
” हो ना…आणि रवी ने तिच्यासाठी जे पैसे ठेवलेत ते कसे आणि कुठे गुंतवायचे हे तिलाच ठरवायला हवे…आणि तिला ते हयात गुंतवायचे आहेत…” आई म्हणाली.
” रवीने पैसे ठेवलेत…म्हणजे काय ?” रेवा ने विचारले.
” अगं म्हणजे रवीने त्याच्या शेअर मार्केट मध्ये गुंतवलेले पैसे सुजाता च्या नावावर ठेवले होते…शेअर चांगल्या किमतीत विकल्या गेले आणि एक चांगली रक्कम मिळाली त्यातून…” आईने सांगितले.
” किती रक्कम मिळाली…?” रेवा ने विचारले.
” बावीस लाख…” आईने सांगितले.
” बापरे ! बावीस लाख…?” रेवा डोळे विस्फारत म्हणाली.
” हो…” आई म्हणाली.
” बरंय…सुजाता ची तर लॉटरी च लागली…नाहीतर एवढी मोठी रक्कम बसल्या बसल्या मिळाली असती का तिला…इकडे ह्यांना सुद्धा नवीन व्यवसायात पंधरा वीस लाखांची गरज आहे…पण जाऊ देत…आम्ही करू कुठून तरी व्यवस्था…पाहू कुणी उधार दिलेत तर…” रेवा म्हणाली.
रेवाचे बोलणे तिच्या बाबांच्या बरोबर लक्षात येत होते. एवढं सगळं मिळाल्यावर ही तिची नजर सुजाताच्या पैशांवर आहे हे त्यांना कळले होते. पण आता ते ही सावध झाले होते. ते काहीच बोलले नाहीत. तिची आई सुद्धा यावर काहीच बोलली नाही.
रेवा ला वाटले होते की आई बाबा आपल्याला गरज आहे हे कळताच दुकानाचा प्लॅन वगैरे गुंडाळून आपल्याला पैसे देण्याबद्दल सुजाता वर दबाव टाकतील. पण तिला वाटले तसे काहीच झाले नाही. आई तर आधीच सुजाता च्या बाजूने झाली होती आणि बाबांना तर आपण स्वतःहून च दूर लोटले. आता तिला तिच्या वागण्याचा खूप पश्चात्ताप होत होता. तसेही दुकान जर चांगले चालले तर सुजाता चा फायदा होईल आणि दुकान ही रवीच्या नावावरून आपसूकच तिच्या नावाने होईल ह्याची रेवा ला मनापासून भीती वाटत होती. तिने तिच्या आईला आडून आडून समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण आई मात्र सुजाताच हे करेन आणि तिला नक्कीच जमेल ह्या निर्णयावर ठाम होती. मग तिने बाबांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर ते तिला म्हणाले.
” मला माहिती आहे की मी तुला जेवढं दिलं त्याने तुझे समाधान झाले नाही म्हणून…तुला आणखी हवंय… तुझी नजर आता रवीच्या पैशांवर सुद्धा आहे…पण आता हा बाप फसणार नाही…मी चांगलच ओळखलं आहे तुला…माझ्यावर आलेल्या परिस्थितीने मला चांगल्या अन् वाईटाचा फरक स्पष्ट कळायला लागलाय…”
” तुम्ही मला चुकीचं समजताय बाबा… मी तर तुमच्याच फायद्यासाठी बोलत होते…ह्यांनी एक नवीन प्रोजेक्ट हाती घेतला आहे…हायवे जवळ एक शेत आहे…ते विकत घेऊन तिथे प्लॉट पाडणार आहेत…कमी गुंतवणुकीत खूप फायदा होणार आहे…तुम्ही काही पैसे दिले असते तर तुम्हालाच रक्कम वाढून मिळाली असती…” रेवा म्हणाली.
” आम्हाला नको…आम्ही आमचं आमचं बघून घेऊ…आणि तुझ्या आईला मी अजून तुझ्या बाबतीत काहीच सांगितलेलं नाही आहे…त्यामुळे मी तेव्हा तुला काही बोललो नाही…पण म्हणून मी सगळं झालं गेलं ते विसरलो आहे असे नाही…” तिचे बाबा म्हणाले.
आता मात्र रेवा काहीच बोलू शकली नाही. ती तशीच पाय आपटत तिथून निघून गेली. थोड्याच दिवसात दुकान पुन्हा सुरू झाले. सुजाता सगळी व्यवस्था पाहत होती. तिने दुकानाच्या निमित्ताने एक नवीन सुरुवात केली होती.
तिच्या दुकानात तिने सगळ्याच बायका कामावर ठेवल्या होत्या. एकही पुरुष नव्हता. या मागे तिचा विचार खूप वेगळा होता. तिच्या मते बायकांनी सगळ्याच क्षेत्रात काम करायला हवे. मग ते मोठ्यातले मोठे असो वा लहानात लहान. तिच्या छोट्याश्या शॉपिंग कॉम्लेक्स मध्ये तर बायका आरामात सगळं काही सांभाळू शकतील असा तिला विश्वास होता. तिचे सासरे मात्र याबाबत जरा साशंक होते पण तिला तिचे प्रयत्न करू द्यायचे हे सुद्धा त्यांनी ठरवले होते.
मात्र सगळ्या कामांसाठी बायका शोधताना तिची जरा दमछाक झाली. इतर कामांसाठी बायका मिळाल्या पण ऑनलाइन येणाऱ्या ऑर्डर पोहचवण्यासाठी लेडी ड्रायव्हर लवकर मिळत नव्हती. पण एक पंचविशीतली तरुणी तयार झाली. पण शेवटी सगळं काही व्यवस्थित सुरू झाले.
सुरुवातीला दुकानात काही विशेष ग्राहकांची गर्दी नव्हती. पण हळूहळू गर्दी वाढू लागली. दुकानात सगळीच कामे बायका करतात हे कळल्यावर लोकांमध्ये ही कुतूहल जागृत झाले. म्हणून मग तिने तिच्या सासूबाईंना ही दुकानात मदत म्हणून बोलावून घेतले. या मागचा उद्देश्य म्हणजे त्यांना एकटेपणा न जाणवता त्यांचं मन रमावं हा होता.
हळूहळू दिवस पुढे जात होते. दुकानाची घडी आता व्यवस्थित बसली होती. त्यांनी ऑनलाईन ऑर्डर घेण्यासाठी स्वतःचे एक ॲप सुद्धा तयार केले होते. त्याचे काम सुद्धा बायकाच सांभाळायच्या. सुजाताच्या सासऱ्यांना तर हे पाहून नवल वाटायचे. कारण बायकांना एकत्र एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी पहिल्यांदाच पाहिले होते.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.
सुजाताची ही नवी सुरुवात एका नवीन बदलाची नांदी असेल का…? रेवा एवढ्यावरच थांबेल का…? सुजाता च्या आयुष्यात पुढे काय होईल…? हे जाणून घेण्यासाठी निर्णय या मराठी कथा चा पुढील भाग वाचायला विसरू नका.